बागलाण ! या चार अक्षरातच नाशिक जिल्ह्याच्या या भुभागाचा इतिहास डोळ्यांसमोरुन तरळून जातो. काही काही शब्दात एक विशिष्ट जादू असते. तो शब्द उच्चारला की इतिहास-भूगोलासोबत त्याचा वर्तमानही खुणावत जातो. इथले डोंगर जेवढे ऊंच,तेवढाच या मातीचा इतिहास गगनाला भिडलेला. किंबहुना त्याहीपेक्षा उंच. जेवढा तुम्ही वाचलेला,तुमच्या माहितीतला,कुणी तुम्हाला सांगितलेला,तुम्ही ऐकलेला,त्याहीपेक्षा जास्त वास्तविक मी अनुभवलेला. खरं तर माझ्यापेक्षा तो कुणाला माहितही नसणार. नसणारच मुळी. इथे नांदलेल्या राजवटींपेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे झेललेला, आणि इथल्या मोठ्या मोठ्या राजकीय संक्रमणाचा साक्षीदार मी ! इथल्या रक्तपाताचा,इथल्या युद्धजन्य परिस्थितींचा,कधीकाळी शांततेत नांदत असलेल्या आणि ऐश्वर्यसंपन्न राजवटींचा मूक साक्षीदार मी. डोलबारी रांगेतला साल्हेर-सालोट्यानंतर सर्वात उंच डोंगर मी, प्रसिद्धी मात्र माझ्या वाट्याला त्याच्याइतकी नाही. हा एकटेपणा फार भयंकर असतो.या एकटेपणातच पिचलेल्या महाराष्ट्रदेशातील अश्या कित्येक गिरीदुर्गांपैकी एक मी. बाजूलाच उभारलेल्या दोन धाकट्या भावांची साथ असली तरी इकडे वळलेली मानवी पावलं दुर्मिळच. असो, ही माझ्यासाठी रोजचीच व्यथा. पण आज मला बोलायचंय,हा अबोलपणा सोडायचाय.कोणी ऐकेल का ? पण त्यासाठी तुम्हाला तुमची वाट थोडी वाकडी करावी लागेल, माझ्या थोडं जवळ यावं लागेल. चला येताय ना मग !