पुर्वप्रकाशित लेख 'सह्याद्रील्या कुशीतली भटकंती' -
लोकप्रभा अंक : ४ सप्टेंबर २०१५,पान क्र . ६९ च्या पुढे
गेल्या आठवड्यातच अंधारबनला जाऊन आलो. पुण्याच्या अगदी जवळ पाठमोऱ्या ताम्हिणी घाटाजवळ वसलेल्या दाट जंगलात मनमुराद भटकंती अनुभवली. आतापर्यंत आडवाटेवरचा मानल्या गेलेला सह्याद्रीच्या धारेवरच्या पायगाडीचा हा प्रवास पुन्हा एकदा मनात घर करुन गेला. या प्रवासातले प्रवासी मात्र सगळ्या प्रकारात मोडणारे ! अगदी नेहमीच्या भटक्या मित्रांपासुन चिमुकल्या सह्यमित्रांपर्यंत पाच-एक डझनाचा गट घेऊन अंधारबन ते कोंकणातल्या भिरा धरणापर्यंतची वर्षासहल जोरात पार पडली. सुरवातीस पाऊस उदार होता पण नंतर मात्र त्याने जी काय पळी दिली ती ट्रेक संपला तरीही तो भेटलाच नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाटेत काडीचाही केर न करता,आरडाओरड न करता जवळपास १४ किमीचा ट्रेक यशस्वी झाला. अजुन एक, विशेष अभिनंदन प्रसादचं ! स्टोक कांगरी शिखर सर करुन आदल्या रात्रीच लेहवरून पुण्यात पोहोचलेला हा पठ्ठया अंधारबनचा ट्रेक लिड करायला सकाळीच हजर होता. क्या बात !! पहाटे पुण्यातून निघालेल्या गाड्या पिंप्रीच्या पाझर तलावाजवळ पोहोचल्या पोहोचल्याच योगीला विचारलेल्या प्रश्नाने आमचा अंधारबन ते खडसांबळ्याचा ट्रेक डोळ्यांसमोर तरळून गेला. काय योगी ? आठवतो का चना मसाला ? "हो ना, त्या खोपट्याजवळच पेटवली होती चुल", तीही वदली. बाकी तंगडतोड भारीच झाली होती म्हणा. आणि हो,अशा ट्रेकमध्येच भटकण्याची खरी मज्जा,घाटवाटा म्हटल्या की आमचा हा फार मोठा वीकपॉइंट बरं का !