गेलं वर्ष ट्रेकच्या नावाने चांगलंच दुष्काळग्रस्त निघालं, तेवढी गौताळ्याची आडवाटेवरची किल्लेगिरी अन् सवाष्णी-वाघजाईची व्हाया ठाणाळे रपेट सोडली तर पायांना कुठे तंगडतोड नाही की खांद्यांना कुठे पिट्ठूचे काचे नाही. घामाने निथळलेली पाठ जमिनीवर कुठे टेकवलेली आठवत नाही, खडकातलं गारेगार पाणी पिऊन कितीतरी वर्षे लोटली असं वाटतंय, या सह्याद्रीची इतकी सवय होऊन गेलीये की गेलं वर्ष माझं मी कसं काढलंय हे मलाच माहिती. या सह्यमंडळाच्या मायेच्या ओलाव्याशिवाय आयुष्य सगळं शुष्क आहे,हे मात्र कळुन चुकलं. सासुरवाशीण जशी वाट बघतीये, कधी माहेरची माणसे येतील आणि तिला माहेरा घेउन जातील, अगदी तशीच अवस्था झालीये अस्मादिकांची ! आणि तसं बोलावणही आलं होतं सह्याद्रीचं, तसं ते नेहमीच आलेलं असतं म्हणा. पण यावेळी मी त्याच्या हाकेला "ओ" द्यायचं ठरवलंच होतं. म्हटलं चला आता पुन्हा एकदा नव्याने सुरवात करायला हरकत नाही.
बाहेर उन्हाचा दाह वाढत असला तरी आता मला कुणाची पर्वा नाही. फाल्गुनोत्सव जवळ येतोय, सह्यमंडळात लालभडक पळस फुलला असणार. करावंदांना मोहर आला असणार, तशी करवंदीची चव चाखायची म्हणजे मे जुनशिवाय पर्याय नसतो. पण किमान त्याचा मोहर बघुन तरी यावं. आंब्याची झाडे सूद्धा बहरली असणार, त्याचा सुगंध घेऊन यावं. या डोंगरातलं जीवनच वेगळं असतं. नाही ? , स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, सिमेंटच्या जंगलात अनुभवता न येणारा असा निर्मळ सूर्योदय-सूर्यास्त. पण कधी कधी भीती वाटते, आपण जसा विचार करतोय तोच विचार हे डोंगरवासी करीत असतील का ? तर ती भीती इथे खरी ठरते, कारण त्यांनाही डोंगरात राहून उबग आलेला असतो, शहरी लोकांपेक्षा ह्या लोकांचे प्रश्न फार वेगळे आहेत, तेही मुलभुत. आणि ते स्वभाविक आहेत, त्यांनाही चांगले रस्ते,वीज,पाणी ह्या सर्वांची गरज भासतेच. शहरात आली की मग ही माणसं हुरळून जातात. शेवटी माणसाला बदल हवा असतोच. अन् त्याच बदलाच्या पायी आपण डोंगरांची वाट जवळ करतो, हेतु प्रत्येकाचा वेगळा असु शकतो. नाही का ?