साद सह्यसागराची....निवती,सिंधुदुर्ग !

1 comment:

पुण्याहून गृह-भोजन मुहूर्त (जेवणं वगैरे घरातूनच आटोपून,नंतर रस्त्यात वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात.ही वेळ साधारण रात्रीचे 10-10:30 ची असते) साधून निघालेलो आम्ही! जेवणं झाली असली तरी चहाची तेवढी तल्लफ उगाचच जाणवत होती. साताऱ्यापासुन चहा - चहा करीत कोल्हापुर गाठुन बावडा घाट उतरायला सुरूवात झाली तरी चहाच्या टपरीचा कुठे मागमुसही नव्हता. शेखऱ्याचं आपलं चाललेलं "काय सँडया ,चहा नाय का नाश्ता नाय,काय हाय का नाय ? तर हा शेखऱ्या,त्याचं कुटुंब मोनाली वहिनी आणि प्रसन्ना,त्याचं कुटुंब पुजा वहिनी हे दोन जोडपी आणि प्रसाद,केसागर,मी असे तीन अतरंगी अशी सप्तरंगी टोळी आणि आमचे ड्रायव्हर काका असं आठाचं धावतं विश्व रात्रीच्या मिट्ट काळोखात गगनबावडा घाटातली वेडी- वाकडी वळण पार करत निघालोय.मोनालीची त्यांच्या नुकताच मिळालेल्या आणि प्रतिष्ठित क्लाइंट,अशा टिकेकरांवरील स्तुतिसुमने उधळून झाली होती. ह्या केसागऱ्याला झोप आवरत नव्हती,कशाला उगीच एका बाणात दोन पक्षी मारायचे प्रयत्न? जीवघेणी वळणं,सीडी प्लेयरमध्ये मध्येच लागणारं एखादं भन्नाट गाणं, गप्पा- टप्पाच्या नादात स्वारी निघाली होती कोंकणात. किर्र अंधारात वाऱ्याशी सलगी करणारा गाडीचा वेग आणि गप्पांचा ओघ मंदावला की समजायचं,काकांनी साइड दिली. मग उगाचच घाटात गाडी चालवणे म्हणजे ड्रायव्हर कमालीचाच पाहिजे वगैरे वगैरे प्रतिक्रिया ! कीलकिल्या डोळ्यांनी घाटाचं निरीक्षण करता करताच गगनगड खुणावत गेला.एका मोठ्या वळणावर तर एकदम वरंधा घाट डोळ्यांसमोर आला.
खुप दिवसांनी निघालो होतो कोकणात हिंडायला.जवळ जवळ दोन एक वर्षांनी! अधुनमधून हरेश्वरला जाऊन आलो  होतो पण अशी सुसाट भटकंती फार दिवसांनी. मला अजूनही आठवतं नऊ - दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा कोकणात गेलो होतो,आमच्या कोंकणवेड्या कल्याणीताई सोबत. तेव्हा खोतकाकुंनी बनवलेली सोलकडी,ही अशी पेल्यानी ओरपली होती आणि नाकपुड्यातून डोक्यात शिरलेले मासे (तेव्हा मी खात नव्हतो,पण इथे आल्यावर बटाट्याची भाजी.....छे छे,हे पटलंच नाही) आणि त्यांचा सुवास असा भिनलाय की कोकणाच्या प्रेमातच पडलो आणि तेव्हापासून या सागरी मेव्याला मी कधीच अंतर दिलं नाही. खोत काकांचं बांबु आणि पोफळी वापरुन बनवलेलं पारंपारिक कोंकणी घर, घरामागुन नारळाच्या दोन बागा ओलांडल्या की थेट पांढरी वाळू. पहिल्यांदा अनुभवलेला सागरी किनारा,सकाळी सकाळी ताज्या ताज्या निरेची आलेली झिंग, आणि मग समुद्रात केलेली मस्ती,उगाचच प्रत्येकाच्या अंगावर पाणी उडवत मज्जा करायची. मग वाळूचे कण आणि खारवटलेले अंग घेऊन परतायचं तर पोफळीच्या बागेतली विहीर आपल्यासाठी सज्ज असायची. गार पाण्याने मस्त आंघोळ झाली की फ्रेश. पेशवेकालीन हरेश्वराचे दर्शन घेऊन यायचं आणि जिभेला वाट मोकळी करून दयायची. मग काय, होऊ दे खर्च,येऊ दे पॉपलेट- सुरमई,झिंगे अन् बांगडा! ही अशी सगळी चंगळ.

बागेतल्या मुंजोबाच्या गोष्टींवर रात्री झोपताना टरकल्याचंही आठवतं. ह्यो माका कोंकण,तुका कसा वाटला ? हे कोणी विचारत नाही,कारण विचारण्याला काही अर्थच नसतो. कोंकण म्हणजे महाराष्ट्राचं सौंदर्य! इथली संध्याकाळची गार वाळू,नारळा- पोफळीतला गारवा,वेड्या- वाकडया पायवाटा,सड्यावरच्या आंबा अन् काजूच्या बागा,इथला हवाहवासा निसर्ग म्हणजे अप्रतिम! आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथली माणसं अन् त्यांची रसाळ कोंकणी भाषा. इथं आल्यावर मला उगाचंच पुलंच्या अंतूशेटना भेटायची फार इच्छा होते,कोण जाणे "ओ गोविंदभट,टाकतोस का दोन डाव?" अशी हाक एखाद्या गल्ली- बोळातून ऐकू यावी.

हे सगळं आठवत असताना,मी ड्रायव्हर शेजारील सीटवर बसलोय याचा विसर पडला आणि डुलकी लागली. तेवढ्यात ती ड्रायव्हर काकांनी परतवली. "ही डुलकी जर ड्रायव्हर काकांनाच लागली असती तर!" या कल्पनेने माझी झोपच उडाली. पहाटेच्या ब्राह्मणमुहुर्तावर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. एक - एक कटिंग चा ब्रेक झाला आणि परत गाडीत बसायला लागलो तर शेखऱ्या बाहेर येऊन मॉर्निंग वॉक करायला लागला,म्हणे,"तुम्ही चहा घेणार ना ?" अहो वहिनी सांगा त्याला,चहा घेऊन निघण्याची वेळ झालीये. काय हो वहिनी,हा झोपेत चालतो की काय ? नाही आपलं विचारून घेतलेलं बरं,एखाद्या वेळेस जायचा आपला निषिद्ध जागा समजून कड्यावर! शेखरच्या आइसब्रेकरने सगळ्यांच्याच झोपा उडाल्या आणि कोकणातल्या आल्हाददायक वाऱ्याची झिंग प्रत्येकाच्या डोक्यात शिरायला सुरुवात झाली. प्रसाद, कुठुन करायची सुरवात? जाऊ दे वेंगुर्ल्याला.वेंगुर्लाsss!

सात- सव्वासातच्या सुमारास वेंगुर्ल्याच्या बंदरावर पोहोचलो. कोळी बांधवाची सकाळची धामधूम चाललेली. मासेमारीला निघणाऱ्या होड्या युद्धावर निघालेल्या खिंकाळणाऱ्या घोड्यांसारख्या समुद्राच्या लाटांवर हुंदळत होत्या. सकाळच्या कोवळ्या किरणास समुद्रापर्यंत पोहोचायला वळवाचा मज्जाव चाललेला,अशा प्रसन्न वातावरणात कॅमेरा सुरु करावा तर महाशयांची तब्ब्येत ठिक नसल्याचं जाणवलं. पुरता हीरमोड झाला. आता कॅमेराशिवाय पुढचे दोन दिवस जगायचे कसे,हा प्रश्नच पडला. तरीही आपला एक टिपून घेतला. भोगवे बीच कडे मार्गस्थ झालो, तेव्हा पोटात आग पडली होती. आणि नेहमीप्रमाणे         आमचा दादया, प्रसन्न "वडापाव बघ रे,कुठे मिळतो का ? या माणसाला हॉटेल ताज मध्ये जरी नेऊन सोडला ना तरी हा आपला वडापाव काही  सोडणार नाही. कारण काय, तर म्हणे " तो कुठेही सहज मिळतो. "

शेवटी रस्त्यालगतच्या टपरीवर थांबलो. तर हा कोंकणी वडापाव. पावाची साइज़ बघून तर हसुच आवरत नव्हतं. आणि जेव्हा वड्याने पावात प्रवेश केला तेव्हा तर त्या वड्याचा पोस्टमाटमच करून टाकला पोरांनी! अहो,दिवसेंदिवस दिवस आकाराने कमी होत चाललेल्या पुण्यातील जोशी वडेवाल्यांच्या वड्यानी जर हे प्रकरण वाचलं असतं तर त्यांचीही मान शर्मेने खाली गेली असती हो! मग कोकणात पाव केवढयाला? वडा एवढा छोटा का ? आणि मग भजी केवढी असतात? वगैरे वगैरे. तेवढ्यात केसागर ने सॅंपल चा सांभार करून दोन वडे गटकावले. म्हटला," मज्जा आली ". दोन - दोन वडापाव पोटात ढकलून पुढचा प्रवास सुरू झाला.

पाऊण तासात भोगवेचा समुद्र किनारा गाठला. ड्रायव्हर काकांना आता कुठे विश्रांती मिळाली. त्यांनी आपली सोयिस्कर जागा बघुन दिली ताणून.आम्ही आमच्या पायांना वाळू मोकळी केली. दगडांवर आपटणाऱ्या लाटांचा आवाज,फेसाळणारं पाणी आणि सागराकडे झुकलेल्या नारळाच्या झाडांनी फ्रेम मध्ये जीव आला आणि खछ्याक आवाज करून कॅमेरा मध्ये बंदिस्त झाला. कॅमेरा थोडाफार साथ देत होता. निवतिच्या समुद्रकिनाऱ्याला लागूनच असलेला छोटासा पण रम्य किनारा,जिथे कर्ली नदी सागरास येऊन मिळते. कर्ली नदीच्या खाड़ीपलीकडे तो देवबाग बीच.अलीकडे नारळाच्या झाडांनी गच्च झालेलं रान म्हणजे त्सुनामि बेट. आणि पार पल्याड तो,दिसतोय का ? भक्कम तटबंदीचा कोट,होय तोच. तो आपला स्वराज्याचा जंजीरा! किल्ले सिंधुदुर्ग!! विशेष असा की या रमणीय सागरी किनाऱ्यावर फक्त आम्हा साताची तुकडी. मस्त फोटोसेशन झाल,पांढऱ्या वाळूत सगळी दंगामस्ती झाली. वाळू झटकून गाडीत बसलो आणि आमच्या या सागरी मोहिमेतल्या पहिल्या किल्ल्याकडे रवाना झालो.


परत सड्यावर आलो तेव्हा उन्ह वाढत चाललेलं.पण दुतर्फा असलेल्या आंब्याच्या अन् काजूच्या बागानी खुष केलं. एखाद्या जंगलात भरदिवसा असल्यासारखी रातकिडयांची किर्र मन सुखावुन गेली.असं वाटत होतं उतरावं गाडीतुन आणि द्यावी थेट ताणून, एखाद्या आंब्याखाली. थोड्याच वेळात किल्ले निवतिच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. चढायला सुरूवात केली तेव्हा टोचणरं उन्ह मी म्हणत होतं.करवंदी आणि काटेरी झाडोरा बाजुला सारुन गडमाथ्यावर प्रवेश केला. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी काही जण सरसावले अन् बाकीची करवंदीवर तुटून पडली. पण सांडया,राजमाचीची सर नाय,शेखर. अजुन कोण? पार तुंगर्लि येईपर्यंत त्यानेच जास्त चापले होते, पण शेखर्या तिथल्या खेकडयांनी तुला अजूनही माफ केलेलं नाही,बरं ! असो,निवतिच्या माथ्यावरून पश्चिमेला असीम सागराने सुरेख दर्शन दिले. डोईवर तळपणार्या सूर्याची किरणे झेलत पहुडलेला समुद्र शांत भासत होता. किल्ल्याच्या पायथ्याशी झाडी पलीकडे,समुद्रातून अवतरलेल्या कातळकड्याने लक्ष वेधून घेतले. निळ्याशार पाण्यावर त्याचा लालसर रंग उठुन दिसत होता. इतिहासाचा वेध घेत आम्ही किल्ल्यावरचा फेरफटका सुरू ठेवला.



जांबा दगडापासुन बांधलेल्या पडक्या वाड्याचे  आणि तटबंदीचे अवशेष पाहून शिवरायांच्या दुर्गबांधणीची आठवण झाली. पण हे बांधकाम शिवकालीन नसावं. या किल्ल्याचा तसा इतिहास ज्ञात नाही. हाकेच्या अंतरावरील मालवणच्या किल्ल्यामुळे निवतिला देखील महत्व असावे,पण किल्ला स्वराज्यात असेल तर! कदाचित टेहळणीची जागा म्हणून. करवंदांचा आस्वाद घेत उत्तर बुरुजावर पोहोचतो तर भोगावेच्या सुंदर किनार्याने डोळ्यांचे पारणे फिटले. माथ्यावर गर्द हिरवाईने नटलेलं रान आणि पायथ्याला पांढऱ्या शुभ्र वाळूचा रुपेरी पट्टा! निवतिची सफर सार्थकी झाल्यासारखी वाटली. फोटोचा नुसता क्लिकक्लिकाट झाला. माघारी फिरुन उतरलो तेव्हा गाडीची पार भट्टी झाली होती. पुढच्या प्रवासाला लागलो,आता मालवण गाठायचं.

गाडी सुरू झाली,गार वारं लागायला सुरुवात झाली. तेव्हा कुठे गाडीतलं तापमान जरा कमी झालं. पण मोनालीचा " उपवास " हा विषय ऐरणी वर  आला आणि परत तापलं. ते निवळण्याची औपचारिक जबाबदारी अर्थातच मी स्वीकारली. कसं आहे ना,वहिनीसाहेब ? आपण एकदा का शिवापूर फाट्यावर सातारयाचा टोल फाडला (शिव्या देत का होईना !) की उपास- बिपास काही नसतं. उपवास पुण्यात,कोकणात कुठून काढला उपवास ? तो पेंगतोय बघ,केसागर. अरे किती झोपतो,फिरायला आलास की झोपायला ? हां.तर मी काय म्हणत होतो," इथे घासफूसवाल्यांचे हाल होतात तर उपासकांची काय बिशाद?" वहिनीसाहेबांचे समाधान झाल्यासारखे वाटले. त्यानंतर मासे आणि त्यांचे प्रकार यावर एक छान चर्चासत्र सुरू झालं. गप्पांच्या नादात परुळ्यात शिरलो आणि रस्त्यालगतच एक छान टुमदार टिपीकल कोंकणी मंदिराच्या दर्शनाने आमची गाडी कडेला घेतल्या गेली. बहुतेक अदिनारायणाचे मंदिर,प्रसाद पुटपुटला. हो तेच. मोठा सभामंडप,आत रुंद गाभारा,त्यात विसावलेली अदिनारायणाची गोमटी मूर्ती. आंघोळ न करताच एकदम प्रसन्न वाटलं. बाकी कोंकणवासियांचं आराध्य दैवत म्हणजे बाप्पा! तेवढ्याच भक्तिभावाने,उत्साहाने राखलेलं आणि रंगरंगोटी केलेलं मंदिर म्हणजे अप्रतिम! चला,गाडीत जाऊन बसलो, उर्वरीत मत्स्यपुराण सुरू झालं.मालवणात येऊन धडकलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते.


 रस्त्यावर पर्यटकांची आणि प्रवासी गाड्याची झुंबड उडाली होती. गर्दीतून वाट काढत एकदाचं आधी ठरल्याप्रमाणे हॉटेल सी- व्यू रिज़ॉर्ट मध्ये चेक इन झालो आणि पाहिलं काम म्हणजे मेनू कार्ड चेक! पण जेवढ्या उत्साहाने ते हातात घेतलं होतं,तेवढ्याच वेगाने ते भिरकावलं,काय रे हे रेट !! मासे रद्द आणि सर्वानुमते कोंबडी सत्कारणी लावायची ठरवलं. खानपान झालं. खुर्च्या टाकून वाळूत ( तारकर्ली बीच वरची वाळू थेट रिज़ॉर्ट मध्ये अंथरली होती ) गप्पा मारत बसलो. नंतर वामकूक्षी घेण्याच्या बेतातच होतो की दादामहाराजांनी आज्ञा सोडली. " चला सिंधुदुर्गला जायचंय ना ?" नारायणराव तरी अजून दोन- अडीच तास ड्यूटीवर होतेच. मालवणच्या किनार्यावर पोहोचलो तेव्हा पर्यटकानी धुमाळ गजबजला होता. हौशी पर्यटकांच्या कॅमेरांचा क्लिकक्लिकाट आणि दुकानांची वर्दळ. त्यातच मालवणच्या धक्क्यावर उभ्या असलेल्या बोटी लोकांना खचाखच भरवुन किल्ल्याकडे रवाना होत होत्या. अशाच बोटीमधून आम्ही कुरटे बेटावर पाय ठेवला तेव्हा सूर्य पश्चिमेला कलायला सुरुवात झालेली. समुद्राच्या लाटा तटबंदीवर आदळआपटत होत्या. त्यांचा आवाज. पुढ्यात धक्क्याचं काम चाललेलं,समुद्रात भर टाकणारी माणस,त्यांचा कल्लोळ. रहाटगाडा जोमाने चालला होता. त्यातच समोरच्या पद्मगडागडाची दुर्दशा हेलावणारी होती.


 मुख्यद्वारातून आत प्रवेश केला आणि उजव्या बाजूला भिंतीमध्ये एका बंदिस्त असलेल्या चौथरावर थबकलो. असं म्हणतात गडाचं बांधकाम झाल्यानंतर महाराजांच्या एका हाताचा आणि एक पायाचा ठसा इथे उमटऊन घेतला होता. त्याचं निरीक्षण झालं,तटबंदिवरुन चालायला सुरुवात केली. पाउले पुढे पडत होती,मन मात्र इतिहासाचा मागोवा घेण्यास रमलं. " आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच, ज्यास अश्वबल त्यास पृथ्वी प्रजा आहे. तदवतच ज्याजवळ आरमार,त्याचा समुद्र! " या आरमार प्रकरणातील वाक्यावरुन द्रष्टया शिवाजी महाराजांनी समुद्राचे महत्व वेळीच ओळखले होते. या आरमाराची मुहूर्तमेढ अर्थातच 40 एकरात पसरलेल्या या कुरटे बेटावर रोवल्या गेली. बांधकामास तब्बल तीन वर्ष लागलेला हा जलदुर्ग म्हणजे जंजीरेकरांच्या थोबाडात मारलेली सणसणीत आरमारी चपराकच म्हणायला हवी. महाराजांच्या या आवडत्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे अभेद्य अशी 12 फुट रुंद आणि 50 एक फुट उंच भिंत (तटबंदी).  57 बुरुजानी सुरक्षित केलेलं हे आरमारी प्रतिक पाहण्याजोगं आहे. किल्ल्यात कायमची वस्ती असणारी घरे अगदी शिवकाळापासुन राखलेली आहेत. किल्ला म्हणण्यापेक्षा आत अख्खं गावच वसलेलं आहे . नगारखाना दरवाजा, आणि त्यावरील नगारा वाजवण्याचा अधिकार आजही परंपरेप्रमाणे चालत आलेल्या एका कुटुंबाकडे आहे. इतर किल्ल्याप्रमाणे आत हनुमानाचे,कुलस्वामिनी आई भवानीचे मंदिर आहे.आणि जगात कुठेही न आढळून येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर अद्वितीय! छत्रपती राजारामांनी स्थापना केलेली मूर्ती कोळी वेशात पाहायला मिळते. बाकी गोड पाण्याचे टाके दूधबाव,साखरबाव आणि दहीबाव पाहण्यासारखे. तटबंदीवरून दिसणारी राणीची वेळा, ताराराणीसाहेबांची खासगीची जागा. तिथे जायला तटबंदी मधुनच एक छोटा दरवाजा काढलाय. सिंधुदुर्गाबद्दल लहानपणी पुस्तकात वाचलं होतं,तेव्हापासुन या किल्ल्याचं खुप आकर्षण होतं. आज प्रत्यक्ष अनुभवताना मन भारावून गेलं. फेरफटका झाला आणि बोटीमध्ये जाऊन बसलो. हॉटेलवर पोहोचलो तेव्हा अंधारलं होतं.



रात्रीचे जेवणं शाकाहारी. बाकी कोकणात व्हेज म्हटलं की ती यादी बटाटा,कोबु हराभरा अन् मटकीची उसळ या पलीकडे सरकत नाही. पण जेवणात सोलकडी अन् उकडीचे मोदक,बेत जमला फक्कड़! पण मासे आज राहूनच गेले,साधा सुरमईचा एक तुकडा जिभेला शिवला नव्हता! असो,बघुया उदया काय होतं ते ?