© Sandip Wadaskar and All photos © Sagar Manore
महाराष्ट्र हा दुर्गांचा देश. भारतात सर्वात जास्त किल्ले असणारे राज्य. गड-किल्ल्यांच्या संख्येइतकाच येथे दुर्गाप्रकारही भरपूर. गिरिशिखरे असो,वनदुर्ग,जलदुर्ग,भुईकोट असो, ऐतिहासिक वा पौराणिक महत्व असलेले किल्ले असो. अखंड आयुष्य जाईल हे गड-किल्ले हिंडण्यात. महाराष्ट्रात जसे विविध प्रकारचे दुर्ग पाहायला मिळतात, तशीच किल्ल्यांची नामकरणाची परंपरा सुद्धा आहे इथे. जोडगोळी. म्हणजेच किल्ले आवळे-जावळे. अगदी जुळ्या भावंडासारखी. नावं पण गमतीदार,यमक साधणारी. सातारचा चंदन-वंदन असो,मनमाड जवळचा मांगी-तुंगी असो ! किंवा अंकाई-तंकाई असो. गड-किल्ल्यांचे नंदनवन असलेल्या नाशिक जिल्ह्यातला रवळ्या-जवळया असो. ही नावं ऐकायलाच किती गमतीदार वाटतं, नाही ? अशीच एक किल्ल्यांची जोडी देशाच्या पश्चिम-दक्षिण व्यापारावर लक्ष ठेऊन गेली कित्येक वर्षे आपलं कर्तव्य बजावत उभी आहे. खरं तर हे बालेकिल्ले आहेत,देशावर राजमाची येथे. अर्थात लोणावळ्या जवळील श्रीवर्धन-मनरंजन ही जोडी.
© Sandip Wadaskar
असाच यावर्षीचा पावसात भिजण्याचा बेत किल्ले मल्हार गडावर पूर्ण होऊ न शकल्याने पुढच्याच आठवड्यात राजमाचीला जायचा बेत आखल्या गेला. जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे आम्हा भटक्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. जबरदस्त पाऊस पडतोय राव ! कॉम्पुटर समोर बसवत नाही आता. निघा की ? कधी निघायचं ? अशी कुरकुर जवळ जवळ प्रत्येकाची चाललेली. आता मात्र खरंच ऑफिस मध्ये बसवत नव्हतं. शेवटी शनिवार उजाडला. सगळी भटकी जमात अर्थात इंद्रा,अतुल ,शेखर,सागर, सचिन,प्रसन्ना आणि मी शिवाजीनगरला लोकलची वाट पाहत उभी राहिली. आमच्यातलं एक कच्चं लिंबू म्हणजे आमचा अजित,चिंचवड वरून बसणार होता. गप्पा-टप्पाच्या ओघात कर्जत गाठलं. रात्रीचे साढे नऊ-दहा झाले असतील. एवढ्या उशिरा कोंदिवडे ला जायला वाहन मिळणे तर अशक्य होतं. पोरं सगळी उत्साहात,चल इथुनच ट्रेकला सुरुवात करूया. या कार्ट्याना म्हणायला काय जातंय ? इथूनच ट्रेक सुरु करायचा म्हटल्यावर, राजमाची च्या पायथ्याशीच संपला असता. कर्जत ते कोंदिवडे हे नंतर सुमारे १२ किमी आणि कापायला कमीत कमी साडेतीन तास लागणार होते. पण दुसरा पर्याय नव्हता.चालायला सुरुवात केली,रस्त्यांनी एखादी गाडी मिळाली तर चांगलेच आहे. वाट निश्चिती म्हणुन घराबाहेर बसलेल्या इसमाला रस्ता विचारला तर "हमको नाही $$$$ मालूम !" इति इसम. आयला ! कोंकणात भैय्या ! घराचे दार लावुन आत बसला तो बाहेर आलाच नाही ? च्यामारी ! हा काय प्रकार आहे ? तेवढ्यात बाजूलाच घराच्या अंगणात दोन भावंड खेळताना दिसली,त्यांच्या कुत्र्यासोबत ! त्यांनी आम्हाला वाट सांगितली. "कुत्र्याचं नाव काय ?" इति अतुल. पोराची हुक्की,दुसरं काय ? "स्यांडी",इति मुलगा. उत्तर ऐकुन पोरांचा हास्यस्फोट आणि माझा डोक्यावर हात ! आयला जगातली सगळी कुत्र्याची नावं काय संपली होती काय ? "स्यांडी" हे काय कुत्र्याचं नाव आहे का? आता हा प्रसंग पूर्ण ट्रेकभर मला चिडवण्यासाठी पोरांना पुरून उरणार होता. असो. आम्ही कोंदिवडे कडे चालायला सुरुवात केली. खरं सांगायचं तर बारा किमी चालण्याची अभिनव कल्पना मला पटलेलीच नव्हती. पण काय करणार ? पर्याय नव्हता. थोडं चालत गेल्यावर एका व्हन वाल्यानी गाडी थांबवली आणि थोडीफार घासाघीसी करीत ठरलेल्या पैशात कोंदिवडेला सोडण्यास तयार झाला.
© Sandip Wadaskar
कोंदिवडेला पोहोचलो तेव्हा रात्रीचे साडे अकरा झाले असावेत. आमचा ट्रेक सुरु झाला. ठाकरवाडीकडे चालायला सुरुवात केली. जून महिन्यातला पाऊस आणि वेळेवर हजेरी दिल्यामुळे आकाशात ढगांची आणि वातावरणात धुक्याची दाटी झालेली. पावसाची चिन्हं दिसायला लागली तोच पिशव्यांना रेनकव्हर वगैरे घालुन पायपीट सुरू केली. कोंडाणा लेणीच्या वाटेवर एका लिम्बू सरबत वाल्याच्या झोपडीत बसुन थोडी थोडी भेळ पोटात ढकलली आणि चालु लागलो. बैलगाडी रस्त्याला लागताच असंख्य काजव्यांनी आमचे स्वागत केले. अक्षरशः दीपमाळ लावल्यासारखे झाडनझाड काजव्यांनी उजाळून टाकले होते. उजव्या बाजूला उल्हास नदी आमच्या विरुद्ध दिशेने वाहत होती. नुकताच पावसाने सुरुवात केल्यामुळे नदीला पाणी खुप कमी होते. ठाकरांच्या वाडीत प्रवेश केल्या केल्याच एक-दोन कुत्री भुंकायला लागली. आणि तेवढ्यावरच न थांबता बाकीच्या कुत्रे मंडळीला साद घालत अख्खं गाव जागं केलं. आता पंचाईतच होती,कुत्र्यांनी अक्षरशः गाव डोक्यावर घेतलं होतं. काय करावं या कुत्र्यांच्या भुंकण्याला ? सुदैवाने एका म्हाताऱ्याने झोपडीबाहेर येऊन आम्हाला योग्य वाटेस लावले आणि चढायला सुरुवात केली. आणि .. हो ! बरं का ? ही वाट नव्हे … ही घाटवाटच!
© Sandip Wadaskar
कोंकण दरवाजा ! देशावरून कोंकणातला दळणवळणाचा अजून एक पुरातन मार्ग. देशावरचं गाव उधेवाडी (राजमाची) आणि कोंकण पायथ्याचं कोंदिवडे(ठाकरवाडी). गावातले लोक सगळे कष्टकरी ठाकर. उंची कमी असताना सुद्धा समुद्रसपाटीपासून चढताना होणारी दमछाक इथे अनुभवायला मिळते. थोडे चढून वर गेलो की मोकळ्या जागेतुन दोन वाटा दिसतात. उजवीकडची वाट ही कोंडणे लेणीवरून आलेली असते आणि दुसरी आम्ही ज्या मार्गानी आलो तशीच राजमाचीकडे जाते. अडीच हजार वर्षापूर्वीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करणारी ही लेणी सुद्धा बेडसे,ठाणाळे या इतर लेण्यांसारखीच भव्यदिव्य! आणि नेहमीप्रमाणे एवढ्या दुर्गम भागात अशा दिव्य लेण्या घडवल्या कशा असतील ? याचा विचार करता करता आपोआपच तोंडात बोटे जातात.जसजसे वर चढत होतो,तसतसा बोर घाटातुन जाणारा रेल्वे रूळ खाली जात होता. मध्येच एखादी गाडी आली की डब्यांचा लपाछपीचा खेळ चालायचा. मग बोग्द्यांमधून लपत छपत गाडी आपली कोंकणात शिरायची.
आगगाडी आणि बोगद्यांचा लपंडाव यांचा आनंद घेत दाट झाडीतुन वाट काढीत आम्ही मोकळ्या जागी पोहोचलो. दिवसा येथुन उल्हास दरीचे (Tiger vally ) विहंगम दृश्य दिसते. येथूनच उल्हास नदी उगम पावते. पण आता रात्र असल्यामुळे आणि वाऱ्यामुळे सळसळत्या झाडांच्या पानांचा आवाज ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता.निसर्गाचा संगीत कार्यक्रम चालु असताना क्षणार्धात पावसाच्या जोरदार सरींनी त्या संगीतात सूर भरल्यासारखं वातावरण साग्रसंगीत करून सोडलं. आसमंत दणाणून सोडला आणि मघापासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आम्हा भटक्यांना नखशिखांत भिजवून टाकले. किल्ले मल्हारगडावरची पहिला पाऊस अनुभवण्याची इच्छा येथे पूर्ण झाल्यासारखी वाटत होती. पाऊस बराच वेळ असाच कोसळत होता. खेकडे पायाखाली येऊन चिरडल्या जात होते. बहुतेक खेकड्यांचा खुनाचा आळ तर शेखरयावरच आला असता,कारण शेखर पुढे गेला की मागच्यांना खेकड्याची डेड बॉडीच दिसायची. आणि अजित तर नेहमीप्रमाणे प्रिंट काढत होता,मध्येच कुठेतरी डिलीट व्हायचा ! अक्षरशः घसरायला लागला की स्वतःला तसाच पडू द्यायचा आणि त्याला पकडायला आम्ही ! थोडासा चढ आला की रिवर्स गियर टाकल्यासारखा मागे यायचा, च्या मारी ! आणि बरं का ? या ट्रेक मध्ये त्याच्या सुप्रसिद्ध पोज मुळे अजितला नवीन पदवी मिळाली. "Dk." आता याचा अर्थ तुम्हाला नाही सांगता येणार,माफ करा ते अजित आणि आमच्यामधलं गुपित आहे. पावसात भिजत भिजत आम्ही माथ्याचे अंतर कमी करत होतो. परत वाट झाडीत शिरली,येथुन एक दीड तासात खिंड गाठली आणि माथ्यावर पोहोचलो. पहाटेचे अडीच पावणेतीन झाले असावेत. बाजूलाच असलेल्या ताकवाल्याच्या झोपडीत पथाऱ्या पसरल्या. दाट धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते,टेंट टाकले आणि झोपी गेलो.
© Sandip Wadaskar
सकाळी जाग आली तेव्हा समोर फक्त धुक्याचं साम्राज्य पसरलं होता. धुक्याचे लोट येत होते,जात होते. दहा फुटावरच काही दिसेना. माथ्यावर झाडांची दाटीवाटी झाली होती. रात्रीच्या चिंब पावसानी आधीच गारठ्लेलो, त्यामुळे कालचे भिजलेले कपडे घालताना चांगलंच जीवावर आलं होतं. उधेवाडीकडे चालायला सुरुवात केली. पावसाने दमदार हजेरी लावत थोडेफार वाळलेले कपडे परत भिजवले. पोटात एव्हाना कावळे ओरडायला सुरुवात झालेली. वाटेत लागणाऱ्या करवंदाच्या झाडांनी खुष केले. करवंदे खात खातच उधेवाडी गाठलं. बाहेर जोरदार पाऊस आणि आत दादाच्या ओसरीत गरमागरम पोह्यांवर ताव मारत आधी मनरंजन ला जायचं ठरवलं. वीस मिनिटात बालेकिल्ल्याचा माथा गाठला. वातावरण जर स्पष्ट असेल म्हणजे धुकं नसेल तर माचीवरूनच बालेकिल्ल्याची भव्य तटबंदी लक्ष वेधुन घेते. बुरुज खुणावत असतो. अगदी बुरुजाजवळ जाईपर्यंत प्रवेशद्वार कुठल्या बाजुला आहे, कळत नाही. आपल्याला वाटत राहते वाट डावीकडे आहे पण उजव्या बाजूच्या चिंचोळी वाटेने आपण बालेकिल्ल्यात प्रवेशतो. महाराजांच्या स्थापत्यशास्त्राचे वैशिष्ट्य असलेल्या गोमुखी रचनेची पूर्ण कल्पना, झालेल्या पडझडीमुळे येत नाही. पण दरवाज्याची भक्कमता जाणवल्याशिवाय राहत नाही. थोडं पुढे गेल्यावर कातळात खोदलेली पावसाळी जुळे टाके पाहायला मिळतात. दगडात कोरलेल्या पाच-सहा पायऱ्या चढुन आपण आतल्या आणि सर्वात वरच्या तटबंदीत शिरतो आणि समोर दिसतं ते छप्पर उडालेलं पण भिंती शाबूत असलेलं भव्य दगडी बांधकाम! प्रवेशद्वारावर गणेशाची सुबक मूर्ती कोरलेली आढळते. दोन्ही बाजुला कोपऱ्यात सुर्य आणि चंद्राचं नक्षीकाम केलेलं आहे आणि त्याच्याच खाली देवड्या आहेत. आत गेल्यावर विचार पडतो,"हे नक्की काय असेल ?" गडमाथ्याचा घेर पाहता "राहण्याची वा वस्तीची जागा नसुन प्रमुख टेहेळणीकराची सदरेची जागा असावी." कारण किल्ल्याची निर्मितीच मुख्यत्वे बोरघाटावर लक्ष ठेवण्यासाठी केली होती. हे सगळं पाहुन मन इतिहासात रमल्याशिवाय राहत नाही. असो ! तेवढ्यात अजित गाफील असलेला पाहुन सगळ्यांनी एकमेकांना इशारा केला आणि त्याला उचलुन टाकला पाण्याच्या डबक्यात . कितीतरी वेळ एकमेकांवर पाणी उडवत चाबूक-डुबुक करत होतो. लोकं स्वच्छ पाण्याने फ्रेश होतात आम्ही गढूळ पाण्याने ताजेतवाने झालो. अंगात उत्साह संचारल्यासारखा आम्ही पुढे निघालो तोच कातळात खोदलेल्या अप्रतिम टाक्याने लक्ष वेधुन घेतले. चौकोनी आकाराचं टाकं बघुन लोहगडावारच्या टाक्याची आठवण झाली. शेवटच्या बुरुजापर्यंत फेरफटका मारून परतीची वाट धरली,धुक्यानी थोडी ढिलाई सोडत वातावरण स्पष्ट केले. आजूबाजूचं विहंगम दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं. पाऊस पाण्यानी भरत आलेली कोंकणातली,उधेवाडीतली भातखाचरं,श्रीवर्धन बालेकील्ल्याची तटबंदी,लोणावळ्यापर्यंतची भलीमोठी डोंगररांग! समोर कोंकणात माथेरान चा डोंगर,मागच्या बाजूला ढाकचा बहिरी आणि त्याच्या बाजूला असलेल्या सुळक्याने लक्ष वेधुन घेतले. अधुन मधुन ऊन,पाऊस आणि धुक्याचा मजेशीर खेळ चालायचा.
© Sandip Wadaskar
किल्ले राजमाची. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची साधारण साडेतीन हजार फुट. सातवाहन,राष्ट्रकुट अशा बऱ्याच राजवटी अनुभवलेल्या या किल्ल्याला महाराजांनी कल्याण मोहिमेनंतर स्वराज्यात दाखल करून घेतले. नंतर छत्रपति शाहु काळात हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. पेशव्यांकडून शेवटी नेहमीप्रमाणे साहेबाकडे ! उधेवाडीच्या दक्षिणेकडे चालत गेलो की राजपुरीच्या देशमुखाने बांधलेला ब्रिटिशकालीन तलाव आढळतो. बाजूला तसा शिलालेखही आहे. तलावाला पाणी वर्षातुन बाराही महिने! समोरच प्राचीन शिवालय आहे. मंदिराच्या समोरच असलेल्या छोट्या टाक्यात, दगडी गोमुखातून बारमाही पाणी वाहत असते. वाह ! बांधकामाची कमालच म्हणायची नाही ?
© Sandip Wadaskar
तांदळाची गरमागरम भाकरी आणि बटाट्याची रस्सेदार भाजी ! बेत जमला फक्कड. मग काय ? पोरं नुसते ..ओरबाड ! जेवणे आटोपुन श्रीवर्धन कडे चालायला लागलो. मनरंजन आणि श्रीवर्धन खिंडीत येऊन पोहोचलो. खिंडीत भैरोबाचे देउळ आणि पुढ्यात दीपमाळ आहे. देउळ आणि मोकळी जागा मुक्कामास योग्य आहे. आजूबाजूला असलेल्या हिरव्यागार झाडीत दगडाचे काळे-कुळकुळीत मंदिर उठून दिसत होतं. बालेकिल्ला चढायला सुरुवात केली. कुठे दगडांमधून,कुठे घसरड्यावरून वाट काढीत,एका खिंडार पडलेल्या तटबंदीतुन माथा गाठला. किल्ल्यावरची भक्कम तटबंदी गत इतिहासाची साक्ष पटवुन देतो. समोरच एकदम पुढ्यात ढाकचा बहिरी आणि त्या बाजूचाच भयंकर सुळका ," इकडची वाट अवघड आहे " असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. थोडं चढुन गेलो की लोखंडी खांब आहे,त्यावर भगवा मोठ्या अभिमानाने फडकत होता. दक्षिणेकडील बुरुजावरून सभोवतालचे विहंगम दृश्य आणि कातळदऱ्याचे जुळे धबधबे लक्ष वेधुन घेतात. एकंदरीत धुक्यामुळे नेत्रसुखाला मर्यादा होतीच. पण असो ! पाऊस वाऱ्याचा मार खात आम्ही थोडावेळ तिथेच शांत बसुन होतो. परतीच्या वाटेला लागलो. आता आव्हान होतं उधेवाडी ते लोणावळा हा सतरा किमीचा लांब पल्ला गाठायचं . चालणे ,चालणे आणि फक्त चालणे !
चालायला सुरुवात करतो न करतो तोच मुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावली. तेच आपलं नेहमीचं नं सुटलेलं कोडं ,"परतीच्या वाटेला पाऊस का कोसळतो ?" चालता चालताच मी आणि भाऊ (पप्पु दादा) आम्ही दोघांनीच केलेला दोन वर्षआधीचा ट्रेक आठवला.
© Sandip Wadaskar
वर्षाचा शेवटचा दिवस. ३१ डिसेंबर ! HAPPY NEW YEAR साजरा करायला अतिऊत्साही लोकांची तर लोणावळ्यामध्ये जत्रा भरते,जत्रेतलं थोडसं ट्राफिक राजमाचीला पण डायवर्ट झालेलं. आणि मग योगायोगानेच आंबट शौकिनांच्या पार्ट्या आल्याच. भरपुर गर्दी,दारूंच्या बाटल्यांचा खच आणि सगळीकडे गोंधळ. अरे काय हे ? ज्या ठिकाणी आपल्या सुवर्ण इतिहासाचा अभिमान बाळगायला हवा, ज्या ठिकाणी इतिहासकालीन वास्तुचे जतन करायला हवे,ज्या ठिकाणी वातावरणाचे पावित्र्य राखायला हवे,त्या जागेवर या आंबटशौकीनांनी तर हैदोस घालायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी आम्हाला समाजकार्यास हातभार लावणे तर दूरच,पण जे करतात त्यांच्याकडे बोट दाखवुन,त्यांची चेष्टामस्करी करण्यातच समाधान वाटते. अरे निदान स्वतःचा कचरा तरी स्वतःच्या घरी नेता येईल की नाही ? मग "आपणच करून काय फायदा",अरे पण भल्या माणसा कुठूनतरी सुरुवात करावी लागेलच ना ? असो. तर १६-१७ किमी ची वाट भर उन्हात पायपीट करून आलो होतो आणि इथवर आल्यावर हे असं.…….
© Sandip Wadaskar
हे सगळं आठवत असतानाच गणेश मंदिराजवळ केव्हा पोहोचलो कळलेच नाही. भर पावसात चिखलाची वाट तुडवत आम्ही लोणावळ्याचे अंतर कमी करत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला करवंदानी लगडलेली भरपुर झाडं आणि वरुण राजाच्या कृपेनी धोधो पाऊस ! निसर्ग राजा अगदी उदार झाला होता. मग काय चांगले मोठे,टपोरे आणि अमृतगोड करवंद, झाड अक्षरशः निष्फळ होईपर्यंत सगळे येथेच्छ हादडत होती,माकडासारखी ! करवंदे खात,पावसाळी डबक्यात उड्या मारत मनमुराद आनंद लुटत होतो. चार -साडे चार तासाच्या पायपिटीनंतर लोणावळ्यात पोहोचलो. एव्हाना मुंबई-पुणे हमरस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांची झुंबड उडाली,ट्राफिक मधुन वाट काढीत एक टपरी गाठली. गरमागरम वडापाव आणि एक-एक कटिंग चहा मारून स्टेशन गाठलं !
धन्यवाद !