उंबरठ्यापलीकडील जग...'राज'माची

उंबरठा ! घरातुन बाहेर पडताना ओलांडला जातो. आपण रोज ओलांडतो, पर्याय नसतो. नाहीतर रोजच्या भाकरीची सोय कशी होणार. पण त्याला खऱ्या अर्थाने ओलांडला असे म्हणता येत नाही,कारण जी गोष्ट आपण रोज करतो,गरजेसाठी करतो, ज्यात तोचतोचपणा असतो,तेव्हा विशेष असं काही वाटत नाही. प्रत्येक गोष्टींमधून आनंद घ्यायला अर्थातच त्यात नाविन्याची गरज असते,घरातुन बाहेर पडण्याची गरज असते म्हणजेच कंटाळवाण्या जगातून तुम्ही बाहेर पडून जर नवीन भरारी घेण्यास तयार असाल तेव्हा खऱ्या अर्थाने उंबरठा ओलांडला असं मी समजेन. निदान माझ्या बाबतीत तरी तसंच आहे, माझ्या आवडत्या डोंगर भटकंतीमध्येही मी जेव्हा तोचतोचपणा आणतो,तिथे समाधानाची अपेक्षा मी कशी करणार. असो  लिहिण्याचे कारण की गेली चार महिने पायांना डोंगरवाट लाभलेली नाही, डोळ्यांना सह्यरांगेतला सूर्योदय-सूर्यास्त दिसलेला नाही. दऱ्या-खोऱ्यातला भरार वारा पिऊन तप लोटल्यासारखं वाटतंय. हव्याहव्याश्या वाटणाऱ्या पायांच्या दुखण्याचे विस्मरण व्हायला लागले. कधी कधी पायातली तिडिक डोक्यात जाते,पण चार पावले पुढे जायला दोन पावले मागे येण्याचा सल्ला अंतर्मन देऊन जाते. मग एखाद्या शनवाऱ्या पहाटे सिंहगडाची पायवाट तुडवली जाते. पण इथेही उंबरठा ओलांडण्याचे समाधान लाभत नाही,शेवटी सिंहगड चढुन उतरणे हाही एक दैनंदिनीचाच भाग, नाही का !




हीच रोजनीशी मोडायची आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे. मग वेगळं काय करायचं, बाहेर नारायणराव आग ओकतायेत. या देहाची लाही करणाऱ्या उन्हात वेगळं काय करायचं. साध्या ट्रेकला पब्लिक नाकं मुरडतात, कुठे तडमडायचं, येड लागलं का ! अहम !! असा एकंदरीत सूर. मग असाच विचार करता करता एक भन्नाट कल्पना डोक्यात आली, राजमाची ट्रेक करायचा. आता ही कल्पना भन्नाट कशी काय ? राजमाची हा साधासुधा ट्रेक, लोणावळ्यावरून उत्तरेला एखाद्याला सोडला पट्टी बांधुन तर रस्ता संपला की अनायासे तो एखाद्या घराच्या अंगणात अलगद विसावतो  ! तुम्ही म्हणाल,"त्यात भन्नाट काय !" . तर ते कळेलच तुम्हाला लवकर. हीच कल्पना रश्म्याला सांगितली तर ती एकदम आनंदात, "अरे व्वा, असं होऊ शकतं !" सर्व तयारीनिशी शुक्रवारी रात्री झोपायचा प्रयत्न करतोय तरीही विचार तेच, आपण उद्या काहीतरी नवीन अचाट करणार. या विचारातच डोळा कधी लागला ते कळलंच नाही.

पहाटे आंघोळीची गोळी घेऊन पाठीवर सॅक चढवली. पाचव्या मजल्यावरून "धुड" खाली आणतानाचा व्यायाम पार पडला, जामानिमा सज्ज करून एकदाचं सिंहगडरोडला लागलो. स्वारगेटकडे जाणाऱ्या एकट-दुकट गाड्या मध्ये पास होत होत्या. उन्हाळी दिवसांतला पहाटेचा मंद वारा सुखवुन जात होता. चाकांचा घुम-घुम आवाज तेवढा सोडला तर बाकी शांतता होती. शिवाजीनगरला पहाटेची पावणेसहाची लोकल वेळेवर येणार,आपल्याला उशीर नको म्हणुन जरा घाईनेच पाय फिरत होते. एव्हाना रेल्वेस्टेशनच्या आवारात पोहोचलो. पीएमटी बसेसचा घोंघों वाढत चालला होता, तेवढ्यात रश्म्याही पोहोचली होती. ती यायच्या आधीच आमची 'चार' तिकिटे  मी काढुन ठेवलेली. आमची दोन "धुडं" आणि आम्ही दोघे असा चाराचा ऐवज एकदाचा लोकलच्या भंडारडब्यात शिरला आणि लोणावळ्याचा प्रवास सुरू झाला.

हा रस्ता काही नवीन नाही  माझ्यासाठी पण तरीही लहान मुलांसारखी खिडकीतून बाहेरचं पळतं जग पहायची हौस काही सुटत नाही. आणि ती सुटूही नये, सुटली तर उगाच मोठे झाल्यासारखं वाटेल, हो ना ? बाकी आज पहिल्यांदाच लोकलच्या स्टोरेज कार मध्ये बसलो होतो. आजुबाजुला बसलेली कष्ट करणारी लोकं बघितली आणि आपण काय सुखी जीवन जगतो याची कल्पना आली, स्वतःचाच हेवा वाटुन गेला. ट्रेनमधुन एकेक स्टेशन मागे टाकत लोहगड,विसापूर,इत्यादी किल्ल्यांकडे पाहत ट्रेन नेहमीच्या सुरात सह्यकण्याकडे पळत होती, माझं मात्र तेच चाललं होतं. माझी आपली नेहमीचीच जुनी सवय,पळत्या ट्रेनमधुन किल्ले ओळखायची. तोंडपाठ असले तरीही. पण असु दे मजा येते. वेळ सरत होती तशी  लोकं पेँगत होती, पहाटेची राहिलेली थोडी थकबाकी आम्हीही चुकती केली. मस्त झोप झाली. सव्वासातच्या ठोक्याला लोणावळा स्टेशनवर पाय ठेवला तोच आजूबाजूची लोकं आमच्याकडे आश्चर्याने बघु लागली, हे नेहमीचच होतं म्हणा. पण आम्हा दोघांच्या सोबतीला असलेली "धुडं" बघुन आम्हाला ते उगाच जास्त जाणवत होतं. असो.

मुंबई-पुणे हमरस्त्याच्या बाजुलाच असलेल्या उडुपी हॉटेल मध्ये मेदूवडा अन् इडलीचा फक्कड नाश्ता झाला आणि धुडावर स्वार होऊन आम्ही राजमाचीकडे रवाना झालो.आमच्या पहिल्यावहिल्या साइकलट्रेकला सुरुवात झाली. एकदाची ! गेल्या सहा महिन्यांपासुन साइकल घरात पडली होती, तशी एकदम अडगळीत नाही म्हणता येणार. पानशेत,खडकवासला या स्वाऱ्या नेहमीच्या पण मनासारखी साइकल रपेट नव्हती झाली आणि दुसरं म्हणजे सायकल डांबरी रस्त्यावर नव्हे तर डोंगरीवाटांवर पळवायची  होती. राजमाचीपेक्षा बेस्ट पर्याय नव्हताच मुळी. शेवटी एकदाचं आम्ही या वाटेला लागलो.

सायकलच्या चाकांनी वेग घेतला तसा लोणावळा शहरातला गराडा कमी झाला. तुंगार्ली डॅमच्या अलीकडचा चढ दम खाऊन गेला. साधारण सहा वर्षापूर्वी केलेला लोणावळा-राजमाची ट्रेक डोळ्यांसमोर आला. तेव्हा हा रस्ता कच्चा होता. इथूनच झालेली तेव्हाची दमछाक पुढच्या सतरा किमीची भिती घालवून गेली होती. असो पण यावेळी आम्ही सायकलने निघालो होतो, त्यामुळे पोहोचायला वेळ लागणार नाही हे निश्चित. तुंगार्ली धरणाजवळून वळण घेत एकदाचा चढ संपला. पुढे ठाकरांच्या आदिवासी वाडीतून कॅप्टन रेसोर्टही मागे पडलं. आणि खऱ्या अर्थाने डांबरी रस्ता संपला. इथून आता खाचखळग्यातली धोपट वाट. आणि पार्श्वभागाखाली माउंटन बाइक. विशेष म्हणजे हा आमचा पहिलाच सायकल ट्रेक असल्यामुळे पंक्चर कीट,पंप असा जामानिमा सगळा व्यवस्थित होता. एकदा सगळं नीट करून सुरुवात केली.चाकं दगडांवर उडायला लागली,समोरच्या चाकातलं सस्पेंशन जाणवायला लागलं. उतारावरून समतोल साधत आमची रपेट सुरू होती. बरेच दिवसांनी घराबाहेर पडलेलो, डोंगरात आल्यावर छान वाटत होतं. उतार संपून थोडं सपाटीला लागलो. डाव्या बाजूने उल्हास नदीचं खोरे आणि उजव्या बाजूला पार राजमाचीपर्यंत धावणारी डोंगराची सोंड. एव्हाना आम्हाला दोन्ही बालेकिल्ल्यांनीही दर्शन दिलं होतं. दरीच्या पल्याड आगगाडीचा बोगद्यातून लपाछपीचा खेळ चाललेला. पावसाळ्यात ईथे अक्षरशः स्वर्ग असतो, खळाळणारे धबधबे, ओसंडून वाहणारे पाणी, धुक्यात हरवलेली वाट, सगळं सगळं अगदी साग्रसंगीत. अर्थात हे सगळं झालं निसर्गप्रेमींसाठी, इतिहासवेड्यांसाठीही राजमाची खुप काही देऊन जातो, फक्त ते घेता आलं पाहिजे. तूर्तास मात्र डोक्यावर नारायणाची कृपा आणि चाकांची घुम-घूम सोडली तर आसमंतात कमालीची शांतता.




उन्हाचा दाह वाढतच होता, फणसराई मागे टाकत आम्ही झाडीत शिरलो. एवढ्या उन्हाळ्यातही ही हिरवीगार झाडी एकदम सुखावणारी आहे. व्वा ! तेवढ्या पॅच मधुन सायकल मस्त पळत होती. सोबतीला सुखावणारी सावली. कुठे दगड,कुठे भुसभुशीत माती, अंगावर येणारी धूळ, उत्साह वाढवीणारा चढ-उतार असे करीत एकदाचं आम्ही कातळधार धबधबा जिथून दिसतो तिथे जवळपास पोहोचलो. कुठुन एक आजीबाई हंडयावरून पाणी वाहत पुढे जाताना दिसल्या, वेशीवर आल्याची खात्री पटली. सायकल पुढे दामटताच मोडकळीस आलेल्या आडोश्याला एक आजोबाही दिसले. कोरडा पडलेला कातळधार एकदम पुढ्यात होता. मागे श्रीवर्धन बालेकिल्ल्याचा दक्षिण बुरुज आभाळाला टेकला होता. सह्याद्रीचा एकदम उत्ताल कडा,शेला पागोटे चढवून संरक्षित केलेला. ऊन चांगलंच रणरणत होतं,   त्याही परिस्थितीत हे  म्हातारं जोडपं पायथ्याशी लिंबू पाणी विकत बसलं होतं. अरे बाप रे ! "कुठुन आला ? अन् सायकलवर ! एवढ्या उन्हातानात, या वक्ताला कोन न्हाय येत जास्त. पन पावसात लयी गर्दी करत्यात लोकं, तुमी बी या पावसाळ्यात. हितनं तो धबधबा लयी झाक दिसतो", इति आजीबाई. "  "श्रीवर्धन किल्ल्यावर पाण्याचा एक गोड झरा आहे नक्की बघा", इति आजोबा. थोड्या गप्पा मारून,यांच्या कमाईला हातभार लावत पोटात लिंबूपाणी रिचवलं,हुशार होऊन परत चाकं फिरू लागली.



श्रीवर्धनच्या बुरुजाला वळसा घालुन लगेच आम्ही राजमाची गावात शिरलो. आणि अर्थातच गर्दी नव्हती. सायकल घेऊन सरळ गणेशदादाच्या पडवीत अलगद विसावलो. हाताशी भरपुर वेळ होता आणि किल्ला पण तसा बऱ्याच वेळा धुंडाळून झालेला. त्यामुळे निवांत. तरीही किल्ल्यावरुन सूर्यास्त अनुभवायचा होता, श्रीवर्धनला भेट घडणार तोपर्यंत आपला पोटोबा घ्यावा उरकून. तांदळाच्या भाकरी अन् रस्साभाजी ओढुन झाली. गणेशने आम्हाला एक सल्ला दिलेला, " दादा, मागच्या बाजुला वनराईतनं थोडं पुढं गेला की मस्त एक घेरेदार आंबा आहे, चटाई घेऊन जावा" सल्ला ऐकुन आमची पावले तिकडे वळवली. राईतून धावणारी दगडी फरसबंद आणि आजुबाजुला चाललेला पक्ष्यांच्या आवाजाने खरोखरच माचीवर आल्याची खात्री पटली. मस्तच, राजमाचीच्या या कायापालटाला जबाबदार आहेत ते दस्तूरखूद्द गोनीदांचा सहवास लाभलेले श्री मुकुंद गोंधळेकर. त्यांची राजमाची ग्राम सहाय्यक समिती ईथे स्तुत्य असं काम करतेय. एव्हाना समोरचा डेरेदार आंबा दृष्टिस पडला आणि आम्हाला आमच्या शहरी जीवनाचं खरच वाईट वाटुन गेलं. दिली टाकुन निवांत पडी.

हाताशी असलेला वेळ, गर्द माचीवरली झाडी, बाहेर आग ओकनारा दिवाकर झाडाखाली मात्र गार सावली, कसली फ़िकिर नाही, राजमाचीला कित्येक वेळा आलोय पण असा निवांतपणा नव्हता. खरच सुख म्हणजे काय तर ते यालाच म्हणतात. माझ्या मते महाराष्ट्रातला प्रत्येक किल्ला प्रत्येक ट्रेकरने सगळ्या ऋतुंमध्ये अनुभवन्यासारखाच आहे. प्रत्येक ऋतुत त्याची वेगळीच मजा असते. त्यातला त्यात राजमाची तर सर्वार्थाने संपन्न असं ठिकाण आहे. आंब्याच्या झाडाखाली टेकवलेली पाठ आणि मिटलेले डोळे कधी वामकुक्षीच्या अधीन झाले कळलंच नाही. उघडले तेव्हा सगळं कसं स्वच्छ झालं होतं. स्वर्गीय निद्रा,सुख !







मनरंजन आणि श्रीवर्धन या दोन बालेकिल्ल्याच्या मध्ये खिंडीत एक छान भैरवनाथाचं फार जुनं मंदिर आहे,इथेही तिथपर्यंत जाणाऱ्या वाटेवर दगडी फरसबंद बांधुन काढलीये. अलीकडे गुहेत मुक्कामाची सोय करता येते,किंबहुना पावसात झालेल्या गर्दीत माचीवरला कुठलाच कोपरा शिल्लक नसतो त्यामुळे तेव्हा या छोटेखानी गुहेलाही भाव आलेला असतो. असो,इथूनच आपल्याला श्रीवर्धन किल्ल्याकडे जाता येतं. खिंडीतून वीस मिनिटात आपण पहिल्या दरवाज्यात पोहोचतो. आम्ही पोहोचलो तेव्हा नारायणराव कलायला सुरुवात झाली होती. येथुन मनरंजनाचा नजारा अप्रतिम दिसतो. त्याची तटबंदीही लक्ष वेधुन घेते. दाट झाडीने व्यापलेली माची अक्षरशः नजरेत भरते. मागे ढाक,कळकराय खूणवून जातात. दक्षिण बुरुजावरून आता कोरड्या पडलेल्या कातळधारचा कडा आणि दोन पठारामधील दरी एकदम भाव खाऊन जाते. त्या दरीत बघता बघता धबधब्याचं पावसाळ्यातलं खळाळणारं सौंदर्य आणि राजमाची परिसराचं देखण चिर-तारुण्य रूप डोळ्यांसमोर उभं राहिलं,ध्यानावर आलो तेव्हा आकाशात सोनेरी सूर्यकिरणांचा पट रंगला होता. पाऊसधारा कोसळलायला अजुन अवकाश आहे तर,तंद्री तुटली. पश्चिमेला गोधणेश्वराचं मंदिर अन् त्याच्या पुढ्यातला उदयसागर तलाव राजमाचीच्या जुणेपणाची आणि संपन्नतेची जाणीव करून गेले. खरोखरच ही माची म्हणजे,इतर किल्ल्यांच्या माचींचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कारण इथे अजुनही माणसांचा वावर कमी झालेला नाही. कोंकणातून माचीवर येताना किल्ल्याच्या पोटात खोदलेली कोंडाणे लेणी भेट देण्यासारखी. तसंच श्रीवर्धन किल्ल्यातही एक सुंदर छोटेखानी गुहा आहे, कमानीवर कोरीव गणेशाची मूर्तीही लक्षवेधी. सगळी अवशेष धुंडाळता नारायण पार खाली सरकला होता.मंद वारा वाहत होता. अंधारात किल्ला उतरून माचीवर पोहोचलो. आजचा दिवस सार्थकी लागल होता. ब्रेडवर चीज लावुन पोटात ढकललं, जमिनीवर पाठ टेकवली तेव्हा रात्रीचे दहा वगैरे झाले असतील.



पहाटे गोधनेश्वराचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला तेव्हा सकाळची कोवळी उन्हें पडली होती.जाताना कुणे गावातून जायचं होतं. तो विचार जरा त्रास देऊन गेला,गावाच्या अलीकडेच हिरव्यागार झाडांची जागा आता प्लास्टिकच्या अतिक्रमणाने घेतली आहे. क्रेन,बुलडोजर,मालवाहू गाड्यांच्या आवाजाने आसमंत दणाणत होता. अक्षरशः कचरा डेपो झाला आहे, विकास ! अजुन काय. नेहमीच शेवट गोड होतो असं नाही. आनंद फक्त डोंगरात, तिथुन बाहेर पडलं की रहाटगाडा सुरू....





13 comments:

  1. भन्नाट! आता कस भरल्यासारख वाटत संदीपभाऊ!

    ReplyDelete
  2. संदीप मस्तच रे, सायकलवरून राजमाची एक नंबरच

    ReplyDelete
  3. मस्तच ....नेहमीप्रमाणेच ��

    ReplyDelete
  4. Jabri narration..as ususal... :)

    ReplyDelete
  5. Khup chaan experience share kelay.tu jagalela kshane aamhini vachatana anubhavala.

    ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences