पहाटे जाग आली तेव्हा कुठल्यातरी गावाच्या वेशीवर पोहोचलो होतो, गाडीच्या बाल्कनीत पिशव्यांच्या गराड्यात रात्रभर दूमडुन घातलेली माझी घडी विस्कटली आणि डोळे चोळतच आजुबाजुला बघुन घेतलं तोच पुढ्यात बसलेला साकेत वदला, "झाली का झोप ?" वाटत होतं, मी सोडुन गाडीतलं अक्खं पब्लिक जागी होतं. अंभईच्या वेशीवर भीमपहाट उगवली होती. टिपू सुल्तान चौकातुन गाडी गावातुन बाहेर पडली आणि पहाटेच्या प्रसन्न(?) वातावरणात बहरलेली जवळ जवळ एकाच रंगाची फुले चुकवीत आमची स्कॉर्पियो एकदाची वैशागडाच्या वाटेला लागली, एव्हाना उजाडलं होतं. वळणावळणाच्या रस्त्यावरून गाडी सुसाट सुटली होती. ढगाळलेल्या आकाशाखाली जंजाळ्याच्या टेकाडावर गाडी थबकली तेव्हा गावाच्या डावीकडचा घेरेदार वैशागड,आता पायगाडी सुरू होणार याची कल्पना देऊन गेला.
गाडी किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत जाते ही माहिती यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने खोडून काढली, त्यामुळे "गाडी किल्ल्यात पोहोचली असती तर बरं झालं असतं ",असा सर्वांचा एकंदरीत सुर ! तो आवरता घेत आम्ही गडाच्या वाटेला लागलो. "किल्ला साढ़ेतीनशे एकरात पसरला आहे", इति हर्शल. एवढा मोठा किल्ला ! म्हणजे धुंडाळण्यासारखं बरंच असलं पाहिजे. आणि खरं सांगायचं तर माझा वेळेच्या अभावी किल्ल्यांबद्दलचा पूर्वाभ्यास यावेळी बारगळलाच होता. आणि तसंही एवढी हुशार मंडळी ट्रेकला असेल तर त्याची गरज ती काय. त्यातल्या त्यात नाशिक आणि परिसरात भरपुर भटकलेला खुद्द कुळकर्ण्यांचा हर्शल आम्हाला लीड करत होता आणि ट्रेकचा संपुर्ण प्लॅन हा खुद्द शब्दभास्कर ओंकार यांच्या मार्गदर्शनाखाली आखल्या गेला होता.ट्रेकला तो नसला तरी प्लानच्या स्वरूपात तो सोबतच होता. त्यामुळे वेगळी अशी चिंता नव्हती. किल्ल्यात जाणारी पायवाट म्हणजे पायवाटच म्हणायला पहिजे कारण चढ जवळजवळ शुन्यच दिसत होता, त्यामुळे इथे ट्रेकिंग नव्हे तर फक्त किल्लेगिरीच करायची होती. हे प्लॅनमधल्या जवळजवळ सर्वच किल्ल्यांच्या बाबतीत होतं.
ढगाळलेल्या वातावरणात अधुनमधुन सूर्याचा उजेड डोकावून जात होता. त्या प्रकाशात शेतातली हिरवी पीकं चकाकून निघत होती. पावसाने यावर्षी दमदार कृपादृष्टी केल्याची जाणीव झाली. कारण हिरवळीचं साम्राज्य चौफेर पसरलं होतं.जंजाळे हे गाव वैशागडाच्या जवळ जवळ सारख्याच उंचीवर आहे. त्यामुळे साधारण अर्धा तास पायपीट करून किल्ल्याच्या आवारात पोहोचलो तेव्हा किल्ल्याची खरी उंची जाणवून गेली. कारण तंगडतोडीला साजेशी अशी खालची पायथ्याची म्हणजेच जरंडीची वाट आणि डाव्या बाजुला समांतर धावणारी अजिंठा-सातमाळ ही डोंगररांग खुणावून गेली. पुढ्यातला घेरेदार बुरुज आणि तटबंदी जागेवर असली तरी तीत दरवाजा म्हणुन एक भगदाडच सामोरं आलं. जनावरांची विष्ठा चुकवत किल्ल्यात प्रवेशलो तर "साढ़ेतीनशे एकर" हे दोन शब्द परत ओठांवर आले,पण दुसऱ्याच क्षणी "एवढा नसावा" असंही वाटून गेलं. आजमितिस जनावरास चरण्याचं कुरण म्हणुन किल्ल्याचा उपयोग होत असावा.असो, किल्ला उलगडत होता, आम्ही पुढे सरकत होतो. प्रवेश करताना उजवीकडील तटबंदी एकदम खणखणीत आहे अजुनही. त्यातुनच काढलेल्या कमानीमधुन परिसर न्याहाळता झाला. पुढे गेल्यावर खालच्या भागात, दोन बुरुजांमधुन एक दरवाजा दृष्टीस पडतो. किल्ल्यावर बरेच अवशेष आहेत. गोलाकार तलावावरून पुढे सरकत दाटलेल्या झाडीत दाटलेला राणीमहाल आणि त्याचाच बाजूला सुस्थितीतला बुरुज थक्क करून गेला. सद्यस्थितीत गवाक्षाखालची नक्षीकाम केलेली दगडी आरास हा त्याचा एकमेव पुरावा. त्याच्याच खाली दगडात कोरलेलं शरभशिल्प गतवैभवाची जाणीव करून गेलं. पायांची धारदार नखे आणि हत्तीला पायदळी तुडवत असलेला शरभ कमाल कोरलाय. गडावरची दूसरी चांगल्या स्थितीतली वास्तु म्हणजे दरगाह, कदाचित सर्वात उंच पण. कारण इथुन सगळा परिसर नजरेत येत होता. पूर्वेस खाली वेताळवाडी तलाव आणि त्यामागचा किल्ले वेताळवाडी, अर्थातच आमचं पुढचं लक्ष्य तेच होतं. खालच्या दरीत घटोत्कच लेण्यांकडे उतरणाऱ्या पायऱ्या दर्शन देऊन गेल्या. पण तूर्तास मोर्चा पश्चिमेकडे वळवून जरंडी गावातून येणारी वाट बघुन घेतली. ही वाट गडाच्या उत्तराभिमुख दरवाज्यात येऊन पोहोचते. ईथे एक फारसी लेख पण कोरलेला आहे, पण लेखाची ही मूळ जागा नसावी.गडफेरी आटोपल्यानंतर चहा-पाण्याची सोय म्हणुन तलावाशेजारीच शड्डु ठोकला. केदार जोशीने स्टोव पेटवून फक्कड चहा बनवला, आणि मॅगीवर आडवा हात मारून पोटातली आगही शमवली. हुशार होऊन घटोत्कच लेण्यांकडे उतरायला सुरवात केली.
गडाच्या पूर्वेकडील दरीत ह्या लेण्या कोरलेल्या आहेत. वैशागडावरून जाताना शेताच्या दांडावरून पुढे चालत गेलो की तश्याच मागे उतरणाऱ्या पायऱ्या सुरू होतात. पायऱ्या म्हटल्यावर समीर काकांनी आमच्यासोबत यायचं टाळलं. पायऱ्या खरंच नकोस्या होतात. चालताना पायांचा आणि दगडांचा मेळ असा बसलेला असतो आणि पायऱ्या दिसल्यावर, आपला पाय कोणीतरी ओढुन ठराविक अंतरावर ठेवल्यासारखं जाणवत राहतं. त्यामुळे पायऱ्या दिसल्या की पायतली तिडिक डोक्यात जाते.असो,उतरताना गावातलाच एक मुलगा भेटला, त्याचं ते उर्दूमिश्रित हिंदी बोलणं ऐकुन ईथे मुस्लिम वस्तीच जास्त असेल याची कल्पना आली. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांपासून साधारण ३० एक किमी अंतरावर असूनही घटोत्कच लेणी मात्र दुर्लक्षित आहेत. खरंतर अजिंठा लेण्यांच्या प्रसिद्धिखालीच झाकल्या गेली असावी. पण सिमेंटच्या पायऱ्या आणि विहारांना लाकडी कवाड बांधली असल्यामुळे सरकारी खात्यानुसार अगदीच दुर्लक्षितही नाही.मधोमध एक भव्य आणि प्रशस्त असं विहार, विहारात मोठमोठे पिल्लर आणि त्याच्या दोन्ही बाजुला छोट्या छोट्या खोल्या, असा रुद्रेश्वर लेण्यांचा थाट आहे. आतल्या गर्भगृहात बुद्धाची मूर्ती आहे.महायान पंथातील पहिली लेणी म्हणुन ही ओळखली जाते.पुरातत्व खात्याने थोड्याफार माहितीचा एक फलक तिथे लावला आहे. असो, लेण्यांची जागा मात्र मस्त नामी शोधुन काढली होती, निसर्गरम्य. समोरच्या दरीत कोसळणाऱ्या छोटेखानी धबधब्याचं रुपडं भरपावसात तर भन्नाटच असेल. लेण्यांचा धांडोळा घेऊन, पायांना जंजाळा गावाची वाट मोकळी केली.
गाडीजवळ पोहोचलो तेव्हा साढेअकरा-बारा झाले असतील. अंभईच्या वाटेवर लागणारं जुनं महादेवाचं दगडी मंदिर बघुन झालं. तिथेही बराच वेळ गेला. पोटात भुकेची हल्कीशी चूणूक जाणवत होती. जेवणाची सोय म्हणुन उंडणगावातली जवळजवळ प्रत्येक हॉटेल चपापून झाली होती. पण श्रावणमासाचं निमित्त करून सगळीच बंद निघाली,उंडणगावातली आमची जेवणाची वेळ "उंड़न"छू होताना बघुन, पोटात कावळ्यांनी आता ओरडण्याबरोबरच द्वंद्वही सुरू केलं होतं. शेवटी हळद्या घाट पार करून(वेताळवाडी किल्याने आमची खोड काढत डोळा मारला अन् मागे पडला, म्हटला असेल "तुम्हाला परत इकडेच यायचं आहे") शेवटी जेवणाची "सोय" ही सोयगावातच झाली. बाकी गावाने नाव काढलं हो. कॉर्नरच्या हॉटेलात एकदमच खेडवळ चवीच्या शेवभाजी वगैरेवर उदरमभरणम करून सोयगावातून गाडी परत हळद्या घाटाकडे वळवली. जाताजाता हॉटेलसमोरच्या घाण्यावर टपलेला केदार जोशीचा डोळा, माझ्या नजरेतून सुटला नाही.
हळद्या घाटाचा चढ चढुन वेताळवाडी पॉइंटजवळ थोडा वेळ विसावलो, किल्ला आमची वाट बसलेल्याच्या अविर्भावातच सामोरे आला.गर्द वनराईतून वाट शोधत निघालेली वळणे आणि त्या वळणावरून मार्ग काढित निघालेल्या लाडक्या येस्टीचा, आपल्या लाल डब्याचा सुंदर फोटो कॅमेरात टिपला गेला. किल्ल्याचा डोंगर फोडुनच निघालेल्या घाटरस्त्यामुळे किल्ल्यात पोहोचायला फारच कमी वेळ लागतो. बोललो होतो ना, ही भटकंती ट्रेकिंग नसुन फक्त किल्लेगिरिच आहे म्हणुन. याच किल्लेगीरीचा दुसरा अध्याय आता वेताळवाडीच्या रूपाने उलगडत जाणार होता. रुपावरून आठवलं, हळद्या घाटातून बाकी हा किल्ला रुपानं देखणाच दिसतो, बरं का! अगदी चित्रातल्या किल्ल्यासारखा, चित्रकाराने फुरसतीत चितारल्या सारखा. बाहेरूनच सुंदर दिसणारा वेताळवाडी आतुन कसा असेल, याची उत्सुकता आता वाढत चालली होती. इनमीन पाच-दहा मिनिटांचीच ती उत्सुकता, चार ढांगा टाकल्या की आपण डाइरेक्ट चिकटतो बुरुजाला.
अगदी सुंदर अश्या तटबंदीने आणि भव्य प्रवेशद्वारांनी नटलेलं, अजिंठासातमाळ रांगेतलं हे दुर्गलेण एकदातरी अनुभवन्यासारखंच आहे. किल्ल्यात प्रवेश करताना आकाश पार्श्वभागावर ठेऊन या तालेवार बुरुजांचा फोटो काय जबरी आला असता ? पण ढगाळलेल्या वातावरणामुळे थोडा हिरमोडच झाला होता.असो, बुरुजांमधुन आम्ही आत प्रवेशलो तर पुन्हा त्यापेक्षाही उंच दोन बुरुजांनी आमचं भव्य स्वागत केलं. एवढे मोठमोठे बुरुज या किल्ल्याच्या प्रेमात पडायला पुरेसे आहेत. आतल्या बुरुजावरचा नक्षीदार सज्जा गतवैभवाबद्दलची उत्सुकता जागरूक करतो. फरसबंदीवर पुढे चालत गेलो की वैशागडाकडे मुख असलेलं प्रवेशद्वार आपलं स्वागत करतं आणि आपण किल्ल्यात पोहोचतो. दरवाज्यावर दोन्ही बाजूना शरभ, आत गेल्यावर खाली देवडया असा साधारण किल्ल्यांवर पाहायला मिळतो तसा सगळा जामानिमा सज्ज आहे. बुरुजावरच्या खोलीतुन खालच्या हळदा घाटाची कमनीय लकब लक्ष वेधुन घेते. एका चांगल्या राबत्या किल्ल्यावर असतील ते सगळे अवशेष आपल्याला वेताळवाडी किल्ल्यात पाहायला मिळतात. खणखणीत तटबंदी, भव्यतेलाही लाजवणारी अशी उंचच उंच बुरुजे, त्यावर केलेले नक्षीकाम, कमानीसह सुसज्ज्य अशी दिमाखदार प्रवेशद्वारं, त्यात बांधलेल्या रखवालदारांच्या देवडया, पाण्याचे प्रशस्त टाके ( आता वटवाघळांनी वस्ती केलीये), धान्यकोठारे, चोरदरवाजा, तेल वगैरे साठवायला जमिनीत केलेली गोलाकार टाक्याची व्यवस्थाही जबरीच,एका मोठ्या बांधिव तलावाशेजारची नमाजगिर आणि त्याच्या भिंतीवरचे निजामाचे चिन्ह आपल्याला गतकाळात ईथे निजामशाहीचे वर्चस्व असल्याचे जाणवून देते.
बालेकिल्ल्याच्या उत्तर टोकावर एक मजेदार इमारत पाहायला मिळते. सताड उघड्या कमानीँच्या दोन रांगा आपलं लक्ष वेधुन घेतात. वरचे छप्पर उडालेलं आहे की मुळातच बांधकाम तसं आहे, हे कळायला मार्ग उरत नाही. पण ईथे आल्यावर गारगार वाऱ्याचा मनमुराद आनंद लुटता येतो, आजूबाजूचा परिसरही न्याहाळता येतो, आपल्या फ्लॅटच्या अगदी ग्यालरीसारखं. कदाचित या हेतूनेच ही वास्तु बांधली असावी, या वास्तूला बारादरी असं नाव आहे. अजिंठा-सातमाळ रांगेतला विस्तारलेल्या पठारासारखा वैशागड आणि हळदा घाटाच्या पायथ्याशी वेताळवाडी धरणाचा सुंदर नजारा येथुन अनुभवता येतो. इथुनच खाली उतरून, घसाऱ्याने खालच्या पदरात पोहोचलो. उजव्या बाजुला वाटेतच पडलेली चांगल्या स्थितीतली तोफ बघुन घेतली आणि वेताळवाडी दरवाज्याकडे मोर्चा वळवला. इथेही चांगला दोन प्रवेशद्वारांचा संच आहे, शरभ, देवडया हेही आहेत. या दरवाज्यातून उतरत खालच्या वाटेने आपण वेताळवाडी गाठु शकतो,पण आम्ही मात्र आमची गाडी वेताळवाडी पॉइंटजवळ पार्क केली असल्यामुळे तिकडे उतरायला सुरवात केली. एका देखण्या आणि अवशेषसंपन्न किल्ल्याची एक परिपूर्ण सफर झाली.
भन्नाट लोकेशन आणि अप्रतिम किल्ला ! या चार शब्दात न सामावणारं वेताळवाडी किल्ल्याचं कौतुक करीत आम्ही हळदा घाट उतरलो आणि गाडी परत थांबवली ती सोयगावातल्या त्याच हॉटेलजवळ, आता काय तर ! वेळ चहाची होती. एव्हाना अक्खा चौका अन् चौकातली माणसे आता आम्हाला ओळखायला लागली असावीत, आम्ही उगाच आकर्षणाचे केंद्र झालो असल्यासारखं वाटत होतं. आभाळ ढगांनी गच्च भरून आलं होतं. प्रत्येकाने टंपासभर चहाबरोबर पुढ्यात येईल त्या बेकरीपदार्थावर ताव मारत पोटाची आग शमवुन सोबत जिभेचेही चोचले पुरवले. बाहेर पडतो तोच पाऊस ढग फुटल्यासारखा बरसून गेला...मोजुन दहा मिनिट हां, हॉटेलसमोर रस्त्यावरून नदीच वाहू लागली होती. मायला, हा कोणता पाऊस. रस्त्यावरून पाणी हॉटेलात शिरतं की काय आता! पण एक चांगलं झालं, रस्त्यावरची सगळी धूळ एका जागी विसावली होती.
या किल्लेगिरीचा पहिला मुक्काम होता अमृतेश्वर मंदिर,बनोटी गाव.आजच्या पायगाडीप्रवासाला स्वल्पविराम देऊन बनोटीच्या वाटेला लागलो तेव्हा उन्ह उतरणीला लागली होती. हर्शलने गावात आधीच जेवणाची सोय म्हणुन संपर्क करून ठेवला होता, गावात पोहोचलो तेव्हा तोच मुलगा आम्हाला सामोरे आला. त्याला जेवणाचं वगैरे सांगुन, मंदिराजवळच गाडी लावली.खळाळत्या नदीवजा ओढ्याच्या काठी वसलेलं अमृतेश्वराचे हे मंदिर एकदम मोक्याच्या ठिकाणी आहे, गावाच्या थोडं बाहेर असल्यामुळे शांत-निवांत. एकाच गोष्टीचं वाईट वाटलं,ते म्हणजे कचऱ्यातून शोधुन काढावी अशी भरपूर शिवलिंग ओढ्यात इतरत्र पडली होती. ठीक आहे तुमची श्रद्धा आहे, पण श्रद्धेच्याच नावाखाली होणारी मूर्त्यांची, शिवलिंगांची किती अवहेलना होते याची कल्पनाच नसते लोकांना. मंदिरांच्या ठिकाणी झालेल्या उत्सवांनंतर किंवा इतर कार्यक्रमांनंतर, साफसफाई करून कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागते हे साफ विसरून जातो आपण.अर्थात याला काही अपवादपण असतात. असो, अंधार पडायला सुरवात झाली होती. संध्याकाळचा गावातला फेरफटका म्हणुन मंदिराबाहेर पडलो, केदारच्या भाषेत, we were just wandering around downtown banoti, you know ! मायला, "डाउनटाउन बनोटी", म्हणे. रस्त्यालगतच असलेल्या हॉटेलमध्ये जेवणाची सोय होती,त्या हॉटेलचा शोध घेत बराच वेळ गेला. फुल्ल तर्रीदार, परत तेलातून आणुन ठेवल्यासारखी भाजी ताटात आली होती, पण पोटात भुकेचा आगडोंब उसळल्यामुळे ढकलल्या गेली. मंदिरात परतलो, आजचा दिवस संपला होता. मंदिराच्या परिसरातच असलेल्या मोठ्या गोडाउनवजा सभागृहात टेंट टाकले, पण आम्ही मात्र पाठ टेकवली ती मंदिरातल्या गारगार संगमरवरी फरशीवर, पहाटे कूडकूड़ायला लागलंच तर आपले तंबू होतेच तयार की तयार.
एक दर्जेदार झोप होऊन पहाटे जाग आली. मोहिमेचा दुसरा दिवस ! एव्हाना नारायणरावही आकाशात अवतरले होते, पण ढगाळ वातावरणामुळे एवढं जाणवत नव्हतं. मंदिराचा कळस आभाळात घुसल्यासारखा जाणवत होता, बाकी इकडच्या मंदिरांचं एक वैशिष्ट्य ध्यानी आलं, मंदिरांचे कळस उंचच उंच बांधले आहेत.कदाचित गावागावांमध्येच चढाओढ लागलेली असावी, कोणाचा कळस किती उंच ? वगैरे वगैरे. मंदिराच्या पाठीमागुन आमचं आजचं पहिलं लक्ष्य खुणावत होतं, अर्थातच नायगावचा किल्ला, किल्ले सुतोँडा !
धन्यवाद । संदिप वडस्कर
(Comment box or wadaskarsandip@gmail.com यावर तुमच्या प्रतिक्रिया कळवु शकता )
या ब्लॉगद्वारे एकच विनंती, संपुर्ण सहयाद्री तुमच्या भिंगऱ्या लागलेल्या पायांसाठी मोकळा आहे, भटकंती फक्त जबाबदारीने करा. खालील सूचनांचे काटेकोर पालन करा......
अतिशय सुंदर लिखाण!!
ReplyDeleteसुंदर व माहितीपूर्ण लेख
ReplyDeleteसुंदर व माहितीपूर्ण लेख
ReplyDeleteMast chan
ReplyDelete😍
ReplyDelete