(ट्रेक
: अस्वलखिंड - कामथा घाट - महादेव
मुरा - ढवळे - ढवळे घाट
- मढीमहाल)
रायरेश्र्वराला
पुणे जिल्ह्यातील महाबळेश्वर
किंवा मिनी-महाबळेश्वर
असे म्हणावयास हरकत
नाही. किंबहुना त्याला
तसेच संबोधले जाते.
या दोन्हीमध्ये साम्यही
भरपुर आहे. दोघांनाही
लाभलेलं विस्तृत पठार ही
नैसर्गिक देणगी ! ऐतिहासिक वारसा
ही बरोबरीचा. रायरेश्र्वरावर
शिवबांनी स्वराज्याची शपथ घेतली
तर श्रीक्षेत्र महाबळेश्वरला
आईवेड्या शिवबांनी आऊसाहेबांची अन्
सोनोपंतांची सुवर्णतुळा केली. फरक
इतकाच की महाबळेश्वर
हे सदाहरित जंगलांनी
संपन्न तर रायरेश्र्वरावर
झाडांची,वनांची संख्या तुलनेने
कमी. पण दोघांचेही
महत्व एकमेकांच्या नजरेने
तीळमात्रही कमी होत
नाही. रायरेश्र्वराच्या कोंकणटोकावर
म्हणजेच नाखिंद्यावर उभे राहून
आसमंत न्याहाळता सुरू
होतो सह्याद्रीच्या अभेद्य
रांगाचा उलगडत जाणारा पट.
नाखिंद्यावरुन दक्षिणेकडे वाळकी खोऱ्याच्या
पलीकडे कोळेश्वर अन् त्याही
पलीकडे महाबळेश्वराचा वनश्रीने सजलेला हिरवळ
माथा. त्याचा पश्चिमकडा
सरळ तुटलेला,तोच
मढीमहाल - जिथे मुलगा
गमावलेला आर्थर मॅलेट हा
इंग्रज अधिकारी,मुलगा गेल्याच्या
दुःखात येऊन बसायचा
म्हणून या जागेला
पडलेलं इंग्रजी हे नाव
- आर्थर सीट ! बेत ठरला,रायरेश्र्वरच्या पायथ्यापासुन ते महाबळेश्वरच्या
माथ्यापर्यंत तंगडतोड करायची. हिरडस
मावळातील अस्वलखिंडीतून कोकणात शिरायचं आणि
खालून चढायला सुरुवात
करून वरचा घाटमाथा
अर्थात मढीमहाल जवळ करायचा,
अट एकच - अखंड
प्रवास फक्त पायगाडीचा
!
All the photos and content © Sandip Wadaskar
शनवाऱ्या
पहाटेच नेहमीच्याच चार टाळक्यानी,अर्थातच योगिता,प्रसाद,रेश्मा अन् मी
घराचा उंबरठा ओलांडला
आणि तुकडी स्वारगेटला
हजर झाली सातची
महाड गाडी पकडायला
.पण काही कारणास्तव
बस ताम्हिणीमार्गे जाणार
म्हटल्यावर पावणे आठच्या गाडीची
वाट पाहत बसलो.पण कोण
जाणे मघापासुन दाढ़ीचे
केस पिकलेल्या एका
माणसाचे आमच्याकडे लक्ष लागून
होते. दोन - तीन
वेळा कुठे जायचंय,कुठे जायचंय
असं विचारून गेला.
वरंधा घाटाच्या अलीकडे
कूदळी गावात जायचंय.
म्हटला,"चला". आणि काका
काय मजेदार होते
म्हणून सांगु, तरुण पिढीच्या
गप्पात रंगायची त्यांची कसब
कमालीची होती. सातारा रोडला
कोंडे देशमुखांच्याकडचा वडा
सँपल पोटात रिचवून
गाडी भोरकडे मार्गस्थ
झाली आणि गप्पांचा
फड असा काही
रंगला की कूदळी
आलं तरी काकांनाच
काय तर आम्हालाही
त्यांचा निरोप घेणं जीवावर
आलं होतं. पण
मजा आली. आम्ही
गावात पोहोचलो तेव्हा
रामनवमीची टळटळीत दुपार होती,आकाशी मात्र ढगांचा
आणि नारायणाचा लपंडाव
चाललेला. खालच्या कूदळीतून रायरेश्र्वरावर
जाणारी वाट खुणवुन
गेली,अन् वरच्या
कूदळीत रामरायाचे गुणगान करीत
असलेला कर्न्या गाव जागं
असल्याचे जाणवून गेला. चालायला
सुरुवात केली तेव्हा,
समोर अस्वलधोंड डावीकडच्या
नाखिंदच्या पायथ्याशी दुपारची वामकुक्षी
घेत शांत निजली
होती. काय ओ
दादा ? अस्वलखिंड नाव कसं
पडलं ? "तिथं अस्वल
मेलं होतं, अंगावर
धोंडा पडून", इति
दादा. पुढं पाणी
मिळेल का वाटेत
? "हो हाय की,वाटच्या शेजारी वरच्या
अंगाला पाण्याचा झरा हाय,जावा गुमान,लयी मस्त
वाट हाय." ओढ्याच्या
शेजारीच थोडं कातळ
चढुन गेल्यावर उंबराखालचं
गोड पाणी घशाखाली
उतरलं तेव्हा तहानसुख
काय असतं ,कळलं
! आहाहा, पाणी खरच
अमृततुल्य होतं. तिथेच दुपारचा
पोटोबा झाला आणि
खिंडीकडे मार्गस्थ झालो.
|
अस्वलखिंडीकडे जाताना वाटेत लागणारा उंबराखालचा झरा |
|
अस्वलखिंड |
आणि
कूदळीतल्या दादाने सांगितल्याप्रमाणे वाट
खरच सुंदर होती.
आजुबाजुला भरपुर झाडोरा, करवंदी,उंबर.इत्यादी
झाडांनी रान नुसतं
तुंबलं होतं. किर्र जंगलात
उन्हामुळे झालेली पानगळ पायाखाली
तुडवत तीन भल्यामोठ्या
दगडांजवळ पोहोचलो आणि खिंडीत
पोहोचल्याची खात्री पटली. बाहेर
नारायणराव आग ओकत
होते,आत मात्र
झाडी सुखावणारी होती,पुढचे पंधरा मिनीटे
जागचं हलावसं वाटत
नव्हतं.आता पुढे
उतार. झाडोऱ्यातून परत
थोडं बाहेर पडलो
तर उजव्या बाजूला
मोठी दरी आ
वासुन होती,कदाचित
कामथी नदीचं खोरे
असावं. रायरेश्र्वर पाठराखण करीत
होता, आता आभाळही
भरून आलं. चांगला
अर्धा-एक तास
पाऊस बरसत होता.
हे म्हणजे भर
उन्हात मिळालेलं अनपेक्षित बक्षीसच
होतं. मंगळगड अजूनही
डोळ्याला दिसला नाही,याचा
अर्थ बरंच चालायचं
आहे,कामथे मात्र
दृष्टिक्षेपात आलं. वाटेत
लागलेल्या झाडांच्या मनसोक्त कैऱ्या
पाडल्या,खाल्ल्या. कोरडे पडलेले
धबधबे ओलांडून आणि
पावसामुळे हवेत आलेला
गारवा अनुभवत आम्ही
एकदाचं कामथ्याच्या मुख्य वाटेला
लागलो. गावात पोहोचलो तर
गावातली पोरं आमच्याकडे
टकामका बघत होती.
कुठून आलाव ?? एका
मावशीबायने आमची स्वतःहून
चौकशी केली. या
बसा,पाणी घ्या
! सवड नव्हती,पण
त्यांच्या आग्रहाचा मान राखत
तहान भागवली. वडघराकडे
चालते झालो तेव्हा
दिवाकर पश्चिमेकडे कलला होता.
महादेव मुर्ह्याला वाट अलीकडुन,बोरघराकडुनच असल्याचं समजलं
अन् तिकडची वाट
धरली. आजचा दिवस
संपवून तिथल्या विहारात मुक्काम
ठोकला. कामथीच्या पलीकडे वडघरात
रामनवमीचा उत्सव चालू होता,तिकडे ह.भ.प महराजांचा
टाळ- मृदंगच्या साथीत
विठोबा चालला होता आणि
इकडे धडपड चालली
होती आमच्या पोटोबाच्या
शांतीची ! जेवणं आटोपून कीर्तन
ऐकतच झोपी गेलो.
|
कामथीचं खोरं |
|
निसर्गरम्य कामथ्यातली सुंदर कौलारू घरं |
सकाळच्या
ढगाळलेल्या वातावरणात महादेवमुर्ह्याची दमवणूक
करणारी चढण जरा
दमानंच चालली होती.कामथीच्या
खोऱ्यात वसलेली वडघर,बोरघर
अन् कामथे हळूहळू
जागे होत होती.
पुढ्यात मंगळगडाचा पसाराही उलगडत
होता. वरच्या पठारावर
पोहोचलो तेव्हा वरंधा घाटाचा
पहारेकरी कावळ्याने दर्शन दिलं
आणि पाठीशी कोणीतरी
ओळखीचं आहे, असं
उगाच वाटून गेलं.
काय आहे,आमची
नेहमीचीच भेट ना
! त्याच्या खिंडीत खाल्लेल्या वडापावची
आठवण येऊन गेली.
उजवीकडच्या चांदला अन् गवळीवाडा
अजूनही झोपेच्या अधीन भासत
होतं. मुर्ह्याच्या वेशीवर
पोहोचलो तेव्हा एक ताई
गंगाटाक्याच्या पाण्याने हंडा भरत
होती. त्या झऱ्यातून
पाण्याच्या प्रवाहावरुन तर वाटत
होतं,गावकऱ्याचा अर्धा
दिवस पाणी भरण्यातच
जात असेल. इतके
असूनही ताईने तिच्या अर्धवट
भरलेल्या हंडयातुन प्यायला पाणी
दिलं, गावात आमचे
दणक्यात स्वागत झालं,कुठुन
आलाव,कुटं चाल्लाव
? चहा घ्या,पाणी
प्या ! प्रश्नांची नुसती सरबत्ती
चालली होती. पण
गाव खरच प्रेमळ
आणि सुंदर आहे.
चारही बाजूने डोंगरांनी
वेढलेलं हे महादेव
मुरा वेड लावून
गेलं. अगदी चित्रातल्यासारखं,तेवढंच जिवंत वाटावं
असं. बोलके गावकरी
आणि आजूबाजूचा सह्याद्रीचा
पसारा बघुन एकदम
उत्साह संचारल्यासारखं झालं. बऱ्याच वर्षांची
ओळख असल्यासारखी एका
मावशीने तर रेश्माच्या
चक्क हातात हात
घेऊन गप्पा मारायला
सुरुवात केली. आणि आता
मात्र एकेका डोंगरसख्यांची
ओळख पटायला लागली.
पहिल्यांदाच झालेल्या महाबळेश्वर अन्
प्रतापगडाच्या दर्शनाने स्तिमित झालो.
पार पल्याड कावळ्यापासुन
अलीकडचा कांगोरीचा मंगळमाथा, अस्वलधोंड,
रायरेश्र्वराचं नाखिंद, महाबळेश्वराचा मढीमहाल,पायथ्याचा काळा कूळकूळीत
चंद्रगड अर्थात ढवळगड, पार
सावित्रीच्या खोऱ्यापलीकडचा प्रतापगड अन् त्याहीमागे
मधु आणि मकरंद
हे जुळे डोंगरसखे.
व्वा ! कमाल याला
म्हणतात देखणा सह्याद्री ! आणि
अशा दिग्गजांच्या पहाऱ्यात
निवांत पहुडलेलं महादेव मुरा
हे आपुलकीने चौकशी
करणारं डोंगरमाथ्यावरचं सुंदर गाव.
गावाच्या
दुसऱ्या टोकावर महादेवाचे एक
जुने मंदिर आहे,जवळच
पाण्याचा झरा आहे.
पाण्याचा एकमेव साठा असल्यामुळे
जपून वापरणेच सोयीचे.
बाकी झाडांच्या सावलीत
दगडी चुलीवर शिजवलेली
मॅगी अन् भुकेने
व्याकूळलेले जीव ! आणिक काय
हवय ? सकाळचा फक्कड
नाश्ता झाला आणि
महादेवाचा निरोप घेऊन मुरा
उतरायला आम्ही सुरुवात केली,
आता पोहोचायचं होतं
चंद्रगडास. खालच्या खांडजपर्यंतची तीव्र
उताराची वाट आणि
वाट अर्धी संपलेली
असताना खालच्या पठारावरून झालेल्या
ढवळीच्या खोऱ्याचे अविस्मरणीय दर्शन
अक्षरशः वेड लावुन
गेलं. असं चित्रं
मी याआधी कधीच
नव्हतं पहिलं. आम्ही उभे
इकडे ते कोंकणातल्या
पीटुकल्या डोंगरावर अन् तिकडे
तो ढवळीच्या पलीकडे
ह्या असा उभाच्या
उभा सह्यकणा,एकदम
खडा ! आणि आजच
आपण हा अवाढव्य
कणा चढुन जाणार
आहोत,या कल्पनेनेच
पाचावर धारण झाली.
सह्यरांगेच्या पायथ्याशी असलेली गावं
जणु द्वारपालाच्या भूमिकेत
रात्रंदिवस खपत असलेली,निवांत विसावलेली. आणि
का नाही खपणार
? त्यांचा तो एक
मोठा आधारवडच ना
! त्याच्याच अंगखांद्यावर वाढलेल्या निबिड अरण्यात
जगणारे हे गावकरी,त्यातुन मिळणारा रानमेवा
अन् फळफळावड याच्यावरच
काही जणांची गुजराण
! निसर्गाचा हा अमूल्य
ठेवा जपणारी माणसं
हीच,बाकीच्यांच्या फक्त
गप्पा ! नाही का
? तेवढ्यात खालून येणाऱ्या एका
बाबांनी आमची चौकशी
केली. खांडजवरुन बाबा
निघाले होते महादेव
मुर्ह्याला. आम्ही तिकडूनच आलो.हे ऐकताच
खुष झाले आणि
स्वतःहून आजूबाजूचा परिसर सांगायला
लागले. " हे बगा
पोरांनो, त्यो तिकडे
पल्याड,तानाजीचा गाव - उमरठ.
तानाजीचा बरं का
! त्याच्या पलीकडे उजव्या बाजुला
गोवेल, परत या
इकडे हे ढवळे,समोरचा चंदरगड,हे
खोपडे,हे चांदण
अन् हे अलीकडेच
खांडज ! आता तुम्हाला
ढवळयात जायाचं तं खांडजला
जायची गरज नाही,
डावीकडील आमराईतली वाट दिसते
का ? तीच धरायची
अन् ढवळी ओलांडून
चंदरगडाच्या पायथ्याशी ! अन् ह्यो
सह्याद्री ! घाटानी चढुन गेलो
की माथ्यावर महाबळेश्वर."
आणि अगदी चित्रकाराने
चितारल्यासारखं ढवळेचं खोरं दिसत
होतं,व्वा ! एका
नजरेत न मावणारा
खोऱ्याचा हा पसारा
थक्क करून गेला.
महादेव मुर्ह्याचा डोंगर उतरून
नदीत उतरलो तेव्हा
चांगलीच दमछाक झाली आणि
नदी कसली ? नुसत्या
गोल गोल छोट्या
- मोठ्या धोंड्यांच्या राशी. बाकी पावसाचे
चार महीने सोडले
की कोंकणातल्या या
नद्या ठणठण गोपाळ
! कधी एकेकाळी ही
नदी तुडुंब भरून
वाहत असते,ही
दगडधोंड्यांची रास बघुन
विश्वासच नाही बसणार.
आणि वरुन आग
ओकनारे नारायणराव अन् कोंकणातलं
दमट वातवरण, त्या
पंधरा मिनिटाच्या चालीत
अक्षरशः करपुन निघालो.
|
चारही बाजूने डोंगरांनी वेढलेलं महादेव मुरा |
ढवळयात
पोहोचलो तेव्हा घामाच्या धारा
वाहत होत्या गावातल्या
एकमेव दुकानात डोकं
गार केलं,ऊन
चांगलंच तापायला लागलेलं,घड्याळात
वाजले होते दुपारचे
एक ! साधारण सहा
तासांची चढाई विचारात घेऊन
महाबळेश्वरला पोहोचेपर्यंत अंधार नक्कीच होणार
होता. चंद्रगडाकडे निघालो
तेव्हा गावातल्या बाया- बापडया
ख्याली- खुशाली विचारत नीट
जायला सांगत. लयी
उन्ह हाय, पुढच्या
शेलारवाडीतून माणुस घ्या संगतीला,
आदिवासी पाडा हाय,थीतं मिळल
कुणीबी,असं काही
बाही सुचवत होत्या.
शेलारवाडीतला अर्जुन दिमतीला घेऊन
आम्ही घाटाकडे कूच
केलं.
रणरणत्या
उन्हात रापलेला काळा कूळकूळीत
चंद्रगड धस्काच देऊन गेला.बोडक्या पठारावरुन जंगलात
शिरलो. निबिड अरण्यातली वाट
तशी मळलेली,मात्र
नवख्याला भिती दाखवणारं
दाट जंगल.मोऱ्यांच्या
जावळीचं इतिहासप्रसिद्ध जंगल. मोरे तसे
हुशार. एकतर वाघाच्या
जबड्यात हात घालायची,
जावळीच्या या खोऱ्यात
शिरायची कुणाची हिम्मत होणार
? आणि झालीच तर
त्यांच्यावर पहारा ठेवायला हा
चंद्रगड नेहमीच तत्पर असावा.
नजीकच्या ढवळे गावातून
निघाल्यावर दहा मिनिटात
गडाचा पायथा गाठता येतो
मोऱ्यांच्या पराक्रमाची गाथा ऐकवणारा
हा ढवळगड आता
निपचीत पडला आहे,
उन्ह-वाऱ्याचे वार
झेलत. एकेकाळी शेखी
मिरवत असेल हा
आपल्या मालकाची,नाही ! आणि
मालकाच्याच नावावरून पडलेलं स्वतःचं
नाव. बाकी रान
जबरदस्त माजलेलं,सूर्यकिरणांनाही आत
सहज शिरण्याची मुभा
नाही. रानमेव्याची नुसती
चंगळ, दहा फूटांवर
माणुस दिसणार नाही
इतकी दाट झाडी,कोकमची उंच झाडे,
पण रानांत क्षणभर
विसाव्याची परवानगी नाही. एक
म्हणजे ढवळया घाटाचा उभा
चढ येंगुन अंधार
व्हायच्या आत वर
पोहोचणे आणि दुसरं
कानाजवळ घोंघों करणारं डासांचं
रानटी आव्हान ! घामाने
निथळताना पावलं उत्तरं द्यायला
लागली होती.
|
ढवळे गावातुन चंद्रगडाच्या वाटेवर |
आता
खरच चालवत नव्हतं
आणि थांबलो तर
डांस थांबू देत
नव्हते.थोडं खुलं
रान बघुन खाण्याचा
ब्रेक झाला अन्
डांसांशी सामना करत परत
चढाईला सुरुवात झाली. शेलारवाडीतल्या
अर्जुनने निरोप घेतला आणि
आम्हाला जंगलात सोडुन परतला.
दाट झाडीमुळे आजूबाजूचं
काहीच दिसत नव्हतं,फक्त किर्र
झाडी आणि डांसांचा
हैदोस. इतक्यात कुठलातरी पक्षी
आपल्या कर्णकर्कश आवाजात घसा
साफ करून जायचा,
आणि कुठे एखाद
मंजुळ गाणं कानावर
पडायचं,पाचोळयात होणारा पावलांचा
आवाज सोडला तर
इथे होती फक्त
रानाची जीवघेणी शांतता. कुठे
आलोय,अजुन कीती
चढायचय,गेल्या दोन तासांत
तर डोंगर पण
नव्हता बघितला आणि आता
तर वाट होती
ऐंशीच्या कोनातली,वर चढत
गेलेली. पहिल्यांदाच उजवीकडच्या डोंगराचं
एक टोक समोर
आलं आणि वाटच
संपली,वाट चुकली.
डावीकडे, उजवीकडे पायवाट संपली
होती. लगेच डोळ्यांसमोर
आली ती वाट
शोधत जाणारी अन्
कापरासारखी उडत जाणारी
वेळ ! जो काय
खेळ करायचा,तो
फक्त पुढच्या सव्वा
तासात.परत सगळे
खाली उतरलो. त्याच
वाटेला समांतर अजुन दोन
वाटा होत्या, एकाने
मी आणि दुसरीने
प्रसाद असे करत
परत एकदा शोधाशोध
सुरू झाली.पण
रस्ता सापडायला तयार नाही.
त्याच वेळी खालून
योगिता अन् रेश्माचा
ओरडा ऐकू आला,खालून वाट असल्याचा.
सुदैवाने जास्त वेळ न
दवडता अचूक वाटेला
लागलो, गेल्या तीन तासांपासुन
चढ़- चढ़ चढत
जाणारी वाट आता
कुठे डोंगराच्या पोटाला
चिकटून आडवी झाली.
चुकण्यामुळे एक गोष्ट
चांगली झाली ती
म्हणजे,अचूक वाट
मिळालेल्या आनंदात पावलं आता
धपाधप पडू लागली
आणि बऱ्याच वेळानंतर
चंद्रगडाचा नजारा समोर आला.
|
बहिरीची घुमटी |
हळूहळू
झाडी खुली होत
गेली आणि एक
एक सह्य- सांगाती
दर्शन द्यायला सुरुवात
झाली. डोंगराला वळसा
घालत आडव्या वाटेने
एक दोनदा जीव
पार गळ्यापर्यंत आणला
होता. आता मंगळगडही
दृष्टीपथात आला, अस्वलखींड,नाखिंद सगळ्यांनी हळूहळू
डोकावयाला सुरुवात केली.दुपारपासुन
दुरावलेलं आकाशीचं छप्पर आता
डोक्यावर आलं, ढगाळलेल्या
नभात नारायणाचा कोप
तेवढा जाणवत नव्हता.
तसंही सांजवेळ जवळ
आली होती. अजून
एक आडवी मारून
थोडं वर सरकलो
तेव्हा दक्षिणेकडे प्रतापगड, महाराजांच्या
प्रतापाची शेखी मिरवित
होता. त्याच्या खालच्या
अर्ध्या डोंगरावर दाट हिरवाईने
आपला मुक्काम ठोकला
होता,किंबहुना तो
तिथे नेहमीचाच ! अफजलबुरुज
महाबळेश्वराकडे आ वासुन
उभा होता. अन्
आंबेनळीच्या खालच्या अंगाला करपलेले
रान खुणावत होतं.
मध्ये सावित्रीची दरी
डोळे फिरवून गेली. येथे
पोहोचेपर्यंत सोबतीला बऱ्यापैकी झाडी
होती. पण पुढे
बोडख्या अन् घसरडया
वाटेवरुन जीव मुठीत
धरून चालायचे म्हणजे
एकाग्रतेची कसोटी पाहण्यासारखं होतं,
थोडं लक्ष चुकलंच
तर क्षमा मागायलाही
संधी न मिळावी.
हजार एक फूटांचा
सरळसोट फॉल होता.
आणि आता मात्र
चंद्रगड अक्षरशः एव्हढासा दिसत
होता. कुठे तो
ढवळे गावातून दिसणारा
भेदक काळा कूळकुळीत
डोंगर, आणि कुठे
हे त्याचं लोभस
आणि निरागस रूप
! व्वा ! कमाल आहे
खरच निर्मात्याची. त्याच्याकडे
चोरटा कटाक्ष टाकत,
पायांवर लक्ष केंद्रित
करत कसेतरी दरीची
भीषणता कमी करण्याचा
प्रयत्न करीत होतो.
हे सर्व चालू
असताना वर थोड्या
अंतरावर असलेल्या झाडावर छोटा
भगवा फडफडताना दिसला
तेव्हाकुठे जीव भांड्यात
पडला. गेल्या पाच
तासांपासुन मानवीय अस्तित्व हरवलेलो
आम्ही,त्या छोट्याशा
भगव्याने एवढे हरखलो
की काय सांगु,
अफाट पसरलेल्या जावळीच्या
या निबिड अरण्यातून
वाट काढित आम्ही
बहिरीच्या घुमटीजवळ पोहोचल्याची खात्री
पटली आणि अजुन
एक जीवघेणी घसरडी
चालून घुमटीजवळ पोहोचलोही
तेव्हा घड्याळजी सव्वासहाच्या ठोक्यावर
येऊन थांबले होते.
|
गाढवाचा माळ |
|
आर्थर सीट-मढी महाल -कड्याचे रौद्र भीषण रूप |
अंधार
पडायला सुरुवात झाली होती.
अजुन कमीत कमी
एका तासाची चढाई
असावी मढी महाल
पर्यंत,पण खात्री
नव्हती. कदाचित जास्त वेळही
लागू शकणार होता.
आणि अंधारात मुक्काम
अवघड अन् धोक्याच्या
ठिकाणी करावा लागला तर
अजुन कठीण होऊन
बसेल,या विचाराने
घुमटीजवळच रात्र काढायची असं
सर्वानुमते ठरलं आणि
पाण्याची शोधमोहीम सुरू झाली.
आणि लगेचच पाण्याचे
टाकेही सापडले. याला जोरचं
पाणी म्हणतात. घुमटीजवळून
दोन वाटा फुटतात
डावीकडची खालून जाणारी वाट
जोर गावी घेऊन
जाते तर वरची
वाट मढीमहालला महाबळेश्वरकडे
जाते,त्याच वाटेवर
हे पाण्याचं टाकं
आहे. मुक्काम करायला
जागा वाईट नव्हती
पण एका आसमानी
संकटाची चाहूल अधेमध्ये लागत
होती अर्थातच आकाशात
नभाचा लागलेला वेढा,हळूहळू तो अजूनच
आवळल्या जात होता.त्यामुळे भिती होती
पाऊस जर आला,तर भिजलेल्या
कपड्यातच झोपा काढाव्या
लागणार.पण वरुण
राजाची कृपा,थोड्याच
वेळात ढगांचा वेढा
शिथिल झाला आणि
लुकलुकणाऱ्या चांदण्या नभांगणात अवतरायला
सुरुवात झाली.एका
बाजूला दोन एक
हजार फुटांचा कडा,त्याच्या खाली जावळीचं
खोरे अन् दुसऱ्या
बाजुला जोर गावाकडे
जाणारी जंगलवाट, आणि चारही
बाजूने छातीत धडकी भरवणारं
किर्र रान. रात्रभर
चाललेली पाण्याच्या टाक्यावरची चाबुक-डूबुक वन्य जिवांचे
अस्तित्व जाणवून गेली. मध्येच
एखादा रानकोंबडा जंगलातल्या
स्मशानशांतीला छेद द्यायचा.
बहिरिच्या घुमटीजवळचा हा मुक्काम
वाटला तेवढा सोपा
नव्हता हे मात्र
खरं.
|
सावित्री नदीचं खोरं |
|
मढीमहालच्या अलीकडील १५ फुटी कातळटप्पा |
सकाळी
उठल्या- उठल्या डोक्यात आलेला
एक नेहमीचाच प्रश्न
! एवढ्या जीवघेण्या वाटेने तेव्हाचा
व्यापार चालत असे
? इथे माणसास धड
चालता येत नाही,तिथे डोक्यावर
बोचके घेऊन कोण
माथ्यावर विकायला घेऊन जात
असेल आणि काय
? विचार करायला गेलो तर
कल्पनेपलीकडचे वाटते,पण घुमटीजवळच
असलेले जोरचे पाणी इथले
ह्या सगळ्यांची साक्ष
देण्याचा प्रयत्न करते. बाकी
बहिरीचा उत्सवही जोरात साजरा
होत असावा. एका
मोठ्या दगडी आडोशाला
विराजमान झालेल्या देवी- देवतांच्या
मुर्ती तेवढंच मन प्रसन्न
करून जातात. घुमटीचा
निरोप घेऊन पुढील
वाटेला ट्रेकस्थ झालो. पाण्याच्या
टाक्याजवळून किल्ले राजगडाचा बालेकिल्ला
दिसल्यावर,पुणं हाकेच्या
अंतरावर असल्याचा भास झाला.
गाढवाच्या माळावरील भगवा बघितल्यावर
ट्रेकचा अजुन एक
टप्पा पार केल्याचा
आनंद गगनात मावत
नव्हता. पण गगनाला
भीडलेला समोरचा मढीमहालचा कडा
बघुन भितीची एक
लकेर उमटुन गेली.
दृश्य सुंदर होतं
की भयप्रद तेच
कळत नव्हतं. तुटलेल्या
कड्याखाली महाबळेश्वरीच उगम पावलेल्या
सावित्रीचं अथांग खोरं अक्षरशः
डोळे दिपवुन गेलं.
हीच नदी पुढे
बाणकोटच्या खाडीमध्ये रूपांतरित होऊन
सागरास जाऊन मिळते.
आता उजव्या बाजुला
कडा अन् डाव्या
बाजूला जंगल असे
करत निमुळत्या वाटेवरून
पुढ्यात दिसणाऱ्या मढीमहालाचं अंतर
कमी करत होतो.वाट उघड्या
रानमाळावरची असल्याने उन्हाची तीव्रता
थोडीफार जाणवायला लागली. मात्र
आर्थर सीटवरील बांधून
काढलेल्या सीमेंटच्या माळावर पर्यटकांची
उडालेली झुंबड दिसली तेव्हा
आपण जवळ पोहोचल्याची
खात्री पटली. या आनंदातच
आम्ही पटापट चढण्याचा
प्रयत्न करत होतो.पण पाय
जपून टाकावा लागत
होता,कारण एकतर
उतार आणि वाट
म्हणजे घसाराच. तोल गेला
तर माणुस कुठे
जाऊन पडेल सांगता
यायचं नाही. शेवटचा
पंधरा फुटांचा कातळ
टप्पा चढुन वर
पोहोचलो तेव्हा महालावरील पर्यटकांनी
अक्षरशः तोंडात बोटे घातली.
कुठुन आलात ? कसे
आलात ? तुम्ही चौघेच आणि
या मुलीपण ! त्यांच्या
तोंडुन कौतुक नुसतं ओसंडून
वाहत होतं, आमच्या
गळ्यात हार- तुरे
पडायचीच देरी होती.
मढीमहालवर
पोहोचल्यावर मागे वळून
पश्चिमेकडे लक्ष गेलं
तेव्हा खरच काहीतरी
मिळवल्याचा आनंद झाला.
कोंकणातल्या ढवळे अन्
कामथे या दोन
नद्यांची खोरी ओलांडून,पुणे - रायगड - सातारा
या तीनही जिल्ह्यांची
सरहद्द पायगाडीने तुडवण्याची मजाच
वेगळी आहे. येथून
दिसणारा सह्याद्रीचा हा पसारा,
अप्रतिमच. खुप दिवसांनी
असा तंगडतोड ट्रेक
पायाखालून गेला होता,
विशेष म्हणजे एका
दिवसात आपण सह्याद्रीची
एवढी मोठी उंची
(जवळपास पावणे चार हजार
फुट )गाठून माथ्यावर
पोहोचतो. त्यातही बहिरीच्या घुमटीजवळ
मुक्काम झडला तर
या ट्रेकसारखी मजा
नाही.
आभारी आहे !
संदिप वडस्कर
मस्त रे… छान लिहिलंस…
ReplyDeleteआभारी आहे जितेंद्र !
ReplyDeleteखूपच अविस्मरणीय असेल हा प्रवास .. अद्वितीय..!!
ReplyDeleteढवळे गाव ते चंद्रगड आणि आर्थरसीट हा ट्रेक माहीत होता पन हि नविन माहिती मिळाली चांगले वर्णन केले आहे ट्रेक चे
ReplyDeleteasa vatla mi pan sobatach aahe tumcya...exact varnan kelas bhava.
ReplyDeletekeep it up:)
Awesome experiense
ReplyDeletekhup chaan ani savistar varnan ahe.
ReplyDeletePlese give me u r number mala pn jaych ahe so information sathi
ReplyDeleteगिरिदुर्गांच्या तटबंद्यांना
ReplyDeleteजरा एकदा बिलगून बघ,
बुलंद बुरुजांच्या चिलखती चि-यांना
फक्त एकदा स्पर्शून बघ.
आणि सांग मला,
... शहरी इमल्यांची आठवण येते का?
किल्ल्यांवरच्या पठारांवर
एकदा रात्री पहुडून बघ,
पौर्णिमेचं पिठूर चांदणं
स्वतःच्या अंगावर पांघरून बघ.
आणि सांग मला,
पंचतारांकीत हॉटेल ची आठवण येते का?
बाजी-तान्याचे पोवाडे
रायगडावरनं गाऊन बघ,
देवराईतली राउळघंटा
एकदा सांजवेळी वाजवून बघ.
आणि सांग मला,
डी.जे. च्या धिंगाण्याची ची आठवण येते का?
खळाळणा-या झ-यात
फक्त जरा बसून बघ,
कोसळता धबधबा
तुझ्या पाठीवर जरा झेलून बघ.
आणि सांग मला,
रिसॉर्टमधल्या कृत्रिम धबधब्याची आठवण येते का?
कड्यावरच्या ठाकरांकडल्या
चहाचे भुरके मारुन बघ,
धनगराच्या झापात बसून
धारोष्ण दूध पिऊन बघ.
आणि सांग मला,
पेप्सी, कोक, सेव्हन अप ची आठवण येते का?
चुलीवर भाजलेली कांदाभाकरी
एकदा जरा चाखून बघ,
सारवलेल्या जमिनीवर बसून
पळसाच्या पानात जेवून बघ.
आणि सांग मला,
मॅकडोनाल्डच्या बर्गर ची आठवण येते का?
रानांमधनं धावणा-या
वाटांवरनं जरा बागडून बघ,
मऊ ओल्या हिरवळीवरनं
उघड्या पायांनी चालून बघ.
आणि सांग मला,
इटालियन मार्बलच्या फरश्यांची आठवण येते का?
प्रतिष्ठेच्या क्षणभंगूर कवचातून
जरा बाहेर येऊन बघ,
निसर्गाच्या संगीतावर
आयुष्याची बासरी वाजवून बघ.
आणि सांग मला,
स्वतः ची तरी आठवण येते का ????
गिरिदुर्गांच्या तटबंद्यांना
ReplyDeleteजरा एकदा बिलगून बघ,
बुलंद बुरुजांच्या चिलखती चि-यांना
फक्त एकदा स्पर्शून बघ.
आणि सांग मला,
... शहरी इमल्यांची आठवण येते का?
किल्ल्यांवरच्या पठारांवर
एकदा रात्री पहुडून बघ,
पौर्णिमेचं पिठूर चांदणं
स्वतःच्या अंगावर पांघरून बघ.
आणि सांग मला,
पंचतारांकीत हॉटेल ची आठवण येते का?
बाजी-तान्याचे पोवाडे
रायगडावरनं गाऊन बघ,
देवराईतली राउळघंटा
एकदा सांजवेळी वाजवून बघ.
आणि सांग मला,
डी.जे. च्या धिंगाण्याची ची आठवण येते का?
खळाळणा-या झ-यात
फक्त जरा बसून बघ,
कोसळता धबधबा
तुझ्या पाठीवर जरा झेलून बघ.
आणि सांग मला,
रिसॉर्टमधल्या कृत्रिम धबधब्याची आठवण येते का?
कड्यावरच्या ठाकरांकडल्या
चहाचे भुरके मारुन बघ,
धनगराच्या झापात बसून
धारोष्ण दूध पिऊन बघ.
आणि सांग मला,
पेप्सी, कोक, सेव्हन अप ची आठवण येते का?
चुलीवर भाजलेली कांदाभाकरी
एकदा जरा चाखून बघ,
सारवलेल्या जमिनीवर बसून
पळसाच्या पानात जेवून बघ.
आणि सांग मला,
मॅकडोनाल्डच्या बर्गर ची आठवण येते का?
रानांमधनं धावणा-या
वाटांवरनं जरा बागडून बघ,
मऊ ओल्या हिरवळीवरनं
उघड्या पायांनी चालून बघ.
आणि सांग मला,
इटालियन मार्बलच्या फरश्यांची आठवण येते का?
प्रतिष्ठेच्या क्षणभंगूर कवचातून
जरा बाहेर येऊन बघ,
निसर्गाच्या संगीतावर
आयुष्याची बासरी वाजवून बघ.
आणि सांग मला,
स्वतः ची तरी आठवण येते का ????
khatarnak..........kdk
ReplyDeleteSorry pan Travel Starting Point & Treaking Starting Point samjala nahi sangu shakal ka plz
ReplyDelete