मावळातुन कोंकणात -एक भन्नाट सह्यभ्रमण


© Sandip Wadaskar
आम्ही एवढे गड- किल्ले भटकतो. कधीतरी कुणीतरी विचारतं "तुम्हाला/तुला काय मिळतं किल्ले, डोंगरमाळ पालथे घालुन ?" यांना प्रतिक्रिया देताना विचार पडतो की कसं सांगावं,आम्हाला काय मिळतं ते. म्हणजे मी शब्दात सांगूच शकत नाही. याचं उत्तर तुम्हाला स्वतःला भटकंती केल्यावरंच कळेल, झोपेचं खरं सुख सह्याद्रीच्या गार जमिनीला पाट टेकल्यावरच कळेल,तिथल्या सायंकाळचा गारवा,कातळातले अमृततुल्य पाणी,डोंगरमाळ पालथे घालताना उमजणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणा,भूतकाळातल्या गुजगोष्टी सांगण्यास आतुर असलेली गुहांमधील निरव शांतता,मोहिमेवरून आल्यानंतर आपल्या महाराजांची पंचारती ओवाळण्याच्या प्रसंगाचे मुक साक्षीदार असणारे किल्ल्यांवरील बुलंद दरवाजे,दुर्गांची दुर्गमता जाणवणारे बेलाग सह्यकडे,असं बरंच आणि खूप खूप! इतिहासाबद्दल वा महाराजांबद्दल थोडेसे जरी वाचनात आले ना की संबंधित किल्ल्याला भेट दिल्याशिवाय चैनच पडत नाही. मग सुट्ट्यांची जुळवाजुळव आणि भिडूंची पण. तरी आम्ही नशीबवान,आठवड्याअंती दोन सुट्ट्या जोडुन असतात. असो. असंच एका ट्रेकला असताना मोहीम आखल्या गेली होती,"पाच किल्ले-दोन दिवसात".तिकोना-तुंग-लोहगड-विसापूर-कोरीगड. अख्खं मावळ. पण गँगला मोठ्या ट्रेकमध्ये कमीत-कमी एक तरी घाट चढण्याची वा उतरण्याची इतकी सवय पडलीये की त्याशिवाय ट्रेक केल्यासारखे वाटतच नाही. प्रसाद ने मोहिमेत बदल केला "तिकोना-तुंग-घनगड-नाणदांडघाट-सुधागड" आणि झालेच तर सवाष्णी घाटाने तैलबैल!

© Sandip Wadaskar
ऑफिस वगैरे आटोपून घरातुन निघेपर्यंत सगळ्यांना संध्याकाळचे सात-साढेसात झाले आणि लोकल पकडून स्वारी कामशेतला पोहोचली. पवनानगर गाठायचं होतं. मुंबई-पुणे हमरस्त्याच्या बाजुला थांबुन भटकी गँग नेहमीप्रमाणे अनोळखी वाहनांना हातवारे करत उभी होती. गाडी मिळेपर्यंत बाजूच्याच टपरीवर प्रत्येकांनी मागे-पुढे करत एक-एक दाबेली हाणली आणि थोड्या वेळाने एकाने ट्रक थांबवला. ट्रक मध्ये पटापट उड्या पडल्या,पवनानगरचा प्रवास सुरु झाला. रात्रीचं काही दिसत नव्हतं म्हणुन बसायला शक्य झालं. कारण ट्रक नुकताच वीटा वाहून आला होता,हे नंतर कळलं.प्रवासाचा आनंद पण घेत होतो आणि ट्रकमधल्या लाल धुळीला शिव्या पण घालत होतो.अर्ध्या तासात पवनानगरला पोहोचलो.रात्रीचे साधारण १०-१०:३० झाले असतील. गावातल्या पारावरची वर्दळ जरा कमी झाली होती.रात्रीच्या प्रहरी या भागात भुरट्या चोरांचा सुळसुळाट असतो,असं ऐकुन होतो. तसंही या चोरांना आम्हा भटक्याकडे मिळणार तरी काय होते? गावकऱ्यांना वाट विचारायला गेलो तर त्यांनी देखील चार मनाचे बोल ऐकवायला सुरवात केली. रात्रीचा गावातच मुक्काम करावा लागणार की काय ? हा विचार करत असतानाच एका आजोबांनी ,"चार-पाच जण आहात तर जाऊ शकता" असं सुचवुन तिकोन्यावरच्या सरकारी दिव्याकडे बोट दाखवले. तिकोना पेठची वाट धरली. रात्रीच्या गूढ शांततेत पवना नदीचा पुल ओलांडुन पाऊन-एक तासात पेठ गाठलं. पेठेत कुत्र्यांनी भुंकून आमचे स्वागत केले. दाट झाडीतली गाडीवाट पार करून चढणीला लागलो. भुक लागली होती पण माथा गाठूनच जेवण करायचं असं ठरल्यामुळे न थांबता अंतर कमी करत होतो. अर्ध्या-पाऊन तासात छोटा दरवाजा ओलांडल्यानंतर पोहोचल्या पोहोचल्या गार वाऱ्याने आमचे स्वागत केले.सपाट जागा दिसली,पथाऱ्या पसरल्या. नेहमीप्रमाणे वाघ बंधूंनी घरून जेवणाचा डबा आणलेला. जेवण उरकलं आणि टेंट टाकुन झोपी गेलो.

© Sandip Wadaskar
सकाळी जाग आली तेव्हा तांबडं फुटायला सुरवात झाली होती.उत्तरेकडे लोहगड-विसापूर,पश्चिमेकडे पवनेच विस्तीर्ण जलाशय आणि पल्याड तुंग असा चौफेर नजारा,मन एकदम हर्शोल्हासित झालं. लगेच आवरून गड फिरायला सुरवात केली.गडाचा घेर फार कमी. तुंग-तिकोना-लोहगड-विसापूर-कोरीगड या दुर्गपंक्तीतला मावळातला एक छोटेखानी किल्ला! हे किल्ले सहसा घाटवाटांवर व मावळ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले.पैकी तिकोना-तुंग हे तर खूपच छोटे किल्ले.आम्ही बालेकिल्ल्याकडे चालायला सुरुवात केली. मोठ्या टाक्या शेजारील गुहेत एक साधूबाबा वस्तीला होते. पाण्याने बाटल्या भरून घेतल्या. थोडं पुढे गेल्यावर चुन्याचा घाना दिसतो,याचा उपयोग बांधकामासाठी लागणारा चुना तयार करण्यासाठी होत असे.बालेकिल्ल्याच्या पायऱ्या चढायला लागलो.कातळातल्या खोदीव पायऱ्या चांगल्या दमछाक करणाऱ्या आहेत.आम्हाला दरवाजा दिसला की आम्ही खुश होतो. नेहमीप्रमाणे बालेकिल्ल्याच्या या भव्य प्रवेशद्वाराने आम्हाला खुश केले. बुरुजाची तटबंदी तर अप्रतिम! एवढ्याश्या जागेत एवढं भक्कम बांधकाम कसे काय केले असतील याचाच विचार आम्ही करीत होतो. कातळ आणि तटबंदीच्या बेचकेतुन तुंग आणि पवनेचा जलाशय मोठा मस्त दिसत होता.पायऱ्या चढताना दमवणूक झाली खरी पण उजव्या बाजूच्या कातळातले कोरलेले टाके बघुन थकवाच नाहीसा झाला. अमृततुल्य पाणी पिऊन निवांत थोडा वेळ विसावलो. सूर्याची सोनेरी किरणे आता माथ्यावर पडायला सुरवात झाली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने भराभर उर्वरित गड पाहण्यास सुरुवात केली. पुढे गेल्यावर भग्नावस्थेत असलेली पिंड आणि नंदी,बाजूलाच वितंडेश्वराचे मंदिर आहे. कदाचित या शिवालयामुळेच किल्ल्याचे नाव वितंडगड पडले असावे. पिंडीच्या मागच्या बाजूला गेलो की कातळात खोदलेल्या सुरेख गुहा आहेत. पावसाळा सोडुन राहण्यास उत्तम मुक्कामाचे ठिकाण! 


© Sandip Wadaskar
किल्ल्याच्या घेऱ्याप्रमाणे याचा इतिहास पण तोकडाच. शिवाजी महाराजांनी हा किल्ला निजामशाहीतून स्वराज्यात दाखल केला आणि दोन-तीन वर्षांनी नेताजी पालकरांची इथे नेमणूक झाली. पुरंदरच्या तहात मुघलांकडे गेलेल्या तेवीस किल्ल्यांपैकी हा एक होता. नंतरच्या काळात संभाजी-अकबर भेटीदरम्यान अकबर इथे राहावयास आला होता.बाकीच्या किल्ल्यांसारखीच इंग्लिश-मराठे युद्धात  या किल्ल्याचे सुद्धा बरेच नुकसान झाले. सर्वोच्च माथा चढुन आम्ही डोंगर-किल्ले ओळखायला सुरुवात केली. अर्थातच ठळक दिसणारे लोहगड-विसापूर उत्तरेला,समोर तुंग-कठीणगड(आमचे पुढचे लक्ष्य!),पवना नदीवरचा विस्तीर्ण जलाशय! वाह ! मावळातलं हे विहंगम दृश्य डोळ्यात साठवत तिथेच बसुन रहावसं वाटत होतं,पण वरून सुर्यनारायणाने तापायला सुरवात केली होती. आता काढता पाय घेणे भाग होते. गडाच्या दुसरया दांडाने उतरण्यास सुरवात केली. झुडपातून घसरडी वाट काढीत तिकोना पेठेत पोहोचलो.


© Sandip Wadaskar
सकाळची न्याहारी आटोपली आणि वाहन न मिळाल्यामुळे जवण गावाचा रस्ता धरला. तिकोना पेठ ते जवण हे अंतर सुमारे ४ किमी. सखा तिकोना सोबतीला होताच. डावीकडे तिकोना,उजवीकडे तुंग असे ठेवीत पाऊन-एक तासात आम्ही जवण गावात पोहोचलो. पारावर लोकांची सकाळची घाई-गडबड चालली होती,आम्हाला येथुन तुंगवाडीला जायचं होतं. सुमारे १० किमी चं अंतर. पायी चालायला हरकत नव्हती पण तीन तास गेले असते. शेवटी एका रिक्षावाले काकाला ठरवुन मोरवे गावाची वाट धरली. पवना जलाशयाला वळसा घालून अर्ध्या एक तासात तुंगवाडीत पोहोचलो. गडाच्या पायथ्याकडे चालायला लागलो. उन्हं चांगलं जाणवत होतं. वाटेत लागलेल्या एका आजोबाच्या घरी थोडं विसावून,पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि शेतातल्या वाटा तुडवत पायथ्याकडची भटकंती सुरु झाली.पायथ्याला पोहोचलो तेव्हा ३-४ मोठमोठ्या झाडांच्या शीतल छायेनी उन्हाचा आलेला शीणच गायब झाला. वडाच्या झाडासारखे दिसणारे वृक्ष. लटकलेल्या असंख्य पारंब्या. आजूबाजूला दाट झाडीत विसावलेले मारुतीचे मंदिर. जागाच मस्त होती. जेवायच्या आधी गड फिरून यायचं ठरवलं. आवारात सह्याद्री प्रतिष्ठान ने किल्ल्याच्या माहितीचे फलक लावलेले आहेत. पालापाचोळ्यात पडलेल्या दगडी गोळ्याने लक्ष वेधुन घेतले,कितीतरी वेळ आम्ही त्याचा विचार करीत होतो. गड चढायला सुरुवात केली. 
© Sandip Wadaskar
तिकोन्यावरून पाहिले तर तुंग असा उत्तुंग सुळक्यासारखा भासतो. गड चढायचा कसा हाच विचार पडतो. पण तुंगवाडीत पोहोचल्यावर गोमुखी प्रवेशद्वार रस्त्याचे मार्गदर्शन करतो. रस्ता कळल्यावर दाट झाडीची वनराई सोडुन उघड्या बोडक्या माथ्यावर कूच केले. थोडंसं चढावर गेल्यावर पायथ्याच्या हिरवाईने नेत्र सुखावले,पण तेवढंच उन्हामुळे डोकं तापायला सुरुवात झाली. अर्ध्या पाऊन तासात पहिल्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. दरवाज्याची बरीच पडझड झालीये,कमानच तेवढी शाबूत आहे. आणि उजव्या बाजूला तटबंदी. पुढे गेल्यावर दुसरे प्रवेशद्वार लागते,गोमुखी पद्धतीने बांधलेलं. याची परिस्थिती तर अजूनच भयंकर आहे. बाजूलाच हनुमानाचे कोरलेले दगडी शिल्पं आढळते. माथ्यावर पोहोचलो. डाव्या बाजूने सर्वोच्च माथ्यावर जाण्याचा मार्ग आहे आणि उजव्या बाजूला गणेश मंदिर. मंदिरात महाराजांचा फोटो ठेवला आहे. जवळच सदरेची जागा आणि टाकं. पाणी पिण्यास अयोग्य. गणेशाला नमस्कार करून सर्वोच्च माथा गाठला. बालेकिल्ल्यावर तुंगाई देवीच्या देवळाशिवाय पाहण्यासारखे काही नाही. आणि जागा पण खूप कमी. पण हो इथे आल्यावर अख्ख्या मावळाचे विहंगम दृश्य दृष्टीस पडतं. लोहगड,विसापूर,मागे तिकोना अशा इतर मावळ सख्यांची भेट होते. पवनेच विस्तीर्ण जलाशय,आणि पुढ्यात हुबेहूब तुंग सारखा दिसणारा खोटा तुंगी लक्ष वेधून घेतात. आणि हो अजुन एका जागेकडे आपले लक्ष जाते ते म्हणजे बालेकिल्ल्याच्या कातळात खोदलेली गुहा. कदाचित इथे बसुन पहारेकरी मावळ परिसराचे निरीक्षण करीत असावे. मधोमध असणाऱ्या खांबावर भगवा वाऱ्याने फडफडत होता. थोडा वेळ थांबुन गड उतरायला सुरुवात केली. वनराई मध्ये विसावलेल्या मारुतीच्या मंदिरात परतलो. तहानलाडू भूकलाडू संपवले. गार सावलीत मस्तपैकी पंधरा-वीस मिनिटे पडी टाकुन आराम केला. आमचं पुढचं लक्ष्य होतं घनगड. 

© Sandip Wadaskar
पायथ्याचे गाव येकोले. पण त्यासाठी सर्वात आधी लोणावळा-amby valley रस्त्यावरील ८ किमी अंतरावर असलेलं घुसळखांब गाठायचं होतं. तुंगवाडीत,इथे बस येते पण वेळ चुकली होती. पायी गेलो असतो तर परत दोन तास गेले असते. गावात एकमेव उभी असलेली गाडी आणि बाजूलाच झोपडीत वामकुक्षी घेत असलेला ड्रायव्हर दिसला. त्याला पटवुन आमचा प्रवास सुरु झाला. तेथुन पेठ शहापूर टेम्पोने. आता परत भांबुर्डे ला जायला कुठली गाडी मिळते का? याचा विचार करीत बसलो. रस्त्यावरूनच किल्ले कोराईगडाची अभेद्य तटबंदी लक्ष वेधुन घेत होती. मागच्या आठवड्यातच इंद्रा आणि प्रसाद गडाला भेट देऊन आले होते. वाहनाची वाट पाहता पाहता कंटाळा आला होता,वाटत होतं यावं गडावरून फेरफटका मारून. आणि सुदैवाने एका माणसाने त्याची गाडी थांबवली आणि अर्ध्या तासात येकोले गावाच्या फाट्याजवळ पोहोचलो. संध्याकाळचे साढेतीन-चार झाले असावेत. घनगडाकडे चालायला सुरुवात केली. फाट्यावरूनच चौकोनी आकाराचा घनगडचा आणि त्याला खेटूनच डाव्या बाजूला म्हातोबाचा असे दोन डोंगर दृष्टीस पडतात. प्रसाद आणि निखिल पटापट पावले टाकत पुढे निघुन गेले होते. इंद्रा,प्रसन्न आणि मी एका आजोबांनी विचारपुस केल्यामुळे त्यांच्या सोबत गप्पा मारत उभे होतो. मग "कोण गावचे ?" वगैरे विचारपूस झाली,जवळच असलेल्या हापश्या वर तोंडावर पाणी मारून पुढे निघालो. पायथ्याजवळ पोहोचलो तेव्हा "शिवाजी ट्रेल चे मिलिंद क्षीरसागर सर इथेच आहे आणि आपण त्यांची भेट घेऊ. " असं प्रसाद म्हणाला. अरे वाह ! चला मग. 
© Sandip Wadaskar
पंधरा-वीस मिनिटे त्यांच्याशी मनसोक्त गप्पा झाल्या,मध्येच त्यांनी मागवलेल्या रानमेव्यानी गप्पांमध्ये अजूनच गोडवा आला. घनगडाचे संवर्धन यांच्याच अखत्यारीत चालू आहे. ऐतिहासिक किल्ल्यांकडे असणारे सरकारचे त्याचबरोबर आपल्यासारख्या जनतेचे दुर्लक्ष. अक्षरशः "किल्ला हा तुमच्या प्रशासकीय हद्दीत आहे" असे पटवून देण्यासाठी त्यांनी सरकारकडे मारलेल्या  फेऱ्या. मग शाळेतील,कॉलेज मधील विद्धयार्थ्यांना जमवुन उन्हाळी शिबीर, अशा माध्यमातुन किल्ल्यांच्या डागडुजीसाठी श्रमदान करवुन घेणे. अशा बऱ्याच गोष्टीवर गप्पा रंगल्या होत्या. शेवटी "तुम्हाला असे गडकिल्ले फिरतांना बघुन खूप आनंद झाला,असेच भटकत राहा" अशी कौतुकाची थाप आमच्या पाठीवर पडली. आम्हाला पण आनंद झाला. दुर्गसंवर्धनासाठी आयुष्य पणाला लावलेले अफलातुन व्यक्तिमत्व. शिवाजी ट्रेल चे संस्थापक आणि तरुणांसाठी प्रेरणादायी मिलिंद सरांची भेट,हा खरच मस्त अनुभव होता. © Sandip Wadaskar
आम्ही गडाकडे कूच केले. दाट रानातून वाट काढीत गारजाई देवीच्या मंदिरापाशी पोहोचलो. आजूबाजूला दाट झाडी असलेलं हे मंदिर मुक्कामाला पण मस्तच. मंदिरात sack ठेऊन गडाकडे निघालो.घनदाट झाडीने वेढलेला सह्यपर्वतावर वसलेला एक छोटेखानी किल्ला. सुरवातीलाच गडासंबंधी ऐतिहासिक नोंदी असलेला फलक शिवाजी ट्रेल ने लावलेला आहे.झाडीतून वाट काढीत आम्ही महादरवाज्याजवळ पोहोचलो. रंगरंगोटी केलेल्या दरवाज्यातुन आत गेल्या गेल्या भव्य कातळ कड्याने लक्ष वेधुन घेतले. कातळात असलेल्या गुहेत पण मुक्कामाला जागा मस्त! येथून वर जाण्यासाठी शिवाजी ट्रेल ने आता शिडी बसवलेली आहे,त्याआधी दगडात कोरलेल्या खाचांमध्ये पाय रोवूनच जावं लागत असे. शिडी पार केल्या केल्याच कातळात एक खोदीव टाके. पाण्याची चव नेहमीप्रमाणे सुमधुर! दक्षिण बुरुजाकडे वळलो आणि सह्याद्रीच्या तुटलेल्या कड्यांनी डोळेच  फिरवले. कडा उभाच खालच्या नाळेत कोसळला होता. बालेकिल्ल्यावर टाक्या व्यतिरिक्त बारमाही पाण्याची विहीर पहावयास मिळते. तैलबैलेच्या कातळभिंती लक्ष वेधून घेतात. 
© Sandip Wadaskar
किल्ले घनगड उर्फ येकोल्याचा किल्ला. कोरसबारस मावळातला वाघजाई आणि सवाष्णी घाटाचा पहारेकरी. किल्ल्याला इतिहास फारसा नाही. पुरंदरच्या तहात गेलेला तेवीस किल्ल्यांपैकी एक. पुन्हा स्वराज्यात दाखल होऊन छत्रपति राजरामाच्या काळापर्यंत मराठ्यांकडे  होता. नंतरच्या काळात कान्होजी आंग्र्यांकडून पेशव्यांकडे आला. पेशवे किल्ल्याचा उपयोग कैदखाना म्हणून करत होते. आणि नेहमीप्रमाणे कर्नल प्राथरच्या तोफेसमोर नतमस्तक होऊन ब्रिटीशांकडे गेला.

पुढ्यात सुधागड,सरळ अस्पष्ट असा सरसगड आणि सुधागड-तैलबैल-घनगड या त्रिकुटांच्या मधल्या दरीकडे आणि मावळत्या सुर्यनारायणाची सोनेरी किरणे झेलत आम्ही कितीतरी वेळ पहुडलेल्या सह्याद्रीकडे पाहत बसलो होतो. 

क्रमशः 

6 comments:

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences