(click her for previous part)मुल्हेरची गाठभेट झाली आणि भरल्या अंतःकरणाने आम्ही हरगडाचा निरोप घेत मुल्हेरगावात शिरलो. चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. पण काय करणार ? नाहीतर पुढे जाऊन आम्हीच चुकलो असतो. पुढल्या वेळी म्हणत गावातल्याच दुकानातुन पुढल्या मुक्कामाचा शिधा वगैरे भरून घेतला. बाहेरचं काही खायचं नाही हा कटाक्षच होता. आजचा मुक्काम होता साल्हेरीस. हरगडाला भेट नं दिल्याची खंत मनात ठेवुनच आम्ही वाघांबेच्या जीपड्यात बसलो. जीपड्यात जागा दिसेल तिथे ड्रायवर माणसांना(?) कोंबता झाला होता. आम्ही दोघे मात्र मानाच्या सीटवरून(ड्रायवर शेजारील) आजुबाजुला असलेल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेऊ शकत होतो. जीपडं चालु झालं. समोर हरगडाची डोंगररांग कापुन काढलेली बारी दिसत होती. या भागात खिंडीला बारी असे म्हणतात. बहुदा हरणबारी ! हो हरणबारीच.
थोडं पुढे सरकतोन सरकतो तोच ड्रायवरने बागलाणी राम राम स्वीकारून जीपड्याचा भार वाढवला. आता मात्रं मुंगीलाही उभं राहायला जागा नसती सापडली,म्हणजे म्हणण्याचा उद्देश ! मुंगीवरून आठवलं, पुण्यातली गोष्टं. टमटम कितीही भरुन करंजी झाली असली तरीही,एखाद्या हत्तीणीने हात दाखवला की ,जागा झालीच म्हणुन समजा. आणि अशा वेळी सामान्य माणसाच्या डोक्यात आलेला एकच प्रश्न, "आयला ,एवढी जागा होती कुठे रिक्षात ? " असो ! हरणबारी धरण मागे टाकत आमचा वाघांबेकडचा प्रवास सुरु होता. मागुन म्हातारे-कोतारे, बाया-बापड्यांच्या गप्पा रंगात आलेल्या. आम्ही मात्र आजूबाजूला असलेल्या डोंगरांचे आकार-उकार ओळखण्यात गुंग झालेलो.
हरगडाने शेवटचा निरोप दिला आणि त्याच रांगेत दूरवर आभाळात घुसलेली चार सुळके वजा शिखरांनी लक्षं वेधुन घेतलं. हे सुळके आसमंताला एवढे भिडले होते की,एखादा नवखा ट्रेकर या रस्त्यांनी आलाच तर त्याला नाशकातल्या या खड्या चढणीची धास्ती वाटली नाही तर शप्पथ! आम्ही पण तोंडात बोटे घातली आणि कुतूहलाने बाजूलाच बसलेल्या काकाला विचारायला सुरुवात केली,तेव्हा "ते पाच पांडव होत " असे कळले. पण सुळके तर चार आहेत ,मग ते सांगु लागले(अस्सल बागलाणी मध्ये),"ते जे डाव्या बाजूला पठार आहे नी ,तो भीम छे " ते तेवढं एक महाकाय पठार होतं,त्याच्याच पायथ्याशी भिमखेत होतं. तेव्हा मला गावाच्या नावाची उपरती झाली ! अस्सं होय ते ? तितक्यातच मागुन अजुन एका म्हाताऱ्या बाबाचा आवाज आला,"नकु....मकू....दाजी....धरम...." हे बाकीचे चार महारथी ! ऐकुन मोठी गम्मत वाटली. एव्हाना आम्ही भिमखेतला पोहोचलो होतो. भार कमी झाल्यामुळे का कोण जाणे,जीपड्यानी एक लांब सुस्कारा सोडला. येथुन वाघांबे अजुन चार किमी. गाडीतले जरा मोकळे झाल्यावर गाववाल्यांनी आमची विचारपुस करायला सुरुवात केली. त्यांना सविस्तर सांगितल्यावर "दोघंच???",सगळे आश्चर्याने आम्हा दोघांकडे पाहायला लागलेत. आम्ही साल्हेर विषयी विचारलं. एकाने सांगायला सुरुवात केली,"साल्हेर-सालुता एकदम जवळी हाय. सालुता नी साल्हेरची छोटी बहेन छे. एकाच बारीतून वाट जाते." खूपच मज्जा वाटत होती हो ! हे ऐकताना. आणि पाऊस ? "पाऊस!!!!,चार महिने टोक दिसत नाही " ,इति गावकरी. "आयला,कोण म्हटलं होतं ? बागलाणात पाऊस नसतो ते ." इथे तर वरूणराजा अक्षरशः झोडपुन काढत होता.
वाघांबे. बरेच दिवसापासुन पुस्तकातुन,इंटरनेटवरून गावाचा संदर्भ शोधत होतो. तेल्या घाटाचं माथ्यावरील गाव. येथुन घाट उतरलो की आपण चिंचली या गावी गुजरात मध्ये पोहोचतो. आज आपण महाराष्ट्रातला किंबहुना देशातला सर्वोच्च किल्ला गाठणार या कल्पनेनेच सुखावलो होतो. पण मनात थोडी धाकधुक होतीच. निसर्गाने अक्षरशः येथे तांडव मांडलेला होता. वरूण राजाने तर बाणांची सरबत्ती लावली होती. चांगले झोडपल्या गेलो. काय रे वाश्या, काय करायचं ? "काय करायचं म्हणजे हादडायाचं आणि निघायचं", इति वाश्या. मेथीचे चार-दोन पराठे फस्त केले. हुंदळणाऱ्या पोरासोरांना वाट विचारुन निघालो भातखाचराच्या दांडावरून.
या हिरव्या-पिवळ्या खाचरातून चालण्याची बाकी मज्जाच वेगळी! डोंगर दऱ्यातून वाहत येणारं पाणी,तेच निघतं पुढच्या प्रवासाला. ओळीने पायऱ्या पायऱ्या बनवलेल्या खाचरातून निथळून पुढे. असं करीत पांडबाच्या, मग म्हाद्याच्या वाफेतुन धरणीमायच्या कुशीत! "गडाची वाट हीच ना ?" दूरवर एका खाचरात बाबासोबत एक कुटुंब राबत होतं. तिकडून "हो" आली आणि निघालो. एकंदरीत वातावरणामुळे घड्याळाचे ठोके कळत नव्हते,पण सुमारे दोन-सव्वादोनला निघालेलो आम्ही अर्ध्या पाऊण तासात एका भल्या मोठ्या पठारावर येऊन पोहोचलो. वाघांबे शांत विसावलं होतं. अधुन-मधुन मघाचे नकु-मकु,इत्यादी आपली डोकी धुक्यातुन आत-बाहेर करत होते. पठार संपुन चढण आता धाप लागणारी होती. तेवढं चढुन अजुन एक विस्तीर्ण पठार. पठारावरच आजुबाजुला गुरं सोडुन बसलेली गावगप्पा मारत बसलेली गावातली पोरं. सुंसुं करत भिडणारा वारा चांगलाच लागत होता. जवळजवळ ऐंशीच्या कोनाचा चढ चढुन परत एका निमुळत्या पठारावर आलो तोच साल्हेर-सालोट्याच्या खिंडीने दर्शन दिले. फक्तं खिंडीने! बाकी दोन्ही टोकं धुक्यात घुसलेले. धुकयांचे लोट जणु महापूर आल्यासारखे दिसत होते. येथूनच उजवीकडची आडवी धोपट वाट धरून चालायला लागलो.
धुकं थोडं विरळ होताच साल्हेरच्या अभेद्यपणाची जाणीव झाली. थोड्याच वेळात खिंडीत येऊन पोहोचलो. विसावलो. डाव्या बाजूला सालोट्याची अखंड आणि सरळसोट पाषाणमूर्ती आकाशाशी स्पर्धा करत धुक्यात हरवली होती आणि उजव्या बाजूला आमचं आजचं लक्ष्य आम्हाला साद घालत होतं. बसल्या बसल्या वाटेचा अंदाज लावत होतो. थोडासा पोटोबा उरकुन घेतला. डोंगरउतारावर एक गुराखी आपल्या गुरांना सांभाळत होता. आणि खिंडीजवळ थोडंसं अंतरावर त्याचा सोबती घोंगड्यात बसुन पावसाचा मारा पचवीत होता. दोन चार आवाज दिले,उपयोग झाला नाही. जवळ गेलो तर "आईशप्पथ,एक छान सुंदर मुलगी माझ्या पुढ्यात उभी आणि चेहऱ्यावरील गोड,हसऱ्या हावभावाने माझ्याशी बोलत होती. निखळ हास्य तिच्या चेहऱ्यावरून ओसंडुन वाहत होतं. मी आपलं नेहमीप्रमाणं रस्ता विचारायला सुरुवात केली. गडावर जायला वाट ? ही अशी इकडुन वर,ती. पाण्याचे टाके,वगैरे ? आहे जवळच. मुखातुन मोजके शब्द बाहेर टाकत तिचा हसरा चेहरा बोलत होता. तेवढ्यात खालुन आवाज आला. तोच मघाचा गुराखी,बहुदा तिचे वडील असावेत. त्यांच्याकडून पुन्हा एकदा वाटनिश्चिती करून आम्ही गड चढायला सुरुवात केली. पोर फारच गोड हसत होतं की,रे ! ,इति वश्या.
गप्पा ऐन रंगात आल्या असताना पुढे एका धोकादायक ट्रावर्सने आमची वाट अडवली. वाढलेल्या झुडुपाला धरून पार केला आणिचांगल्या कमरे एवढ्या वाढलेल्या झाडीतुन वाट काढीत दगडी पायऱ्यांजवळ येऊन पोहोचलो. समोर धुक्याशिवाय डोळ्यांना काहीच दिसत नव्हतं. नाहीतर सालोत्याचं मनमोहक दर्शन येथुन झालं असतं. घुडगेरावांची वाट लावणाऱ्या पायऱ्या चढुन आम्ही कोरलेल्या कातळाजवळ पोहोचलो आणि समोर पहिल्या दरवाजाचं दर्शन झालं. मंडळी खुष ! पुढे अजुन दोन दरवाजे ओलांडुन गेल्यावर उजव्या बाजुला गुहेची भली मोठी रांग आमच्या दिमतीला हजर! आणि डाव्या बाजूला खोल दरी. सिंहगडावर कसं,"या,गरम गरम भाकरी तयार आहेती",म्हणून बायका-माणसं ओरडत असतात. तसंच इथल्या गुहा आम्हाला खुणावत होत्या. कुठे पाण्याचे नितळ टाके,तर कुठे मुक्कामाला सपाट जागा. इथला राखीव प्लान ठरवून आम्ही पुढे निघालो. कारण पुढे गंगा सागर तलावाजवळ चांगल्या प्रशस्त गुहा आहेत,असं वाचण्यात आलं होतं. चौथा दरवाजा पार करुन पठारावर पोहोचलो. धुक्यात दिसत तर काहीच नव्हतं पण जवळ असलेल्या नकाशाच्या साह्याने आम्ही कसे तरी गंगासागर तलावाजवळ पोहोचलो. मात्र गुहेपर्यंतचा रस्ता येथुन नक्की होत नव्हता.वाढलेल्या गवतामुळे वाटा बंद झालेल्या. थोड्याच वेळात आपले दिवाकरराव देखील ड्युटी संपवून निघणार होते, त्याच्या सोबतच निघालो आणि राखीव प्लान अमलात आणायचं ठरवुन परत गुहेत येऊन पाठ रिकाम्या केल्या.
गुहा तपासुन झाल्या. बोरिया बिस्तर उघडल्या गेला. अंधार पडायच्या आत टेंट, सामान वेळेवर दिसेल त्या जागी,वगैरे वगैरे अगदी नवीन घरात राहायला आल्यासारखं मांडुन ठेवलं. आमचा हा उद्योग चालु असतानाच एका माणसाचे लक्षं आमच्याकडे गेलं,एव्हाना आमच्या इटुकल्या स्टोव्हवर मुंगडाळ खिचडी शिजायला सुरुवात झालेली. नमस्कार-चमत्कार झाला. ओ,दादाहो ! इथं का थांबलात ? वर मोठ्या गुहा आहेत.तिथं जाऊन ऱ्हा. नाही,इथेच बरं आहे,आम्ही. घोंगडं बाजूला ठेऊन गुहेत येऊन बसला आणि पुढचा तासभर गप्पांत एवढा रंगुन गेला की खुप दिवसांनी आपला एखादा जीवाभावाचा मैतर भेटावा ! पायथ्याच्या माळदर गावाजवळच्या शिंदेवाडीतला साधारण तिशीतला तरुण ! स्वभावाने बोलका आणि कामाने अतिउत्साही वाटत होता. बोलता बोलता मध्येच म्हणायचा ,"काय दादाहो ?, चला गुहा जवळी हाय ,जाऊन येऊ !" नको रे उद्या जायचंच आहे. त्रिमक(त्र्यंबक शिंदे) दादाची नागलीची(नाचणी) शेती आहे वाडीजवळ. त्याला औषधी झाडपाल्याची सुद्धा जाण आहे. तसं त्याने प्रात्यक्षिक पण करून दाखवलं वाश्याच्या दंडावर आलेल्या गाठीवर झाडपाला चोळून ! तासा-दिडतासात जाईल म्हटला गाठ. बोलता-बोलता आम्हाला त्याच्या घरचं उद्याचं नागपंचमीच्या जेवणाचं आमंत्रण सुद्धा आलं पण आमच्या तोंडातुन हावरट जिभेचा नाचणीच्या भाकरीचा लोभ आम्हाला लपवता आला नाही. आणि आम्ही नको नको म्हणत त्र्यंबकने "उद्या सकाळची न्याहारी-नाचणीची भाकरी" असं आश्वासन देऊन आमचा निरोप घेतला. काय साधी भोळी लोकं असतात नाही ? पैशाची हाव नसलेली ही माणसं आदरातिथ्यात कधीच कमी पडत नाही. पैशाची नव्हे तर सोन्याहुन पिवळी अशी मनाची श्रीमंती ! फक्त ते आदरातिथ्य कळायला पाहुण्याकडे मनाचा मोठेपणा हवा,नाहीतर काँक्रीटच्या जंगलात दुसऱ्यांचे उणे काढण्यातच आपली धन्यता मानणारे भरपूर भेटतात. नाही का ?
" इथल्या मातीला जेवढा पुराणाचा गंध आहे तेवढाच भव्य इतिहास बागलाणातल्या या सर्वोच्च मानबिंदुला आहे. " संदीप खूप मस्त सुंदर वर्णन केले आहेस बागलाणाचे...!!! या एका लाईन ने संपूर्ण बागलाण प्रांताची सैर घडवून आणलीस...!!! :) :)
ReplyDeleteधन्यवाद ! Anurag :)
Deletemast re sun-deep :)
ReplyDelete