पश्चिमेचा गार वारा....!

गेलं वर्ष ट्रेकच्या नावाने चांगलंच दुष्काळग्रस्त निघालं, तेवढी गौताळ्याची आडवाटेवरची किल्लेगिरी अन् सवाष्णी-वाघजाईची व्हाया ठाणाळे रपेट सोडली तर पायांना कुठे तंगडतोड नाही की खांद्यांना कुठे पिट्ठूचे काचे नाही. घामाने निथळलेली पाठ जमिनीवर कुठे टेकवलेली आठवत नाही, खडकातलं गारेगार पाणी पिऊन कितीतरी वर्षे लोटली असं वाटतंय, या सह्याद्रीची इतकी सवय होऊन गेलीये की गेलं वर्ष माझं मी कसं काढलंय हे मलाच माहिती. या सह्यमंडळाच्या मायेच्या ओलाव्याशिवाय आयुष्य सगळं शुष्क आहे,हे मात्र कळुन चुकलं. सासुरवाशीण जशी वाट बघतीये, कधी माहेरची माणसे येतील आणि तिला माहेरा घेउन जातील, अगदी तशीच अवस्था झालीये अस्मादिकांची !  आणि तसं बोलावणही आलं होतं सह्याद्रीचं, तसं ते नेहमीच आलेलं असतं म्हणा. पण यावेळी मी त्याच्या हाकेला "" द्यायचं ठरवलंच होतं. म्हटलं चला आता पुन्हा एकदा नव्याने सुरवात करायला हरकत नाही.
बाहेर उन्हाचा दाह वाढत असला तरी आता मला कुणाची पर्वा नाही. फाल्गुनोत्सव जवळ येतोय, सह्यमंडळात लालभडक पळस फुलला असणार. करावंदांना मोहर आला असणार, तशी करवंदीची चव चाखायची म्हणजे मे जुनशिवाय पर्याय नसतो. पण किमान त्याचा मोहर बघुन तरी यावं. आंब्याची झाडे सूद्धा बहरली असणार, त्याचा सुगंध घेऊन यावं. या डोंगरातलं जीवनच वेगळं असतंनाही ? , स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, सिमेंटच्या जंगलात अनुभवता न येणारा असा निर्मळ सूर्योदय-सूर्यास्त. पण कधी कधी भीती वाटते, आपण जसा विचार करतोय तोच विचार हे डोंगरवासी करीत असतील का ? तर ती भीती इथे खरी ठरते, कारण त्यांनाही डोंगरात राहून उबग आलेला असतो, शहरी लोकांपेक्षा ह्या लोकांचे प्रश्न फार वेगळे आहेत, तेही मुलभुत. आणि ते स्वभाविक आहेत, त्यांनाही चांगले रस्ते,वीज,पाणी ह्या सर्वांची गरज भासतेच. शहरात आली की मग ही माणसं हुरळून जातात. शेवटी माणसाला बदल हवा असतोच. अन् त्याच बदलाच्या पायी आपण डोंगरांची वाट जवळ करतो, हेतु प्रत्येकाचा वेगळा असु शकतो. नाही का ?

आम्हा भटक्यांना हक्काचं असं माहेरघर, हरिश्चंद्रगडाशिवाय दुसरं कोण असणार ? भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेला खुद्द हरिश्चंद्र आपल्या स्वागतासाठी नेहमीच तत्पर असला तरी इथला एक माणूस मनात भरतो तो म्हणजे कोंकणकड्यावरचा भास्कर. तेवढंच प्रेमळ त्याचं कुटुंब. इथे आलं की कसं माहेरी आल्यासारखं वाटतं, चटणी-भाकर का होईना, आग्रहाने खाऊ घालणारी ही डोंगरातली माणसं मला शहरी लोकांपेक्षा अधिक जवळची वाटतात. या माणसांसारखाच  हरिश्चंद्रगड हाही कधीच नाराज करीत नाही, फक्त ते प्रेम अनुभवायचं असेल तर तुमच्या पायात जोर आणि डोकं बिनघोर पहिजे. ते असलं की झालं, तुम्ही या रांगडया गडाच्या प्रेमात पडलाच म्हणुन समजा.किल्ल्यावर पोहोचणाऱ्या प्रत्येक वाटा ह्या धुंडाळण्यासारख्या, किल्ल्याच्या आवारातला कोपरा न् कोपरा डोळ्यांना अगदी सुखावणारा, ऋतु कुठलाही असो कोंकणकड्यावरचा गारवा हा हवाहवासाच. त्यामुळे ईथे यायला असं खास कारण लागत नाही, पाठीवर पिशवी चढवायची आणि पायगाडी सुरू करायची. पण या वेळेस एक खास निमित्त पुढे करूनच निघालो होतो. बऱ्याच वर्षांपासून मनात घर करून राहिलेला साधले घाट खुणावत होता. कोंकणातून माथ्यावर येणारी ही खुप महत्वाची घाटवाट, जुनी नळीची वाट म्हणायला हरकत नाही. पण कानामागून येऊन तिखट झालेल्या नळीच्या वाटेमुळे पार झाकल्या गेलीये. काही केल्या साधले घाट हुलकावणी देत होता. शेवटी एकदाचा  प्लॅन ठरवलाच,भेट द्यायची ती जुन्नर दरवाजा चढून आणि तळकोकण गाठायचं ते अगदीच दुर्लक्षित असलेल्या बैलघाट अन् साधले घाट उतरून.
यावेळी ट्रेकला सोबत करणारे विशेष होते. आमचा ब्लॉगर मित्र योगेश, लिंगाण्याच्या चढाईबद्दल सहज त्याचा पिंग आला. बोलता बोलता मी सादडे घाटाचा प्लॅन करतोय, असं बोलून गेलो. दोनच दिवसांनी पठ्ठयाचा मेसेज,"तुझा हरीश्चंद्रगडाचा प्लॅन कसा आहे ?", मनातल्या मनात म्हटलं, चला एका दर्दी भटक्यासोबत ट्रेकची मज्जा येणार. तशी थोबाडपुस्तकात असलेली आमची जुनी ओळख. पण ती वेवलेंग्थ जुळायला डोंगरातली एखाद पायवाटच सोबत तुडवावी लागते, त्यानंतर मग त्या मैत्रीसारखी मजा नसते, तुम्हाला सांगतो. या अशाच डोंगरमैत्रीतून मला माझी बायको गवसली होती, तीच माझी जिवाभावाची ट्रेकरमैत्रीण रेश्मा. योगेश गोटात सामील झाला.  रेश्मा येणारच होती आणि तिसरी होती माझी बहीण पल्लवी ! शनवाऱ्या पहाटेचा ब्राम्हमुहूर्त साधून आम्ही तिघे घरातुन बाहेर पडलो, योगेश कल्याणहून निघाला.पहाटेपहाटे शिवाजीनगर बसस्टँडला नेहमीच्या जामधून वाट काढत गाडी आळेफाट्याकडे रवाना झाली. झोपेची थकबाकी गोळा करत आळेफाट्यावर उतरलो, योगेश खूबी फाट्याला पोहोचला होता, आम्हाला थोडा उशीर होणार होता त्यामुळं त्याने पायगाडी सुरू केली होती. थोडक्यात उदरमभरणम आटोपून ओतूरवरून पिंपळगाव मार्गे आमची येस्टी खिरेश्वर कडे मार्गस्थ झाली. साधारण आठ वर्षांपूर्वी याच रस्त्याने जीपच्या टपावर बसुन जवळ केलेल्या पहिल्या हरिश्चंद्रगड भेटीच्या आठवणी जाग्या झाल्या. तूर्तास पिंपळगावजोग धरणाला वळसा घालून जाणाऱ्या रस्त्याची अगदीच दुर्दशा झालीये. अखंड येस्टी हेलकावे खात निघाली होती, त्यातही येस्टीचं मला कौतुक वाटून गेलं. ते मला नेहमीच वाटत आलेलं आहे म्हणा, कारण डोंगरातल्या गावातुन तालुक्याच्या ठिकाणी जायला सर्वसामान्यांना हा एकमेव पर्याय असतो. आणि शाळेतल्या मुलांसाठी तर ही येस्टी, फाइवस्टार स्कूलबस पेक्षा कमी नसते. या शाळकरी पोरांच्या कलकलाटातच  पिंपळगावची एक एक वाडी कमी होत होती, डोंगरांची जवळीक वाढत होती. धरणाच्या पलीकडे सिंडोळा, देवदांडया, भैरवगड असे महारथी एकेककरून नजरेसमोर येत होते. रोहीदास, तारामती ही हरिश्चंद्रगडाची शिखरेही साद घालत होती. टोलार खिंडीला या वेळेस फाटा देणार होतो, कारण वाट राजनाळेची होती. खिरेश्वरास उतरलो तेव्हा उन्ह थोडं जाणवत होतं, घड्याळात साधारण साढ़ेदहा झालेले, ठरल्याप्रमाणे अर्धा तास उशीरच झाला होता. योगेश धरणाच्या भिंतीवरची पायपीट संपवुन कधीच चिंतामणच्या अंगणात विसावला होता. नमस्कार चमत्कार झडले आणि पाण्याचा साठा करून आमची पायगाडी वळवली ती राजमार्गाकडे.
आधी दोनवेळा ही वाट उतरून आलोय, यावेळी पहिल्यांदाच चढतोय. आधी सपाटीची आणि नंतर अलीकडच्या कळश्या डोंगराला भिडणारी ही वाट सुरवातीला झाडीमुळे खुप सुखावह वाटून जाते. आम्ही झाडीच्या सावलीत शिरलो आणि ओळखीचाच पण एक अनामिक सुगंध डोंगरात स्वागत केल्यासारखा जाणवून गेला. तो सुंगंध नाकात शिरून आमचाही हूरूप वाढला. पानगळ तुडवत पावले तालात पडत होती. पहिल्या दमाची चढ़ाई संपवुन पाण्याचा एक ब्रेक घेतला,त्याच सपाट्यात छोटासा माथा गाठला.मागे पुष्पावतीचं पाणी ऊन्हाने चकाकत होता, दाह वाढत होता. आडवाटेवर झाडाजवळ मस्त सावली दिसली, तिथवर पोहोचलो तितक्यात पश्चिमेकडुन येणारी जोरदार वाऱ्यांची गारगार झुळूक आणि रोहीदास अन् तारामतीचा भन्नाट नजारा, हे दोघांच्या एकाच वेळेस भेटी झाल्यामुळे एकदम सुखावुनच गेलो. अप्रतिम ! तारामती शिखराच्या खालच्या सह्यकड्यांनी एकदम धडकीच भरली. तुटलेले कडे डोळे फिरवून जातात. फलाहार झालं,पाणी झालं. पश्चिमेचा वारा पिता पिता, पायवाटाही शोधून झाल्या. राजमार्गाचं पहिलं दर्शन झालं. मोरोशीचा भैरवगड आणि परिसर अजुन जवळ भासून गेला. आजूबाजूचा सह्यरांगेचा नजारा डोळ्यांसोबत कॅमेरांमध्येही टिपून पुढची घसाऱ्याची वाट कमी होत होती. पुढे काकडीवर ताव मारत नेढ्याच्या डोंगरात, त्याच्या पोटातून निघणारा ट्रॅवर्स पार केला, ही वाटसुद्धा सुंदर आहे. उजव्याबाजूला छातीवर येणाऱ्या कपारी अन् डाव्या बाजूची माळशेजची दरी, डोळे दिपवून जाते. ही दरी हळुवार उलगडत जाते, आधी रोहीदास, तारामती ही शिखरे नंतर रोहीदासला पोहोचणारी खालच्या पदरातली वाट,नंतर पायथ्याच्या थिटबीचा नजारा आणि शेवटी माळशेज घाट डोळ्यांसमोर समोर आला की समजायचं आपण बरोबर राजनाळेच्या पायथ्याशी आलोय.

घाटावरून नजर मागे वळवली की पुढ्यात उभा ठाकतो तो राजमार्ग. दगड-धोंड्यांची भन्नाट अशी राजनाळ ! इथून पुढे चढाई सगळी खडी. पाठपिशव्या आवळल्या, चढाईला सुरवात केली. घाटावरून सुरवात असल्यामुळे राजनाळेची वाट कोंकणातून चढणाऱ्या नाळेपेक्षा तर लहानच आहे. आणि एकदम खड़ी चढण असल्यामुळे गडमाथ्यावर पोहोचायला पण वेळ कमी लागतो, बाकी दगडधोंड्यांची वाट असल्यामुळे माथा जवळ करताना विशेष मजा वाटते. आम्ही थोडी सुरवात केली आणि तेवढ्यात वरून एक दगड घसरून पायाजवळ आलाच, सावधानतेचा इशारा मानुन परत सुरवात केली. गडाचा हा राजमार्ग, खोदीव पायऱ्या, पावट्या, वाटेत कोरलेल्या शिवलिंग, भग्न गणेशमूर्ती, इत्यादी अवशेषांच्या मदतीने स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी अलीकडच्या काळापर्यंत दुर्गम मानली जाणारी ही गडवाट,आता मात्र राजमार्गच होऊन गेलाय. नेहमीच गर्दीतून वाट काढणारी टोलार खिंडीची पायवाट किंवा पाचनईची अगदीच सोप्पी अशी डोंगरवाट यांना पर्याय म्हणुन राजमार्ग नेहमीच खुणावत असतो. राजनाळेची खुमखुमी जास्त  असते ती हरिश्चंद्रगडाच्या दर्दी वारकऱ्यांना ! एकदमच सोप्प्या श्रेणीचे कातळटप्पे पार करून आम्ही नाळेच्या तोंडाजवळ आलो आणि माळशेज दरीचा अजुन एक अद्भुत नजारा डोळ्यांसमोर आला
गडमाथ्यावर पोहोचलो तेव्हा कोंकणकडा भेटीची ओढ आणि पोटात भुकेचे आगडोंब एकाच वेळी उसळले होते. पण बालेकिल्ल्याच्या पायथ्याचं झाड बघुन आधी पोटोबा उरकून घेतला. आता ओढ होती ती भास्करजोडीची, बालेकिल्ल्याला वळसा घालुन जाणारा भयानक ट्रॅवर्स पार करून सपाटीला लागलो तेव्हा उन्ह उतरणीला लागलं होतं. मंदिराची वाट कमी होत होती. जसजसे जवळ जातोय तसतसा कैक दिवसांनी घरी परतल्याच्या भावना एकदम उचंबळून येत होत्या. योगेशही बऱ्याच दिवसांनी आला होता, त्यामुळं त्याचंही काही वेगळं नव्हतं. आजोबा, कात्राबाई, घनचक्कर, इत्यादी डोंगरसख्यांनी दर्शन दिलं. मंदिरात पोहोचलो तेव्हा महाशिवरात्रीची परतीची गर्दी इतरत्र रेंगाळत होती. दर्शन घेऊन पाण्याची तहान भागवली आणि तडक कोंकणकडा गाठला.
भास्कर झापावर नव्हता आणि दुसरा भास्कर अस्ताला अजुन बराच वेळ होता. भास्करच्या बाबांनी आत नेवून पिठलं भाकरी अन् कांदा, असा डोंगरी थाट असलेलं ताट समोर केलं. चारघास पोटात गेले,जरा बरं वाटलं. भास्करची भेट झाली, गप्पाटप्पा खेचून तिथुन पाय काढला तो कड्यावरच्या भास्करभेटीला. सुदैवाने कोंकणकड्यावर गर्दी कमी होती. थोडं पुढे जाऊन बसकण मांडली, नेहमीप्रमाणे पुढ्यात अनंत पसरलेल्या क्षितीजावरील तांबड्या छटा गडद होईपर्यंत रंगलेल्या गप्पा आटोपून मुक्कामी पोहोचलो. टेंट ठोकुन झाले. थोड्याफार वाऱ्यात चुल जरा उशीराच पेटली. गरमागरम सुपनंतर चुलीवर सोयाबीन बिर्याणीचा बेत शिजत होता आणि रात्र सरतीये तश्या आमच्या गप्पांना रंगत चढत होता. बिर्याणीनंतर, पातेल्यात हाफफ्राय तुडतुड करायला लागला तेवढ्यात, "आईशप्पत, भारीये !", योगेश उदगारलाच. "आधी कोत्रे लांब टाक, नायतर रात्री भूत येईल", या योगेशच्या वाक्यावर झोपेपर्यंत चांगलंच खळखळून हसत होतो. एकंदरीत हसण्याने आज दिवसभरच पोट दुखत होता म्हणा. कड्यावरचा मुक्काम हा नेहमीच अविस्मरणीय असतो. त्यातही सोबत असे दर्दी भटके असतील तर, भटकंतीला आणि त्याबरोबरच अश्या मुक्कामाला चारचांद लागतात.

पण कोंकणकड्यावरचा जोरदार वाहणारा वारा कधीकधी असह्य करतो, टेंटमधुन बाहेर पडायची देर, नाकातून गंगाजमुना वाहायला लागतात. यावेळेस आमचं नशीब चांगलं,वारा कमी असल्यामुळे  पहिल्यांदाच कोंकणकडा रात्री अनुभवता आला. होळीपौर्णिमा पुढच्याच आठवड्यात असल्याने चंद्राचा पुरेसा प्रकाश पडलेला. नभांगण असंख्य ताऱ्यांनी उजळले होते अन् खालच्या बेलपाडा, केळवाडीची झापं विजेच्या खांबांनी. माळशेज घाटही रहदारीने अविरत चमचम करतोय, पण सगळं कसं शांत. सिंडोळा, हडसर, देवदांड्या, त्याच्यामागे तळेरान, भोजगिरी, नाणेघाट, इटुकला भैरवगड, एकदम पुढ्यातला रोहिदास, इकडे नाफ्ता ,त्याच्याच बाजूला कलाडगद, मागे आजोबा,कात्रा ,घनचक्कर,पाबरगड, शिरपुंज्याचा भैरव अशी डोंगरांची आणि किल्ल्यांची अविरत साखळी जणु रात्रीच्या शांततेत ध्यानस्थ बसल्यासारखी जाणवत होती. असा चौफेर नजारा थक्क करून गेला. कोंकणकड्यावरून चंद्रसुद्धा कमी सुंदर दिसत नाही,ही नवीन प्रचिती आली. अशा भन्नाट आणि अविस्मरणीय आठवणींसाठीच तर पावले डोंगराकडे वळतात..नाही का ?

रात्रभर कुत्री भुंकत होती. त्यामुळं सकाळी जाग जरा उशीराच आली. भास्करच्या झापावर गेलो तर अपेक्षित टोमणा त्याने मारलाच, "झाला का सूर्योदय पाहून ?". ठरवल्याप्रमाणे आमचा सूर्योदय हुकला होता. त्याच्याकडे पोह्यांवर ताव मारून पुढच्या पायपीटीला सज्ज झालो. सगळ्यांची भेट घेऊन आम्ही बैलघाटाकडे चालायला सुरवात केली. आनंदाची एक गोष्ट म्हणजे भास्कर खुद्द आमच्यासोबत साधलेच्या खिंडीपर्यंत साथ करणार होता. त्यामुळे पुढची तंगडतोड अजुनच मजा आणणार होती. सह्याद्रीचे हे काटक शेर्पा भास्कर अन त्याचा मेहुणा पुढे पायाला भिंगरी लागल्यासारखे पळत होते. छोटयाश्या जंगलटप्प्यातून बैलघाटाच्या खिंडीत आलो तर समोर एकदम नाफ्त्याच्या जुळ्या सुळक्यांनी दर्शन दिलं. सुरवातीलाच भास्करच्या मेहुण्याने आम्हाला एका कपारीत  नेलं, त्यात पाण्याचा एक गोड झरा दाखवला. विशेष म्हणजे भास्करलाही याची माहिती नव्हती. आत पडलेल्या जनावरांची विष्ठा, ईथे त्यांचा खास अधिवास असल्याचं जाणवून गेला. पण कपारीतून होणारे समोरच्या दऱ्याखोऱ्यांचं दृश्य विहंगम ! थोडसं खाली उतरलो आणि हरिश्चंद्रपर्वताचं गडपण सिद्ध करणारा अजुन एक पुरावा समोर आला,तो म्हणजे कोंकण दरवाजा ! दरवाज्याचे आता फक्त अवशेषच उरले असले तरी खणखणीत तटबंदी आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जाते. परिणामी कोंकणातून चढणाऱ्या सादडे घाटावर महत्वाचा मार्ग म्हणुन शिक्कामोर्तब होतो. बाकी बैलघाटाची ही वाट सगळी झाडीची आहे, त्यामुळे मोहरलेल्या झाडांचा सुगंध घेत आम्ही निवांत उतरत होतो. उजव्या बाजूला कलाडगड अन् वाकडी सुळका, जणु शिवलिंग आणि नंदीसारखा भासुन जातो.

साधारण दोन तासांनी खालच्या पठारावर पोहोचलो तेव्हा हरिश्चंद्रगडाचा वेगळाच नजारा समोर आला, हा एकदम नवीन होता. पुणे जिल्ह्यातून सुरू होणाऱ्या दगडधोंड्यांच्या राजनाळेपासून (खिरेश्वर) ते नगर जिल्ह्यात उतरणाऱ्या झाडीने गच्च अशा बैलघाटापर्यंतची (पाचनई) पायपीट भन्नाटच होती. या दोन जिल्ह्यांसोबतच सादडे घाटाने वा नळीच्या वाटेने, ठाणे जिल्ह्याशी नाते जोडु पाहणारा हरिश्चंद्रगड भौगोलिकदृष्ट्या किती महत्वाचा आहे हे कळून येतं. कोंकणातल्या बेलपाडा गावातुन घाटावरचं पाचनई गाठायचं असेल तर हा साधले घाट हा उत्तम मार्ग.
असो, हा भूगोल असाच राहणार. तूर्तास पोटात भुकंपाचे धक्के जाणवायला लागले होते, त्याचं काय ? म्हणुन सादडे घाटातल्या उंबराच्या पाण्याजवळचा आमचा पोटोबा आधीच उरकायचा ठरवला. भास्करच्या "जोवर हाय पोटात भर, तोवर तंगड्यात हाय जोर" या गावरान म्हणीचा मान ठेऊन, पेठ-पाचनई रस्त्यावरच आमचा दुपारचा तंबू ठोकला. हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्यात मोडणारा हा भाग आजुबाजुच्या वस्तीमुळे थोडा गजबजलेला असला तरी रानातली शांतता अजुनही अभंग ! ओढ्याशेजारी आम्ही डोंगरातला संसार मांडला, विक्रमी वेळेत नकळत भास्करने पेटवलेली चुल बघुन रश्म्या तर आनंदाने उडत होती, "आईशप्पत, काय पेटलीये चुल!". कोण काही सांगायच्या आत प्रत्येक जण आपापल्या कामाला लागलं होतं, कोण पाणी भरून आणतंय, कोण भांडी घासतंय. व्वा ! यालाच तर डोंगरातली संघभावना म्हणतात. खालच्या ओढ्यात मस्त डुबकी मारून झाली. मसाले भात अन् अंडयाची भुर्जी यावर येथेच्छ ताव मारून झाला.


पायगाडी पुढे सरकली.बाकी ओढ्याकाठची जागा जाम आवडली आपल्याला, कधीतरी रात्रीच्या मुक्कामाला पावले इकडे नक्कीच परतणार, यात शंकाच नाही. दुपारचे दोन वाजले होते, उन्ह असलं तरी एवढं जाणवत नव्हतं. पेठकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून सादडेची खिंड खुणावून गेली. झाडीत शिरून हलकासा चढ चढून झाला, भास्कर इथुन आम्हाला निरोप देणार होता. थोडंसं वर चढून भास्करच्या मदतीने योगेश आणि मी सादडेचा सगळा घाट एकदा निरखून घेतला. घाटमाथ्यावर आलो तोच पश्चिमेकडून येणाऱ्या गार वाऱ्याने आमचं दमदार स्वागत केलं. परत खिंडीत आलो. नेहमीच विचित्र आणि अवघड वाटणारा पण आवश्यक प्रश्न मी हिंमत करून विचारलाच, "भास्करा,किती द्यायचे तुला?" तेवढ्याच निरागसतेने तो उत्तरला, "दे, तुला द्यायचे ते" डोंगरात मिळणाऱ्या ह्या अस्सल प्रेमाची किंमत पैश्यात करताना मला कधीकधी फार जिवावर येतं. पैश्यासाठी अव्वाच्यासव्वा रक्कम मागणारे व्यावसायिक गाईड आणि भास्कर हे दोन फार वेगळे प्रकरणं आहेत, किंबहुना ही तुलनाच चुकीची आहे. भास्करचा निरोप घेऊन आम्ही सादडे घाट उतरायला सुरवात केली, तेच वारं पुन्हा पुढ्यात आलं. सुरवातीलाच तुटलेले धोंडे आणि घसारा, त्यामुळे एक फोटो घेतला टीपून आणि कॅमेरा टाकला पिशवीत. घसारा सांभाळून उतरायला सुरवात केली. नळीचा नजारा मात्र अप्रतिम. भरररार वारा सुरूच होता. मागे वळून पाहिलं तर आम्ही बरीच नळी उतरून आलो, मात्र भास्कर अजुनही खिंडीतल्या टेपाडावर उभा राहून आमच्याकडे लक्ष ठेऊन होता. "भास्करा,येतो रे", एकदाचा त्याचा निरोप घेतला तसा पश्चिमेचा गारवा कमी होत गेला.. 

नळी संपली आणि पुढ्यातला परिसर खुला होत होता. जवळचा पाण्याचा साठा संपत आला होता म्हणजे प्रत्येकाजवळ आरक्षित बाटली होती पण आम्हाला ते उंबराचं पाणी चुकवायचं नव्हतं. पाण्याची शोधाशोध सुरूच होती,तशी कोंकणाची दरी कमी होत होती. दमटपणा वाढत होता. शेवटी तो पाण्याचा उंबर सापडला आणि गटागटा पाणी पिऊन पुढच्या पायपीटीला सुरुवात केली. उंबराच्या पुढे पावट्या दिसल्या, हीच वाट असल्याची खात्री पटली पण लगेच दरड कोसळलेली असल्याने पुढची वाट नाहीशीसुद्धा झाली होती. त्यामुळे पुढे कुठेतरी मिळेल या आशेवर नाळेतूनच वाटचाल सुरु ठेवली. माझा अंदाज थोडा चुकला होता, भास्कर ने सांगितल्याप्रमाणे "तुम्हाला डावीकडे वळायचं आहे", हे लक्षात होतं,पण त्याआधी उजवीकडे पायवाट सांगितली होती,हे माझ्या ध्यानातुन सुटलं.पण योगेशच्या लक्षात असल्यामुळे पायवाट सापडली आणि मोठा कोरडा ओढा पार करून आम्ही डावीकडे वळलो. जनावरांचं शेण, लाकुड तोडतानाचा आवाज आणि शेताची बांध जवळ दिसायला लागली. गाव जवळ असल्याची खात्री पटली. तरीही अजून बरंच चालायचं आहे, दरी ओलांडून केळेवाडीची झापं दिसत होती, पण तिकडे कानाडोळा करून बेलपाड्याकडे चालत राहिलो आणि सकाळी निघालेलों आम्ही, आता संध्याकाळी आम्हाला कोंकणकड्याचं दर्शन झालं. अंधार पडायला सुरवात झाली होती. कमळूच्या घरी पोहोचलो तेव्हा साधारण साढेसात झाले असतील. भास्करला सांगितल्याप्रमाणे, मोरोशीपर्यंतच्या गाडीची व्यवस्था त्याने करून ठेवली होती. कमळूकडे चहा घेऊन आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. इति संपुर्ण भटकंती, हरिश्चंद्र नाम पर्वतु !

धन्यवाद । संदिप वडस्कर
(Comment box or wadaskarsandip@gmail.com यावर तुमच्या प्रतिक्रिया कळवु शकता )
या ब्लॉगद्वारे एकच विनंती, संपुर्ण सहयाद्री तुमच्या भिंगऱ्या लागलेल्या पायांसाठी मोकळा आहे, भटकंती फक्त जबाबदारीने करा. खालील सूचनांचे काटेकोर पालन करा...... 

 

8 comments:

 1. मस्त.. finally Sandip is back..

  ReplyDelete
 2. झक्कास, दुष्काळ संपल्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय.
  मजा आली... नियोजन करून टाकतो ह्याच पण।

  ReplyDelete
 3. संदिपभाऊ झक्कास रे!

  ReplyDelete
 4. Really enjoyed lot with all of you.

  ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences