हातलोटचा देवरहाट !

सध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गेला होता. पण गेल्या उन्हाळ्यात कोंकणदिवा ट्रेकमध्ये दापसरेच्या देवराईला भेट देण्याचा योग आला अन् त्याही आधी अहुपेची देवराई बघुन झाली होती त्यात भर म्हणजे आमच्या “सह्याद्री ट्रेकर्स ब्लॉगर्स”  ग्रुपमध्ये या वर्षीच्या दिवाळी अंकांची चर्चा चाललेली असताना अजयने “भवताल” हा विशेष अंक सुचवला होता,लागलीच घेऊनही आलो. दोन दिवस अंक हातचा सुटला नाही आणि देवराईने पुन्हा एकदा मनात उचल खाल्ली.

आजकाल ट्रेकला जाताना सहसा किल्ला,एखादी घाटवाट आणि आजुबाजुला असलेली देवराई हे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न चाललेला असतो. अनायासे या दिवाळीचा आमचा हातलोट घाट-कोंडनाळ-मधुमकरंदगड हा बेत ठरला होता. त्यात किल्ला होता, घाटवाटाही होत्या. पण आजुबाजुला देवराईचा उल्लेख कुठेही सापडत नव्हता. पुर्वाभ्यास म्हणुन विकीमॅपियावर भेटी होत होत्या, आणि नेमका एक दिवस इंटरनेट चाळत असताना हातलोट गावाच्या पश्चिमेला मला एक हिरवा ठिपका सापडला,अर्थात आजूबाजूच्या झाडीपेक्षा जरा जास्तच गर्द. झूम करून बघितलं तर मंदिर(रहाट) या नावाने तो मॅप होता. आता मला खात्रीच पटली की ही देवराईच असणार कारण देवराईला “देवरहाट” असेही संबोधतात. ट्रेकचं हे समिकरण जुळल्याचा परमानंद झाला.त्यामुळे आता कधी ट्रेकचा दिवस उजाडतो अन् डोंगरवाटेला लागतो असं झालं होतं.

दिवाळी खाऊन झाली होती, फटाके आम्ही उडवत नाही, भाऊबीजही झाली आणि गुलाबी थंडीची हलकीशी चाहूल लागायला सुरवात झाली. तसा यावर्षी पाऊस चांगलाच लांबल्यामुळे गारठाही थोडा मागेपुढे करत होता.अशातच घरातुन बाहेर पडायला तब्बल एक तास उशीर झाला. महाबळेश्वरच्या ट्रेफिक मध्ये अडकण्यासाठी हा उशीर पुरेसा होता, अपेक्षेपेक्षा याचा जास्तच भुर्दँड भरावा लागला.ईश्वर काकांची स्विफ्ट होती आणि त्यांच्या  बाजुला सरकारी जावई आमीन बसला होता,थेट मंत्रालयातून जावळी खोरे गाठण्यास.  या जंगलात सरकारी माणसे सहसा फिरकत नाही(लाल डब्ब्याचे ड्राइवर-कंडक्टर सोडले तर) जावळीत शिरण्यास एवढा उत्सुक फार कमी लोकांपैकी अमीन एक असावा, असो पण त्यामुळे मंत्रालयाचं ओळखपत्र दाखवुन महाबळेश्वराची एंट्री फी वाचली होती,हेही नसे थोडके.

कोयना नदीवरचा शिवकालीन पुल 

मेटतळे ओलांडून गाडीने घाट उतरायला सुरवात केली, समोर प्रतापगडाचे भव्य पण धुरकट दर्शन झाले. माझा हा आवडता आंबेनळी घाट रस्ता बरं का? कोंकणात जातानाच्या सगळ्या वाऱ्या इथे आठवून जातात. पलीकडे जुनी आंबेनळीची घाटवाट पण आहे, तीही एकदा पायाखालून घालायची आहे. तूर्तास जावळीच्या खोऱ्यातला हा हिरवागार प्रवास पुढे सरकतो आणि कोयना नदी आडवी येते,स्फटिकासारखं स्वच्छ पाणी बघुन निसर्गाकडे अजुनही भरपुर आहे देण्यासारखं,याची प्रचिती येते. हिचा उगम इथे बाजूलाच आहे, महाबळेश्वरच्या लॉडविक आणि हंटर्स पॉइंट यांच्या मधल्या दरीतुन ही दक्षिणवाहिनी कोयनानगरला पोहोचेपर्यंत चांगलीच फूगते आणि पुढे कृष्णा नदीला जाऊन मिळते.

जावळीचं हे खोरे या नदीमुळे सुजलाम झालंय, हिरवीगार वनराई सगळीकडे पाहायला मिळते. ह्याच कोयना खोऱ्यात आता तीन दिवस मनसोक्त भटकंती करायचीये. थोडा वेळ नदीची साथ मिळाली आणि पारफाटा ओलांडून डावीकडे वळून आम्ही कोयनेच्या खोऱ्यात प्रवेश केला तेव्हा काही क्षणात वाहनांची वर्दळ कमी झाली. एका वेगळ्याच जगात प्रवेश केल्यासारखं जाणवलं. गाडी मस्तपैकी निमुळत्या पण चकाचक डांबरी रस्त्यावर वळणे घेत धावत होती.

चटुर्बेट फाट्यावर परत डावीकडे वळलो आणि जंगल जाणवायला सुरवात झाली. सर्वदूर नीरव शांतता पसरलेली. एखाद दुसरं वाहन पास होत होतं पण ते नावालाच, बाकी या रस्त्यावर आम्हीच.पुढे सरकलो तोच कोयना नदी परत आडवी आली आणि दणकट पुलही. वाचनात आलेला शिवकालीन पुल हाच असावा. होय तोच.पण पुलाबद्दल माहिती सांगणारी एखाद पाटी पहिजे होती बाजुला. दुर्दैवाने नाहीये. पण पुल फारच सुंदर आहे. बांधकाम अजुनही खणखणीत आहे. मधुन काढलेल्या महीरपी कमानी लक्ष वेधुन घेतात. पार गावाजवळचा हा पुल प्रतापगडासोबतच बांधुन काढला असावा. चारशे वर्षानंतरही हा पुल अजुनही टिकून आहे, याचच आश्चर्य वाटतं. धन्य !

कोयनेच्या खोऱ्यातली शिरवलि, कासरुड ही शिवकालीन गावं मागे टाकत हातलोटला दाखल झालो तेव्हा दुपारचे दीड वाजलेले. आम्ही तब्बल वेळेच्या अडीच तास उशीरा चाललो होतो. दुपारच्या वेळेला गाव शांत-निवांत भासत होता. बहुदा गावातली मंडळी शेताकडे असतील. एका काकांचे दर्शन झाले,चौकशीअंती आडनाव  आमरे होत.हे पाहुणे गाववाले नव्हेत, कारण ईथे सगळे मोरे. पूर्वापार चालत आलेल्या इथल्या भागावर मालकी हक्क हा मोऱ्यांचा. दस्तुरखुद्द चंद्रराव मोऱ्यांची जावळी.अजुन एका ठिकाणी मोऱ्यांकडे चौकशी करून हातलोट घाटाची वाट विचारून घेतली.पाणी वगैरे भरून हातलोट घाटाकडे प्रस्थान केले.दुपारचे साधारण अडीच झाले असतील.घाटवाट सुरू करण्याची ही वेळ नव्हे, पण मोरे काकांच्या सांगण्यानुसार दोन तास लागणार होते.तर आम्हाला चार तास जरी म्हटलं तरी डोक्यावरुन पाणी संध्याकाळी साढ़ेसहापर्यंत आम्ही खालच्या बीरवाडीत पोहोचणार होतो.

गावातलाच संतोष आम्हाला घाटमाथ्यापर्यंत घेऊन जाणार होता,सोबतीला दोन कूत्रे होतेच. वळणावळणाच्या पायवाटेवरून गावाचे सुंदर दर्शन होत होते.बाजुनेच खळाळणाऱ्या कोयनेला जाऊन मिळणाऱ्या ओढ्याचे विहंगम दर्शन डोळ्यांमध्ये साठवत आमची वाट पुढे सरकत होती. स्वप्नातलं गाव वाटावं इतकं टुमदार आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं सुंदर गाव,माझ्या पाहण्यात आलेल्या फार कमी गावापैकी एक.  मधुमकरंदचा माथा धुक्यात होता,दुपारनंतरच्या दाबाचा परिणाम म्हणुन ढगाळ वातावरण त्यामुळे मन थोडं हिरमुसलेलंच. असो.




गावाच्या पश्चिमेला देवराई असल्याचा विकीमॅपियावरून अंदाज आलाच होता. हीही एक उत्सुकता होती,पण इथे सगळे त्याला रहाट म्हणतात.ती जागा बघुन पुढे आम्हाला घाट उतरायचा आहे.नव्याने होऊ घातलेल्या गाडीरस्त्याला लागून पायवाट तुडवत निघालोय. तेवढ्यात एका कुत्र्याच्या पायाखालून एक मोठा साप सळसळत गवतात नाहीसा झाला म्हणजे आम्हाला नाही दिसला अमीनने तो पाहिला होतं, कुत्रं क्षणभर बधिर झालं होतं. भेदरलेल्या अवस्थेतच आमच्या सोबत परत चालायला लागलं.

निवांत रस्ता तुडवत निघालोय पण संतोषचा अबोलपणा खटकत होता. प्रत्येक माहिती खोदुन काढावी लागत होती.काही वेळाने तोच बोलता झाला” रहाट पहायचा ना ?” अरे हो मग, चला मग. गावाच्या शेवटाचे खाचर ओलांडून पुढे पायवाटेवर लागतो तोच पक्ष्यांचा कीलबिलाट ऐकायला लागला.भरदुपारी तेवढ्याच भागातल्या कीलबिलाटाने वातावरणात चांगलाच जिवंतपणा आणला होता. मी मागे वळून रेश्माला हाक दिली  “रश्म्या, हेतु साध्यम! ही देवराईच” बाकीच्या जंगलपट्ट्यापेक्षा उंच वाढलेल्या झाडांचा भरगच्च समूह ही देवराई असल्याचाच पुरावा होता. उत्साहाच्या भरात भराभर पावले टाकत देवराईत प्रवेश केला.  उजव्या बाजूने आता कोरडा पडलेला ओढा,ओलावा होताच आणि डाव्या बाजूची वाट घनदाट राईत गेली होती. आम्ही ओढ्यानेच पुढे सरकलो. “गावातली लोकं येतात का रे संतोष?” “जास्त नाही” जेवढ्याला तेवढं उत्तर. “या रानातली झाडे वगैरे तोडतात का?” “नाह्ही, जास्त कुणी येत नाही,जत्रा असते तवा असते गर्दी” आत शिरत गेलो आणि पत्र्याच्या आश्रयाला असलेल्या देवीचं दर्शन झालं. “गावनय कूम्बालजय”,संतोष पुटपुटला. 


अच्छा अच्छा म्हणजे, गावात बांधलेल्या भव्य मंदिरातील देवीचे जुने ठाणे म्हणजेच हे रहाट होय तर. जबरदस्त आणि गावकऱ्यांची खरच कौतुकास्पद कामगिरी म्हणायला हवी. आजकालच्या जुन्या राऊळांचा जीर्णोद्धार म्हणुन देवराईमध्येच सिमेंटली इमले चढत असताना, इथल्या रहाटातून आपली श्रद्धा गाववाल्यांनी अलगद बाजुला आणुन ठेवली. पण आता एक चिंता म्हणजे इथुन देवच बाहेर गेले म्हटल्यावर ही राई किती दिवस तग धरणार,देवच जाणे. कारण जंगलांचे असे हिरवीगार तुकडे शाबूत आहे ते गाववाल्यांच्या श्रद्धेमुळे. असो  राईत सिमेंटचा वापरच बंद झाला,हेही नसे थोडके. परतताना गावातलं नवीन मंदिर बघून जाऊ, तूर्तास हे झाडीतलं राऊळ. जेवढ्याला तेवढं पत्र्याच्या आडोशाला गावनय माता आणि चारही बाजुला गच्च झाडी, काही झाडे तर फारच जुनी. आता मी या विषयात नवीन असल्यामुळे देवराई पुर्ण वाचता नाही आली, पुढच्या वेळेला आलो की झाडांची नावं ओळखता आली तरी खुप झालं. पाऊस लांबला असल्यामुळे देवराईतल्या पाऊलवाटा अजुनही चिखलात दडल्या होत्या, चिखलात रूतलेल्या जनावरांचे ठसे तेवढे जाणवत होते. चांगला अर्धा-पाऊण तास घालवुन आम्ही देवराईच्या बाहेर पडलो आणि आजूबाजूपेक्षा हा  जंगलटुकड़ा अजूनच ठळक भासुन गेला.




देवराईमध्ये हिंडून घाटवाटेकडे वळालो. मधुगडाच्या पश्चिम धारेवरून कोयनेला मिळणाऱ्या या ओढ्याचा उगम झाला आहे.कधी ओढ्यातुन,कधी त्याच्या कडेकडेने वाट काढत आम्ही खिंडीत येऊन पोहोचलो.जरा लवकरच पोहोचलो होतो कारण जळवा नावाचं प्रकरण पुढे आलं. माझं हे नेहमीचंच आहे. जावळीत घुसल्यावर माझ्या हे लक्षात येतं, असो. खिंडीत पोहोचल्यावर बुटातल्या,पायांवरच्या जळवा काढायचा एक सामूहिक कार्यक्रम पार पडला.खिंडीतच डाव्या बाजुला पाण्याचं खोदीव टाक आहे, पाणी फक्त जनावरे पिऊ शकतील असं. सुरवातीलाच खोदीव पावट्यापण घाटवाटेचं अस्तित्व पटवुन जातात.ही खिंड ओलांडली की कोयना खोऱ्यातून आपण जगबुडीच्या खोऱ्यात प्रवेश करतो,म्हणजे सातारा जिल्ह्यातून रत्नागिरीमध्ये.संतोषने निरोप घेतला आणि आम्ही घाट उतरायला सुरवात केली.

वातावरण बदलल्यामुळे या भागात जळवांचा त्रास बंद झाला होता. घोणसपुरातून उतरणाऱ्या कोंडनाळेपेक्षा ही वाट खुपच सोपी आहे.पण इथुन जनावरे वाहून नेत असल्यामुळे लांबची आहे. हातलोटमधली लोकं अजूनही ह्या वाटेचा उपयोग दळणवळणासाठी करतात, पण तो फार थोडा. वाट गच्च झाडीतून खाली उतरली आहे. जंगलाची शांतता अधुन मधुन माकडांच्या चित्कारांनी भंग होत होती. वातावरण ढगाळ असल्यामुळे बऱ्यापैकी अंधारूनच आलं होतं. ओढ्यांचा आवाज यायला लागला, बहुदा जगबुडी नदीच्या ऊगमाचा प्रवाह असावा. खाली उतरतोय तसा त्या प्रवाहाचा खळखळाट वाढत होता.  काही वेळाने नजारा थोडासा खुला झाला, मागे वळून पहिलं तर खिंड पुर्ण धुक्यात बुडाली आणि बरंच खाली आलो होतो, पण बिरमणीची वाट अजुन चांगलीच दूर भासत होती. जगबुडीचा ओढा आता सपाटीला लागला होता. घाटातून येणारी वाट मळलेली असली तरी सपाटीवरची वाट वाढलेल्या गचपनामुळे पार नाहीशी झाली होती. कमरेएवढालं गवत छाटत आमची तंगडतोड चाललेली. मध्येच पक्ष्यांचे निरनिराळे आवाज ऐकायला यायचे, जंगल आपल्याच तंद्रीत मस्त होतं आणि आम्ही आमच्या तंगडतोडीत. आणि तोच ओढा ओलांडून वाट डावीकडे गेली. अंधार पडायला सुरवात झालीच होती, पुढच्याच क्षणी एकदम काळोख दाटून येतो की काय अशी भिती वाटत होती. अन् पुढची वाट नाहीशी होऊन खरोखरच डोळ्यांसमोर अंधार झाला. ना वाटेचा पत्ता, ना गावाचा! ना गावाच्या अलीकडच्या भैरीरहाटाचा!  गाव जास्त दूर नसणार याची खात्री असतांनाही पुढची वाट शोधणे हे अंधारामुळे कठीण होऊन बसले होते. थोडी शोधाशोध केली, पण व्यर्थ. सुदैवाने एक चांगली गोष्ट अशी की जिथे आम्ही अडकलो होतो, त्याच जागेवरची माती उघडी पडली होती बाकी आजुबाजुला सगळं गवत माजलं होतं. ओढा शेजारुन वाहत असला तरी थोडा लांबच होता. सर्वानुमते ईथेच तंबू टाकुन रात्रीचा मुक्काम करायचा आणि पहाटे पहिल्या किरणांनिशी पुढची शोधमोहीम सुरू ठेवायची,असं ठरलं.


आर्थरसीट-महाबळेश्वर ट्रेकमधला बहिरीच्या घुमटीजवळच्या मुक्कामानंतर सर्वात भयानक मुक्काम अनुभवला असेल तर तो हा होता. फरक हाच की तेव्हा टेंट नव्हते,आता सोबतीला टेंट असले तरी सर्वात जास्त त्रास होता तो रानटी चिल्टांचा आणि कोंकणातल्या दमट वातावरणचा. या दोन गोष्टींमुळे जंगली प्राण्यांची भिती का काय ते वाटते, तिकडे लक्षच गेलं नाही.कसे तरी तंबू उभारले, एका तंबुला “किचन टेंट” बनवुन त्यातच छोट्या मेणाच्या स्टोव्हवर रश्म्याने मुगाची खिचडी शिजत घातली. दुपारपासुन गावातली दोन कुत्री आमच्यासोबत इथपर्यंत आली होती, घट्ट काळोखात तेही घाबरल्यासारखी करत होती,त्यांना थोडं खायला घातलं. जंगल पुर्णपणे आपल्या रंगात यायला सुरवात झालेली. कुत्री अधुन मधुन भुंकत होती. त्याकडे दुर्लक्ष करत आम्ही आमचा गरमागरम खिचडीचा बेत उरकून घेतला आणि तंबुत शिरलो ते पहाट होईपर्यंत.  आणि बरं का आज बायकोचा वाढदिवस आहे, तिने आयुष्यात न विसरता येणारा हा असा जंगली वाढदिवस अनुभवला होता. वरून  परत परत असेच भन्नाट ट्रेक घडू देत, अशीच इच्छा प्रकट केली. जियो बायको.



सकाळी आवरुन बीरमणीच्या वाटेची बरीच शोधाशोध केली पण सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. आता ही वाट सापडलीही असती पण वेळ जाऊन पुढचा प्लॅन बोंबलला असता. खरंतर सुरवातीच्या प्लॅनप्रमाणे कालचा मुक्काम हा बिरमणिमध्ये करून आतापर्यंत चढ़ाईसाठी आम्ही कोंडनाळेला लागायला पाहिजे होतो. पण कोंडनाळेचा बेत रद्द करून हातलोट घाटानेच चढाई करून पुढे घोणसपुर गाठायचं असं सर्वानुमते ठरलं आणि राहिलेली कोंडनाळ पुढे कधीतरी करू या विचारातच चढाईला सुरवात केली.परत गचपनातून काल आम्हीच मळवलेली वाट शोधत घाटाच्या वाटेला लागलो. आज समोरचा नजारा जरा स्पष्ट झाला होता.पुढ्यात हातलोटची खिंड दिसत होती. सकाळचा उदरम् भरणम् ब्रेक आटोपून चढाई सुरू ठेवली. कालपेक्षा आज वाट वेगळी भासत होती,कदाचित वेळेचा परिणाम असावा. रमतगमत खिंडीपर्यंत पोहोचायला आम्हाला पावणेबारा वाजले, इथुन पुढे कोयना खोऱ्यातले प्राणी, जळू सोबतीला होतेच त्यामुळे पटापट पावले टाकत हातलोटच्या वेशीवर येऊन पोहोचलो. बाजूलाच ओढा दिसताच आधी कोंकणातला दमटपणा धुऊन स्वच्छ मनसोक्त आंघोळ झाली.

गावात पोहोचलो तेव्हा बरोबर जेवणाची वेळ येऊन ठेपली होती. मोरे मावशींना जेवणाचं सांगुन, जळूंच्या जखमांवर मलमपट्टी करीत बसलो, चांगलं चार ठिकाणी रक्त काढलं होतं माझ्या पायांचं. मोरे काकांना आम्ही खाली रानात रात्र काढली, याचंच भारी कौतुक.या पावसानंतर या वाटेने जाणारे तुम्ही कदाचित पहिलेच असणार, काकांनी हे वाक्य टाकताच शोधमोहीमेचा भीमपराक्रम करून आल्यासारखं अंगावर उगाच मुठभर मांस चढलं. कालच्यापेक्षा आज चांगलं ऊन पडलं होतं, मधुमकरंद मोठ्या ऐटित गावाकडे लक्ष ठेऊन होता. आता जेवण झालं की पायगाडी तिकडेच वळणार होती,पण तूर्तास मोरे मावशीच्या हातचं सुग्रास जेवण आणि हातलोट गावातल्या इकडच्या तिकडच्या गप्पा आणि ऐकिव कथा. नवीन शब्दांची भर पडत होती,जळवांना ईथे कानिट म्हणतात आणि आमटीला सांभर.वा व्वा सुंदर! वाचनात आलेल्या एका उल्लेखांवरुन हातलोट घाटाने गुरे वाहून न्यायचे, मोरे कुटुंबासोबत गप्पा मारता मारता, “लोकं पार फलटनवरन गुरे आणतात, मेंढरंच असतात जास्त, लयी दुरुन दुरुन येतात लोकं  गावागावात मुक्काम टाकत जातात खाली” या मोरे काकूच्या वाक्यावरून या घाटाचे महत्व कळले, म्हणजे अजुनही ही घाटवाट चांगली वापरातली आहे तर. मोरे कुटुंब स्वतःहून सगळी माहिती सांगत होते, आम्ही काढलेले फोटो बघुन त्याबद्दलही बोलत होते. असाच एक टाक्याजवळून दिसणाऱ्या कड्याचे मजेशीर नाव ऐकून नवल वाटलं. “अंगाला घासल्यासारखा अंगावर येतो म्हणुन अंगसकडा” माळावर लटकवलेल्या बोंबलाकडे बायको, रश्म्याचं बरोबर लक्ष गेलं, आणि “मावशी, उद्या कालवन बोंबलाचं” असा बेत सांगुन जेवण उरकलं. घोणसपुराकडे चढायला सुरवात केली तेव्हा नारायणराव मावळतीकडे झुकू लागले होते....



धन्यवाद । संदिप वडस्कर
(Comment box or wadaskarsandip@gmail.com यावर तुमच्या प्रतिक्रिया कळवु शकता )
या ब्लॉगद्वारे एकच विनंती, संपुर्ण सहयाद्री तुमच्या भिंगऱ्या लागलेल्या पायांसाठी मोकळा आहे, भटकताना मात्र जबाबदारीचे भान ठेवा. तुम्ही जे अनुभवताय, तुम्हाला वाटत असेल तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावं, त्यांनाही अनुभवता यावं तर खालील सूचनांचे काटेकोर पालन करा...... मोठ्या संख्येने जाण्याचे टाळा, गोंगाट टाळा, प्लास्टिक टाळा........ निसर्गाचा मुक्तपणाने आस्वाद घ्या,निसर्गालाही मुक्तपणाने जगु द्या !

7 comments:

  1. Great.........

    ReplyDelete
  2. खुपच सुंदर...👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम...! एक नंबर, एकदम भारी माहिती दिली आहे.

    ReplyDelete
  4. अप्रतिम...! एक नंबर, एकदम भारी माहिती दिली आहे.

    ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences