स्वर्गीय राजमार्ग - जुन्नर दरवाजा !

हरीश्चंद्रगड ! टोलार खिंडीतून गडाच्या नैसर्गिक अन् अभेद्य अशा सात - आठ डोंगरी भिंतीतला एक भला मोठा डोंगर चढून उतरलो की, डाव्या बाजूला माथ्यावर औरस - चौरस असा बालेकिल्ला नेहमीच खुणावत असतो. "हा बालेकिल्ला" असं जुजबी स्थलनिर्देश हरिश्चंद्रगडाच्या या वाट्याला आलेलं आहे. कित्येक वेळा गडाची ही वाट जवळ केली पण "हा बालेकिल्ला" ह्याच्या पलीकडे कधी जाणं झालं नाही. त्याची तटबंदी नेहमीच साद घालायची. कधीतरी त्यावरील भगवा डौलात फडफडायचा,म्हणायचा "इकडे पण वळु देत,तुमची पावलं ! कधीतरी". पुढच्या वेळेस आलो की बालेकिल्ला बघून येऊच,स्फुरण चढायचं पण तो योग जुळून यायला तब्बल चार वर्षे वाट पहावी लागली. आणि चांगल्या गोष्टींसाठी वाट पाहिलेली बरीच,नाही का ? असो,तर प्रवास सुरू होतो आमच्या खुप दिवसांपासूनच्या रखडलेल्या मोहीम जुन्नर दरवाज्याचा. अनायासे बालेकिल्ला पण खिशात पडणार या विचाराने सकाळी सकाळी शिवाजीनगरला राजुरच्या बस मध्ये पार्श्वभाग टेकवला,तेव्हा हाडांना झोंबणारी पौषाची थंडी मी म्हणत होती. "सॅन्डया,गारठला काय ?",असे म्हणत नाशिक फाट्यावर प्रसाद अन् योगिने आणि आळे फाट्यावर ईश्वर काकांनी गाडीत एंट्री मारली तेव्हा खऱ्या अर्थाने "येस्टी"चा प्रवास सुरू झाला. गाडीत बसल्या बसल्या खिरेश्वरच्या वाटेवरून पाचनईला घसरलो. सर्वात सोप्या वाटेने चढुन, सर्वात दुर्गम अशा जुन्नर दरवाज्याने उतरायचं ठरलं. अजून एक म्हणजे,सोपी - सोपी म्हणत राहिलेली पाचनईची वाटही उलगडणार म्हटल्यावर सोनेपे सुहागा !

राजूरात पाचनईला जाणाऱ्या वाहनांची मारामार,पण एक जण एका "हरियाली"त तयार झाला आणि एकदाचं आम्ही गडाच्या पायथ्याशी धडकलो तेव्हा दुपारचे तीन झालेले. उन्ह असली तरी गारवाही कमी नव्हता. घरून आणलेल्या शिदोरीवर ताव मारून झाला आणि गडाकडे रवाना झालो. पाचनई हे डोंगराच्या कुशीतलं छोटसं गाव, कोंकणकड्यावरील आमचा मैतर,भास्कररावांचा गाव ! बऱ्यापैकी उंचीवर असल्याने इकडुन गडाची वाट कमालीची कमी झालीये, गावात वस्ती बादड/बदाद आणि भार्मल यांचीच जास्त ! गावाच्या दक्षिणेला हरिश्चंद्रगडाचा डोंगर तर उत्तरेला पाबरगड- घनचक्कर ची चक्कर आणणारी अफाट डोंगररांग. पल्याड भैरोबा खुणावत असतो अन् पुढ्यात दिसतो तो कलाडगड,आपल्या समोरील छोट्या सुळक्यासोबत निवांत गप्पा हाणत बसलेला.एव्हाना वाकडी सुळक्याच्या पलीकडे कात्राबाईच्या खिंडीनेही दर्शन दिलेलं असतं. आस्ते कदम करीत निघालोय. छोटं टेकाड चढुन लहानस्या सपाटीवर पोहोचतो,उजव्या बाजुला मंगळगंगेची दरी अन् डाव्या बाजुला एखादा अलगद आणुन ठेवल्यासारखा एक भलामोठा कातळ, त्यामधील मोठ- मोठ्या कपारी विसाव्यास उत्तम. हाताशी असता वेळ तर दिली असती ताणुन !  येथूनच पहिल्यांदा कलाडमागे लपलेल्या आजोबांनी दर्शन दिलं आणि कृत्याकृत्य झालो. तिथेच गारगार लिंबूपाणी गट्टम करून चालते झालो तोच मंगळगंगेचा (मळगंगा) पाट आडवा आला. आता कोरडा पडलेला पाट,पावसात तुडुंब भरून वाहत असेल यात वादच नाही. पण प्रवाहामुळं आकाराला आलेल्या कातळ-तळ्याजवळ निवांत क्लिक्क्लिकाट झाला. पलीकडील दरीत चांगला दहा - एक फूटाचा फॉल, पावसातल्या फोटोग्राफिसाठी मस्त वाव होता. परत एकदा श्रावणातल्या सरीत ही वाट जवळ करायलाच पाहिजे. डोक्यात येऊन गेलेला उगाच आपला एक पावसाळी प्लॅन ! अजुन एक टेकाड चढुन माथ्यावर पोहोचलो तेव्हा दिवाकरराव आपला दिवसभराचा कार्यभाग आटोपतं घेत होते. हरिश्चंद्रेश्वरावरील भगवा,नारायणाची कलती उन्हे पिऊन जोमात फडफडत होता. डाव्या बाजुला बालेकिल्ला खुणावुन गेला.

पाचनई च्या वाटेवरून कलाडगड,रतनगड ,खुटा आणि घनचक्कर डोंगररांग



मळगंगेचा पाट
माथ्यावर पोहोचलो आणि अपेक्षित चित्रं डोळ्यासमोर आलं. अर्थातच सुट्टीचा दिवस असल्याने गडावर धुमाळ गर्दी साचली होती. मंदिराच्या आवारात पाठपिशव्या उतरवल्या तेव्हा माणसांचा कलकलाट चाललेला होता. कुणी टेंट पीच करत, कुणी सरपण गोळा करण्यात गुंग होते, बाटल्यामध्ये अमृत भरून आम्ही मात्र भास्करभेटीच्या ओढीने कोंकणकड्याकडे धाव घेतली. महत्वाचं म्हणजे कोंकणकड्यावर दोन भास्करांची गाठभेट होणार होती, एक म्हणजे तमाम हरिश्चंद्रगड ट्रेकर मंडळीचा जिवाभावाचा सखा अन् दुसरा अखिल दुनियेचा मित्र - दोघेही भास्कर ! एकाची अस्ताला जाण्याची वेळ येऊन ठेपली होती,तर दुसरा त्याच उर्जेने आलेल्या गेलेल्यान्ची विचारपूस करून त्यांची सोय करण्यात मग्न होता. कड्यावर पोहोचलो तेव्हा अक्षरशः जत्रा भरली होती,प्रत्येकाची प्रोफाइल पिक्चर ची धडपड. बाकी काय :) आणि खरं सांगायचं तर,इथे आल्यावर आपल्यालाही मोह आवरत नाही :). त्यातून वाट काढत कड्याच्या खालच्या कपारीजवळ निवांत जाऊन बसलो. परत एकदा सुरू झाल्या आपल्या  नेहमीच्याच गप्पा कोंकणकड्याशी ! सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकतोय,तसा किरणांच्या छ्टांत रंगबदल जाणवतोय, एक वेळ अशी येते की,लोकं कोंकणकड्यालाही विसरतात आणि अस्ताला जाणाऱ्या लाल ठिपक्याकडे टक्क बघत राहतात. मग थोड्याच वेळात तो मित्र उद्या परत येण्याचं वचन देऊन उभ्या जगाचा निरोप घेत गडप होतो,तेव्हा मात्र भरून येतं. सूर्यास्ताचा हा अनुपम सोहळा यथासांग पार पडल्यानंतर झापाजवळ पोहोचलो तर आवाज द्यायच्या आधीच भास्करची हाक ! भास्करा,राहायला मिळेल का रे निवांत जागा ? भास्कर लागलीच,आम्हाला घेऊन झाडीत. हे बघा,मस्त जागा आहे अन् मी पण झोपायला इकडेच येणारे. आणि काय नामी जागा शोधून काढली होती भास्करने,व्वा ! अन् विशेष म्हणजे सरपण बाजूलाच.
शेकोटी पेटली. टेंट पडला. भास्करकडून घेतलेल्या पातेल्यात सुप उकळायला सुरुवात झाली आणि कॅम्पसाइट रेडी ! आणि मस्तपैकी सुपचे घोट घेत,गडमाथ्यावर आम्हा भटक्यान्च्या अन्  वर आकाशी नभांगणात ताऱ्याच्या,निवांत गप्पा रंगल्या होत्या. बाजूलाच कुठलाशा ग्रुपचा गोंगाट चालूच होता. पण आमच्या "शिक्रेट" कॅम्पसाइटपर्यंत त्यांच्या आवाजाची धार जरा कमीच होती. मला हे कळत नाही,डोंगरात आल्यावर कशाला पाहिजे "लुंगी डॅन्स" ?? निवांत आलोय दोन दिवस, जरा शांतीला धरावं तर ! नाही ह्या लोकांना चिकन्या चमेलीसोबतच नाचायला भारी आवडतं. काय बोलायचं. गाणी ऐकायचीच तर आपलं ! जाऊदे यांना कुठे सुचवायची गाणी :) उगाच गाण्यांचा उपमर्द व्हायचा. भास्करच्या झापावर भाकरी अन् पापडासोबत वांग्या- बटाट्यावर आडवा हात मारत जेवणं आटोपली,बाहेर आलो तर थंडीने चांगलाच रंग दाखवायला सुरुवात केली होती. येथून शेकोटीपर्यंत पोहोचेस्तोवर अवसान नव्हतं. लगेच स्लिपिंग बॅग मध्ये घुसून काम ओके :) झालं. शेजारीच शेकोटीची ऊब आणि आकाशातील तारे मोजत केव्हा झोप लागली,कळलंच नाही.

टीम जुन्नर दरवाजा - (anti-clockwise) प्रसाद ,मी,ईश्वरकाका आणि योगिता
सकाळी जाग आली ती प्रसादच्या हाकेने,म्हणे "सॅन्डया लयी आळशी झाला " तसाच उठुन पोहोचलो कोंकणकड्यावर, आता जरा कमी होती गर्दी. उन्ह चांगलीच वर आलेली. पार सिंडोळ्यापासुन तळेरान,हडसर,नाणेघाटाची सह्यरांग अन् खाली कोंकणात मोरोशीच्या भैरवगडापर्यंतची डोंगरमंडळी आळसावलेल्या अंगाने धुक्याची दुलई बाजूला सारत जागे होतायेत. खालीही बेलपाड्यातली झापं जागी होतायेत अन् सकाळी सकाळी पेटलेल्या चुलीतल्या धूरकांड्या आकाश जवळ करतायेत. कोवळ्या उन्हात न्हावुन निघालेली नाफ्त्याची जोडी पण खटाखट नटलेली. सृष्टीचं हे असं निखळ निसर्गसौंदर्य पाहताना पापण्याही लवत नाही,त्यात कोंकणकडा म्हटल्यावर सुट्टीच नाय. इथे येऊन धडकायला फक्त कारणं शोधली जातात आणि कारण नसतानाही इथे येऊन बसायला,जगात कोंकणकड्यासारखी दूसरी जागा नाही. आम्हा तिघांच्या हरिश्चंद्राच्या कीतीतरी वाऱ्या झाल्या असल्या तरी योगिताची ही पहिलीच वेळ ! मग ती नळीची वाट,तो रोहिदास.ती माकड नाळ. पारायण पुन्हा एकदा झालं. बराच उशीर झाला होता. आमच्या झोपडीत जाऊन माझा काळा आणि बाकीच्यांचा दूध घालुन गवती चहा झाला, हा असा चहा झाला ना की खरं ट्रेकला आल्यासारखं वाटतं. मस्तच ! आवरुन भास्करचा निरोप घेतला,त्याच्याकडून एकदा जुन्नर दरवाज्याची वाटही निश्चित करून घेतली आणि कड्याचा निरोप घ्यायला परत एकदा पावले तिकडे वळलीच ! हरिश्चंद्राकडे वळलो. महादेवाचं दर्शन घेऊन जुन्नरी दरवाज्याकडे ट्रेकस्थ झालो. वरची वाट धरून टोलार खिंडीकडे चालायला सुरवात केली तेव्हा उन्ह बरीच वर आलेली. गारठा जाणवत असला तरी वाटेने घाम काढलाच नेहमीप्रमाणे ! टेकाड चढुन गेलो,पुढ्यात बालेकिल्ला !

हरिश्चंद्रेश्वर !



बालेकिल्ल्याच्या वाटेवरून तारामती शिखर

ईश्वरकाका आधीच भेट देऊन आल्यामुळे खालीच थांबले सॅक वगैरे त्यांच्या हवाली करून योगी,प्रसाद अन् मी भिडलो एकदाचं बालेकिल्ल्याला. तारामतीची सोंड उजव्या बाजुला ठेवत घसाऱ्यावर चढायला सुरवात केली. खालून वाट तर बरी दिसत होती,पण थोडं चढुन गेल्यावर दहा-एक फूटाच्या दगडाने आमची वाट अडवली. चढून तर गेलो असतो,उतरताना मात्र गाळण उडाली असती. माघारी वळून योगिता तिथेच थांबली आणि वरच्या फुफाट्यातून प्रसाद आणि खालून मी असे करत दूसरी वाट कुठे दिसतेय का ? याचा शोध सुरू झाला. वाट तर नाही सापडली पण झाडीतून कुठे ठेचकाळत,खरचटत थोडं वर चढलो तर पायऱ्या- पायऱ्याचा रस्ता गेलेला आढळला योगिताला हाक देऊन अजुन वर चढलो तर चक्क दगडात कोरलेल्या पायऱ्या ! डाव्या बाजुला नेहमीची  खुणावणारी तटबंदी अन् उजव्या बाजुला कोरडं पडलेलं टाकं. चला कुठे अजुन काही सापडतय का ? परत शोधाशोध. आणि क्या बात ! दगडात खोदलेलं पाण्याचं भलंमोठं टाकं,तेही त्यात स्वच्छ,थंडगार पाण्याचा भरपुर साठा.पोटात भरपेट रिचवुन उर्वरीत शोधमोहीम सुरू झाली. बालेकिल्ल्यावर अजुन दोन - तीन पाण्याच्या टाक्या आढळतात. एवढा पाण्याचा साठा, हे टेकाड बालेकिल्ला असल्याचे सिद्ध करु शकतो. येथून दिसणारा तारामती शिखराचा नजारा वासोट्याच्या नागेश्वराची आठवण देऊन गेला, रोहीदासही खुणावुन गेला. घाटमाथ्यावर सिंदोळा,तळेरान,जोग धरण अन् सह्यरांगेतला भैरवगड आपलं अस्तित्व जाणवुन गेला, माळशेज घाटातल्या गाड्यांचा खेळ पाहत परतीचीवाट धरली. हरिश्चंद्रगडाच्या आडव्या - तीडव्या पसरलेल्या पठाराचं खरं रूपडं आपल्याला इथुन चांगलंच अनुभवता येतं. एका बाजुला दाट झाडी तर दुसऱ्या बाजुला सताड उघडं पडलेलं पठार ! लांब - लांब पर्यंत गडाचा आवाका संपत नाही. पश्चिमेला कोंकण कड्यापासुन पूर्वेस वाघदरी - टोलार खिंडीपर्यंत पसरलेला गडमाथा ! खरच हरिश्चंद्रगड म्हणजे जातीवंत भटक्याच्या गळ्यातलं ताईतच ! कितीही वेळा आणि कधी ही आलो तरी मन भरत नाही. आणि आज तर बालेकिल्ला पण बघुन झाला, संतुष्ट मनाने उतरायला सुरुवात केली.झुडपातून वाट काढत सपाटीवर पोहोचलो तेव्हा सपाटुन भुका लागलेल्या.
बालेकिल्ल्यावरील पाण्याचे स्वछ टाके आणि मागे तारामती शिखर
झाडाच्या सावलीत निवांत पोटोबा झाला आणि मोहिमेतल्या सर्वात महत्वाच्या आव्हानास सज्ज झालो. निघालो तेव्हा उन्ह बरीच वर आली होती. बालेकिल्ल्याच्या पोटाला चिकटून निघालेली घसरडी वाट धरून, उजव्या बाजुला माळशेजच्या जीवघेण्या दरीची भीषणता अनुभवत निघालो. बालेकिल्ल्याला वळसा घालुन भास्करने सांगितल्याप्रमाणे उंबराच्या झाडाजवळ पोहोचलो. येथून 100 एक फूटांचा घसारा उतरून अजुन एका टाक्याजवळ. वाटेत पाण्याचं भलंमोठं टाकं,हेच मुळी या राजमार्गाच्या अस्तित्वाची पहिली खूण ! पाणी पिण्याच्या लायकीचे नसले तरी एकदा साफसफाई झाली की मस्त होईल. "एक नंबर सॅन्डया " ह्या प्रसादच्या मुखोद्गाराने दरवाज्याजवळ पोहोचल्याची खात्री पटली. आणि पहिल्या दर्शनातच नाणेघाटाची आठवण झाली. एका वेळी एकच माणुस जाईल,एवढ्याच आकाराच्या नाळेनी झालेली सुरुवात. बाजूलाच असलेल्या मोदकाच्या आकाराचा भला- मोठा दगड आणि सुरुवातीलाच कातळात खोदलेल्या पायऱ्यांनी जाम खुश करून सोडले. मनोमन आनंद झाला. आणि जसजसे खाली उतरायला सुरुवात केली,तसतसे हा राजमार्ग असल्याची खात्रीच पटत गेली.
हरिश्चंद्रगड बालेकिल्ला
तारामती शिखर आणि बालेकिल्ला ,जुन्नर दरवाज्याच्या वाटेवरून
ठरावीक अंतरावर खोदून काढलेल्या पायऱ्या, मध्येच एका ठिकाणी कोरलेली शिवलिंग,गणेश आणि कुठल्यातरी देवतेची भग्न पाषाणमुर्ती खुणावून गेली. गतकाळात प्रत्येक जण येथून माथा टेकवुन जात असेल,नाही. नळीच्या वाटेपेक्षा नेमकी उलटी असलेली दगडांची स्थिति आणि खोदलेल्या सुंदर पायऱ्या उतरताना मजा वाटत होती. एक- दीड तासांची उतराई संपल्यावर डावीकडच्या रानात शिरलो आणि वाटेला लागलो. वाटेतच वरच्या कपारीतून दिसणाऱ्या रोहिदास आणि तारामती शिखराचा नजारा जीव वेडावुन गेला. उजवीकडील माळशेज घाटाची दरी सोडुन आता डावीकडे वळलो तेव्हा पहिल्यांदा खिरेश्वराचे दर्शन झाले अन् अजुन जवळ आल्याची खात्री पटली,मात्र वाट गेली होती तिकडे लांब ! अजुन दोन छोटे डोंगर उतरायचे होते,सिंडोळयाने पुन्हा एकदा दर्शन दिले. आता नारायणही कलायला सुरुवात झाली होती. बाकी गडाचा हा मार्ग आवडला आपल्याला. हरिश्चंद्रगडास भटक्याचा स्वर्ग म्हणतात,त्यावरून गडावर जाणाऱ्या ह्या वाटेला "स्वर्गीय राजमार्ग " म्हणावयास हरकत नाही,नाही का ?

जुन्नर दरवाज्याच्या वाटेवर लागणारं एकमेव पाण्याचं टाक

जुन्नर दरवाज्याच्या पायऱ्या ,मागे रोहिदास आणि तारामती शिखर

नळी ,जुन्नर दरवाजा वाट


कपारीतून होणारे रोहिदास आणि तारामतीचे रम्य दर्शन
जुन्नर दरवाज्याचा तंगडतोड ट्रेक करून आल्यावर निवांत विसावा हा पिंपळगाव धरणाच्या पाणवठयाजवळ,ही कल्पनाच मोठी सूख देऊन गेली. तिथे पोहोचलो तेव्हा दिवसभराचा कार्यभाग आटोपून आमच्यासारखेच तहान भागवण्यासाठी पक्ष्यांनी गर्दी केलेली. नारायणरावही ड्यूटी संपवून निघण्याच्या तयारीत होते.अनायासे ईश्वरकाकांचा नवीन सूपर- zoom दिमतीला होताच. मग काय सूर्यास्ताची कलती सोनेरी किरणे आणि काकांचा कॅमेरा,बेत आला फक्कड जमून ! घेतली सात- आठ टिपून. तळ्याशेजारीच बसून सॅकमधलं खाण्याचं होतं नव्हतं राहिलेलं संपवून खूबी फाट्याकडे आमची पायगाडी चालती झाली तेव्हा मोरोशीचा भैरवगड दिवाकराच्या सोनेरी किरणात न्हाऊन निघत होता...घाटमाथ्यावर सांजवेळी पक्ष्यांचा किलबिलाट ...उजवीकडे सोनेरी रंगांची उधळण तर डावीकडे पाणवठयावर आपल्या इवल्याशा चोचिने पक्ष्यांची चाललेली पाणी पिण्याची कसरत....अधुन मधुन सुखावणारा गारवा...हवहवीसी संध्याकाळ अगदी चित्रातल्या सारखी…………. 


9 comments:

  1. Masta zalay blog Sandy! Keep it up! Photos ek number aalet!

    ReplyDelete
  2. Trek mastach hota tasach blog pan mast details madhe lihiles sandya

    ReplyDelete
    Replies
    1. हो प्रसाद, एकदा खेकडयांचा कार्यक्रम करायचाय गडावर :)

      Delete
    2. हो प्रसाद, एकदा खेकडयांचा कार्यक्रम करायचाय गडावर :)

      Delete
  3. मस्त मित्रा

    मला हे कळत नाही,डोंगरात आल्यावर कशाला पाहिजे "लुंगी डॅन्स" ?? निवांत आलोय दोन दिवस, जरा शांतीला धरावं तर ! नाही ह्या लोकांना चिकन्या चमेलीसोबतच नाचायला भारी आवडतं.

    सगळीकडे आजकाल हेच पहायला मिळते.... आणि यासोबत बेवडे मंडळी

    सगले सह्यप्रेमि मिळून यावर काहीतरी उपाय करायलाच पाहिजे....

    ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences