तुरुकवाडी! रस्त्यावरच्या डाव्या बाजूला ग्रामपंचायतीचं बोर्ड बघुन प्रसाद पुटपुटला,"आयला,हे नाव कुठंतरी वाचण्यात आहे " मग एकदम डोक्यात प्रकाशच पडला. हे तर पन्हाळा - विशाळगड या मोहिमेत महाराजांनी पायाखाली तुडविलेल्या मातीचे गाव ! मनोमन नमस्कार झडला.आंबा घाटातल्या पितळी गोमुखातलं झिरपणारं पाणी घशाखाली उतरवून पुढे निघालोच तोवर विशालगडानेही दर्शन दिले. नावाप्रमाणेच आडवा पसरलेला गडमाथा गडदाखल होण्याचं आवतण देऊन गेला. त्याची उंचीही काही कमी थोडकी नव्हे ! उजवीला दरीपलीकडे हिरव्यागार वनश्रींने नटलेला चांदोली अभयारण्याचा माथा खुणावत गेला. निरभ्र आकाश,आंबा घाटाचा गुळगुळीत रस्ता आणि नेहमीप्रमाणे रंगलेला गप्पांचा फड,त्यात आमच्या रेश्मा मॅडमची रात्रीच्या झोपेची राहिलेली थकबाकी ! बाईसाहेब मध्येच जाग्या व्हायच्या आणि कुठे -कुठे किल्ला असं काहीबाही विचारायच्या. किल्ला तोपर्यंत घाटाच्या वळणावर नजरेआड व्हायचा.
एकंदरीत घाटातला सुंदर प्रवास जगतच आम्ही निघालो होतो आंब्याच्या देशात! चाखाया कोंकणचो राजा,फळांचा राजा. अनुक्रमे आंबा अन् दाभोळे घाट उतरून रत्नागिरीत प्रवेश केला तेव्हा मध्यान्हीचा सूर्यनारायण डोक्यावर वीज पडल्यासारखा तळपत होता.पुण्यातून पहाटे जरी निघालो असतो तरी देवाचा हा रोष टाळणं जरा मुश्किलच होतं.तरीही उन्हं पडायच्या आधीच घराचा उंबरठा ओलांडून निघायचा,आमचा बेत काही अंशी फसलेलाच.प्रवास हा जवळपास एक-सव्वा तास उशीराच सुरू होता.पूर्णगडाचा रस्ता विचारून त्या वाटेला लागलो तेव्हा घड्याळजी दीडच्या ठोक्यावर येऊन थांबलेले. रस्त्यावरूनच पावसच्या स्वामी स्वरूपानंदांना नमस्कार करून पूर्णगडाकडे मार्गस्थ झालो.
|
पूर्णगड वाडी - पारंपरिक जांबा दगडाची घरं |
© Sandip Wadaskar । © WTA | भटकंती…सह्याद्रीच्या कुशीत । All Rights Reserved
मुख्य रस्त्यावरून आत शिरलो,डांबरी रस्त्यांची जागा आता जांबाच्या मातीने घेतली.आजुबाजुला आमराई, प्रत्येक झाडाला शेकडोनी आंबा लगडलेला. मूचकुंदीच्या खाडीतीरी मुस्लिमवाडीत पूर्णगडाचा रस्ता विचारून पुढे निघालो तेव्हा हुंदळणाऱ्या सागरी लाटांचं पहिलं दर्शन झालं,पुढचे दोन दिवस आता तो सोबतच असणार होता म्हणा.समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे का होईना कोंकणातला हा असह्य उकाडा थोडा कमी भासत होता,निदान डोळ्यांना तरी.
तटालगतच वेढा मारून आत घुसलो तर हाताला लागेल इतक्या अंतरावर एक टवटवीट हापूस आंबा फांदीवर निर्विकार डुलत होता,लगेच जाऊन खुडला अन् पिशवीत टाकलाही.बाहेरच्या उन्हातून आत आल्यावर आंब्याच्या झाडांची सावली जरा गारसूख देऊन गेली.थोडं पुढे सरकलो आणि हापूसचा स्वर्गच गवसल्याचा आनंद झाला, क्षणात सगळ्यांच्या मनातला चोर जागा व्हायला वेळ नाही लागला. किल्ला फिरुन झाला की हा उद्योग मार्गी लावायचा,असं मनात ठरवूनच प्रवेशद्वाराकडे निघालो, बाजूलाच कोंकणातली पारंपरिक वाडी दुपारची वामकुक्षी घेत सुस्तावली वाटत होती,वाटनिश्चिती म्हणून वाडीत शिरलो तर इथल्या घरांचा खरच हेवा वाटून गेला .काय राहतात ना लोकं,मस्त ! जांबा दगडांची बांधकाम असलेली बसकी,कौलारू घरं. घरासमोर स्वच्छ सारवलेलं अंगण,अंगणाचं दार म्हणजे दोन उभ्या लाकडी खांबांवर आडवा खांब,व्यवस्थित अडकवलेला. आणि घराच्या चारही बाजूने गारेगार सावली देणारी आंब्याची भरभक्कम झाडे.आडवा खांब उचलुन एका घरात शिरणारच होतो पण आवाज लावल्यावर एका मावशीने बाहेर येउन आम्हाला गडाच्या वाटेला लावले.
|
मुख्य प्रवेशद्वार - दोन भक्कम बुरूजामधील पूर्वेकडचं दार |
किल्ल्याच्या भक्कम बुरुजांनी लक्ष वेधून घेतलं. प्रवेशद्वारातच हनुमंताचं एक टापटिप मंदिर आहे. दोन भक्कम बुरुजांच्या मधलं दरवाज्याचं बांधकाम अगदी मजबूत वाटतं. आत जाताच किल्ल्याचा आवाका एकाच नजरेत येतो म्हणजे सुरू होताच पुढच्या दरवाजावर नजर गेली की संपला किल्ला ! पश्चिमेस समुद्राकडे घेऊन जाणाऱ्या दारात पहारेऱ्याची जागा आणि तटबंदीवरून दिसणारं सागराचं मनमोहक दृश्य कमाल. किल्ल्याच्या चार बाजूने पायऱ्या चढुन आपण तटबंदीवर चढु शकतो. सहा भरभक्कम बुरुज,दोन सुबक बांधणीचे प्रवेशद्वार,एक सदर अन् मजबूत बांधणीच्या तटबंदीने वेढलेला हा सर्व छोटेखानी जामानीमा ! बास ! आटोपला पूर्णगड.
किल्ल्याचे बांधकाम शिवाजी महाराजांनी केलंय की सखोजी आंग्रे (सर्खेल कान्होजी आंग्रे यांचा मुलगा )यांनी केलं,याची पक्की माहिती नाही. पण शिवकालीन असावा,असं सारखं वाटत राहतं. कारण शिवाजी महाराजांनी बांधलेला शेवटचा किल्ला, असाही उल्लेख याबद्दल होतो. किल्ल्याची निर्मिती मूचकुंदी खाडीवर देखरेखीसाठी केली असावी.आतापर्यंत पाहिलेल्या किल्ल्यांपैकी सर्वात छोटा किल्ला, याचंच कौतुक वाटून गेलं. किल्ला पाहून झाला होता, आता राहिलेलं अखेरचं काम म्हणजे! हो,बरोबर! चांगल्या पंधरा-वीस आंब्याची कमाई करून पश्चिम प्रवेशद्वाराने आम्ही पसार झालो. थोडावेळ एकदम कसं सराईत चोर असल्यासारखं वाटलं, आणि तसेही विकत घेऊन खाण्यापेक्षा चोरून खायची मजा वेगळीच,नाही योगिता ! बरोबर ना ?
|
पश्चिमेकडे पसरलेला अथांग महासागर -पूर्णगडाच्या तटबंदीवरून |
असो.पुढच्या प्रवासाला लागलो,मोहिमेतल्या दुसऱ्या किल्ल्याकडे मोर्चा वळविला.नारायणराव अजूनही आग ओकत होतेच.काजळीखाडीवरचा भाट्ये ब्रिज ओलांडून आम्ही रत्नदुर्गाकडे रवाना झालो.अरे हो,एक विसरलोच ! भेटीआधीची सर्व किल्ल्यांची माहिती जमवण्याची महत्वाची जबाबदारी आपणहून रेश्माने स्वतःकडे घेतली होती. म्हणजे किल्ल्यावर काय पाहाल,काय अवशेष अजुन शिल्लक आहेत,त्याचा आकार - ऊकार वगैरे- वगैरे. त्यामुळे आम्ही फक्त ऐकत होतो. बाकी बाईसाहेबांनी तयारी जोरात चालवलेली दिसत होती. अगदी सुवाच्चं अक्षरात लिहिलेला सर्व किल्ल्यांचा लेखाजोखा हातात शेवटपर्यंत बाळगून होती. त्यामुळे रत्नदुर्गाजवळ पोहोचताच "घोड्याच्या नालेच्या आकाराची तटबंदी" या तिच्या वाक्यावर सर्व जण खळखळून हसले. गाडी थेट बालेकिल्ल्याच्या दरवाज्यापर्यंत जाते. पायऱ्या आणि रंगरंगोटी केली असल्यामुळे आपण एखाद्या मंदिरात प्रवेश करतोय,असंच वाटतं. किंबहुना आपण भगवती देवीच्या शिवकालीन मंदिराकडेच जात असतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच माहितीचा फलक लावला आहे. नवरात्रीच्या दिवसात देवीचा उत्सव असतो,त्यामुळे किल्ल्याशिवायही या जागेला जास्त महत्व. तटबंदीवरून फिरत असताना समुद्राचं विहंगम दर्शन झालं. पलीकडे कडेलोट टोक म्हणजेच शिफ्ट-डिलीट पॉइंट आणि त्याच्या थोडं वर दीपगृह! पूर्वेला गडाची लांबलचक जवळपास दीड किमीची तटबंदी लक्ष वेधून घेते. मिऱ्या बंदर, रत्नागिरी शहर आणि भगवती जेट्टीचा नजारा छान. सृष्टीचा रहाटगाडा जोमाने चालला होता. पण या रहाटगाड्याच्या आवाजासमोर उदरातला कावळ्यांचा कोलाहल जरा जास्तच वाटु लागला. कारण पुण्यातून निघाल्यावर सातारारोडला ढकललेला सकाळचा वडासांबार सोडला तर पोटात एकूण खड़खडाट होता.
|
पूर्णगडाचे पश्चिम द्वार |
|
रत्नदुर्गाच्या तटबंदीतुन दिसणारा दीपगृह आणि कडेलोट टोक |
आता पुढचा किल्ला हा जयगड पण त्या आधी एक गरजेचा प्रायोजित कार्यक्रम म्हणजे उदरंभरणम् ! आरे -वारे बीचच्या साइड ने जाणारा रत्नागिरी ते गणपतीपुळे हा एक अप्रतिम रस्ता तुमची नजर सागरावर खिळवून ठेवतो. देशातल्या सर्वात सुंदर रस्त्यापैकी असलेल्या या रस्त्याने प्रवास म्हणजे विलक्षण. अर्थात याला पर्यायी रस्ता आहे,पण इतका सुंदर रस्ता सोडून तिकडे कोण जाणार. डाव्या बाजूला अथांग पसरलेला दर्या आणि उजवीकडे टेकडीवरून जाणारा हा वळणावळणाचा दुपदरी राजमार्ग. खालच्या बाजूला येणारे अनुक्रमे आरे आणि वारे हे दोन व्हर्जिन समुद्रकिनारे अन् त्यावरील पांढरी वाळू सतत आपल्याला किनाऱ्याकडे खेचत असते. गणपती पूळ्याचा निसर्गरम्य समुद्रकिनारा आणि किनाऱ्यावरच बाप्पाचं अस्सल जांबाचं मंदिर,भोवताली असलेली माणसांची गर्दी वळवळणाऱ्या मुंग्यासारखी भासून मजा वाटून गेली. पुढे गेल्यावर डाव्या बाजूला असलेली रम्यं सुरुची वनं पण इकडेतिकडे पडलेला,टाकलेला अतिउत्साही पर्यटकांचा कचरा मन विषण्णही करून गेला. असो,महाभागांना साष्टांग दंडवत घालुन गणपती पूळ्यात पोहोचलो.
संध्याकाळचे घड्याळात साधारण पाच झालेले. पोटात कावळेही ओरडत होते,जास्त वेळ न दवडता पोटोबा करायचा होता कारण कोणत्याही परिस्थितीत जयगड चुकवायचा नव्हता. पण नशीब आमचं एवढं बलवत्तर,या वेळेला काहीच नाही मिळालं. साधा वडापाव ही गवसला नाही. त्यामुळे गाडी दामटली तडक जयगडाकडे ! वाटेत कवी केशवसूतांचं मालगुंड हे गाव लागलं तेव्हा गाडीतुन उतरून त्यांच्या स्मारकाला भेट देण्याचा मोह झालेला पण वेळेचं बंधन असल्यामुळे टाळावा लागला. गणपती पूळ्याहून साधारण 18 किमी अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्याकडे वळताना दुरुनच जयगड दीपगृह दॄष्टीस पडलं. डाव्या बाजूला जिंदाल स्टील कंपनीचा परिसर आणि बाजूलाच असलेल्या जयगड गावापासून थोडा दुर वसलेला हा गडकोट चांगल्या स्थितीत आढळतो.
|
जयगडच्या खंदकातील दरवाजा |
|
जयगड किल्ल्याचे प्रवेशद्वार |
प्रवेशद्वाराजवळच असलेल्या तलाठी कार्यालयाजवळ गाडी लावुन आत शिरलो तर विजापूरी बांधकाम असलेला दरवाजा छाप पाडून गेला. सद्यस्थितीत हा भक्कम बुरुज आधुनिक सीमेंटच्या वापरामु़ळ तग धरून उभा आहे. उजव्या बाजूला एक छोटेखानी दरवाजा खंदकातुनच वाट जाईल असा बांधून काढलाय. बाकी या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे समुद्राकडचा भाग सोडला तर तिन्ही बाजूने 10 - 12 फूटी खंदकानी कोट एकदम संरक्षित आहे. नेहमीप्रमाणे तटबंदी,काही ठिकाणी तोफा ठेवायला जागा आणि जंग्या आढळतात. जयगडच्या (जयगड नदीची खाडीही म्हणतात ) खाडीवर लक्ष ठेवायला या किल्ल्याची निर्मिती झाली असावी. तसा सागराकडे सतत नजर ठेवणारा भक्कम असा दुमजली टेहेळणी बुरुजही पाहण्यासारखा. त्याच्या गवाक्षातून समुद्रात फिरणारया बोटीचा नजारा आपलं मनोरंजन करतो. समुद्राकडील तटबंदीवर एक छोटं दीपगृहही लक्ष वेधून घेतं. किल्ल्याच्या मधोमध एक पडलेलं बांधकाम,तसेच प्रवेश केल्यावर लगेच निवासाची जागा पडक्या अवस्थेत आहे.
गडफेरी आटोपून परत निघायला लागलो तेव्हा ढगांआड नारायणराव पश्चिमेकडे कलत होते आणि खाली मोहल्ल्यात पोरांची क्रिकेटची मॅच चाललेली. जिंदाल कंपनीतले दिवे हळूहळू उजाळायला लागलेले. कलत्या दिवाकराच्या सोनेरी किरणांनी सिंधूसागरही उजळून निघत होता. आज दिवसभरात तीन समुद्री किल्ल्यांची भटकंती झाली होती. समाधानी मनाने जयगडाचा निरोप घेऊन आजच्या पायगाडीला आराम आणि भटकंतीला विराम देऊन जयगड जेट्टीकडे रवाना झालो.
|
समुद्राकडील तटबंदी आणि पायथ्याशी खंदक ! |
|
|
|
क्रमशः - जांबा अन् आंब्याच्या देशात - उत्तरार्ध ……
No comments:
Post a Comment
Thanks for putting comments. Keep watching space for new experiences