रणरणत्या उन्हात, सावली देवराईची !

फाल्गुन संपला. चैत्राची गुढी यावर्षीच्या विक्रमी तापमानात उभारल्या गेली.वैशाखवणवा चैत्रातच पेट घेतो की काय, असं वाटत होतं. एवढा चैतन्यमयी मराठमोळा सण उन्हाच्या रखरखाटात साजरा करावा लागतो,याचं मला नेहमीच अतिशय वाईट वाटतं. पण निसर्गाने काहीतरी ठरवूनच ही तिथि निवडली असणार. त्याचं कारण आपल्यासमोरच उलगडत असतं, वसंतऋतुचं आगमन झालेलं असतं. या उन्हातच झाडांना पालवी फुटायला सुरवात होते, आंब्याला मोहोर येऊन ते पिकायला सुरवात होते.स्वच्छ निळ्या आकाशात नारायणराव खुल्या मनाने तळपत असतात. आता तेवढा उन्हाचा भाग सोडला तर मन सह्याद्रीमंडळात मुक्त हिंडायला एका पायावर तयार असतं. पण यावर्षीचा एकंदरीत उन्हाळा बघता बाहेर पडायला जीव मागेपुढे बघत होता. कुठेतरी जाऊन यावं, पण कुठे हे नक्की सुचत नव्हतं. योगेशने अहुपे घाट सुचवला, पर्याय चांगला असला तरी कोंकणातून चढाई आणि ती या उन्हात म्हणजे. थोडी द्विधा मनःस्थिती होतीच. पण योगेशने, त्याची पाच वर्षाची मुलगी "चार्वी" सोबत येते म्हटल्यावर माझं मत ठाम झालं आणि होकार कळवला.


योगेशला अहुपे घाट म्हणजे एकदम घरआंगण  असल्यासारखा. आम्ही मात्र घाटावर राहत असल्यामुळे ईथे पोहोचेपर्यंत प्रवासातच जास्त वेळ जातो. आणि याच कारणांमुळे अहुपे घाट मला प्रत्येक वेळेला टांग देत होता. यावेळी मात्र उन्ह असलं तरी एकदाचा बघुनच यावा आणि वरून थोडीफार झाडी असल्याची योगेशने शाश्वती दिली होती.पुण्यावरून पहाटेची सिंहगड गाठून कर्जतला वडापाव वगैरे सगळे सोपस्कार आटोपत म्हस्याला पोहोचलो तेव्हा घड्याळात साढ़ेदहा झाले होते, नारायणराव अगदी टळटळीत दुपार असल्यासारखे पेटले होते. पाठीवरच्या आमच्या मोठमोठ्या पिशव्या बघुन, "एवढ्या उन्हात कशाला मरायला आलं म्हणायचं हे ध्यान" अश्या नजरेने म्हस्यातली माणसं आमच्याकडे टकामका बघत होती. तिथुन सटकुन, खोपीवलीला जाणाऱ्या जिपड्यात स्वतःला कोंबलं आणि अहुपेच्या पायथ्याचा प्रवास सुरू झाला.
उजवीकडच्या सह्यरांगेच्या बाजूनेच हा रस्ता पुढे धसईपर्यंत जातो. सह्यरांगेतच भव्य सिद्धगडाच्या माचीवर, आभाळात घुसलेल्या बालेकिल्ल्याचा नजारा बघुन जुन्या आठवणींचा खजाना डोळ्यांसमोर तरळून गेला. ओळख पटत गेली, जागा,डोंगर, कपाऱ्या आठवून गेल्या, होय, त्याच खिंडीतून खाली नारीवलीपर्यंतची झालेली रात्रीच्या काळोखातली तंगडतोड क्षणार्धात आठवून गेली. जीप पुढे सरकतीये तशी सिद्धगडाची लिंगि आणि दमदम्या नजरेसमोर खुला होत गेला. मछिंद्र, गोरख हे जुनेजाणते गिरीशिखरेही साद घालुन गेले. एव्हाना खोपिवलीत पोहोचलो होतो. डोक्यावर दिवाकर अन् कानात ठणाणा करीत असलेला गावातला कर्ना या दोघांनीही आमचं जंगी स्वागत केलं होतं. रस्त्याच्या डावीकडे असणाऱ्या एका घरात भर उन्हाळ्यात कोणीतरी बोहल्यावर चढणार होतं, कोंकणी लग्नंगीतांनी कर्ना जीवाच्या आकांताने ओरडत होता.

काही वेळाने योगेश त्याच्या कुटुंबासोबत दाखल झाला, छोट्या चार्वीला आयतच म्यूजिक मिळालं होतं. उतरल्या उतरल्या एकदम उड्याच मारायला लागली होती, पाच वर्षीय या पोरीचा उत्साह बघुन अहुपे घाटाची चढाई एकदम खेळिमेळीत जाणार यात वादच नाही. पाण्याच्या बाटल्या वगैरे भरून आम्ही अहुपे घाटाकडे चालायला सुरवात केली तेव्हा साधारण साढ़ेअकरा झाले असतील. एवढ्या उन्हात, समोरचा घाट चढायचा आहे हे बघुन जरा टरकलीच, पण भीतीला फाट्यावर सोडत चालु लागलो.
अहुप्याच्या देवराईतुन गेलेला डांबरी रस्ता
शेताच्या बांधांवरून वाट हुडकत स्वारी पुढे चालत होती, छोटी चार्वी तुरुतुरु पळत होती. वर नारायणराव तळपत होते. एकंदरीत ऊन्हाने सुकून ओस पडलेल्या भातखाचरांकडे बघुन असं वाटत नव्हतं पावसाळ्यात ईथे स्वर्ग अवतरत असेल. काय करणार, वरुणराजा चार महिने ढगफूटीसारखा बरसतो अन् राहिलेली चार महिने आपला बळीराजा पाण्यासाठी तरसतो. उन्हाळ्यात हे हाल कधीकधी तर पाहवत नाही. असो, उजवीकडे असलेला गोरखगड तोही पावसाची वाट पाहत बसलेला, ऊन्हाने करपल्यासारखा जाणवून गेला. माथ्यावरची झाडी तेवढी सुखावणारी, अध्ये मध्ये जागा मिळेल तिथे झाडीने आपला मुक्काम ठोकला होता. बाकी जिकडे पहावे तिकडे सह्याद्रीचे तुटलेले ओसाड अन् राकट कडे ! अन् उन्हाने करपलेले रान. चढतोय तसे हे दोनसूळके भाऊ खाली खाली जात होते. अहूप्याची चढण सौम्य आहे, पायवाटही चांगली रुळलेली आहे. पण डोक्यावर दिवाकर पेटलेला असल्यामुळे चांगलीच दमछाक होते आहे. दर दहा मिनिटाला पाण्याची बाटली बाहेर निघत होती. छोटी चार्वी तूरूतूरू पळत, उड्या मारत चढत होती. मध्येच भरतनाट्यमचे तत्कारही करून दाखवायची. तिचा एकच हट्ट होता बाबांच्या ब्लाडरमधुनच तिला पाणी प्यायचा. त्रास वाढल्यावर आईने धपाटा दिलाच. पण रडता-रडताही तीने पायांना कुठे विश्रांती नाही दिली.

 हे प्रकरण बघुन आम्ही धूम हसायचो, मग तीही खुदकन हसून द्यायची. तसा आमचाही हूरूप वाढायचा. पाण्याच्या टाक्याजवळ थांबुन दुपारचे जेवण करायचं असं सर्वानुमते ठरलं आणि चालत राहिलो. एकदाचं टाक्याने दर्शन दिलं वाहिनींनी घरून अप्पे अन् चटणी आणली होती, चीजसेंडविच सोबत क्षणार्धात पोटाच्या कुठल्या कोपऱ्यात गेलं कळलंच नाही. थोडी विश्रांती घेऊन तासादीडतासात रमतगमत माथ्यावर पोहोचलो. माथ्याच्या अलीकडे वाट चांगली बांधुन काढलीये. मध्ये पाण्याची दोनएक टाकेपण दृष्टिस पडले. इतिहासकाळात घाट वाहता असल्याची ही चिन्हे होती. शेवटच्या टप्प्यात आंब्याची भरपूर झाडे, वाटेत पडलेल्या कैर्या चाखत आणि भर उन्हाळ्यात शितलछायेची ही वाट मोठं डोंगरसुख देऊन गेली. घाटमाथ्यावर एवढं मोठं पठार क्वचितच एखाद्या गावाला लाभलेलं असेल. उजवीकडे दिसणारा झाडीभरला डोंगर दिसतो, तो ओलांडून गेलो की कोंढवळ मार्गे भीमाशंकरची चाल मस्त निसर्गरम्य आहे अन् डावीकडे अफाट अशी कोंकणाची पोकळी आहे. मछिंद्र आणि गोरखगड या द्वयीँचे नयनरम्य दर्शन इथून होते. कोंकणबाजूचे डोंगरतुकडे अलगद कुणीतरी काढुन नेल्यासारखे सरळसोट तुटलेले कडे बघितले की डोळे विस्फारुन जातात. "योगेश, इथंच कड्यावर कुठेतरी तंबू टाकुया का?" कड्यावरचा मुक्काम, ही कल्पनाच मुळी रोमांचित करून गेली. "पुढे एक मस्त जागा आहे, देवराईजवळ तिथून हा कडा पण जवळ आहे, तिथे करूया मुक्काम", इति योगेश.


कच्च्या रस्त्याने आमची पायगाडी पुढे सरकली, आता सवय झालेल्या हावभावांनी अहूप्यातले लोकं आमच्याकडे बघत होती. डोंगरातल्या इतर गावांसारखंच हे गावही निवांत होतं. या गावाला देशापेक्षा कोंकण जवळ करून देणारा अहुपे घाट हा जुना व्यापारमार्ग. कदाचित मंचरपासून या अहुपेमार्गे व्यापारी माल खालीवर पोचता केला जात असेल. इथली सगळीच लोकं शेती करणारी असली तरी आजुबाजुच्या जंगलावर अवलंबुन असणारी महादेव कोळी ही जमात खुप महत्वाची ठरतात. कारण त्यांच्याच प्रयत्नांनी अजुनही शाबूत असलेली अहुपे देवराई आजही सुरक्षित आहे. मैदानावर इतरत्र न आढळणारा गर्दझाडीचा हा भूभाग सहज लक्षात येतो, तिकडेच आमची पावलं पडत होती. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा सांजवेळ होत आली होती, नारायणराव ड्यूटी संपवून निघण्याच्या तयारीत होते. कड्यावरून सूर्यास्त पाहून तंबू ठोकायला सुरवात केली, चुलही पेटली. मोकळ्या आकाशाखाली डोंगरातला संसार मांडल्या गेला. गरमागरम सुपचे घोट घेत गप्पा रंगल्या होत्या. चुलीवर मसालेभातासोबतच सोयाबीन बिर्याणीचाही बेत जमून आला होता. जेवणं झाल्यावर परत एकदा कडा न्याहळीत बसलो होतो, खालच्या खोपीवलीत लग्नाघरचा कर्ना अजुनही ठणाणा करीत होता, वाऱ्याच्या झुळकेसह त्याचा आवाज अध्येमध्ये वर येत होता. गारठा वाढत होता. टेंटमध्ये घुसलो ते पहाट उजाडेपर्यंत.


ओसाड माळरानावर हिरव्यागार झाडीचा एक मस्त असा भूभाग आहे, उंचच उंच झाडे आभाळाला टेकली आहेत. झाडांचा शेँडा न्याहाळता कदाचित डोक्यावरील टोपी खाली पडावी. याच झाडांना, आश्रयाला आलेल्या असंख्य वेलीँच घट्ट आवरण लाभलंय. हे झालं बाह्यरंग, पण जेवढं शांत बाहेरून वाटतंय तेवढं ते आतुन नसणारच मुळी.एक छोटीशी पायवाट आपल्याला आत घेऊन जाते, झाडांचं, वनस्पतींचं,प्राण्यांचं एक वेगळंच जग. सगळं कसं जिवंत. कदाचित त्यांना आपण त्यांच्या जगात शिरलेलं आवडणारही नाही. अगदी मधोमध एखादा चौथरा किंवा दगडमातीने बांधलेलं छोटेखानी देऊळ.देवराईचं हे वर्णन आमच्यासमोर अहूप्याच्या रूपाने जिवंत झालं, मात्र पहिलीच गोष्ट खटकली ती म्हणजे अगदी मधुन गेलेला गावचा मुख्य डांबरी रस्ता अन् दुसरं म्हणजे जुनी कात टाकलेलं देऊळ ! चकचकीत फरश्या अन् विटासिमेंटचं बांधकाम बघुन निराश झालो. नशीबाने इथली जुनी झाडे अजुनही शाबूत आहेत. भीमाशंकर अभयारण्याअंतर्गत राखलेली ही देवराई सर्वोच्च परिसंस्थेचा एक उत्तम नमुना आहे, जणु एक छोटेखाणी जंगलंच.देवराईतून फेरफटका मारून झाला. बाहेर उन्ह रणरणतय तर आत देवराईची शितल सावली,माकडांचे चित्कार. इथूनच घोड नदीचा उगम होतो, उंच झाडांच्या फांद्यांवर माकडांसह आम्हाला राज्यप्राणी शेकरु म्हणजेच "जायंट स्क्विरल" याचंही चांगलं जवळून दर्शन झालं. कितीतरी वेळ ते आमच्यासोबत होतं. गरमागरम आमलेटवर ताव मारून परतीच्या बसची वाट पाहत बसलो तेव्हा उन्ह चांगलीच वर आली होती. योगेश एकटाच परत घाट उतरून खोपीवलीला जाणार होता, बाकीच्यांनी मात्र राजगुरुनगरच्या येस्टीने परतीची वाट धरली. येत्या पावसाळयात परत एकदा अहुप्याचं निसर्गसौंदर्य अनुभवायला पावले इकडे वळतील,यात वादच नाही !सर्व छायाचित्रे साभार - निलेश उमरकर.
 
धन्यवाद । संदिप वडस्कर
(Comment box or wadaskarsandip@gmail.com यावर तुमच्या प्रतिक्रिया कळवु शकता )
या ब्लॉगद्वारे एकच विनंती, संपुर्ण सहयाद्री तुमच्या भिंगऱ्या लागलेल्या पायांसाठी मोकळा आहे, भटकताना मात्र जबाबदारीचे भान ठेवा. तुम्ही जे अनुभवताय, तुम्हाला वाटत असेल तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावं, त्यांनाही अनुभवता यावं तर खालील सूचनांचे काटेकोर पालन करा...... मोठ्या संख्येने जाण्याचे टाळा, गोंगाट टाळा, प्लास्टिक टाळा........ निसर्गाचा मुक्तपणाने आस्वाद घ्या,निसर्गालाही मुक्तपणाने जगु द्या !

1 comment:

  1. संदीप, ब्लॉगपोस्ट खूपच छान आहे.....
    मी Maddy....तुमच्या भटकंतीच्या वाटेवर पाबे घाटात भेटलेला
    Nice to connect you here :-)

    ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences