वनदुर्ग किल्ले वासोटा - नागेश्वरची अद्भुत गुहा

कोयना (शिवसागर) जलाशय
All the photos and content © Sandip Wadaskar

कधी स्वित्झर्लंडला गेलात का हो ? मग तुम्हाला युरोपियन लेक डेस्टीनेशन माहितीच असेल नाही ? चहूबाजूंनी हिरवाईने नटलेले सुंदर छोटे-मोठे तलाव, स्वच्छ नितळ पाणी ज्याच्यामध्ये डोकावुन पाहिलं तर अगदी मासे काय खाताहेत, हे स्पष्ट दिसावं ! अशा तलावामध्ये बोटीतुन मस्त पैकी एक लांब फेरफटका मारायला मिळाला तर !! कल्पनाच किती सुखद  वाटते नाही ? तर त्यासाठी तुम्हाला स्वित्झर्लंडला जायची काय गरज, मी पण नव्हतो गेलो. कारण असेच एक लेक डेस्टीनेशन आपल्याला पुण्याहून अगदी साडेतीन तासाच्या अंतरावर वसलेलं आहे. ऐतिहासिक सातारा शहरापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या कोयना धरणाचा अथांग जलसाठा म्हणजेच आपलं महाराष्ट्रीयन लेक डेस्टीनेशन ! आता सांगा युरोपात जायची काय गरज ! चला तर मग निघुया, कोयनेच्या अथांग पाणलोटामधुन बोटीचा आनंद घेत वासोट्याच्या जंगल सफारीला . 
सातारा शहरातुन उजव्या बाजुला वळालो की निसर्गाने आपल्या ताटात आज काय वाढुन ठेवले असेल याची कल्पनाच करवत नाही. पावसाळ्यात निसर्गाची मुक्तहस्ते उधळण पहायची असेल तर एक वेळ भेट द्यायलाच हवी .कास पठाराकडे जाणारा डोंगरी भिंतीवरील गुळगुळीत डांबरी रस्ता , साद घालणाऱ्या सह्यरांगा , दोन्ही बाजुंना जांभूळपुरा आणि कन्हेर धरणाचं फ्रेम मध्ये जीव ओतणारं पाणी , आजुबाजुचा कुंद गारवा आणि निसर्गरम्य कास तलाव पहिल्याच भेटीत प्रेमात पाडतो. पाठीराखा अजिंक्यतारा काही वेळ साथ करतो नंतर तोही निघुन जातो.  हा निसर्ग जगतच,वेडाच्या भरात आपण आपली गाडी दामटतो आणि थेट येऊन धडकतो ते टेटली या छोटाश्या गावात.
असाच गेल्या वर्षी (२०१३) पावसाळा संपता संपता मी आणि सचिन जाऊन धडकलो सचिनच्याच टेटलीच्या हॉटेल जलतारा मध्ये. मनसोक्त फोटोग्राफी ची इच्छा बाळगुन दाखल तर झालो होतो,पण पावसाचा वाढलेला मुक्काम पाहता भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त होती. असो बघूया तर काय होतं ते, थोड्याच वेळात आमच्या WTA चा ग्रुप हजर झाला. जेवणं वगैरे आटोपुन नेहमीप्रमाणे शेकोटीभोवती बसलो चाकोट्या करत. आता वेळ होती ती ओळख समारंभाची आणि काही महत्वाच्या सूचनांची . सगळ्यांनी आपापले आत्मचरित्र थोडक्यात कथन करून कार्यक्रम आटोपला. मग एकमेकांवर टिचक्या,गमती-जमती,प्रत्येकाचे ट्रेकिंग अनुभव,गप्पा-टप्पा वगैरे वगैरे सगळे रंग उधळुन सर्व जण पांगले आणि झोपेच्या अधीन झाले. मी पण आपलं वरूण राजाकडे छोटंसं गाऱ्हाणं टाकुन झोपी गेलो की "बाबा , उद्या थोडीफार उघड्झाप होऊ दे !"
पण नाही राजा ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. अख्खं गाढ विश्व पहाटेच्या साखरझोपेत असताना दणकून बरसला,मग बाहेर झोपणाऱ्यांची त्रेधातिरपीट आणि नुसती धावपळ, सगळा नूरच पालटला. पटापट आवरलं. वाफाळलेला चहा आणि "वर्ल्डस बेस्ट सेलिंग" बिस्कीट घेऊन बसलो कोयनेच्या काठावर बोटची वाट पाहत. बोट आली,बामणोलीला वनविभागाची परवानगी वगैरे सगळे सोपस्कार पार पाडत असताना एक म्हातारा बोटचालक उद्गारला "चुन्याची डबी,तंबाखू घेतला ना? , क्षणभर माझ्या डोळ्यांसमोर "तळहातावर मी स्वतः तंबाखू चोळतानाचा प्रसंग उभा राहिला " नाही आता जाल, परत येताना अर्धा किलो रक्त कमी करून याल !! " डोक्यात लगेच ट्यूब पेटली ,"जळु !!!!!" .मनात शंकेची पाल चुकचुकली,"नाही बाकीचे तर दिसताहेत हट्टेकट्टे,पण माझं काय ? अर्धा किलो इथेच गेल्यावर, पुढल्या ट्रेकला कसं व्हायचं ?? " चार-पाच चुन्याच्या डब्या खिशात घालुन सुरु झाला कोयनेच्या अथांग जलसागरातून किल्ले "वासोट्याचा अविस्मरणीय प्रवास ! आता येथुन पुढे दीड तास नो त्रास ! शब्दशः पायाला त्रास न देता अनुभवता येणारा निळाई-हिरवाईने नटलेला भन्नाट निसर्गराजा. जपानी बनावटीच्या डीझेल इंजिनचा आवाज थोडा वाढला आणि अंगात उत्साह संचारल्यासारखं एवढाश्या बोटेत प्रत्येक जण सैरभैर व्हायला लागलं. फोटोवेड्यांना हा अँगल,तो अँगल, कुठला अँगल घेऊ अणि कुठला सोडु असं होऊन गेलेलं आणि निसर्गवेडा आपला शांतपणे इथली प्रत्येक फ्रेम डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करीत होता. दोन्ही बाजूनी घनदाट, हिरवीगार जंगलं आणि नशिबाने पाऊस नसेल तर पाण्यात पडणारे वृक्षवल्लीचं प्रतिबिंब म्हणजे एक विलक्षण सुखप्राप्तीच ! आणि मला विचाराल तर या सुखप्राप्तीसाठी मी वासोट्याला असंख्य वेळा येऊ शकतो, आताही बहुदा माझी सहावी वेळ असेल. 


पहिल्यांदा आलो होतो ते गिरीदर्शन सोबत. त्यानंतर मग चांगला-जिवाभावाचा वेगळाच ग्रुप तयार झाला,मग येतच गेलो. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन अनुभव येत गेले,प्रत्येक वेळी या प्रतिबिंबाची नव-नवीन फ्रेम डोळ्यात साठवत गेलो,पण यावेळेस वरूण राजाच्या अवकृपेने मनासारखी फ्रेम काही गाव ना झाली होती. असो. तर असाच बोटीचा अर्धा प्रवास सरत आलेला असतो आणि उजव्या बाजुला कोयनेचा पाट आत घुसलेला आढळतो. इथे कोयनेला कांदाटी येऊन मिळते,येथुन आपण सरळ गेलो की चकदेव,पर्वत,महिमंडणगड डोंगरसखे भेटतात. आपला प्रवास वासोट्याकडे सुरु असतो,थोड्याच वेळात किल्ले वासोटा महापराक्रमी राजासारखं आपलं प्रतिबिंब जलाशयात न्याहाळत बसलेला दिसतो. हेच त्याचं होणारं पहिले दर्शन. इथेच बोटीचा प्रवास सार्थक झाल्यासारखा वाटतो. डोंगरउतारावर असलेल्या दोन-दोन,तीन-तीन झोपड्यांच्या वाडीचे,जंगलात बांधलेल्या मचाणाचे, कुठे पावसाळी पाणी ओसरून वर आलेल्या छोट्या-मोठ्या बेटांचे कौतुक करत आपण मेट इंदवलीस दाखल होतो. हे खरं किल्ले वासोट्याचं पायथ्याचं गाव ,पण कोयना धरण झाल्यापासुन दुसरीकडे वसवलं आहे.आधीच दुर्गम असलेल्या जावळीच्या खोऱ्यातला हा अतिदुर्गम वासोटा कोयनेच्या पाणलोट प्रकल्पामुळे आणि व्याघ्रप्रकल्पामुळे थोडाफार सुरक्षित आहे. पण अलीकडच्या काळात इथे येणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली आहे. मेट इंदवलीस दाखल होणारे हे साधारण ३ प्रकारात मोडतात. पहिलं म्हणजे बोटीचा आनंद घेऊन परत फिरणारे, दुसरं म्हणजे गिर्यारोहक जे वासोटा करायला आलेले असतात ते आणि तिसरे म्हणजे आम्ही, जे पाय फुटेस्तोवर वासोटा-नागेश्वर एकाच दिवशी जवळ करणारे.
बोटीमधून पायउतार होऊन आपण वनविभागाच्या कार्यालयात येऊन थांबतो, इथे आलेल्यांचा आणि प्रत्येकाजवळ असलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा,पिशव्यांचा आकडा नोंदवला जातो. आणि परत आल्यावर तो आकडा सारखाच असला पाहिजे,बरं का!. कमी झालेला चालत नाही,जास्त झालेला चालतो,किंबहुना त्यासाठी आपण प्रयत्नच करायला पाहिजे. असो तर एकदाचं आपण वासोट्याच्या घनदाट जंगलात शिरतो. झपाझप पावले टाकीत मारुती-गणेशच्या उघड्या देवळापाशी पोहोचतो, जवळच असलेल्या तेवढ्यात मागुन कुणीतरी किंचाळतं. मागे वळुन पाहतो तर जळवांनी धुमाकुळ घातलेला होता,जळ्व्यांनी म्हटल्यापेक्षा उगाच बॉउ करणाऱ्या त्यांनीच(??) गोंधळ घातला होता, आता बिचारे जळू तरी काय करणार ?  वर्षाकाठी तीन चार महिन्यांचा त्यांचा मुक्काम,घेतात आपली पोटं फुगवुन !! मग चुना-तंबाखू वगैरे लावुन कुणाच्या पायावरचे,कुणाच्या शूजमधले सैनिक बाजुला करून मोहीम पूर्ववत आली आणि तिकडे लक्षं न देता चालत राहण्याची सूचना देऊन आम्ही नागेश्वर फाट्याजवळ पोहोचलो. आता येथुन डावीकडे वासोटा २० मिनिट आणि उजवीकडे नागेश्वर दीड तास ! पुन्हा एकदा घनदाट जंगलात शिरलो. या रानात वनविभागाने सगळीकडे विविध पक्ष्यांच्या,प्राण्यांच्या,वनस्पतींच्या माहितीपर फलक लावलेत. इतर महत्वाच्या सूचना पण लावलेल्या आहेत. या सूचना फक्त वाचण्यासाठी नसुन पाळण्यासाठी आहेत याची प्रत्येकाने खबरदारी घ्यायला हवी. आता गदारोळामुळे सगळेच दिसतील याची शक्यता नसली तरी,आपण निदान आवाज न करता जंगलातली शांतता राखुन निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. असेलच नशीब चांगलं तर एखादं किडुक-माडूक स्पॉट करू शकतो. वासोट्याची वाट जरी रुंद झालेली असली तरी सुर्यकिरणे इथे जमिनीला स्पर्श करू शकत नाही एवढी झाडांची दाटीवाटी आहे. 



