हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने - कोंकण कडा

1 comment:
समुद्रसपाटीपासून तब्बल 3२०० फूट उंचावर. जवळपास १ किमी खोलीची नाळ पार करून आम्ही खिंडीत पोहोचलो होतो. बेलपाडा गावातुन निघाल्यापासून वारं काय हे विसरलो होतो. दोन्ही बाजूंनी उंचच उंच कडे असल्यामुळे वाऱ्याचा पत्ताच नव्हता. पाय पुरते थकलेले. तहान-भूक सपाटून लागलेली. पण चालणे भाग होते. नळीची वाट संपली होती. आता एका छोट्याश्या घाटवाटेतून वर चढायचे होते.७००-८ ०० फुटाची चढाई अजुन बाकी होती.थोडा वेळ थांबुन चढायला सुरुवात केली. दाट झाडीतुन वाट काढत एका मोठ्या आणि अखंड खडकाजवळ पोहोचलो. तो खडक सहज पार करून वर चढलो तर कलाडगडाचे आणि प्रचंड नाफ्त्याचे सुंदर व विहंगम दृश्य आमची वाट पाहत होते. नाफ्त्याच्या नेढयाने लक्ष वेधून घेतले. ऊन वाढत चालले होते.उन्हाचे चटके अंगावर घेण्यापेक्षा आम्ही लगेच झाडीत शिरलो. येथुन जवळपास अर्धा तास लागणार होता कोंकण कड्या पर्यंत पोहोचायला.

घाटातला शेवटचा रॉक प्याच चढून आम्ही हरिशचंद्र गडाच्या पठारावर पोहोचलो आणि निसर्गानी आमची घनचक्कर,कात्राबाई ,आजोबा गड,कलाडगड,इत्यादी दुर्ग सख्यांची भेट घालवून दिली. भर उन्हात चालताना या दुर्गा रत्नांची भेट म्हणजे नळीच्या वाटेने आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. भुकेमुळे पोटात कावळे जरी ओरडत असले तरी तेथून पाय काढावासा वाटत नव्हता. पण कोंकण कड्याच्या भेटीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. चालायला लागलो कोंकण कड्याकडे.


कोंकण कडा .निसर्गाची एक अफलातून किमया. लहान-थोरांचे, प्रत्येकाचे म्हणजे ज्यांना कमीत कमी माहिती आहे अशांना एक जबरदस्त आकर्षण असलेला सह्यपर्वतामधला भव्यदिव्य कातळकडा.इथे येणाऱ्या प्रत्येकाला "निसर्ग आपल्याशी बोलतो" असा अनुभव देणारा.जवळपास अर्धा किमी परिघाचा अंतर्वक्र कडा.नळीच्या वाटेतुन आल्यामुळे त्याचे हे वेगळेच भन्नाट रूप आम्ही अनुभवत होतो. इंद्रानी तर पुढे  कड्यासमोर जाऊन बैठकच मांडली. अक्षरशः तहान-भुक विसरून आम्ही कड्याचे हे अजब रूप न्याहाळत बसलो होतो.दक्षिणेकडे भैरव गडाची कातळ भिंत महाकाय कोंकण कड्याच्या समोर केवढी छोटी भासत होती. सिंडोळा किल्ला,नानाचा अंगठा लक्ष वेधुन घेत होते. नळीच्या वाटेतून उंचच उंच दिसणारे रोहीदासाचे शिखर आता आमच्या बरोबरीचे वाटत होते.  उठावसं वाटत नव्हतं. पण पोटात कावळ्यांनी आता  ओरडण्याबरोबर थैमान घालायला  सुरवात केली होती. भास्करला जेवणाचं आधीच सांगितलं असल्यामुळे निश्चिंत होतो.

कोंकण कड्यावर पोहोचलो. शरीर चांगलंच थकलं होतं. पण कड्यावरच्या गार वारयानी थकवा थोडासा दूर झाला होता. सर्वात आधी पाण्याची तहान भागवली आणि लिंबू सरबताचे दोन-तीन ग्लास रिचवून हुशार झालो.तंबू ठोकायला सुरवात केली.आमचा छोटासा आशियाना सज्ज झाला आणि जेवण पण तयार होते. पिठलं-भाकरी वर यथेच्छ ताव मारून पोटभर जेवण उरकलं. वामकुक्षी म्हणून दिली ताणुन. इंद्रा आणि निखिल तर मेल्यासारखे झोपले होते. तिकडीच्या चेहऱ्यावर समाधानाच्या छटा स्पष्ट दिसत होत्या. माझा तर मागच्या दोन वर्षापासुनचा स्वप्नवत ट्रेक पूर्ण झाला होता. 





एकदम सुर्यास्तालाच जाग आली. कोंकण कड्यावर आता नेहमीप्रमाणे सुर्यास्ताचा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी बरीच गर्दी झाली होती.आलेले सहलीकर आपापल्या परीने चित्रविचित्र पोज देऊन फोटो काढण्यात दंग होते. पण आम्हाला यात काहीच इंटरेस्ट नसल्यामुळे एका जागी जाऊन बसलो.निसर्गाचा विलक्षण सोहळा डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो. खूप दिवसांनी कोंकण कड्याशी आम्हा भटक्यांच्या निवांत गप्पा रंगल्या होत्या.खरच आम्ही आज भारावलो होतो.शेवटी सुर्यनारायणानी निरोप घेतला आणि आम्ही आमच्या तंबुत परतलो. 


Maggie !!!! रात्रीच्या जेवणाचा बेत. सरपण गोळा झाले. थोड्याच वेळात गरमागरम maggie तयार झाली. पोटभर हादडली. गप्पा मारता मारता कधी झोपेच्या अधीन झालो कळालेच नाही. 



सकाळी जाग आली तेव्हा चांगलंच उजाडलं होतं. बापरे केवढी ती झोप. म्हणजे ट्रेकला एवढं निवांत आम्ही कधीच नव्हतो. सकाळची आन्हिक उरकताना इंद्राच्या दातघासनीच अजब कौतिक,"म्हणे मी घाबरलो नळीच्या वाटेला!" :) पटापट आवरलं. कोंकण कड्याचा निरोप घेतला. परत भेटण्याचे वचन देऊन खिरेश्वर मार्गे परतीचा प्रवास सुरु झाला.   

 
ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. 
संदिप

कोलाबा(कुलाबा) अलिबाग …

2 comments:
समुद्रामधल्या गडांचे कुतूहल नेहमीच आपल्याला असते . असाच एक समुद्रातला गड म्हणजे कोलाबा(कुलाबा).
अलिबाग च्या समुद्र किनाऱ्या वरून दृष्टीस पडणारा किल्ला. समुद्रकिनाऱ्यापासून साधारण  १ - २ किमी अंतरावर समुद्रात आहे.
सकाळी भरती च्या वेळी किल्ल्यावर जायचं असल्यास बोट शिवाय पर्याय नाही .





किल्ला :-


किल्ल्यावर जाण्याआधी आम्ही समुद्राचा आनंद लुटण्याचे ठरवले :)






 समुद्रात मनसोक्त डुंबून झाल्यावर ओहोटी च्या वेळी आम्ही किल्ल्यावर जायचे ठरवले … तेव्हा ओहोटी मुळे
चालत जाणे  शक्य होते . 




इसवी सन १६८०  मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधल्याचे म्हटले जाते. ब्रिटीशांच्या बोटींवर हल्ला करण्यासाठी या किल्ल्याच्या मुख्यत्वे उपयोग होत असे.  


कालांतराने हा किल्ला कान्होजी आन्ग्रेंच्या ताब्यात आला. काही काळ त्यांच्या परिवाराच्या ताब्यात राहिल्यानंतर किल्ल्यावर पोर्तुगीजांचे वर्चस्व होते. 

ताज्या पाण्याची विहीर या किल्ल्यामध्ये अजून आहे . काही स्थानिक लोकांनी तिथे लोकांना जेवण उपलब्ध व्हावे म्हणून स्वयंपाका ची व्यवस्था केली आहे . त्यासाठी सुद्धा हे लोक विहिरीचे पाणी वापरतात. 

  

किल्ल्यावर बरीच मंदिरे आहेत ,भवानी आई मंदिर, पद्मावती मंदिर , महादेव मंदिर, गुलाबी मंदिर , बोपदेव मंदिर ,  त्यातील मुख्यत्वे सिद्धीविनायकचे मंदिर सुंदर आहे . 





अप्सरा तलाव ----


    अजून अनेक monuments या किल्ल्यावर आहेत , आंग्रे वाडा , नानीबाई आंग्रे चा वाडा (कान्होजी आंग्रेंच्या विधवा), तळघर , मुख्य कार्यालये , इत्यादी । 
 
किल्ल्ल्यावरून दिसणारे  दृश्य :
 

 
 

 सध्या किल्ल्याच्या डागडुजी ची जबाबदारी Archaelogical Survey of India (ASI) घेत आहेत त्यामुळे प्रवेश फी भरावी लागते :) त्यातल्या त्यात भारतीयांसाठी कमी आहे (५ रु) …परकीय नागरिकांसाठी फी (१००  रु) 
पण हे मानावे लागेल कि किल्ला बर्यापिकी सुस्थितीत आहे … 

 परत येताना घोडागाडी करायचे ठरवले …. परत किनार्यावर येउन बसलो तेव्हा सूर्यास्त होत होता … वाह काय सुंदर दिसत होते दृश्य  







शांत सुंदर सज्जनगड …

1 comment:
शांत सुंदर सज्जनगड …

सज्जनगडाला जायला फक्त निमित्त लागते , केव्हाही जायला आम्ही तयार असतो . कॉलेज मध्ये असताना २ -३ फेऱ्या झाल्या असतील … संत रामदास स्वामींची समाधी आणि हे येथील मुख्य आकर्षण , सज्जनगड चा अर्थच "चांगल्या लोकांचा गड" आहे.

शिवाजी महाराजांचे गुरु असलेले रामदास स्वामी येथे वास्तव्य करत होते , तेव्हापासून सुरु असलेले रामदास स्वामी संस्थान आजपर्यंत अस्तित्वात आहे. गडावरची शिस्त वाखाणण्याजोगी आहे . खरच …

इसवी सन १७०० मध्ये जेव्हा औरंगजेबाने हा गड ताब्यात घेतला तेव्हा या गडाचे त्याने "नवरसातारा" असे ठेवले होते तरी रामदासांनी ठेवलेले सज्जनगड हेच नाव प्रसिद्ध झाले :)

स्वारगेट वरून सातारा एस टी प्रवास आणि साताऱ्या वरून थेट सज्जनगडाच्या पायथ्याशी एस टी उपलब्ध आहे . पायथ्यावरून दिसणारे घाटातले दृश्य खूप सुंदर आहे. विशेषत: पावसाळ्यात …

इथून १५ - २० मिनिटे पायऱ्या चढून गेल्यावर शिवाजी महाराज प्रवेशद्वार लागेल . अजून पायऱ्या चढून गेल्यावर श्री समर्थ महाद्वार आहे .

उजव्या बाजूने गेल्यावर सोनाळे तळे दिसते, ज्याचे पाणी हिरव्या रंगाचे झाले आहे :) :) या तळ्याच्या थोडे आजूबाजूला भटकल्यास उपहारगृह , धर्मशाळा दिसेल

थोडे चालून गेल्यावर रामदास स्वामींचा मठ दृष्टीस पडतो(अशोकवन) या मठामध्ये शिस्त म्हणजे शिस्त . रोजचे वेळापत्रक ठरलेले आहे. पूजा, नैवेद्य, आरती, मनाचे श्लोक पठन आणि मग जेवण. शुद्ध सात्विक जेवण सर्वांसाठी उपलब्ध असते. आपल्या हाताने ताट वाटी घेऊन जेवण झाल्यावर व्यवस्थित परत ठेवून द्यायची हात तिथला नियम जो आपण घरी कधी पाळला नसला तरी इथे आपोआप पाळला जातो (वातावरणच तसे असते ) :) :) :)

मठाच्या मागील बाजूस नूतन प्रवेशद्वारातून आत गेल्यावर राम मंदिर आहे ज्या मंदिरात वरील बाजूस रामाचे मंदिर आणि त्याच्या बरोबर खाली समाधी स्थान आहे.

या समाधी स्थानात प्रवेश केल्यावर आपली बडबड , डोक्यातले वेगवेगळे विचार , गोंधळ आपोआप बाजूला पडतो एवढी शांतता येथे असते , असा अनुभव आजपर्यंत मी घेतलेला नाही. समाधी स्थानाचे महत्व तेव्हा आपल्या लक्षात येते…

संस्थानाचे कार्यालय इत्यादी पार केल्यावर मागील बाजूस सुंदर पठार आहे. हिरवळी वरुन चालताना अतिशय प्रसन्न वाटते. धाब्याचे मारुती मंदीर एका टोकाला आहे जेथून पुढे उरमोदी धरणाचा सुंदर नजारा दिसतो. कॅमेरा एक क्षण सुद्धा स्वस्थ बसणार नाही ….

ठोसेघर च्या धबधब्याचा आवाज सुद्धा इथे ऐकू येतो एवढी शांतता येथे आहे. बरेच असे सुंदर स्पॉट येथे आहेत जे शब्दात सांगण्यापेक्षा तुम्ही खालील फोटोंमध्येच बघा :) :) :)

कसे पोहचाल: पुण्यावरून सातारा एस टी मिळू शकते आणि साताऱ्या वरून थेट सज्जनगड एस ती उपलब्ध आहेत.

खाण्याची सुविधा : समर्थ रामदास मंडळा तर्फे मोफत जेवण असते दुपारी एका ठराविक वेळात , अन्यथा उपहारगृह आहेच :) पायथ्याशी काही टपऱ्या आहेत …

राहण्याची सुविधा : समर्थ रामदास मंडळा तर्फे मोफत राहण्याची सोय सुद्धा आहे .

फोटो :-




 
 


गडाच्या पायथ्याशी …   दरी मधले दृश्य  









 





धाब्याचा मारुती ।