उंबरठा ! घरातुन बाहेर पडताना ओलांडला जातो. आपण रोज ओलांडतो, पर्याय नसतो. नाहीतर रोजच्या भाकरीची सोय कशी होणार. पण त्याला खऱ्या अर्थाने ओलांडला असे म्हणता येत नाही,कारण जी गोष्ट आपण रोज करतो,गरजेसाठी करतो, ज्यात तोचतोचपणा असतो,तेव्हा विशेष असं काही वाटत नाही. प्रत्येक गोष्टींमधून आनंद घ्यायला अर्थातच त्यात नाविन्याची गरज असते,घरातुन बाहेर पडण्याची गरज असते म्हणजेच कंटाळवाण्या जगातून तुम्ही बाहेर पडून जर नवीन भरारी घेण्यास तयार असाल तेव्हा खऱ्या अर्थाने उंबरठा ओलांडला असं मी समजेन. निदान माझ्या बाबतीत तरी तसंच आहे, माझ्या आवडत्या डोंगर भटकंतीमध्येही मी जेव्हा तोचतोचपणा आणतो,तिथे समाधानाची अपेक्षा मी कशी करणार. असो लिहिण्याचे कारण की गेली चार महिने पायांना डोंगरवाट लाभलेली नाही, डोळ्यांना सह्यरांगेतला सूर्योदय-सूर्यास्त दिसलेला नाही. दऱ्या-खोऱ्यातला भरार वारा पिऊन तप लोटल्यासारखं वाटतंय. हव्याहव्याश्या वाटणाऱ्या पायांच्या दुखण्याचे विस्मरण व्हायला लागले. कधी कधी पायातली तिडिक डोक्यात जाते,पण चार पावले पुढे जायला दोन पावले मागे येण्याचा सल्ला अंतर्मन देऊन जाते. मग एखाद्या शनवाऱ्या पहाटे सिंहगडाची पायवाट तुडवली जाते. पण इथेही उंबरठा ओलांडण्याचे समाधान लाभत नाही,शेवटी सिंहगड चढुन उतरणे हाही एक दैनंदिनीचाच भाग, नाही का !
शनिवार -रविवार अगदी ऑफिस ला दांड्या मारून सह्याद्रीत रमणाऱ्या टोळीतला एक स्वच्छंदी भटक्या. या अशा कित्येक भटकंती स्वहस्ते नोंदविलेला हा ब्लॉग.कधी कधी भटकत असताना सह्याद्रीला उपमा देताना त्याच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात , पण थोड्याफार वाचनाने,स्वानुभावाने आमच्या ट्रेकचे वृत्तांत आंतरजाळावर उतरविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. हा ब्लॉग वाचुन तुमच्याही पायाला भिंगरी लागेल यात शंकाच नाही ,अर्थात तसे झाले तर या ब्लॉगचे सर्वात मोठे यश असेल.बाकीच्या गप्पा लेखांमधुन ,फोटोंमधुन होईलच
उंबरठ्यापलीकडील जग...'राज'माची
सह्याद्रीमस्तक साल्हेर -उत्तरार्ध !
बागलाण मोहीम २०१५… हरगडाचे आत्मकथन
बागलाण मोहीम २०१५… साल्हेर पूर्वार्ध - इथुन पुढे
आजचा दिवस थोडा निवांतच, गड उतरून "फक्त" परतीच्या प्रवासाला लागायचे आहे. पण त्या "फक्त" मध्ये बरेच काही येणार यात काडीमात्र शंका नाही. मला पण जरा उशीराच जाग आली. टेंट मधुन थोडं बाहेर डोकावून पाहिलं तर रोहन, रेश्मा आणि आमीन अजूनही झोपेच्या अधीन होते. गुहेबाहेर फट्ट पडलं होतं. बाहेर आलो तर गारठा मी म्हणत होता. परत जाऊन स्वेटशर्ट टाकलं आणि बाहेर आलो. काल संध्याकाळच्या पावसाने ओलावा जाणवत होता. कालच्या सांजवेळच्या सोनेरी पायघड्यांची जागा आता झुंजुमुंजु झालेल्या ओलसर गवतांच्या दुलईने घेतली होती. समोरच्या गंगासागर तलावातलं पाणी ढवळून निघाल्यावर शांत भासत होतं. ढग केव्हाच निवळले होते, पण राहिलेल्या थोड्याफार पुंजक्यानी पहाटेच्या निळ्याशार आकाशात वेगळाच साज चढला होता. गुहेवरच्या टेकाडावर, श्रीपरशुराम मंदीरावरील भगवा वाऱ्याने फड्फडत होता. त्याच्या पलीकडील नारायणाची उगवती किरणे साद घालत होती.
आज आम्हाला तेच टेकाड म्हणजेच कळसूबाईनंतरचं सर्वोच्च शिखर सर करायचं आहे. ते कालच झालं असतं पण वरुण राजाच्या अवकृपेने राहिलं. तशी येथे येण्याची माझी ही दूसरी वेळ पण गेल्या वेळेसही दाटलेल्या धुक्यात कुठे चढतोय,काय चढतोय याचा पत्ता नव्हता लागत. परशुरामटोकावरचा भर्रार वारा तेवढा अनुभवला होता. बाकी धुक्यात हरवलेला आसमंत आणि सुंसुं करत घोँगावणारा वादळी वारा. एवढाच काय तो पावसाळ्यातला गडावरचा राबता. हे आताचं,पण भूतकाळात काय ? त्यातल्या त्यात ही श्रीपरशुरामाची तपोभूमी. खरच त्यांनी इथे तपश्चर्या केली होती ! पण ह्या गुहा तर तेच सांगण्याचा प्रयत्न करतात. या गुहेतच त्यांचं वास्तव्य असेल का ? कारण गडावरची राहण्याची ही एकमेव जागा. असं जर असेल तर इथली माती कपाळी लावायला पहिजे कारण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. वरच्या टोकावरुनच म्हणे परशूरामांनी बाण सोडून अपरांताची निर्मिती केली. एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यावर जिंकलेल्या पृथ्वीचं दान करून स्वतःलाच राहायला जागा नव्हती आणि मग सागराला मागे हटवुन त्यांनी कोंकणाची निर्मिती केली. आताचे कोंकणस्थ चित्पावन हे म्हणजेच श्रीपरशुरामांचे वंशज. हजारो वर्षापुर्वी सह्याद्रीची निर्मिती झाली ती या पौराणिक घटनेमुळे की धरणीमायच्या गाभार्यात धुमसणाऱ्या भौगोलिक कारणांमुळे ?, हा एक वेगळा शोधनिबंधाचा विषय आहे. असो. खाली गंगासागर तलावाजवळ त्यांच्या आईचे, रेणुकामातेचे मंदिरही आहे.गंगासागर टाक्याच्या पल्याड सरळ तुटलेला कडा हा धडकी भरवून जातो. गूहेतून टाक्याची भिंत कड्याला चिकटूनच बांधली की काय असे वाटून जाते. बाजूलाच गंगा-जमुना टाके आहे. हे सगळं बघुन या जागेबद्दल ऐकलेल्या,वाचलेल्या आख्यायिकांमध्ये मी हरवुन गेलो होतो.
Subscribe to:
Posts (Atom)