बागलाण मोहीम २०१५…. हरगडाच्या आत्मकथनापासुन पुढे
दोन वर्षाआधी भरपावसात केलेली साल्हेरची वारी जशीच्या तशी डोळ्यांसमोर आहे. कोसळणाऱ्या सरींची गाज आणि सुंसुं करत वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज अजूनही तेवढाच ताजा,अगदी कालच इथून गेल्यासारखा. पण त्याच पावसामुळे अर्धवट झालेली गडफेरी आणि तेव्हाचा राहून गेलेला सालोटा मनात घर करून होता. हरगडही चुकला होता. बागलाणात पुन्हा एकदा भटकायला ही दोन कारणं पुरेशी होती. सह्यमित्रांची जुळवाजुळव करून पावले नाशकाकडे वळवलीच. त्याच भटकंतीचा आजचा दुसरा दिवस उजाडला तो पहाटेच्या पडलेल्या दवाने. स्वच्छ आकाशाची अपेक्षा असताना पहाटेचं मळभ अस्वस्थ करीत होतं. आता पाऊस बरसतो की काय अशी भीती वाटून गेली. कालचं दिवसभराचं हरगडपुराण ऐकून मुल्हेरमाचीवर आमचा मुक्काम पडला होता.गर्द वनराईत तलावाकाठी वसलेल्या माचीवरल्या ऐतिहासिक गणेश मंदिरातला मुक्काम आणि हवाहवासा गारठा, दिवसभराचा सारा शीणच निघुन गेला. पहाटे पहाटे बिनदुधाच्या कोऱ्या-करकरीत चहात लिंबू पिळून घशाला शेक दिला आणि पायगाडी सुरु केली.
माची उतरतोय तसं आकाश निवळायला लागलं. पाऊण तासात मुल्हेरवाडी गाठून वाघांबेच्या रस्त्याला लागलो. बागलाणातलं एक उपेक्षित दुर्गरत्न सर झाल्याचं समाधान वाटत होतं, त्यात जिपड्यात लावलेल्या टिपिकल नाइनटीजच्या गाण्यांनी तर तोंडावर पाणी न मारता एकदम ताजेतवाने झाल्यासारखे वाटले. जीपची बाल्कनी आमच्या सॅकनी गच्च झालेली अन् त्यातच थोड्याफार जागेत आमची चौकडी एकदम फिट बसली होती. हरणबारीच्या डाव्या बाजूने गेलेला निवांत रस्ता आणि बहुदा पहाटेची राहिलेली थकबाकी गोळा करत पुढ्यात बसलेला रोहन केव्हाच गारद झाला होता. पण त्याच्या दुर्दैवाने वाघांबेचा रस्ता काही लांब नव्हता. जिपड्यातून उतरलो तर गावकऱ्याच्या प्रश्नांचा भडीमार सुरु झालेला. दोन वर्षापूर्वीच्या पावसाळी आठवांना उजाळा मिळाला. सर्वदूर पसरलेल्या हिरवाईत, वरून टपोऱ्या थेंबांचे तडाखे सोसत आम्ही खिंडीकडची जवळ केलेली वाट आणि धुक्यात हरवलेले साल्हेर-सालोट्याचे गडमाथे आठवून गेले.यावेळेला मात्र गावातूनच त्यांचं स्पष्ट दर्शन झालं. खल्लास ! आकाशास भिडलेले दोन्ही गडमाथे पुढच्याच क्षणी काळजास भिडले.
शेताच्या दांडांवरून पावलांनी खिंडीकडे ताल धरला. थोड्याच वेळात वरच्या झापावरून छोटा मुलगा येऊन मिळाला. "मै आऊ किल्लेपर" असे त्याने हिंदीत विचारल्यावर आमीन भडकला, मराठी येत नाही का रे ? नाव काय तुझं ? "कांतीलाल" तोंडात बोट घालत तो उत्तरला. अनवाणी पायाने आमच्यासोबत चालू लागला. या मुलाच्या नावावरून बाकी गुजरातेत असल्याचाच भास झाला. तसं वाटणं साहजिकच आहे म्हणा, पुढ्यात दिसणारी भौगोलिक पोकळी ही गुजरातमध्येच मोडते. तेल्या घाटाची खिंड ओलांडली की आपण रोमिंग मध्ये. इथल्या मराठी भाषेवर गुजरातीचा प्रभाव पडूनच तर बागलाणी तयार झाली. एव्हाना आम्ही वरच्या पठारावर पोहोचलो तेव्हा भुकेची तीव्र जाणीव होत होती. पण पुढ्यातला सालोट्याचा भेदक सुळका आणि उजव्या बाजुला साल्हेरचा शैलकडा एकदम देहभानच विसरून गेला. याला म्हणतात नैसर्गिक तटबंदी ! व्वा !! वरच्या पदरात खोदीव गुहा खुणावून गेल्या. दक्षिणेस त्याच रांगेतून निघालेली भीमाची बोटं,थेट हरगडाच्या लिंगीपर्यंत पोहोचलेली. पायथ्याशी वाघांबे,भीमखेत आदी निवांत पहुडलेली. या निसर्गचित्राचा आस्वाद घेत उदरंभरणम आटोपून अर्ध्या तासात खिंड गाठली आणि सालोट्याच्या चढाईस सज्ज झालो.
खिंडीत पायथ्याच्या माळदर गावातून अजुन एक वाट येऊन मिळते. उजवीकडे साल्हेरला जाणारी,ती सोडून डावीकडची वाट पकडून सालोट्याच्या सुळक्याला भिडलो. उभ्या महाकाय सुळक्याला चिकटून पुढे गेलेली ही पायवाट म्हणजे जेमतेमच. म्हणजे पाय हुशारीने टाकलेलाच बरा नाहीतर घरंगळत पायथ्याशीच. ही आडवी पार केली की आपला खेळ सुरु होतो तो उभ्या चढाईचा,सोबतीला वाटेतला घसाराही काही कमी नाही. हि वाट बघुन तर वाटायला लागलं,बरं झालं छोटा कांतीलाल बरोबर आहे. गावातलं कोणी सोबत असलं की एक मानसिक आधार असतो. आता कांतीलाल छोटा असला तरी फरक नाही पडत. तरा तरा चढत तो पुढे पळायचा, पाठीवरच्या सॅक सांभाळत आमची मात्र तारांबळ उडायची. एक उभा चढ येँगुन आम्ही सालोट्याच्या पायऱ्यांना भिडलो. कुठे तुटलेल्या पायऱ्या,मुरमाड वाट जीव मुठीत घेऊन थोडं वर सरकलो तर पायऱ्यांसाठी कोरलेला कडा अंगावर येत होता. धक्का लागून पडतो की काय ? अशी भिती वाटत होती, समोरचा साल्हेरपर्वत मात्र जीव ओवाळून टाकावा असा भासत होता. त्याच्या पोटात कोरलेल्या पायऱ्या आणि दरवाजे-कमानीचे विहंगम दर्शन होत होते. निसर्गाने निर्मिलेल्या कलाकृतीवर मानवीय हस्तक्षेपाचा सुंदर साज चढला होता,खरंच कमाल !
पहिला दरवाजा ! कातळात कोरलेल्या या अखंड दरवाज्याची कमान एकदम शाबूत आहे. कमान म्हणजे महिरप नसुन एक चौकटच कोरुन काढलेली आहे, दोन बाजूंना सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. पण उंबरठय़ातच वरून तुटलेला एक भलामोठा धोंडा येऊन पडला आहे. तिथून वाट काढत पुढे गेलो की उजव्या बाजुला नितळ पाण्याचे टाके, गार पाणी पोटात रिचवून आमचा प्रवेश गडाच्या दुसऱ्या दरवाज्यात. हा दरवाजा मात्र दगडी रचून बांधून काढलाय. कमान शाबूत आहे. दरवाज्याच्या वरच्या बाजूस पहारेकऱ्यांची जागा पण एकदम मोक्याच्या ठिकाणी आहे. "स्लीपिंग बॅग टाकून झोपेची काय मस्त सोय होईल यार",इति रोहन. दुसरं कोण ? असु दे ,असतं एकेकाचं. येथुन साल्हेरचं श्रीपरशूराम टोक एकदम स्पष्ट दिसतं. तीवरील खोदीव गुहेँची लांबचलांब साखळी आणि चढाईचा मार्ग खुणावत जाते. साल्हेरसारखीच गुहेँची साखळी ही सालोट्यावर पण आहे. कुठे कोरडे, कुठे पाण्यावरचं पिवळेधम्मक शेवाळ आणि आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत आम्ही तिसऱ्या दरवाज्यात पोहोचतो. दरवाज्यात प्रवेश करून पुढ्यातल्या पायऱ्या चढलो की गडमाथा.
गडमाथ्यावर भग्न वाड्यांचे अवशेष,पाण्याची टाकी,हनुमानाचे मंदिर याखेरीज काही नाही. पण एका नजरेत न सामावणारा बागलाण आणि त्याचा सर्वोच्च मानबिंदु साल्हेर याचा ताशिव कडा,याचे विहंगम दर्शन होते. "सह्याद्री मस्तक: बग्गुला नामभूत पूर्व जगतीतल् विश्रुत: " या जयराम पिंडे यांच्या ओळींचा शब्दशः अर्थ आपल्याला इथूनच,सालोट्याच्या माथ्यावरूनच लागतो.
सह्याद्रीमस्तक ! पूर्वी बागूल राजाच्या ताब्यात असलेला जगातील सुप्रसिद्ध दुर्ग आणि सह्याद्रीचं मस्तक. कमाल ! जणु परमेश्वराने सालोटा हा साल्हेरदर्शनार्थच उभारलाय. सालोट्याला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असले तरी त्याचे महत्व हे साल्हेरमुळेच. अगदी जुळेभाऊच,फरक काय तो उंचीचाच. सालोट्यावरून साल्हेरच्या आणि महाराष्ट्राल्या कळसूबाईनंतर सर्वात उंचावर वसलेल्या चित्पावनाला दंडवत घालुन आम्ही परतीला लागलो.
उतरताना मनात भितीची लकेर उमटुन गेली. मुरमाड तुटलेल्या पायऱ्या, निसरडी वाट,खोल भयाण दऱ्या आणि भरीस भर म्हणून पाठीवरच्या जड सॅक, "कांतीलाल, उतरता येईल ना रे ? छोट्या कांतीलालने मान हलवली आणि पाणपिशव्या भरून आम्ही उतरायला सुरवात केली. साहजिक पहिली नजर गेली ती एकदम दरीत,शरीर मात्र पहिल्याच पायरीवर ठिय्या मांडून. चुकून अंगावर आलेल्या कड्याचा धक्का सॅकला लागला तर कपाळमोक्ष खालच्या दरीतच. एकमेकांना सांभाळत एकदाचं आम्ही खालच्या आडवीला लागलो तेव्हा सुटकेचा नि:श्वास टाकला.
पुढच्या दहा मिनिटात खिंडीत पोहोचलो तेव्हा आभाळात मेघ दाटून येत होते. अरे काय राव हा पाऊस गम्मत करतो.कांतीलालला निरोप दिला. क्षणात पावसाने गंभीर होत टप टप पडायला सुरुवात केली. पण थोडाच वेळ. एक बरं झालं, या घाई गडबडीत आम्ही साल्हेरच्या पहिल्या दरवाज्याजवळ कधी पोहोचलो ते कळलंच नाही. आता वेळ होती सालोट्याचा भेदक सुळका मनात साठवायची, साल्हेरच्या प्रत्येक पायरीनिशी सालोट्याचं ते रूप अधिक अधिकच भेदक होत होतं. नेमका हाच नजारा गेल्या पावसाळी भटकंतीत आम्ही चुकवला होता. आता तो पुढ्यात होता. पावले पुढे, मागे सालोटा अशा पद्धतीने आमची टोळी साल्हेरची वाट कमी करत होती. पहिल्या दरवाज्याचे दर्शन झाले. कमान जागेवर असली तरी बांधकाम ढासळलेल्या अवस्थेत आहे, आता कातळात उभ्या कोरलेल्या पायऱ्या चढून एक-एक दरवाज्याचे कौतुक करावे आणि चालत रहावे. बेलाग सह्यकडे आणि त्याच्याच पोटात खोदलेले हे अप्रतिम दरवाजे. दुसऱ्या दरवाज्याच्या कमानीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. काय कौतुक वर्णावे,काय सोडावे आणि काय धरावे ! हजारो वर्षापासून उन-वारा-पाऊस या कशाचीच तमा न बाळगता आकाशासी स्पर्धा करू पाहणाऱ्या या सह्यकड्यांचे गुण गावे की, निसर्गदत्त या डोंगरात ह्या कलाकृतीचा साज चढवणाऱ्या मानवीय हस्तक्षेपास दंडवत घालावा. बिल्डरच्या घश्यात आयुष्यभराची कमाई घालूनही पुढच्या पन्नास वर्षाची ग्यारंटी मिळत नाही,तिथे हे बिनसिमेंटचे दरवाजे कसे काय तग धरून आहेत हो !! हा भाबडा प्रश्न मनात येऊन जातो. या रेखीव तीन दरवाजांची साखळी चढुन आलो की मानवाच्या कल्पकतेला खरंच सलाम करावासा वाटतो. डाव्या बाजूस कोरलेल्या गुहा,त्याच पहिल्या गुहेत गेल्या पावसाळी भटकंतीत केलेला मुक्काम आणि अर्धवट शिजलेली मुंगडाळ खिचडी. वसुने डीओ म्हणुन वापरलेलं वॉलिनि आणि माळदरच्या त्र्यंबकदादासोबत मारलेल्या गप्पा. या आठवांना परत उजाळा मिळाला. पण तूर्तास आकाशी साचलेल्या मळभाने कॅमेराचा चांगलाच हिरमोड झाला होता.बुड टेकवून पंधरा-वीस मिनिटांची विश्रांती झाली. थोडेफार जीभेचे चोचलेही पुरवून झाले.
आभाळात मेघांनी चांगलाच सुलतानढवा केला होता. ढगांच्या गडगडाटासह विजेचे लोळ सळसळत होते. साल्हेर आणि मेघराजाचं नातं हे आमच्याच वेळेस एवढं का उतू यावं. या बेमोसमी पावसाने फोटोग्राफीवर पाणी फिरणार होतं. मन थोडं नाराज झालं. थोड्या गूहेच्या उजव्या बाजूने चालायला सुरवात केली. कानठळया बसवणारा मेघांचा आवाज ऐकतच चौथा दरवाजा ओलांडून पठारावर प्रवेश केला.
समोरच्या शिखरावर श्रीपरशूराम विराजमान आहेत, पण या वादळात नको म्हणत गुहेकडे मोर्चा वळवला. पाऊस चांगलाच रंगात आला होता. परत एकदा पावसाने नाराज केलं. सांजवेळी पठारावरील मावळतीची किरणे अनुभवायची होती, सोनपिवळ्या कुरणांना डोळे भरून पहायचे होते,परशुरामटोकावरून क्षितीजावर उमटलेल्या सूर्यकिरणांचा खेळ बघायचा होता. पण कसलं काय. आता पळत जाऊन गुहा गाठण्याशिवाय पर्याय नव्हता.
बऱ्यापैकी भिजत गुहेत पोहोचलो,पाऊस जुलैसारखा कोसळत होता. "अरे लाकडं, चुल पेटवायला लाकडं !!", अर्थात हा प्रश्न तिच्याशिवाय कुणाच्या डोक्यात येणार ? पावसात सगळी लाकड ओलसर पडली असतील,येताना आम्ही एखाद धोंडा आणला होता उचलून.पण तो पुरेसा नव्हता. सुदैवाने बाजूच्या गुहेत दोन-तीन मोठ्या काटक्या मिळाल्या आणि आमची निखाऱ्याची सोय झाली. चुलीतल्या समिधेने पेट घ्यायला सुरवात झाली तशी गुहेबाहेर पावसाची सर ओसरायला लागली.मुल्हेरमाचीसारखंच आजचाही बेत हा खरपुस भाकऱ्या,पण कोरड्यास मात्र पिठलं. आत भाकरीचा खमंग तर बाहेर नुकताच ओसरलेला पाऊस आणि त्या पावसासरशी पसरलेला एक अनामिक सुगंध, ढगांनीही उघडीप देऊन सूर्यकिरणांनी सजलेला लाल-तांबडा आसमंत आणि खाली गंगासागर तलावाच्या आजुबाजुला पडलेल्या, वाळून भिजलेल्या गवताच्या सोनेरी पायघड्या ! कमाल रे निसर्गा तुझी !! असाच लाभत जा बाबा.
अंधार पडायला सुरुवात झाली. चुल धगधगत होती,बाहेर गारठा वाढत होता. छोट्या स्टोव्हवर भात शिजत होता,तव्यावरची फ्राइड कोवळी गवार पण तयार झाली तोंडी लावायला. मध्येच रोहनला कुणाची तरी चाहूल लागायची, "नाही,नाही आवाज आला !अशी नखं ओरबाडल्यासारखा,हो खरंच !" तसा जमिनीवरपण हाताने ओरबाडुन दाखवायचा. ये ! गप्पये !!, इति रेश्मा. बाहेर मिट्ट काळोखात काहीतरी सळसळलं की पहिला या रोहनला पत्ता लागायचा. वाऱ्यामुळे प्लास्टिकचा आवाज झाला तरी. ओघवत्या गप्पा साल्हेरच्या माहितीवर सरकल्या आणि विषय नेमका इतिहासाकडे न झुकता पौराणिक कथांवर येऊन धडकला.साहजिकच चित्पावनावर प्रकाश पडला याचं कारण,आज आम्ही आदीचित्पावनाच्या तपोभूमीत आणि दुसरं म्हणजे रत्नागिरीतला खुद्द एक गोरटेला चित्पावन हातात टॉर्च घेऊन आमच्यात बसला होता. मग आम्ही कोंकणी लोक कंजूस नसुन गरीब कसे,ते कीती समजदार आणि कष्टाळू वगैरे वगैरे. त्यानंतर चित्पावनांची उत्पत्ती या विषयावर एक छान चर्चासत्र रंगलं. याच गप्पा-टप्पात स्वयंपाक तयार होत आला होता. आहाहा ! जेवणाचा दणकाच उडाला एकदम. एवढ्या उंचीवर गरमागरम जेवण म्हणजे अहोभाग्यम. बागलाणी मोहिमेचा आजचा दुसरा अंक संपला तो ह्या स्वर्गीय चवीच्या अस्सल मराठमोळ्या जेवणाने. "कशासाठी....पोटासाठी.....सह्याद्रीच्या....मस्तकासाठी !" या कवी माधव ज्युलियन यांच्या चार शब्दांना फाटे फोडत, या पामराला काहीतरी सुचुन गेलं. बस्स,इतकंच !!
धन्यवाद । संदिप वडस्कर
(Comment box or wadaskarsandip@gmail.com यावर तुमच्या प्रतिक्रिया कळवु शकता )
संदिपभाऊ,
ReplyDeleteझकास एकदम! ऊत्सुकता जागरूक करणार लिखाण! असाच जागर चालू द्या! चांग भल!
धन्यवाद तुषारभाऊ !
DeleteKhup cha surekh!!
ReplyDeleteधन्यवाद ज्योती !
DeleteKhup mast Sandip..
ReplyDeleteधन्यवाद मुकुंद !
Deleteखूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !! लेखन आणि माहिती दोन्ही उत्तम :)
ReplyDeleteखूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !! लेखन आणि माहिती दोन्ही उत्तम :)
ReplyDeleteआभारी आहे देवेंद्र !
Deleteआभारी आहे देवेंद्र !
DeleteNostalgic!!!!
ReplyDelete