महाराष्ट्रात फार पूर्वी पासुन किल्ले-भटकंती ची एक भन्नाट संस्कृति रुजु झालीये आणि ती आजतागायत तेवढ्याच उत्साहात टिकून आहे. विशेषतः पुणेकर,मुंबईकरांमध्ये.आठवड्याअंतीचं प्लॅनिंग इथे सोमवारपासुनच सुरू होतं.आणि जोडून सुट्टी आली की पाठीवर पिशव्या चढवून रानोमाळ हिंडणाऱ्याची संख्या इथे कमी नाही.मग त्या दोन दिवसात तुम्ही - आम्हीचं रूपांतर तु तु - मै मै मध्ये आणि अनोळखीचं मैत्रीमध्ये होतं,एकदम चिरकाल टिकणारया ! तिथे वय,सामाजिक प्रतिष्ठा,श्रीमंती,गरिबी काहीही आड येत नाही.एखाद्या मुक्त उधळण करणाऱ्या ताज्या दमाच्या बालट्रेकरची आणि डोक्यात रॉउंड कॅप,हातात कॅमेरा वगैरे मिरवणाऱ्या आजोबांची मैत्री इथे नवीन नाही. आणि अशी जगावेगळी डोंगरमैत्री इतरत्र कुठे पाहायला मिळणार नाही हे माझं प्रांजळ मत आहे. कदाचित याच हव्याहव्याश्या डोंगरमैत्री मुळे आम्हाला घरात बसवत नसेल. कदाचित,आमच्या लाडक्या सह्याद्रीला भेटल्या शिवाय करमत नसेल. रानोमाळ तंगडतोड करणाऱ्या मनस्वी भटक्यामध्ये या सह्याद्रीबद्दल अपार आदरभाव आहे.झपाट्याने चाललेली डोंगरांची लचकेतोड आणि जंगलांची कत्तल त्याला पाहवत नाही. चंगळवादी पर्यटकांमुळे दूषित झालेलं वातावरणही त्याला पाहवत नाही. साचलेल्या कचरयामुळे त्याचेही मन हळहळल्याशिवाय राहत नाही. साफसफाईची प्रेरणा घेऊन मग दहा - पाच जणांचा गट तयार होतो आणि जमेल तेवढे श्रमदान करून कचरा पायथ्याशी आणला जातो. पण आजच्या परिस्थितीत तेही एवढं साधं आणि सोपं राहिलेलं नाही. माझ्या मते अशा ठिकाणी आपण आधीच जर जबाबदारीने वागायला शिकलो असतो तर ही वेळ ओढवलीच नसती. ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. गावकरी,ट्रेकर,पर्यटक या सगळ्यांची.तर अशाच डोंगरयात्रेतून,गिर्यारोहणातून जर संवर्धनही होत असेल तर त्या भटकंतीला एक वेगळीच दिशा मिळु शकते. त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. फक्त गरज आहे ती आपल्या अफाट सह्याद्रीबद्दल अपार प्रेमाची आणि ढासळत जाणाऱ्या पर्यावरणाच्या पुरेपुर जाणीवेची.याच जाणीवेतुन आम्ही मागच्या वर्षापासून गडावर स्वच्छता अभियान सुरू केले. किल्ले तोरण,लोहगड- विसापुर अशा गर्दी खेचनार्या ठिकाणावरून दहा - पंधरा कचरयाच्या पिशव्या खाली आणताना मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. आपण आपल्या घरात इकडे तिकडे पडलेला थोडासाही केर जर बघु शकत नाही तर या पवित्र ठिकाणी आपल्याला कचरा करण्याचा अधिकार दिलाय कोणी ? ही साधी सरळ गोष्ट आपल्याला का समजू नये ? आणि हे अति झालं की प्रशासनाला नावे ठेऊन आपण मोकळे होतो. फक्त नावं ठेऊन चालणार नाही तर, आपल्यालाही हातभार लावता येईल, याची जाणीव असु द्यावी. याच जाणीवेतुन मग अरुण सरांसारखे डोंगरमित्र पुढे येतात.
All the content Copyright - Sandip Wadaskar
किल्ले मदनगड़ावरील हौsद साफसफाईचा विडा त्यांनी उचलला. तसं पाहिलं तर अलन्ग मदन कुलन्ग या सह्याद्रीमधल्या सर्वात दुर्गम आणि अवघड किल्ल्यावर पर्यटकांची सोडाच पण गिर्यारोहकांची म्हणावी तेवढी वर्दळ कमीच. त्यामुळे चंगळवादी प्रव्रुत्तिपासुन हा त्यातल्या त्यात सुरक्षित,पण दुर्गमतेमुळं तेवढाच दुर्लक्षितही ! इथे मुक्कामाला प्रसन्न गुहा आहेत पण उदकाची मारामार. नाही म्हणायला कातळात खोदलेल्या पाण्याच्या तीन टाकी,सगळ्या मोठमोठ्या दगड- मातीने गच्च झालेल्या. एका हौsदाच्य कोपऱ्यातून पिण्याच्या पाण्याची थोडीफार सोय होते. पैकी एका हौsदाची साफसफाई मोहीम सरांनी आखली होती आणि वाटा खारीचा का असेना आम्हीही मोहिमेत सहभागी व्हायचं ठरवलं. तिन्ही दिवस शक्य नसल्याने शुक्रवारचं ऑफीस आटोपून मी,प्रसाद,सागर अमराळे अन् त्याचा भाचा, किरण सर,महादेव गदादे आणि प्रह्लाद सर असे सात डोंगरमित्र आंबेवाडीकडे रवाना झालो. नुकताच लागलेल्या निवडणुकीच्या निकालावर चर्चासत्र झाली. सागरने सांगितलेल्या अरुण सरांच्या काही आठवणींनी त्यांना भेटायची इच्छा अजूनच दृढ होत गेली. गप्पांच्या नादात आम्ही आंबेवाडीत पोहोचलो तेव्हा रात्रीच्या थोडयाफार प्रकाशात त्रिकुट उजळून निघालं होतं. डाव्या बाजुला काळसुबाईंच ठाण खुणावीत होतं. जेवणं उरकून लखनच्या पडवीत पथाऱ्या पसरल्या आणि झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईची अन् नाशकातल्या जल्लोशची मंडळी येऊन मिळाली. संजय अम्रुतकर सरांची ओळख झाली. "वडस्करांचा संदिप पण आलाय वाटतं !" या त्यांच्या वाक्याने डॉ. जयराम ढीकले सरांची भेट झाली. उरलेल्या सामानाची विभागणी करून पाठीवर चढवलं आणि मदनकडे ट्रेकस्थ झालो. बऱ्यापैकी उजाडलं असल्यामुळे अ- म - कु चा पसारा त्याच्या दुर्गमतेची जाणीव करून गेला. अलंगचा ट्रॅव्हरस नं घेता,अलंग आणि मदनच्या खिंडीत जाणारी जरा जवळची नाळेतली वाट धरली. आणि दोन- अडीच तासात आम्ही खिंडीत पोहोचलो. उन्ह वाढतच होतं. त्यातच मदनाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. घामाच्या धारा वाहत होत्या. चाळीस फूटी तुटलेल्या कड्याजवळ पोहोचलो तेव्हा कुठे थोडीफार सावली मिळाली आणि विसावलो. कड्याला सुरक्षादोर नसल्यामुळे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. थोडया वेळाने संजय आणि पराग या दोघांनी दोर सोडल्यानंतर एकेकानी चढायला सुरुवात केली. गडमाथ्यावर पोहोचलो तेव्हा काम सुरू होतं. उमेश सरांनी ताक- पाणी वगैरे घेऊन नंतर कामाला लागण्याची सूचना करून गुहेकडे बोट दाखवलं. अरुण सर आणि काही मंडळी दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागली होती. गुहेत पाठपिशव्या ठेऊन कामाला भिडलो.आदल्या दिवशीच्या श्रमदानामुळे गाळानी बुजलेले झरे थोडेफार मोकळे झाले होते. हौsदात पाणी साचलं होतं. गाळाच्या सोबतीला मोठमोठ्या दगड- धोंडयांच्या राशि. हे प्रकरण म्हणजे जरा अजबच वाटत होतं. गाळ उपसायचं ठीक होतं,पण ही दगडं कमी करायची म्हणजे ताकदीबरोबर थोडं डोकंही चालवायची गरज होती. मग काय पायथ्याची भोरु अन् कंपनी आणि आमची ट्रेकर कंपनी. कुणी गाळ काढत होतं काहीजण दोर खेचत होतं. माती बाजूला करून मोठमोठी दगडं मोकळी होत होती. दोराची गाठ घट्ट आवळली अन् दहा - पंधरा जणांनी जोर लावला की दगड टाकयाबाहेर पडलाच समजा! जल्लोश व्हायचा,हर हर महादेवाच्या आरोळ्या उठायच्या. सारा आसमंत दुंदुमून जायचा नुसता!आणि अजून एक म्हणजे दगडांखाली गाळात दडलेले खेकडे,दगडाखाली हात गेला की एखाद चिंबोरा हातात आलाच पाहिजे. पुढे तर असं झालं की चिंबोरे शोधायलाच दगड वर यायचे. हे सगळं चालु असताना गुहेतुन जेवणाचं आवतन आलं. हात वगैरे धुवून गुहेकडे धावलो तर अरूण सरांनी जेवणाचा साग्रसंगीत थाट मांडला होता. पुरणाची पोळी काय,मसाले भात काय, छोले काय ? आ हा हा !!! इथे हौsद सफाईला आलोय की उत्सवाला हेच कळेना?
एवढ्या दुर्गम किल्ल्यावर,टळटळीत उन्हात हातातल्या ताटात पुरणाची पोळी अन् मसाले भाताचा आस्वाद घेत बसलेले दुर्गवीर! हे चित्रं म्हणजे कमाल. पण इथे एक साधी अट होती. पुरणाची पोळी प्रत्येकाला एकच, अर्थात जेवण प्रत्येकाला आणि समान मिळायला पाहिजे हाच उद्दात हेतु. पण मजा आली भरपेट जेवणं झाली,वामकुक्षी झाली आणि मावळे हौsदाकडे वळले. कामं सुरू झाली.पण पाहतो काय, तेवढ्यात वातावरणाचा नुर पालटला,अलंग्याच्या मागून येणारे काळे ढग आमच्या दिशेने झेपावु लागले होते. आभाळ गच्च झालेलं. ढगांची दाटीवाटी आणि विजांचा कडकडाट. कुणीही म्हणणार नाही की वीस मिनिटाआधी इथे टळटळीत दुपार होती. विजेच्या कडकडाटासह घन बरसू लागला,इतका की समोरच्या अलंगवर धबधब्यांना सुरुवातही झाली. कुणीतरी गुहेच्या वरच्या बाजूला गेलं असता वीज अनुभवल्याचंही सांगत होतं, नंतर कळलं ते आमचे किरण सर होते. बाहेर पाऊसवेडे पाऊस जगत होते. गुहेत हिंदी- मराठी गाण्यांना उजळणी मिळत होती. पण अरूण सर मात्र गुहेतल्या अंधाराची सोय म्हणून मशाली(आधुनिक torch) ठेवण्यासाठी जागा शोधत होते. बराच वेळ पाऊस असाच कोसळत होता. हौsदाचं काम बंद पडलेलं पण असो, पहिला पाऊस आहे घ्यावा गोड मानून! सगळे आनंदात! दिड एक तास बरसल्यावर पावसाची सर हळूहळू ओसरायला लागली.तासा- दोन तासाआधी उन्हाचे चटके देणारा निसर्ग आता हवाहवासा वाटू लागला होता. हवेत कमालीचा गारवा आणि वातावरण कसं स्वच्छ,नितळ! एक एक करून सगळे कामगार गडी हौsदाकडे परतु लागले. पहारी,घन,घमेले,फावडे,वगैरे वगैरे सामान घेऊन सगळे परत एकदा सज्ज झाले. आता अजुन एक अडचण म्हणजे पावसाच्या पाण्यामुळं हौsदात चिखल झाला होता. पण आता कुणाला त्याची तमा नव्हती,घमेल्याने गाळाचा उपसा सुरू झाला. पावसाने एकदम ताजे- तवाने झालेले गडी जे भिडले ते सांगायलाच नको. दगड बांधायचा अवकाश, ओढला की टाकयाबाहेरच फेकला जायचा. हे सर्व चालु असताना अलंगावर सांजवेळ उन्ह खेळत होती,पावसानंतर ऊन- पावसाच्या खेळानं रंगून गेलेल्या अलंग्याचं मनमोहक रुपडं बघून भारावून गेलो. नारायण पलिकडे चांगलाच कलला होता.
मदनाच्या सर्वोच्च माथ्यावरून नारायणराव थोड्याच वेळात कुलंगआड होणार होते. महारथी कुलंगच्या मागे सांजवेळ सोनेरी किरणे आपले रंग उधळीत होती. तो अनुपम सोहळा पाहत,तिथून हलावसं वाटलं नाही की कॅमेराचं शटर बटन दाबावसं वाटलं नाही. आणि काय सांगु काय दिसत होता सह्याद्री! माझा सह्याद्री! अफाट,अभेद्य,अजिंक्य सह्याद्री! महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील सर्वात उंच डोंगरशिखरांची मांदियाळी ही इथेच! सगळ्यांची उंची ही सरासरी पाच हजार फूटांपेक्षा जास्तच. सर्वात ऊंचावर असलेल्या कळसुबाईंच्या ठाण्यापासुन उजवीकडे,छोटा कळसुबाई,श्रीक़िरडा,अलंग,घन्चक्कर,कात्राबाई,आजोबा,कुलंग हे महारथींची भलीमोठी रांग जणु अस्ताला जाणाऱ्या दिवाकरास सलामी देतायेत असं वाटत होतं. कुठे रतनगड डोके वर काढतोय,कधी त्याचा खूँटा स्वतःचं अस्तित्व जाणवतोय. कुठे डांग्या सुळक्या खुणावतोय. खाली घाटघर अन् सांधण दरी मागल्या भेटीची आठवण करून देतायेत,पश्चिमेकडचा जलाशय सांजवेळची सूर्यकिरणे झेलत पहुडलाय,कधी तिकडे तो पट्टा विश्रामासाठी निमंत्रण पाठवतोय असं वाटत होतं. मस्त मस्त !!अंधार गडद व्हायच्या आधी हौदाकडे वळलो. आता तर गारव्यामुळे चांगलाच उत्साह संचारला होता. दगड बाहेर फेंकताना कुणाना- कुणाच्या तरी श्रीमुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दागणिक हास्यकल्लोळ उठायचे.हसून- हसून पोट दुखायची वेळ आली होती अन् हौदही रिकामा झालेला दिसत होता. अगदी रात्रीचा दिवस करून काम चालु होतं. बऱ्यापैकी अंधारून आलेलं. थोडावेळ उपसा करून आजचा दिवस संपला,असं जाहीर झालं अन् गुहेकडे वळलो. रात्रीच्या जेवणात खीर आणि दुपारच्या छोल्याचा फडशा पाडुन जमिनीवर पाठ टेकवली तेव्हा निरभ्र आकाशात चांदण्यांचा सडा पडला होता. तारे मोजत कधी झोप लागली कळलंच नाही.सकाळी जाग आली तेव्हा, प्रसाद ओरडत होता. सॅन्डया. उठ,उठ अरे तुझा सूर्योदय, तुला फोटो काढायचे होते ना ? उठलो तेव्हा "गोल्डन अवर" निघून गेला होता. सकाळची आण्हीक उरकून हौदाजवळ येऊन बसलो. तिकडे गुहेत चहा- नाश्त्याची तयारी चालु होती. मला कालपासुन एक प्रश्न पडला होता. या हौदात ही एवढी मोठ-मोठी दगड गेली कशी असेल. नाही,मुद्दाम टाकली असेल. कदाचित इथला पाण्याचा स्त्रोत कायम बंद करण्याच्या उद्देशाने. हो असच झालं असेल. त्याच मानसिकतेतुन इथल्या पायऱ्या पण उध्वस्त करण्यात आल्या आहेत. पण मग एवढी दगड. सांगता येणार नाही. तसा या किल्ल्यांचा इतिहासही फारसा ज्ञात नाही. आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या बुरुज वजा किल्ल्याचा उपयोग होत असावा. कारण सर्वात उंच टोकावर उध्वस्त झालेली चौकी पहायला मिळतात. असो. तूर्तास हौदाची साफसफाई महत्वाची होती. प्रह्लाद सर, किरण सर, महादेव अन् प्रसाद मिळून चहा होईपर्यंत तेवढा गाळ उपसुन घेतला आणि चहा- नाश्ता आटोपून सर्वजण परत एकदा लढाईस सज्ज झाले. शेवटचा दम म्हणत म्हणत बरेच दगड बाहेर आली होते. आता दगडांच्या राशी हौदाच्या बाहेर दिसायला लागल्या होत्या. पाहून फार फार बरं वाटत होतं. बराच गाळ बाहेर आला होता. कुठेतरी आमच्या सह्यादीच्या कामी आल्याचं समाधान होतं. साफसफाईची सांगता झाली. तेवढ्यात महादेवने त्याच्या नुकताच जगात प्रवेश केलेल्या बाळाचे पेढे भरवुन तर शेवट अगदी गोड करून टाकला. एका डोंगरमित्राचा पेढे वाटतानाचा चेहऱ्यावरील आनंद काही औरच होता !
"जल्लोष"ने निरोप घेतला.आम्ही गावलेले थोडेफार चिंबोरे भाजुन खाल्ले पण गुहेत जेवणाचा बेत वेगळाच शिजलेला! मस्तपैकी झिंग्याची चटणी आमची वाट पाहत होती. सागर अमराळेने बऱ्यापैकी जतन करून आणलेलं आम्रखंड, व्वा वाह ! भर उन्हात चुलिवर पोळ्या भाजतानाचे किस्से, गप्पा मारत जेवणं उरकली. एकमेकांचे अनुभव वाटल्या गेले. अरूण सरांसोबतही गप्पा झाल्या. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. त्यांना भेटून येणारे म्हणत असतात,अरूण सर तुमच्या बाजूला येऊन थांबले तरी तुम्ही नाही ओळखू शकणार. तेही खरच आहे, बाहेरून असे साधारण दिसणारे अरूण सर ही काय चीज आहे, हे फक्त त्यांच्यासोबत असणारे भटकेच सांगू शकतील. त्यांनी आखलेली ही मोहीम म्हणजे फक्त हौद साफ करणे नव्हे तर चार लोकं एकत्र येऊन आपण आपल्या सह्याद्रीसाठी काहीतरी करु शकतो अशी प्रेरणा देणारी एक मोहीम आहे,असं माझं मत आहे. वेगवेगळ्या ग्रुपसोबत फिरणारे, वेगवेगळ्या ग्रुपचे चालक- मालक, पुणे - मुंबई- नाशिक अन् इतर आजूबाजूची भटकी कंपनी,संजय सरांसारखे लेखक,ढीकले सरांसारखे सायक्लिष्ट, श्वेता,पिनाक,देव,प्रिसिलिया,मिहिर,दिवेश,समीर,विष्णु, हर्षल,संजय,पराग,उमेश सर, महिमचे जयंतकाका आणि इतर सर्व यांच्यासारखे डोंगरमित्र या सगळ्यांसोबत दोन दिवस मस्त मजेत गेले. हौदाच्या पुढच्या वर्षीच्या कामाचं आवतण, गेल्या दोन दिवसाच्या श्रमाची पोचपावती म्हणजे गोड आठवणी अन् अनुभवलेला अविस्मरणीय सह्याद्री मनाच्या कोपऱ्यात ठेऊन आवरायला सुरुवात झाली.हार्नेस बांधून परतीची वाट धरली. उतरताना डोळ्यासमोर आलेली दरीची भीषणता काळजाचा ठोका चुकवल्याशिवाय राहत नाही. तूटलेला कडा उतरून खिंडीत पोहोचलो. आता नाळेची वाट न घेता अलन्गचा ट्रॅवर्स जवळ केला. रमत गमत सपाटीला लागलो तेव्हा आभाळ गच्च झालं होतं. विजेच्या लखलखाटात पसारा अजूनच भेदक भासत होता.समाधानी मनाने परतीच्या वाटेला लागलो तेव्हा संध्याकाळचे सात वाजुन गेले होते....अरुण सरांनी याही वर्षी ही मोहीम आखलेली आहे , तरी जास्तीत जास्त डोंगरमित्रांना या मोहिमेत सहभागी होण्याचे टीम मदनगड हौद साफसफाई च्या वतीने मी आवाहन करतो .लवकरच सर्वांची भेट होईलच :) !!!!!!
mast sandy parat tya god athwanina ujala milala ani asach kahi nawin karnyachi prerna ...
ReplyDeleteमस्त रे संदिप 👍🚩🚩
ReplyDeleteDada mala pan aaplya mohime madhe sahabhagi hoyache ahe... kay karawe lagel tya sathi?
ReplyDeleteMaza mobile number ahe - 8626036379