माझ्या मित्रवर्तुळात भटक्या म्हणुन मी सगळ्यांना माहिती आहे. आणि नेहमीचे भटके मित्र वगळता नवख्यांचा मला नेहमी एकच प्रश्न असतो, "आम्हाला यावंसं वाटतं रे पण, आम्हाला जमेल का, तुमचे ट्रेक खुप मोठे आणि कठीण असतात " वगैरे वगैरे. तर खास त्यांच्यासाठी म्हणुन ही थोडीफार विषयाला हात घालणारी माहिती. पुण्याच्या अगदी ५०-६० किमी अंतरावरील सर्वात सोप्पे आणि जिथुन अगदी हिमालयीन मोहिमांसाठी सुद्धा सराव केला जातो असे छोटे-छोटे ट्रेक आपण एका दिवसात करू शकतो . चला तर मग करायची सुरवात ?१) मल्हारगड : नेहमीच्या फिरस्त्यांमध्ये सुद्धा अपरिचित असणारा सोनोरीचा मल्हारगड हा एकदा तरी जवळ करावा असाच आहे. पेशवेकाळात सरदार पानसेनी उभा केलेला,मराठेशाहीत शेवटचा बांधलेला किल्ला म्हणजेच मल्हारगड. किल्ल्याची लांबच लांब तटबंदी आणि मल्हारी-मार्तंडाचं मंदिर या खेरीज गडाचं मुख्य प्रवेशद्वार पाहण्यासारखं आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी दिवे घाट पार करुन डाव्या हाताला वळलो की सोनोरी गावात पोहोचता येते, गावातच पानसेचा खासा वाडाही पाहण्याजोगा आहे.
२)रोहीडा: रोहिड खोऱ्यात म्हणजेच नीरा नदीच्या खोऱ्यात वसलेला हा सुंदर किल्ला पुण्यावरून साधारण ६५ किमी अंतरावर आहे. पुण्यावरून भोर गाठावे आणि तेथुन एसटी किंवा जीप मधुन बाजारवाडी गाठावे. मळलेली वाट आपल्याला तासाभरात गडमाथ्यावर घेऊन जाते. पायथ्यापासुन गडावर असणाऱ्या दोन टोकावरील असलेल्या बुरुजांमुळे एक विशिष्ट आकार जाणवतो. गडावरील एकूण सहा बुरुज आणि तटबंदीमुळे गड अजूनही भक्कम वाटतो. इथल्या पाण्याच्या टाक्यांची भलीमोठी रांग आणि एकमेकांना जोडले असल्यामुळे शिवरायांच्या दुर्गविज्ञानाचे कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. रोहीडमल्लंच्या मंदिरात ७-८ जणांच्या राहण्याची सोय होऊ शकते.
३)राजगड:जिजाऊ साहेब आणि छत्रपति शिवरायांच्या २६ वर्षाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या इथल्या मातीला जगात तोड नाही. ज्या स्थापत्यशास्त्राची अवघ्या जगाने दखल घेतली आणि किल्ले बांधणीचा उत्कृष्ट नमुना म्हणुन घोषित केले आहे तो म्हणजेच आपल्या राजांचा गड. सुवेळी अर्थात पहाटेच्या वेळी सूर्योदयाचा निस्सीम आनंद घ्यायचा असेल तर राजगडा व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही तुम्हाला सांगतो. पाली गावातुन पालखी दरवाजा, भुतोंडे गावातुन अळू दरवाजा किंवा गुंजवण्यातून चोरदिंडीमार्गे गडदाखल झालात की या पवित्र भूमीत रमण्यासारखं दुसरं सुख नाही. बालेकिल्ल्याच्या अवघड पायऱ्या चढुन गेलो की सकाळ्ची कोवळी किरणे ल्यालेला महादरवाजा चकाकून निघतो. प्रवेश करता करताच लगेच कुजबुज सुरु होते ,"कुठं बरं पुरलं असेल अफजलखानचं मुंडकं ? " संजीवनी माचीकडे जाताना होणारं बेलाग बालेकिल्ल्याचं अद्भुत दर्शन आणि पुढ्यात दुहेरी तटबंदी असलेली नागिणीसारखी सळसळणारी संजीवनी माची म्हणजे अप्रतिम. तर मग कधी येताय राजगडावर ? पद्मावती मंदिरात ५०-६० जण रात्रीच्या मुक्कामाला राहु शकतात, गडावर जेवणाची सोय होऊ शकते.
४)सिंहगड: हिमालयीन मोहिमेचा सराव करण्यासाठीची पुणेकरांची पहिली पसंती! कोणीही नवखा पुण्यात अवतरला की त्याच्याकडुन "तो सिंहगड किल्ला कुठे आहे रे ?",असा प्रश्न हमखास विचारला जातो. पण मला तिथे कसं जायचं याची माहिती देण्याची गरज वाटत नाही. पावसाळ्यात अगदी शिवापुर फाट्यापर्यंत गाड्यांची भली मोठी रांग,एवढी गर्दी खेचणारा हा सिंहगड म्हणजेच वीर तानाजीच्या शौर्याचं जिवंत प्रतीक. इथे येऊन फक्त पिठलं-भाकरीवर ताव न मारता संपुर्ण गड पहावा. कलावंतीण बुरुज पहावा,तानाजी कडा पहावा. थोडा वेळ शांत बसुन कल्याण दरवाज्याचं सौंदर्यही न्याहाळावं. गडावरुन दिसणारी राजगड-तोरणा ही दुर्गाजोडी तर अप्रतिमच.
५)घनगड: कोरसबारस मावळातला अगदी छोटेखानी, सवाष्णी आणि वाघजाई घाटाचा पहारेकरी. लोणावळा-ऍमबी व्हॅली रस्त्यावरून उजवीकडे भांबर्डे फाट्याकडे वळायचे. भांबरड्याच्या अलीकडेच येकोले म्हणुन एक गाव आहे तिथुन चालत वीस मिनिटात आपण किल्ल्याचा पायथा गाठतो. तेथून पाऊण तास गडमाथा. माथ्यावर एक विहीर आणि बुरुजाशिवाय पाहण्यासारखं काही नाही, पण कोंकणातल्या सुधागड,सरसगड, सवाष्णीचे खोरे आणि आपलं सह्यभुषण तैलाबैलाच्या कातळभिंती हा नजरा म्हणजे अफलातुनच. तैलबैलाच्या अवाढव्य पठाराची आपल्याला कल्पना येते. शिवाजी ट्रेल या संस्थेच्या अखत्यारीत या किल्ल्याचे संवर्धन सुरु आहे.
६)तुंग: पवना काठचा मावळखोर्याचा पहारेकरी. तिकोन्यावरून बेलाग सुळक्यासारखा भासणारा पण पायथ्याशी पोहोचताच गोमुखी प्रवेशद्वार आपल्याला मार्ग दाखवतो. तिकोना पायथ्याच्या जवण गावापासुन साधारण १० किमी वर असलेल्या मोरवे गावी पोहोचलो की अर्ध्या तासात चालत जाऊन आपण तुंगवाडीत पोहोचतो. पाऊण तासात माथा गाठता येतो. पडझड झालेली दरवाजे,हनुमानाचे कोरलेले दगडी शिल्प,गणेश आणि तुंगाई देवीच्या मंदिराखेरीज पाहण्यासारखे तसे काही नाही. पण पवनेचं विस्तीर्ण जलाशय आणि अक्ख्या मावळाचं विहंगम दृश्य नजर खिळवून ठेवतं.
७)तिकोना: पावसाळ्यात हौशी ट्रेकर मध्ये प्रसिद्ध असलेला तुंग-तिकोना-लोहगड-विसापूर-कोरीगड या दुर्गापंक्तीतला एक छोटेखानी किल्ला. याच्या आकारावरूनच याला हे नाव पडले असावे आणि माथ्यावर असलेल्या वितंडेश्वराच्या मंदिरावरून याला वितंडगड असेही म्हणतात. बालेकिल्ल्याचं प्रवेशद्वार भव्य आहे. उजवीकडे लगेच बारमाही पाण्याचं टाकं आहे. थोडीफार तटबंदीही शाबूत आहे. वितंडेश्वराच्या मंदिरामागे खंदक खोदलेले आढळतात. अलीकडच्या गुहेत पावसाळा सोडुन १५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.
८)तोरणा: "गरुडाचे घरटे" आणि "पुणे परिसरातील सर्वात उंच किल्ला" अशी बिरुदावली मिरवणारा रांगडा दुर्ग नवख्या तसेच कसलेल्या गिर्यारोहकांचीही नेहमी परीक्षा पाहत असतो. भट्टीमार्गे वाळणजाई,राजगड-तोरण्यामार्गे बुधलामाची अशा बऱ्याच वाटा असल्या तरी साधारण ट्रेकर हे वेल्हयातून बिनी दरवाज्यानेच किल्ला जवळ करताना दिसतात. वेळ असेल तर बुधला माचीकडे जाताना उजव्या बाजूला वाळणजाई दरवाजा नक्की पाहावा. पाऊसकाळ सोडुन गडावर सकाळीच चढायला सुरुवात करावी. गडावर पोहोचायला साधारण २-२:३० तास लागतात. सदरेजवळच असलेल्या टाक्यात पाण्याची आणि मेंगाई देवीच्या मंदिरात राहण्याची सोय आहे.झुंजार माचीकडील हनुमान बुरुजावरून राजगडाचे विहंगम दर्शन होते. दूरवर लिंगाणा,रायगड,सिंहगड,रायरेश्वर,पुरंदर,इत्यादी दुर्गसख्यांचे दर्शन होते.
चला तर मग करायची सुरुवात ? पावसाळा पण जेमतेम आठवड्यावर येउन ठेपलाय. पण एक साधी अट आहे,घरातून निघालेला प्लास्टिक(पाण्याच्या बाटल्या, वेष्टण,इतर अविघटनशील) चा कचरा ट्रेक संपल्यावर घरच्या डस्ट बीन मध्येच दिसायला हवा. बाकी अफाट सह्याद्री तुम्हाला मोकळा आहेच…….
शनिवार -रविवार अगदी ऑफिस ला दांड्या मारून सह्याद्रीत रमणाऱ्या टोळीतला एक स्वच्छंदी भटक्या. या अशा कित्येक भटकंती स्वहस्ते नोंदविलेला हा ब्लॉग.कधी कधी भटकत असताना सह्याद्रीला उपमा देताना त्याच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात , पण थोड्याफार वाचनाने,स्वानुभावाने आमच्या ट्रेकचे वृत्तांत आंतरजाळावर उतरविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. हा ब्लॉग वाचुन तुमच्याही पायाला भिंगरी लागेल यात शंकाच नाही ,अर्थात तसे झाले तर या ब्लॉगचे सर्वात मोठे यश असेल.बाकीच्या गप्पा लेखांमधुन ,फोटोंमधुन होईलच
भटकंती- पुण्याच्या आसपास
Subscribe to:
Post Comments (Atom)
At first you write a very good blog. After reading your article it is more easier to know trekking points near Pune.
ReplyDeleteखुप छान माहिती
ReplyDelete