येथुन १० मिनिटात पहिल्या उघड्या-बोडक्या माथ्यावर येउन पोहोचतो आणि शिवसागर जलाशयाचा आणि आजूबाजूच्या डोंगरी रांगांचा भव्य-दिव्य नजारा आपली वाटच पाहत असतो. डोक्यावर येणाऱ्या सूर्याला न जुमानता एकटक पाहत उभे राहतो, एवढ्या घनदाट जंगलातली ही वाट चढुन आल्याचं सार्थक वाटतं आणि पाच मिनिटात पडक्या पायऱ्या आणि ढासळलेले दरवाजे चढुन आपण गडमाथा गाठतो. माथ्यावर पोहोचल्या पोहोचल्याच पुढ्यात असलेल्या हनुमान मंदिरासमोर आपली बसकण मारतो. तहान लागलेली असते,भुकेचे आगडोंब उसळलेले असतात. ते शांत करून मग किल्ल्याविषयी थोडी चर्चा सुरु होते. वासोटा ! छत्रपतींनी मोठ्या प्रेमाने व्याघ्रगड असे नामकरण करून गौरवलेला. महाबळेश्वर डोंगर रांगेतला एक अति दूर्गम वनदुर्ग. उगवतीला कोयनेचं विशाल खोरं आणि मावळतीला सह्यपर्वताचे बेलाग कडे. तिकडून डोळ्यात नं मावणारे तळकोंकणाचं अफाट सौंदर्य. असा हा निबिड अरण्याचा राजा प्रत्येकाने एकदा तरी जवळ करावा असाच. 
 भक्कम इतिहासाचा साक्षीदार -किल्ले वासोटा 
 कोल्हापूरच्या शिलाहारवंशीय भोजराजाकडून वाहीवाटीनी शिर्के-मोरे यांच्याकडे आला . मोऱ्यांचा पाडाव-अफझल खान वध झाल्यानंतर महाराज पन्हाळ्यात अडकले असताना मावळ्यांकडून हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला . तसं पाहिलं तर किल्ले वासोट्याला स्वराज्यात तूरुंगाचं स्थान. महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेले असताना हरामखोर इंग्रजांनी सिद्दी जौहर लांब पल्ल्याच्या तोफा देऊन मदत केली होती आणि तोही काही महिन्यांपूर्वीच झालेला करार मोडुन. त्या इंग्रजांना कारावास घडला तो इथेच. किल्ले तोरण्याप्रमाणे इथेही महाराजांना धनलक्ष्मी प्रसन्न झालेली, सोन्यानी भरलेले ४ हंडे इथे सापडले होते. पेशवेकाळात हा किल्ला औंधकर पंतप्रतिनिधीकडे आला. पेशवे आणि पंत यांच्यात बिनसल्यामुळे पंतांना अटक झाली परंतु किल्ल्याचा ताबा गेला पंताची उपपत्नी ताई तेलीण यांच्याकडे. ताई तेलीणीने पेशव्यांचा सेनापती बापु गोखल्याला चक्कं महिनोंमहिने लढा देऊन जेरीस आणले. किल्ला पडला पण नंतरच्या काळात एक मजेदार आर्या प्रसिद्ध झाली. 
श्रीमंत पंतप्रतीनिधीचा हा 
अजिंक्य किल्ला वासोटा ।
ताई तेलीण मारी सोटा ,
बापु गोखल्या संभाळ कासोटा ।।
 पण त्यानंतर ते मराठेशाहीचं दुर्दैव. १८१८ इंग्रजाळलेली तोफ जुन्या वासोटयावरून आग ओकायला सुरुवात झाली आणि तब्बल वीस तासानंतर किल्ले वासोटा हा पण इंग्रजांच्या ताब्यात गेला. 
आपला गडावरचा फेरफटका सुरु होतो. आलो तसोच सरळ झाडीत आत शिरलो की आता फक्त पाया शाबूत असलेलं जोत्याचं बांधकाम थक्कं करून सोडतं. आणि पलीकडे सरळ तुटलेले कडे. परत येऊन उजवीकडे वळालो की पाण्याची दोन टाकी. गडमाथ्यावरील पाण्याचा एकमेव स्त्रोत. टाक्याच्या दिसण्यावर जाऊ नये, झाडाचा पडलेला पाला-पाचोळा बाजूला सारून पाणी बाटलीत भरून घ्यावे, १०० टक्के शुद्धतेची हमी ! कारण तसा पर्यायच नसतो. हीच वाट दाट झाडीतुन आपल्याला बाबु कड्याकडे घेऊन जाते. १० मिनिटात आपण त्या भेदक कड्यापाशी पोहोचतो आणि आपसूकच गौरवोद्गार बाहेर पडतात. हरिश्चंद्रगडाच्या कोंकणकड्याची आठवण करून देणारा,जणु त्याचा धाकला भाऊच ! पण एका वैशिष्ट्याने बाबु कडा कोंकण कड्यापेक्षा वेगळा ठरतो. जसा निर्मात्याने वेळात वेळ काढुन अंतर्वक्री कोंकण कडा घडवला त्याच फुरसतीने बाबुकड्याचे वेगळेपण टिकवायला विसरला नाही. त्या वेगळेपणाची साक्ष म्हणजे एका ठराविक अंतरावर असलेले खडकाचे महाकाय चिरे ! वाह !! यासम हाच ! समोरच जुन्या वासोट्याच वाढलेलं रान, तिथल्या निर्मनुष्य वातावरणाची जाणीव करून देतं. छत्रपतींच्या नावाने एक जबरदस्त जयघोष देऊन आपण उर्वरित गड पाहण्यास परततो. त्यानंतर चंडिकादेवीच्या शाबूत असलेल्या मंदिरात माथा टेकवुन, दोन्ही बाजूंनी दरी असलेल्या वाटेवरून आपण काळकाईच्या ठाण्यावर पोहोचतो. इथून दिसणारा मुलुख म्हणजे अफलातूनच. चारही बाजूनी वेढलेलं पूर्वेला कोयनेचा जलाशय तर पश्चिमेला तुटलेले कडे आणि उत्तरेला जुळे सुळके आपले लक्षं वेधुन घेतात.  त्यातलाच अलीकडचा खोटा नागेश्वर आणि पल्याड आपलं आजचं पुढचं लक्ष्यं, अर्थातच नागेश्वराची अद्भुत गुहा. 
नागेश्वरची अद्भूत गुहा 
नागेश्वर सुळक्यापर्यंत पोहोचण्याची वाट किती बिकट आहे याची कल्पना आपल्याला काळकाईच्या ठाण्यावरूनच येते. चौफेर मुलुख डोळ्यात साठवुन आपण नागेश्वराकडे कूच करतो. अर्थातच त्यासाठी वासोट्याचा अर्धा उतार संपवावा लागतो. नागेश्वर फाट्याजवळ आलो की सुरु होतो घनदाट जंगलातला पायगाडीचा एक सुखद प्रवास. पण तो अनुभवायचा असेल तर एक साधी अट आहे. रोजच्या फालतु गप्पांना आवर घालुन गुमान चालायचं. इथली निरव शांतता अनुभवायची,इथल्या निरनिराळ्या झाडांचा सुगंध पार छाती फुगेपर्यंत घ्यायचा. रानपाखरांच्या मंजुळ संगीत मेजवानीचा येथेच्छ आनंद लुटायचा. वासोट्यासारखी गर्दी इकडे फिरकत नसल्यामुळे पायवाट ही अजूनही निमुळतीच आहे आणि पाऊसकाळ नुकताच झाल्यामुळे अध्ये-मध्ये खंडित झालेली,पण ती शोधण्यात पण एक वेगळी मजा आहे. हा सगळा कार्यक्रम चालु असताना दाट झाडी संपुन आपण कधी उघड्या-बोडक्या माथ्यावर येतो कळतच नाही. आणि मग येथुन सुरु तारेवरची कसरत ! मुख्य सह्य रांगेच्या पोटाला चिकटून सरपटत निघालेली चिंचोळी वाट म्हणजे एक जीवघेणा थरारच .धुक्यामुळे दरीची खोली तितकीशी जाणवत नव्हती, पण अधुन-मधुन धुकं विरळ होताच हे आपण कुठुन जातोय याचीच भीती वाटत होती. तर अशी ही वाट ,त्याहुन मुरमाड ! पण धीराने आस्ते कदम करत निघालो की तीही आपण पार करतो आणि अर्ध्या पाऊण तासात एका झाडाखाली येऊन पोहोचतो. आता मात्रं समोर गुहेच्या दिसणाऱ्या पायऱ्या जीव नकोसा करतात. मोठ्या कष्टाने पायऱ्या चढलो की गुहेत आडवा नं झालेला भटक्या माझ्या तरी पाहण्यात नाही.
तर अशी ही नागेश्वरची गुहा ,एक नैसर्गिक लेणं . पोहोचताक्षणी डोक्यापासुन पायापर्यंत एका झटक्यात माणसाला गार करणारी आणि इथे येता येता आडवा करणारी एक अविस्मरणीय जागा. इथे आहे महादेवाचं शिवलिंग , त्यावर बारमाही थेंबांचा अभिषेक करणारं छत. इथे कोंकणातल्या चोरवणे गावातुन शिवभक्तांची नेहमीच वरदळ असते,महाशिवरात्रीला यात्राही भरते. आजुबाजुला भरपुर त्रिशूळ आणि पुढ्यात डोळ्यात न मावणारी सह्यपर्वताची अफलातुन फ्रेम !  मस्त पैकी जगासोबतच स्वतःला देखील विसरून एक लांब वामकुक्षी घ्यावी  आणि महादेवाचे दर्शन घेऊन निघावं परतीच्या प्रवासाला !
आता परतीला दोन पर्याय आहेत,एक म्हणजे ज्या वाटेने आलो त्याच वाटेने नागेश्वर फाटा गाठुन मेट इंदवलीला पोहोचायचं किंवा त्यापेक्षा अवघड असलेली नाळेतली वाट. आम्ही नाळेतल्या वाटेने उतरायला सुरुवात केली. ही वाट म्हणजे पाऊल चुकीच्या दगडावर पडले की बत्तीशीची वाटंच. असंख्य खाचखळगे,दगडं आणि अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेली ही वाट म्हणजे संपतच नाही. आणि शेवटी जीव भांड्यात पडतो जेव्हा मारुतीरायासह-गणपती बाप्पा दर्शन देतात. बोटीजवळ जेव्हा पोहोचलो तेव्हा आमच्या आधीच पोहोचलेला ग्रुप जळूंवर नुसता तुटुन पडला होता. किरण तर डोकं गेलेल्या बाजीप्रभू सारखा हातात चप्पल घेऊन दिसेल तिथे चित करीत होता. आणि निखिल, जेव्हा त्याने त्याची पँट वर केली तेव्हा आतापर्यंत जळूची बाजू घेणारा निखिल ,त्याने येथेच्छ शिव्या हासडायला सुरवात केली. सगळा गोंधळ-गोंधळ उडाला होता. असो तर असा वासोट्याचा पावसात आलेला भन्नाट अनुभव आठवणीच्या कप्प्यात ठेऊन आमचा टेटलीकडचा प्रवास सुरु झाला.
आतापर्यंत वासोट्याचे काही प्रकाशचित्रे :

© Sandip Wadaskar 

























धन्यवाद !
All the photos and content  © Sandip Wadaskar

10 comments:

  1. MAST SANDIP...KHUP MAST WARNAN ANI INFORMATION KEEP IT UP :)

    ReplyDelete
  2. Nice Article and Will soon arrange Vasota treak. I am also love traking. Also writing trekking experience in Marathi.
    http://www.bhataktana.com/

    ReplyDelete
  3. Hi,
    very useful and attractive article. My name is Ravindra Mhapadi i am from Village Posare. which is locate near by Nageshwar or Village Choravane. If any trekker team want to stay for night then write to ravindramhapadi@gmail.com. & ravindramhapadi@yahoo.com
    My village is really very beautiful. there one SWAYANBHU MAHADEV MANDIR.
    THE MANDIR HAVE VERY NICE HISTORY. and other hill, mountain is attract to every nature lover.

    If you want any more data then plz reply.

    Regds
    Ravindra

    ReplyDelete
  4. As always अप्रतिम मित्रा

    ReplyDelete
  5. खूप छान....आम्ही पण जातोय 10 ते 12 दिवसात अनुभवायला.... श्रीमंत पंतप्रतीनिधीचा हा
    अजिंक्य किल्ला वासोटा ।
    ताई तेलीण मारी सोटा ,
    बापु गोखल्या संभाळ कासोटा ।।

    ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences