हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने - कोंकण कडा

समुद्रसपाटीपासून तब्बल 3२०० फूट उंचावर. जवळपास १ किमी खोलीची नाळ पार करून आम्ही खिंडीत पोहोचलो होतो. बेलपाडा गावातुन निघाल्यापासून वारं काय हे विसरलो होतो. दोन्ही बाजूंनी उंचच उंच कडे असल्यामुळे वाऱ्याचा पत्ताच नव्हता. पाय पुरते थकलेले. तहान-भूक सपाटून लागलेली. पण चालणे भाग होते. नळीची वाट संपली होती. आता एका छोट्याश्या घाटवाटेतून वर चढायचे होते.७००-८ ०० फुटाची चढाई अजुन बाकी होती.थोडा वेळ थांबुन चढायला सुरुवात केली. दाट झाडीतुन वाट काढत एका मोठ्या आणि अखंड खडकाजवळ पोहोचलो. तो खडक सहज पार करून वर चढलो तर कलाडगडाचे आणि प्रचंड नाफ्त्याचे सुंदर व विहंगम दृश्य आमची वाट पाहत होते. नाफ्त्याच्या नेढयाने लक्ष वेधून घेतले. ऊन वाढत चालले होते.उन्हाचे चटके अंगावर घेण्यापेक्षा आम्ही लगेच झाडीत शिरलो. येथुन जवळपास अर्धा तास लागणार होता कोंकण कड्या पर्यंत पोहोचायला.

घाटातला शेवटचा रॉक प्याच चढून आम्ही हरिशचंद्र गडाच्या पठारावर पोहोचलो आणि निसर्गानी आमची घनचक्कर,कात्राबाई ,आजोबा गड,कलाडगड,इत्यादी दुर्ग सख्यांची भेट घालवून दिली. भर उन्हात चालताना या दुर्गा रत्नांची भेट म्हणजे नळीच्या वाटेने आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. भुकेमुळे पोटात कावळे जरी ओरडत असले तरी तेथून पाय काढावासा वाटत नव्हता. पण कोंकण कड्याच्या भेटीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. चालायला लागलो कोंकण कड्याकडे.


कोंकण कडा .निसर्गाची एक अफलातून किमया. लहान-थोरांचे, प्रत्येकाचे म्हणजे ज्यांना कमीत कमी माहिती आहे अशांना एक जबरदस्त आकर्षण असलेला सह्यपर्वतामधला भव्यदिव्य कातळकडा.इथे येणाऱ्या प्रत्येकाला "निसर्ग आपल्याशी बोलतो" असा अनुभव देणारा.जवळपास अर्धा किमी परिघाचा अंतर्वक्र कडा.नळीच्या वाटेतुन आल्यामुळे त्याचे हे वेगळेच भन्नाट रूप आम्ही अनुभवत होतो. इंद्रानी तर पुढे  कड्यासमोर जाऊन बैठकच मांडली. अक्षरशः तहान-भुक विसरून आम्ही कड्याचे हे अजब रूप न्याहाळत बसलो होतो.दक्षिणेकडे भैरव गडाची कातळ भिंत महाकाय कोंकण कड्याच्या समोर केवढी छोटी भासत होती. सिंडोळा किल्ला,नानाचा अंगठा लक्ष वेधुन घेत होते. नळीच्या वाटेतून उंचच उंच दिसणारे रोहीदासाचे शिखर आता आमच्या बरोबरीचे वाटत होते.  उठावसं वाटत नव्हतं. पण पोटात कावळ्यांनी आता  ओरडण्याबरोबर थैमान घालायला  सुरवात केली होती. भास्करला जेवणाचं आधीच सांगितलं असल्यामुळे निश्चिंत होतो.

कोंकण कड्यावर पोहोचलो. शरीर चांगलंच थकलं होतं. पण कड्यावरच्या गार वारयानी थकवा थोडासा दूर झाला होता. सर्वात आधी पाण्याची तहान भागवली आणि लिंबू सरबताचे दोन-तीन ग्लास रिचवून हुशार झालो.तंबू ठोकायला सुरवात केली.आमचा छोटासा आशियाना सज्ज झाला आणि जेवण पण तयार होते. पिठलं-भाकरी वर यथेच्छ ताव मारून पोटभर जेवण उरकलं. वामकुक्षी म्हणून दिली ताणुन. इंद्रा आणि निखिल तर मेल्यासारखे झोपले होते. तिकडीच्या चेहऱ्यावर समाधानाच्या छटा स्पष्ट दिसत होत्या. माझा तर मागच्या दोन वर्षापासुनचा स्वप्नवत ट्रेक पूर्ण झाला होता. 





एकदम सुर्यास्तालाच जाग आली. कोंकण कड्यावर आता नेहमीप्रमाणे सुर्यास्ताचा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी बरीच गर्दी झाली होती.आलेले सहलीकर आपापल्या परीने चित्रविचित्र पोज देऊन फोटो काढण्यात दंग होते. पण आम्हाला यात काहीच इंटरेस्ट नसल्यामुळे एका जागी जाऊन बसलो.निसर्गाचा विलक्षण सोहळा डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो. खूप दिवसांनी कोंकण कड्याशी आम्हा भटक्यांच्या निवांत गप्पा रंगल्या होत्या.खरच आम्ही आज भारावलो होतो.शेवटी सुर्यनारायणानी निरोप घेतला आणि आम्ही आमच्या तंबुत परतलो. 


Maggie !!!! रात्रीच्या जेवणाचा बेत. सरपण गोळा झाले. थोड्याच वेळात गरमागरम maggie तयार झाली. पोटभर हादडली. गप्पा मारता मारता कधी झोपेच्या अधीन झालो कळालेच नाही. 



सकाळी जाग आली तेव्हा चांगलंच उजाडलं होतं. बापरे केवढी ती झोप. म्हणजे ट्रेकला एवढं निवांत आम्ही कधीच नव्हतो. सकाळची आन्हिक उरकताना इंद्राच्या दातघासनीच अजब कौतिक,"म्हणे मी घाबरलो नळीच्या वाटेला!" :) पटापट आवरलं. कोंकण कड्याचा निरोप घेतला. परत भेटण्याचे वचन देऊन खिरेश्वर मार्गे परतीचा प्रवास सुरु झाला.   

 
ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. 
संदिप

1 comment:

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences