रुसलेल्या पावसात .. सैर घाटवाटांची !

उकाडा जाणवतोय फार. उंबरठा ओलांडून घराबाहेर पडावं तर दिवाकरराव सकाळी सकाळीच सुरू होतात. स्वच्छ सूर्यप्रकाश पण डोळ्यांना असह्य होणारा,आता नकोसा झालाय. वर निळ्या आकाशी एखाद कापशी ढग वरुणराजाची आठवण देऊन जातोय. कधी येतोय रे पावसा, अश्या विनवण्या करीत मुके जीवही झाडांच्या सावलीत विसावतायेत. आम्हा भटक्यांच्या भटकंतीलाही  जरा विराम लागलाय. पण त्याही परिस्थितीत मन काही रमेना. मग डोक्यात मस्त प्लॅन शिजायला लागतो, घनदाट अरण्याची वाट खूणावते. मन सैरावैरा धावू लागतं वाट अंधारबनाची. मग मजाच मजा बाहेर आग ओकणाऱ्या दिवाकराला वाकुल्या दाखवत सह्याद्रीच्या कुशीत शिरण्याची. मग त्याला उगाच चिडवत भटकत राहण्याची,तुला काय वाटलं ? आम्ही घरात बसणार ? नाहीरे, नारायणा नाही. तुझ्या नाकावर टीचुन डोंगरात जाणार.
मढे घाटाचा धबधबा

जुनचा पहिला आठवडा,वेधशाळेचे भाकितं यायला सुरवात होते. पावसाची हजेरी लवकरच, अर्थात दिवसागाणीक ते दररोज बदलतच म्हणा. चालायचंच,नेहमीचं आहे.  ऑफीसच्या काचेतून तोही वाट बघत असतो पहिल्या पावसाची,अगदी आतुरतेने. पहिल्या पावसात भिजलेल्या मातीचा सुगंध त्याला चुकवायचा नाहीये. ऑफीसच्या खिडकीतून दिसणारा,पार्कींगसाठी पोखरुन काढलेला डोंगर आसुसलेला,तोही वाट बघतोय. त्याच्या माथ्यावरची कोमेजलेली झाडे - झुडपे डोळे लावुन आहेत आभाळाकडे चातकासारखी. पानाफुलांना प्रतीक्षा आहे ती पावसाचा पहिला थेंब आपल्या अंग- खांद्यावर खेळवण्याची. या थेंबाची कमाल मात्र भारी, त्याच्यासमोर अमूल्य अशा हिरे-मोत्याची काय बिशाद. नुसतंच बघत रहावसं वाटतं त्या आळवावरच्या मोत्याकडे ! हिरव्यागार अशा एका मोठ्या आळवावरचा मोती निवांत विसावलेला, हे क्षण डोळ्यात साठवण्याचीच तर त्याला नेहमी आस. कधी एकदा हा घन बरसायला सुरुवात होईल असं होऊन जातं.
फोटो गेल्या वर्षीचा पावसातला …… सह्याद्रीतले मोती !
© Sandip Wadaskar ।  © WTA | भटकंती…सह्याद्रीच्या कुशीत  । All Rights Reserved
पण जुन कोरडाच जातो, मग रुसलेल्या पावसाचा मागोवा घेत आमची चांडाळ चौकडी येऊन धडकते सह्यमाथ्यावरच्या एका छोट्याश्या गावात. अर्ध्या रात्री ! अर्थात गावात स्मशानशांततेचं साम्राज्य पसरलंय. शाळेतल्या समोरच्या व्हरांडयात पथाऱ्या पसरून झोपी जाण्याचा प्रयत्न चाललाय. वर जुनाट छप्पर ,पार भारत स्वतंत्र झाला त्यावेळेसचा काळ जाणवून गेलं. पुढ्यातल्या छोटेखानी पिल्लरवर टॉर्चची नजर गेली तेव्हा भारतीय हवामानातील तीन मुख्य ऋतूंची नव्याने ओळख झाली. मात्र आतातरी ऋतुराजाला त्याच्या निर्धारित वेळेपेक्षा जरा उशीरच होणार असं दिसतंय. उगाच मी हसून घेतलं. त्या अंधारातच माझ्या इयत्ता चौथीच्या वर्गाच्या भिंती लक्ख आठवून गेल्या. अजूनही झोपेचा पत्ता नाही. वरच्या छपराकडे पाहत झोपेच्या विनवणया चालु आहेत. केळद गाव मात्र दाट धुक्याची रजई अंगावर ओढुन केव्हाच झोपेच्या अधीन झाली होती. या धुक्याने पण आमची चांगली गम्मत केली, ऐन जुलैच्या तोंडावर मावळातला भात,कधी वरुणराजाची कृपादृष्टी होईल याची वाट बघतोय. अगदी कोरड्या रस्त्यांनी आम्ही केळद गाव जवळ करत होतो, पण गावच्या वेशीवर येताच धुक्यानी आम्हाला खिंडीत गाठलं. "इंद्राभाई,तुला रस्ता दिसतोय कसा या धुपटातून" अशी थट्टाही करून झाली. रात्रीच्या प्रहरी गावात पोहोचलेलो,शेखर अन् इंद्रा गाडीच्या फ्रंटसीट बळकावून तिथेच विसावलेले. पण मी,माझ्या एकाबाजूला प्रसाद दुसरीकडुन संदीप त्याच्याही पल्याड रसिका, शाळेच्या जुनाट छपराखाली असंख्य डासांची आक्रमण परतावून लावतोय. ही दोघं राजगडाची गडफेरी आटोपून आधीच गावादाखल झाली होती. कधीतरी डोळा लागला तर वाऱ्याने दरवाजा हलला, कडीकोंडयाने विचित्र आवाज करून परत डोळ्यांची झापं  उघडल्या गेली. पुढ्यातल्या आंब्याचा पसारा रात्रीच्या धुक्यात अजूनच भेदक भासुन गेला. मध्येच कोसळुन जाणारी पावसाची सर अन् वाऱ्यामुळे सळसळणाऱ्या पानांचा आवाज यांच्याशिवाय वातावरणात कमालीची शांतता, पण झोपेच्या नावानं बोंब. पहाट झाली तेव्हा गाव अजूनही धुक्याची दुलई पांघरूण साखरझोपेतच होतं. मात्र एक कीर्ट पोर हातात खारीचा पुडा घेऊन घराकडे निघाला होता. "छोट्या, खारीसोबत गरम चहा मिळाला तरी चालेल",उगाच पोराची थट्टा करायची आम्हाला आलेली हुक्की. अजुन काय. लाजत,धडपडत पोरं एका घराआड नाहीसं झालं. थोड्याफार पावसाने बहरलेलं समोरच्या घरावरचं हिरवट छप्पर सुखावुन गेलं, त्यावर उगवलेली शेवाळही सौंदर्यात कीती भर घालू शकतं,नाही.व्वा !

कर्णवडीतलं एक सुंदर घरटं !
घाटमाथ्यावर वसलेलं हे सुंदर गाव धुक्यात पार बुडालेलं होतं . नजर दहा फूटांपेक्षा पुढे जात नव्हती. शेजारीच वाहणाऱ्या ओढ्यात तोंडं खंगाळून झाली. भणाणणाऱ्या वाऱ्याची अन् धुक्याची मस्त जुगलबंदी चालली होती. पापणी लवते नं लवते, क्षणार्धात धुक्याने विरळ होऊन गावाचं दर्शन घडवून आणलं. तोच गाव परत धूरकट चादर ओढुन अदृश्यही झाला. गावातल्याच कदम काकांना घेऊन उपांडया घाटाकडे आम्ही ट्रेकस्थ झालो. आम्हाला खरंतर शेवत्या घाटातून खाली उतरायचं होतं पण घाटाच्या तोंडापर्यंतच जायला वेळ लागला असता आणि धुक्यामुळे अजुन कठीण होतं. त्यामुळं जवळचाच उपांडया जवळ केला. बाकी प्रत्येक खाचरातली ईटुकली भातं अगदी तयार,एक कोपऱ्यात ओळीने सज्ज होती. पण धरणीमायचा चिखल व्हायला अजुन अवकाश होता. थोड्याफार पावसाने भिजलेल्या तांबुस मातीत हिरवीगार अन् टवटवीत रोपं मात्र उठुन दिसत होती. ओढ्यावरचा छोटा पुल ओलांडून मुख्य पायवाटेला लागलो.बोलक्या कदम काकांची अमृतवाणी अन् पराक्रम ऐकत, धुक्यातुन वाट काढत चाललोय. त्यांच्या सोबतीला असणाऱ्या लोखंडी टोच्याने नुकताच एका जनावराची केलेली फजिती मोठी रंजक होती. पाच- दहा मिनिटात खिंडीत पोहोचलो. घाटाच्या तोंडावर आलो तरीही धुकं कमी व्हायचं नाव नव्हतं. पावसामुळे चिकट झालेली पायाखालची वाट अन् पुढ्यात कदम काकांचं ध्यान यांचा माग घेत,घाट उतरायला सुरुवात झाली. पायगाडीची मात्र चांगलीच परीक्षा चालली होती. चिकट झालेली दगडं चुकवत मातीतून पाय घालावा लागत होता. तसे नं केल्यास पार्श्वभाग जमिनीला टेकण्याची जाम भिती होती. एकदोनदा तर या संकटातून निभावलोही.

पेशवेकालीन विहीर -वाकीची बाव !


कर्णवडीच्या वेशीवर आलो तेव्हा कुठे धुक्याने आमचा माग सोडला. तिथल्याच छोट्या झऱ्यावर मावशीबाई हंडयाने पाणी भरत होत्या. ओढ्यात थोडं कॅमेराशी खेळून वाडीत पोहोचलो. खाली कोंकणाची पोकळी जवळ भासुन गेली. पावसाचा अजूनही पत्ता नव्हता. जुलै महीना वाटावा,अशी चिन्हच नव्हती. नाहीतर पाऊस !! तोही सह्यरांगेतला. एकदा सुरू झाला की डोक्यापासुन पायापर्यंत पार सडकुन काढतो. मग तुम्ही कीतीही महागडी पावसाळी आणा, तुमचं पोतेरं झाल्याशिवाय राहणार नाही. पण जुन उजाडेपर्यंत वैशाखवणव्याने त्रस्त सर्वचजण या मुहूर्ताची वाट पाहत असतात. त्याला तोही अपवाद नसतो.
एकदा वळीव बरसून गेला की त्याला आस लागते ती, आपल्या प्रिय सह्याद्रीकडे वळण्याची ! तसा तो बाराही महीने किमान अंतःकरणाने इकडेच असतो पण त्याला ओढ लागते ती उन्हाने रापलेली,थोडी काळपट पडलेली शाल पुन्हा एकदा पावसात धुवून हिरवीगार झालेली बघायची. तूर्तास धरणीमातेचं हे रूपडं जरी पालटलेलं असलं तरी पाऊस काही मनासारखा पडत नव्हता. पण गेल्या आठवड्यात हरिश्चंद्रावर पावसाने शेकून झाली होती, त्यामुळे तेवढी तक्रार नव्हती. रानवडीला पोहोचेपर्यंत मात्र एक हल्कीशी सर सुखावुन गेली. समोर वरंधा घाट,कावळ्या अन् न्हावीण सुळका थोड्याफार पावसाने न्हाऊन निघाले होते. त्याच्याही पल्याड कांगोरीच्या माचीनेही दर्शन दिलं.  हिरव्याशालूत  सह्याद्रीचा पसारा मस्त नटलेल्या नवरीसारखा मन वेडावुन गेला. खालची कौलारू घरं आणि वळणावळणावर धरणीला समृद्ध करणारा पावसाळी शिवथर नदीचा पाट या सौंदर्यात अजूनच भर घालत होता. अर्ध्या तासाचा उतार संपवून आम्ही रानवडीत पोहोचलो. डांबरी रस्त्याच्या कडेला एका दुकानात खाऊ माऊ करुन व्हरांडयात खुर्चीमध्ये विसावलेल्या आबांसोबत गप्पा झाडत बसलो. "आबा,शेवत्या घाटाची वाट ?" "ह्या !! ती काय वाट हाय ?, रान माजलं नुसतं. कुणीबी जात न्हाय आता तिकडनं,वस्तीच न्हाय. एखाद - दोन आदिवास्याची झापं हायेती,बस ", इति आबा. व्हरांडयातून पुढ्यात सह्याद्रीचा धारेवरचा डोंगर अन् पायथ्याशी खाचरातली हिरवळ बघुन तिथुन निघावसच वाटत नव्हतं. आणि आता पावसाने हजेरी दिली तर कौलावरून खाली ओंघळणारे पाणी अन् सरींचा आवाज ऐकायला काय भारी मजा येईल, ना ! इथून डांबरी वाटेने शिवथरघळ सात- आठ किमी. कदम काकांचा अन् आबांचा निरोप घेऊन आल्यावाटेने आम्ही मढे घाटाच्या रस्त्याला लागलो.


रस्त्यावरूनच उजवीकडे नजर गेली तेव्हा डोंगराच्या पोटात लपलेल्या एक अप्रतिम धबधब्याने दर्शन दिलं. पावले आपोआपच तिकडे वळली. जवळ पोहोचलो तर जलप्रपात खरच सुंदर होता. आणि दुरुन भासणारी ही छोटीशी खाच नसुन चांगलीच मोठी दरी असल्याचं जाणवलं. अजुन एक फ्रेम कॅमेरात टिपल्या गेली. या वाटेतच आपल्याला एका पेशवेकालीन वास्तुला भेट देता येते. वाकीची पेशवेकालीन विहीर किंवा स्थानिक भाषेत वाकीची बावी. आता ती कशी असेल, आकार कसा असेल,खोली कीती असेल याचा विचार करतच डांबरी रस्त्याने आमची पायगाडी निघाली होती. गावात लावणीची गडबड चालली होती. भातखाचरं तुडुंब तर नाही पण थोड्याफार पावसाने वाहत होती. काही काही अजूनही कोरडीच. वाकीची बाव बाकी कमाल. त्यातल्या निळ्याशार पाण्यानेच आम्ही अगदी फ्रेश झालो. इंग्रजी 'T' आकाराची ही भलीमोठी विहीर  स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. टीच्या आडव्या आणि उभ्या दांडीमध्ये खालून एक मस्त कमान बांधली आहे. आता बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे कमान बुडाली होती. निळ्या पाण्यातून मात्र सुंदर वाटत होती. उजव्या भिंतीवर एक शिलालेखही कोरलेला आढळतो. आणि विहिरीचे स्थानही मोक्याचे आहे. उपांडया,मढे अन् शेवत्या या तीनपैकी कुठल्याही घाटाने तुम्ही प्रवास करा,वाकीची बाव हा पाण्याचा हमखास साठा ! कमाल ! शिलालेख वाचण्याचा निष्फळ प्रयत्न करुन आम्ही मढे घाटाच्या चढाईला लागलो.

मढे घाटातुन कोंकणातली भातखाचरं
पलीकडच्या उजव्या पठारावरचा आभाळात घुसलेला दुर्गाचा कडा एकदम कळसूबाईरांगेतल्या कुलन्गची आठवण करुन गेला. हा किल्ला छत्रपतींनी बांधायला काढून सोडून दिला,असं सांगितलं जातं. पायथ्याला खाचरात भातलावणी चालली होती, त्यांना किल्ल्याबद्दल विचारलं तर हसायला लागली. मला नेहमीच प्रश्न पडतो, आपण बोंबलत हातात कॅमेरा,कधी अर्धी चड्डी,चिखलाने माखलेलं ध्यान,हे सर्व बघुन गावकरी आपल्याला बावळट तर समजत नाहीना ? पण जाऊ दे, समजु दे काय समजायचं ते. त्यांनाही नेहमीच वाटत असेल, घरदार सोडून कशाला ही लोकं,उगाच पाण्यापावसाचं या डोंगर- दऱ्यात येऊन आपली " काशी" करतात ? पण त्यांना काय माहीत, आमची पंढरी अन् काशी दोन्ही हेच,इथेच ! बाकी लावणी एकदम रंगात आली होती. चिखलात बैल हाकणारे बाबा पण पुढ्यात कॅमेरा बघुन एकदम थबकले," हम्म,काढा आता"
मढे घाटातुन " दुर्ग " आणि वाघेरा धबधबा !


पूर्वीचा केळद घाट. सह्याद्रीच्या या भागाला इतिहासात फार मोठे स्थान. कारण ती गोष्टही फार मोठी. सिंहगडावर एक स्वराज्यनिष्ठ हीरा निथळुन पडला. हिंदवी स्वराज्यासाठी एका मित्रासमान शूर सरदाराने स्वामीनिष्ठेला दिलेली एक मानाची सलामी. त्या शूरवीर तानाजी मालुसरे यांचा मृतदेह इथूनच त्यांच्या उमरठ या गावी नेला होता. त्यानंतर केळद चा मढया झाला. या वाटेने तानाजीचं प्रेत चार खांद्यावरुन अंतिम यात्रेला चाललंय,ही कल्पनाच किती रोमहर्षक आहे. काय लोकं होती ! काय मनःस्थिती असेल तेव्हा हे प्रेत आपल्या खांद्यावरून घेऊन जाणाऱ्याची अन् तेही अशा आडवळणावरून ! खरच ह्या वाटा शोधून काढणाऱ्यास  साष्टांग दंडवत. अर्धी चढाई संपून मोकळ्या पठारावर आलो तेव्हा डाव्या बाजूला गाढवटोक अन् वाघेरा जलप्रपाताचा अद्भुत नजारा नजर खिळवून गेला. पुढ्यात घाटमाध्यावर मढे घाटाची खिंड स्पष्ट दिसत होती आणि त्याच्याच उजव्या बाजूला धबधबा खाली कोसळत होता. वरच्या गर्दीची किलकिल अन् कल्लोळ ऐकू आल्यावर जवळच आल्याची खात्री पटली. हळूहळू धबधब्याचा आवाज वाढू लागला. पठाराचा मोकळा भाग सोडला तर वाट सगळी दाट झाडीची होती. एक रानटी डासांचा त्रास सोडला तर बाकी सगळं गोमटं होतं. जेवढा कल्लोळ वर होता तेवढीच शांतता घाटात नांदत होती. अर्ध्या तासात आम्ही माथ्यावर पाय अन् बुड दोन्ही टेकवुन एक लांब सुस्कारा टाकला. समोरच्या सपाटीवरून मढे घाटाच्या धबधब्याचे अप्रतिम दर्शन होत होते, त्याच्या तोंडावर चाललेला उत्साही पब्लिकचा असुरक्षित खेळ मात्र अस्वस्थ करुन गेला. हल्लागुल्ल्यात चुकुन धक्का लागला तर दीड- दोनशे फूटावरून खाली माणसाचा कपाळमोक्षच,नाही का ? पुण्यापासून हाकेच्या अंतरावर अशी बरीच ठिकाणं आहेत,जी पावसात अगदी भरभरून हसत असतात,तिथल्या फुलांमध्ये,पानांमध्ये,दाटलेल्या धुक्यामध्ये अन् भरून आलेल्या नभामध्ये, तिथल्या कोसळणाऱ्या महामूर पावसामध्ये. पण काही ठिकाणं आडवाटेवरची,जिथे पोहोचायचं तर पायगाडीशिवाय पर्याय नसतो. अगदी कालपर्यंत आडवाटेच्या यादीत आरामात पहुडलेल्या मढे घाटाचा आता पिकनिक स्पॉट झालाय. गाड्या पार धबधब्याच्या तोंडाशी आल्यावर अजुन काय होणार. असो तूर्तास आम्ही आमच्या पायगाडीला केळदची वाट दाखवुन सह्याद्रीचा निरोप घेतला. पावसाच्या सरी रुसल्याच होत्या, दोन ऐतिहासिक घाटांची सैर मात्र अफलातुन झाली. "ये वरुणराजा ये बाबा लवकर, बरस आता" साकडं घालुन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. 


केळद गावाकडे … पावसासाठी आसुसलेली खाचर !

15 comments:

  1. Ashakya sundar likhan ani uttamn mandani... Tuzi post mhanje vachakansathi mejwanich janu... Hi ashi mejwani eachkanna satat labho hi sadichha...
    Asach lihit raha...!!! :)

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Tuza blog vachtana ase vatate ki mazya sagalyat avadtya lekhkacha dhada utsuktene vachtey....:-)
    Jevdha chan blog tevdhech sunder photos....
    Mastach....

    ReplyDelete
  4. Good work..chaan lihilay...Regards.

    ReplyDelete
  5. खुप छान !! पूर्ण नहीं वाचू शकलो पण अर्ध्यापर्यंत च माँ मन तृप्त झाले मित्रा

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. संदिप तुमचा ब्लॉग वाचून नेहमीच छान वाटते.. सह्याद्रीचे केलेले वर्णन एकदम सुंदर (आमची पंढरी अन् काशी दोन्ही हेच,इथेच !)...
    धन्यवाद

    ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences