सह्याद्रीमस्तक साल्हेर -उत्तरार्ध !


          बागलाण मोहीम २०१५… हरगडाचे आत्मकथन 
          बागलाण मोहीम २०१५… साल्हेर पूर्वार्ध - इथुन पुढे 
आजचा दिवस थोडा निवांतच, गड उतरून "फक्त" परतीच्या प्रवासाला लागायचे आहे. पण त्या "फक्त" मध्ये बरेच काही येणार यात काडीमात्र शंका नाही. मला पण जरा उशीराच जाग आली. टेंट मधुन थोडं बाहेर डोकावून पाहिलं तर रोहन, रेश्मा आणि आमीन अजूनही झोपेच्या अधीन होते. गुहेबाहेर फट्ट पडलं होतं. बाहेर आलो तर गारठा मी म्हणत होता. परत जाऊन स्वेटशर्ट टाकलं आणि बाहेर आलो. काल संध्याकाळच्या पावसाने ओलावा जाणवत होता. कालच्या सांजवेळच्या सोनेरी पायघड्यांची जागा आता झुंजुमुंजु झालेल्या ओलसर गवतांच्या दुलईने घेतली होती. समोरच्या गंगासागर तलावातलं पाणी ढवळून निघाल्यावर शांत भासत होतं. ढग केव्हाच निवळले होते, पण राहिलेल्या थोड्याफार पुंजक्यानी पहाटेच्या निळ्याशार आकाशात वेगळाच साज चढला होता. गुहेवरच्या टेकाडावर, श्रीपरशुराम मंदीरावरील भगवा वाऱ्याने फड्फडत होता. त्याच्या पलीकडील नारायणाची उगवती किरणे साद घालत होती.
आज आम्हाला तेच टेकाड म्हणजेच  कळसूबाईनंतरचं सर्वोच्च शिखर सर करायचं आहे. ते कालच झालं असतं पण वरुण राजाच्या अवकृपेने राहिलं. तशी येथे येण्याची माझी ही दूसरी वेळ पण गेल्या वेळेसही दाटलेल्या धुक्यात कुठे चढतोय,काय चढतोय याचा पत्ता नव्हता लागत. परशुरामटोकावरचा भर्रार वारा तेवढा अनुभवला होता. बाकी धुक्यात हरवलेला आसमंत आणि सुंसुं करत घोँगावणारा वादळी वारा. एवढाच काय तो पावसाळ्यातला गडावरचा राबता. हे आताचं,पण भूतकाळात काय ? त्यातल्या त्यात ही श्रीपरशुरामाची तपोभूमी. खरच त्यांनी इथे तपश्चर्या केली होती ! पण ह्या गुहा तर तेच सांगण्याचा प्रयत्न करतात. या गुहेतच त्यांचं वास्तव्य असेल का ? कारण गडावरची राहण्याची ही एकमेव जागा. असं जर असेल तर इथली माती कपाळी लावायला पहिजे कारण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. वरच्या टोकावरुनच म्हणे परशूरामांनी बाण सोडून अपरांताची निर्मिती केली. एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यावर जिंकलेल्या पृथ्वीचं दान करून स्वतःलाच राहायला जागा नव्हती आणि मग सागराला मागे हटवुन त्यांनी कोंकणाची निर्मिती केली. आताचे कोंकणस्थ चित्पावन हे म्हणजेच श्रीपरशुरामांचे वंशज. हजारो वर्षापुर्वी सह्याद्रीची निर्मिती झाली ती या पौराणिक घटनेमुळे की धरणीमायच्या गाभार्यात धुमसणाऱ्या भौगोलिक कारणांमुळे ?, हा एक वेगळा शोधनिबंधाचा विषय आहे. असो. खाली गंगासागर तलावाजवळ त्यांच्या आईचे, रेणुकामातेचे मंदिरही आहे.गंगासागर टाक्याच्या पल्याड सरळ तुटलेला कडा हा धडकी भरवून जातो. गूहेतून टाक्याची भिंत कड्याला चिकटूनच बांधली की काय असे वाटून जाते. बाजूलाच गंगा-जमुना टाके आहे. हे सगळं बघुन या जागेबद्दल ऐकलेल्या,वाचलेल्या आख्यायिकांमध्ये मी हरवुन गेलो होतो.



बाकीची मंडळी एव्हाना झोपेतून जागी झाली होती. प्रत्येकजण निषिद्ध जागेच्या शोधार्थ पळत होता. सकाळची अण्हिकं उरकून गुहेत परतलो. रात्रीचा भात-पिठलं मिक्स करून परतून घेतला, उरलेल्या भाकरी आणि तव्यावरचं गरमागरम आमलेट. असाकाही नाश्ता झाला त्याला तोड नव्हती,तुम्हाला सांगतो. आईशप्पत मजा आली. या खादाड आठवांमुळेच हा ट्रेक लक्षात राहील यात वादच नाही.  आवराआवर झाली,सॅक पॅक करून गुहेतच ठेवल्या आणि परशुराम टोकाकडे ट्रेकस्थ झालो.


गूहेच्या वरच्या बाजूनेच जाणारी वाट आधी चुकली नंतर सापडल्यावर साधारण वीस मिनिटात माथ्यावर आम्ही पोहोचलो. सह्याद्रीच्या मस्तकावर पोहोचलो. पहाटेचं निवळलेलं आकाश परत धुरकट चादर पांघरूण होतं. माथ्यावरचं हे छोटेखानी मंदिर श्रीपरशुरामांच्या पावलांना ऊन-वारा-पाऊस या सगळ्यांपासुन वाचवत असतं, मंदिराच्या आत परशुरामांची मूर्तीही पाहायला मिळते.पुढ्यात सालोट्याचा भेदक सुळका साल्हेरशी स्पर्धा करतोय. पण साल्हेरचं वर्चस्व निर्विवाद ! येथुन संपूर्ण किल्ल्याचा आवाका नजरेस भरतो, डोळे नुसते भिरभिर फिरत असतात. एकेक दूर्गरत्ने साद घालत असतात. त्यांची ओळखपरेड झाली आणि उतरायला सुरवात केली. गूहेतून सॅक उचलुन साल्हेरवाडीकडे मार्गस्थ झालो.
साल्हेरचं हे पठार खरच अवाढव्य आहे ,याची प्रचीती आपल्याला परशुराम टोकावरून येतेच. पण वर्तमानात या पठारावरचे वाडेहुडे एकदम जमीनदोस्तच झालेले आहेत. यज्ञवेदी तेवढी आपल्याला आढळते. इकडे-तिकडे भिरभिरनारी नजर मात्र अस्वस्थ होती, खरंच काय राबता असेल गतकाळात. साक्षात कुबेराचं ऐश्वर्य भोगलं असेल या गडकोटाने. वाटेतलं ही यज्ञवेदी  परशूरामभूमीच असल्याची ग्वाही देत होतं. काय धार्मिक आणि पवित्रं वातवरण असेल नाही तेव्हा ! या यज्ञवेदीच्या चारही बाजूने बसलेला ऋषिमुनींचा गोतावळा डोळ्यांसमोर येऊन गेला. मंत्र,जाप अन् वेदीतल्या फटफट जळणाऱ्या समिधेचा आवाज क्षणभर कानात घुमुन गेला.आता मात्र ऊन-वारा झेलत हे पौराणिक साक्षीदार तग धरून उभे आहेत. पुढे वाटेत लागणाऱ्या टाक्यातले पाणी तोंडावर शिंपडुन आम्ही साल्हेरवाडीत उतरणाऱ्या पहिल्या दरवाज्यात पोहोचलो. दरवाज्याच्या तटावरुन किल्ल्याचा घेर बघुन रोहन पुटपुटला, "एवढ्या मोठ्या किल्ल्याला कसा काय वेढा घातला असेल दिलेरखानाने ? काय भयंकर युद्ध झालं असेल नाही !" "अरे हो ! ह्या किल्ल्याची माहिती म्हणजे इतिहास कोणी सांगितलाच नाही, काय इतिहास आहे या किल्ल्याला,स्यांडी ", इति रेश्मा.



इतिहास ! इथल्या मातीला जेवढा पौराणिक गंध आहे,तेवढाच भव्य इतिहास बागलाणातल्या या सर्वोच्च मानबिंदूला आहे. पार बागुल राजांपासुन सुरू होणारा वैभवशाली इतिहास शिवशाहीतल्या घटनांवरून सरकत पुढे गुजरातच्या गायकवाडांपर्यंत येऊन थबकतो. इथे राज्य करणारा शेवटचा बागुलवंशीय राजा तो बहीर्जी, त्यानंतर किल्ला गेला मुघलांच्या ताब्यात
मुघलांचं बळकट ठाण म्हणुन हा किल्ला प्रसिद्ध होता, औरंगजेबाने किल्ल्याचं नाव ठेवलं होतं," सुलतानगड ". पण सन 1670 मध्ये एक आनंदाची घटना घडली. महाराजांनी सुरतेसह वर्हाडतल्या कारंजालुटीची संपत्ती स्वराज्यात आणताना साल्हेरवर कब्जा केला आणि लूट इथे ठेवण्यात आली. सह्याद्रीचं मस्तकच स्वराज्यात दाखल झालं म्हटल्यावर पातशाह गप्प थोडेही ना बसणार ! औरंगजेब चेकाळला आणि तयारी सुरू झाली साल्हेरच्या अजरामर रणसंग्रामाची. छत्रपती शिवाजीमहाराजांना शहाजीराजांकडून मिळालेल्या "गनिमी कावा" या युद्धतंत्राचं अजुन एक उत्कृष्ठ उदाहरण.  महाराज जातीने युद्धात हजर नसले तरी पेशवे मोरोपंत पिंगळे आणि सेनापती प्रतापराव गुजर यांच्या नेत्रुत्वाखालील मराठ्यांनी मुघलांना चांगलीच धूळ चारली. खुल्या रणांगणातही गनिमी काव्याचा अफलातून प्रयोग, यापेक्षा हुशार असूच शकत नाही. अफझलखानाचा वध जेवढा इतिहासात प्रसिद्ध तितकाच प्रकाशझोतात आलेला हा साल्हेरचा रणसंग्राम.




बादशाहचं फर्मान शिरसावंध्य मानून बहादुरखान,महाबत खान,जसवंतसिंग, दिलेरखान अशी खाशा मंडळी साल्हेर घेण्यासाठी निघाली. मुघल होते पन्नास हजारांच्या आसपास. जसा पुरंदरला वेढा घालुन मी शिवाजीला जेरीस आणलं तसाच वेढा साल्हेरला घालुन मराठ्यांना  मारतो,असाच विचार करून दिलेरखान बागलाणात दाखल झाला असावा. साधारण चार कोस घेराच्या या रांगडया किल्ल्याला वेढा पडला.

इकडे कोंकणातून मोरोपंत आणि नगरहून प्रतापरावांचे सैन्य येऊन दिंडोरीस मिळाले अन् तयारी सुरू झाली. जवळपास चाळीस हजार मराठे तीन फळीत विभागले गेले. त्यातली एक साल्हेरच्या दक्षिणेस दबा धरून बसली, मोरोपंतांच्या नेतृत्वाखाली.दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे अंमलबजावणी झाली आणि पहाटे पहाटे दूसरी फळी वेढ्यावर तुटून पडली,बघता बघता माणसं पडू लागली. पण तासाभरानंतर मराठ्यांनी आपलं ब्रम्हास्त्र उपसलं, त्यांनी माघार घ्यायला सुरवात केली. मुघलांना कळायच्या आत मराठे पळायला लागले.विजयाच्या गैरसमजूतीने बेहोश होऊन मुघलांनीही त्यांचा पाठलाग करायला सुरवात केली. साल्हेरपासुन चांगले चाळीसएक किमी दुर येऊन मुघल सैन्य कमालीचं थकलं होतं आणि त्याच वेळी तिसऱ्या फळीतलं अगदी ताज्या दमाचं राखीव सैन्य  मुघलांवर तुटून पडलं, प्रतापरावांची फळीही मागे फिरली आणि कात्रीत सापडल्याप्रमाणे मुघल अक्षरशः कापल्या गेले.इकडे हे रणकंदन चालु असताना दुसरीकडे  त्याचवेळी नाटकाचा दुसरा अंक चालू होता.

साल्हेरच्या पायथ्याशी मोगल सैन्यांचा वेढा शिथिल पडला होता. दक्षिणेस दबा धरून बसलेल्या मोरोपंतांच्या सैन्यांनी गाफील मुघलांचा खरपुस समाचार घेत गड राखला. दिलेरखान पळुन गेला,इतर सहकारी मारल्या गेले. मराठ्यांनी गड राखला.




हा झाला साल्हेरचा इतिहास ! शिवशाहीतलं एक सोनेरी पान ,लिहावं तितकं कमीच. इथे थोडक्यातच मांडला,लिहायला बसलो तर छोटेखाणी पुस्तक पण पुरणार नाही. आणि या आणि अशा कितीतरी ऐतिहासिक घटनांची साक्ष देतात हे तग धरून राहिलेले दरवाजे. या दरवाज्यांना स्पर्श करावा, इतरत्र पडलेली एखादी दगडी वीट जागेवर ठेवावी. इथे घडलेल्या पराक्रमांचं स्मरण करावं -कौतुक करावं. दरवाजांवरचे नक्षीकाम मायेनेे कुरवाळावे की ते आपोआपच बोलू लागतात. ह्याच गूजगोष्टी ऐकायला तर पाच दिवस एसी-पीसीत धुसमटणारी जिवं इथे रममाण होतात. नाही का !


साल्हेरवाडीकडे उतरतानाचा हा पाहिला दरवाजा साध्या कमानीचा पण, कोपऱ्यातले दगडी नक्षीकाम लक्ष वेधून घेतात.उजवीकडच्या भागात मोठी फट पडली असुन दरवाजा बऱ्यापैकी तग धरून उभा आहे. तेथुन साठ अंशाच्या पायऱ्या उतरण्याची कसरतही आनंद देऊन जाते. पायथ्याचा रस्ताही अगदी जवळ भासून जातो.

या दरवाज्याचं कौतुक संपत नाही तेवढ्यात पुढचा दरवाजा आपल्यापुढे दत्त म्हणुन उभा ठाकतो. हा पण अगदी साध्या बांधणीचा, पण याच्या जोडीस लगेच दुसरा. खालच्या दरवाज्यावर पहारेकऱ्यांच्या जंग्या लक्ष वेधून घेतात. दरवाज्याचा डावीकडचा कडा तासून सुरक्षित आणि संरक्षित केलेला. कमाल ! परत कातळात कोरलेल्या तीव्र उताराच्या पायऱ्या उतरून दरवाजा मनात साठवावा. खालच्या पठारावर पोहोचलो साल्हेरचा पश्चिमकडा दोन्ही बाहु पसरून भेटीचं आमंत्रण दिल्यासारखा भासत होता. या हाकेला देत आमीननेही हे आमंत्रण स्विकारलं. या नजाऱ्याचं एक छानसं प्रकाशचित्र कॅमेरात कैद झालं. काय त्या कड्याची अभेद्यता ! निसर्गापुढे मानवीय खुजेपण इथे उघड उघड जाणवत होतं. खरच सह्याद्रीचा मस्तक शोभतो हा साल्हेर. सर्वोच्च स्थानी वसलेलं भगवान परशुरामांचं मंदिर आता इटुकलं भासू लागलं. दुर्गवीर प्रतिष्ठानने सफाई केलेल्या या पठारावरील टाक्यातले पाणी पिऊन आम्ही पुढे सरकलो. बाजूलाच कुणा अज्ञात विराच्या पादुका चौथऱ्यावर विराजमान आहेत. एक भलामोठा तोफगोळाही टिकून आहे. तिथूनच खाली उतरायला दूसरी एखाद वाट असावी. खालच्या साल्हेरवाडीतला आवाज अजुन जवळ भासून गेला. पण चालावं अजुन भरपूर लागणार,हेही निश्चित.

पायाखालची धोपटवाट, डावीकडचा शैलकडा आणि पुढ्यात परत दरवाज्यांची साखळी. बांधकाम शेवटची घटका मोजतय पण महीरफी नक्षीदार कमान अजुनही शाबूत ! बांधिव दगडी पायऱ्या, डाव्या बाजुला कातळात गणपती कोरलेला. दरवाज्यांची इतकी भलीमोठी साखळी आतापर्यंत निदान माझ्यातरी किल्ले भटकंतीत पाहण्यात नाही. अप्रतिम, अविश्वसनीय !


उन्हाची तीव्रता वाढत होती,तशी पोटातली जनताही ओरडायला लागली होती. पण पायाखालचा दगडांनी बांधून काढलेला हाइवे उतरताना त्या भुकेपेक्षा ट्रेक संपत आल्याचंच दुःख जास्त होतं. वनराईतल्या देवीचे दर्शन घेऊन शेवटच्या पायवाटेला लागलो. आव्हान संपलं होतं. बागलाणच्या हरगड-सालोटा-साल्हेर या त्रयीँचा अविस्मरणीय प्रवास आता संपणार होता, पण अर्थातच बागलाण फीरस्तीची चटक लागणार हे निश्चित. कारण हे मानकरी जरी असले तरीही बागुलभूमी इथेच थोडेही ना संपणार ! ही भटकंती अशीच चालु राहणार !!! साल्हेरवाडीत उतरलो तेव्हा आकाशात मळभ दाटून आलं होतं पण त्याहीपेक्षा मन दाटून आलं होतं, जिपड्यातून निरोप घेताना या बागलाणी मानकऱ्यांचा, साल्हेर -सालोट्याचा !
इति संपुर्णम बागलाण मोहीम २०१५ !
धन्यवाद । संदिप वडस्कर

(Comment box or wadaskarsandip@gmail.com यावर तुमच्या प्रतिक्रिया कळवु शकता )


7 comments:

  1. अतिशय परिपूर्ण वर्णन! सह्याद्रीत भटकणारयाच्या मनात येणारया सर्व गोष्टी मांडल्यात! लिहीत रहा संदीपभाऊ!मस्त!

    ReplyDelete
  2. आभारी आहे तुषारभाऊ,तुझी प्रतिक्रिया नेहमीच उत्साह आणते. परत एकदा धन्यवाद !

    ReplyDelete
  3. साल्हेर हा सह्याद्री-मस्तक ओळखला जात असला तरी तुझा ब्लॉग म्हणजे सर्व ब्लॉग्स चा बादशाह म्हणावा लागेल आणि हा साल्हेर चा ब्लॉग म्हणजे त्या बादशहाचा राजमुकुट जणू...
    Awesome...

    ReplyDelete
  4. दादा, 3 वर्षांपूर्वी केलेल्या साल्हेर पेक्षा हा वाचताना अनुभव घेतलेला साल्हेर न विसरण्यासारखा आहे.. लिहीत रहा.. आमच्यासारख्या वाचकांसाठी 🙌🙌🙌

    ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences