कोंकण प्रवास 2010 - वरंधा घाट,हेदवी


गोष्ट एका झुरळाची - भाग 1


प्रवास , माझ्या सर्वात आवडीचा विषय. म्हणजे घरापासून कॉलेज पर्यंतचा असो किंवा घरापासून ऑफिस पर्यंतचा, करीत आलोय आणि अजून करतोय. कधी कंटाळा येतो ,कधी एन्जोय पण करतो . पण कोंकणात ला प्रवास  म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच. कोंकणातले ते नागमोडी रस्ते ,वरंधा किंवा ताम्हणी घाटातून कोंकणात जाताना दिसणाऱ्या खोल खोल दऱ्या,मध्येच समोरून एखादी ST पास झाली कि आपली ST छोट्याछोट्या गावात पोहोचल्याचा अभिमान, तो  विशाल समुद्र, नारळी -पोफळीच्या बागा, तिथले लोक, तिथली कोंकणी भाषा नेहमीच मला आकर्षित करत आलेले आहेत .मी आतापर्यंत कोंकणात बरेच वेळा गेलोय,आणि प्रत्येक  वेळेला काहीतरी नवीन अनुभव येत गेले. असाच दोन वर्षांपूर्वी आम्हाला आलेला एक भन्नाट अनुभव मला तुम्हाला सांगावासा वाटतो. 

एखाद्यावेळेस संकटे कशी आणि किती येऊ शकतात  आणि त्या संकटांना  सामोरे जाताना  कशी मजा अनुभवता येऊ शकती  याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे हि ,एका झुरळाची गोष्ट. अर्थातच थोडा त्रास झाला,पण  मजा तितकीच  आली .गोष्टं आहे दोन अडीच वर्षापूर्वीची, म्हणजे  नोव्हेंबर 2010. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आमचे कोंकणात जाण्याचे ठरले. सगळ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या पडल्या होत्या आणि ज्यांना सुट्ट्या नव्हत्या  त्यांनी ऑफिसमधे  आजारी  असल्याचं कारण सांगुन इकडचा बेत आखला होता. अर्थातच मी त्यांच्यापैकीच होतो. या दिवाळीला मी नवीन कॅमेरा घेतला होता त्यामुळे मी पण फोटो काढण्यास उत्साही होतो. 

तर अशातर्हेने माणसांची आणि सामानांची जुळवाजुळव करून गुरुवारी निघण्याचे ठरले. त्या दिवशी माझ्या भाचीचा आनंदीचा वाढदिवस होता, तो हेदवीला साजरा करायचा  ठरला  आणि  सकाळी  9-10 च्या  सुमारास घराचा  उंबरठा  ओलांडला. 

सातारा रोड सोडून  भोर फाटा  पार करतो न करतो तेवढ्यात  आम्ही प्रवासाचा नारळ फोडला. म्हणजे गाडी पंचर.आम्ही याला शुभ शकून मानतो ,तसे न केल्यास दुसरा पर्यायच उरत नाही? म्हणजे  ही शुभ घटना प्रवासात कधीही घडू शकते पण सुरवातीलाच घडली तर याला  टायर पंचर  न म्हणता नारळ फोडणे हे जास्त बरोबर वाटेल. पंचर काढेपर्यंत नारळाचा प्रसाद म्हणजे घरून आणलेला दिवाळीच्या फराळावर यथेच्छ ताव मारून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.नेहमीप्रमाणे  भोरला भेळ  घेतली आणि पुढे नीरा देवघर धरणाच्या बाजूला एक छोटं देउळ आहे ,तिथे थांबायचं ठरलं. वाह काय दिसत होतं  धरणाचं पाणी, येथूनच मी आपला कॅमेरा सुरु केला.




दूरवर पसरलेलं धरणाचं पाणी ,नुकताच पावसाळा संपत आल्यामुळे सगळीकडे अंथरल्या सारखी वाटणारी हिरवीगर्द चादर,आणि त्या चादरीवर बसून भोरची प्रसिद्ध सुकी भेळ खात बसलोय,क्या बात है ? लयीभारी ! मस्तपैकी भेळ संपवून आणि मनसोक्त फोटो काढून आमचा पुढचा प्रवास चालू झाला. पुढचा थांबा होता वरंध घाट.












वरंधा घाट, माझ्या सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक. केकच्या कापलेल्या तुकड्यांसारखे  दूर दूर पर्यंत  पसरलेले डोंगर .पुण्यावरून  कोंकणात जाताना उजव्या बाजूला खोल खोल दिसणारी दरी. दरीमध्ये डोकावून पहिले तर आपल्याला एक पायवाट दिसते ,तेच शिवथर घळ जिथे समर्थ रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. डाव्या बाजूला वाघजाई  देवीचं एक छोटेखानी देउळ आणि आजूबाजूला  सह्याद्रीच्या उंचच उंच कडा. नुकताच झालेल्या पावसामुळे परिसर अगदी हिरवागार झाला होता. आणि निसर्गाचा हा अवतार बघून मी एकप्रकारचं मानसिक समाधान अनुभवत होतो. 
मस्तपैकी गरमा गरम वडापाव आणि कांदाभजी वर ताव  मारून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो . 








पुढे चिपळूण जवळ जेवणासाठी थांबलो, जेवणाची वेळ उलटून गेल्यामुळे मिसळ पावावर भागवलं. ते हॉटेल जरा उंचावर असल्यामुळं  वसिष्ठी नदीचं विहंगम द्रुष्य दिसत होतं. लगेच कोंकण  रेल्वे पास झाली आणि पावसामुळे वातावरण अजूनच  सुखावह झालं. चिपळूण पार  केल्यावर संध्याकाळपर्यंत आम्ही हेदवीला पोहोचलो. 

साधारण साडेसहा -सात वाजले असतील. बऱ्यापैकी अंधार पडला होता. बाकीचे सामानांची आवराआवर करण्यात गुंतले होते. मी आणि आदित्य रात्रीचा एक फेरफटका मारवा म्हणून समुद्रावर गेलो. समोरचं  काहीच दिसत नव्हतं. रात्रीची भयाण शांतता आणि शांतता भंग करणारा  लाटांचा तेवढा आवाज. थोडावेळ फोटो सेशन करून परत आलो. अर्थातच कॅमेरा मध्ये काहीच दिसत नव्हतं .


त्या दिवशी आनंदीचा वाढदिवस होता आणि गडबडीत केक घ्यायचा  कुणाच्याच लक्षात नाही आलं .  तेवढ्यात निनाद दादानी जवळच्या दुकानातून  सोहन पापडी आणली. ती एका ताटात ठेवली, त्यातच मेणबत्ती पेटवून त्याचा केक तयार केला.वाह काय केक होता तो,आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो असा केक!






अंधारामुळ आनंदी रडायची थांबेना. तिकडे त्या राधीकानी फटाके   उडवायला सुरवात केली. सगळा गोंधळ उडाला होता.कुणाचं  काय तर  कुणाचं काय. म्हणजे कुणा-कुणाचं काय मला सगळं सांगता नाही येणार.


आता मला हे कळत नव्हतं, चांगलं कोंकणात फिरायला आलो, आजूबाजूच्या निसर्गाचा आस्वाद घ्यायचा, इकडे तिकडे फिरायचं, हे फटाके   कशाला आणायचे  सोबत? म्हणजे आपण शहरात पण घाण करणार  आणि कुठे सहलीला गेलो कि तिथे पण.  काय हे? जाऊ दे तो एक चर्चेचा स्वतंत्र विषय आहे.



तर सांगत काय होतो? हा, तर अशाप्रकारे सगळ्यांनी आनंदीचा वाढदिवस साजरा केला. रात्रीची जेवणं करून झोपी गेलो. मी सकाळी उठुन  फोटो काढण्याच्या विचारातच  झोपलो.




सकाळी म्हणजे पाच सव्वापाच च्या दरम्यान सगळ्यांची कुजबुज चालू झाली .आमच्या जीजाश्रींच्या कानात एका झुरळाने प्रवेश केला होता.आणि इथे आमच्या कोंकण प्रवासाच्या गोष्टीमध्ये खलनायका नी एन्ट्री मारली!
म्हणजे  झुरळ खलनायक होता की नायक हे आपल्याला नंतरच कळेल. पण तूर्तास त्या झुरळाला कानातून बाहेर काढण्याचे प्रयत्न चालले होते. प्रत्येकांनी त्या प्रयत्नांमध्ये आपापला हातभार लावला, पण झुरळ बाहेर यायचं नावच काढेना.  जीवशास्त्राचा विदयार्थी असल्यामुळे राहुल दादा हात धुऊन त्या झुरळा मागे लागला होता, त्याला मोठं आव्हानच मिळालं होतं. पण  त्यालाही झुरळ दाद देईना. कानाला कुठलं तरी भिंती मधलं छिद्र समजुन,  झुरळ एकदम डेड एंड पर्यंत जाऊन पोहोचलं होतं आणि तिथेच ते मेलं . जीजाजींचा कान चांगला दुखायला लागला होता ,पण काय करणार गावात  कोण  डॉक्टर पण सापडायला तयार नव्हता , शेवटी सगळ्यांनी  झुरळाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सोडून दिले आणि बीच वर जायचं ठरवलं.





हेदवीचा निसर्गरम्य समुद्र किनारा. आणि आम्ही ज्या रेसोर्ट(रेसोर्ट कसला कोंकणातली छोटी छोटी  घरेच ती.... ) मध्ये थांबलो होतो तेथून दोनच  मिनटाच्या अंतरावर. थोडा दुर्गम असल्यामुळे पर्यटकाची वर्दळ कमीच. मस्त शांत बीच होता. नेहमीची आपली बीच वर मस्ती करून परत आलो.


आवराआवर ,नाश्ता ,चहा पाणी करून हेदवीच्या दशभुजा गणेश मंदिरात जाण्यासाठी निघालो आणि वाटेतच झुरळाचा निकाल लावण्यासाठी डॉक्टरला  शोधायचं ठरलं.






   

अशातऱ्हेने गणपतीचं दर्शन घेऊन गणपती पुळे च्या   दिशेने आमचा प्रवास सुरु झाला............

To be continued............
Keep watching space for next part of  story  कोंकण प्रवास 2010- गणपती पुळे,गुहाघर
  

4 comments:

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences