हरगड उवाच !

हरगड बोलतो तेव्हा … या नावाने,साप्ताहिक लोकप्रभा दि. २५ डिसेंबर २०१५ या अंकात पूर्वप्रकाशित लेख (वाचण्यासाठी इथे click करा , पान क्र७० च्या पुढे …)

बागलाण ! या चार अक्षरातच नाशिक जिल्ह्याच्या या भुभागाचा इतिहास डोळ्यांसमोरुन तरळून जातो. काही काही शब्दात एक विशिष्ट जादू असते. तो शब्द उच्चारला की इतिहास-भूगोलासोबत त्याचा वर्तमानही खुणावत जातो. इथले डोंगर जेवढे ऊंच,तेवढाच या मातीचा इतिहास  गगनाला भिडलेला. किंबहुना त्याहीपेक्षा उंच. जेवढा तुम्ही वाचलेला,तुमच्या माहितीतला,कुणी तुम्हाला सांगितलेला,तुम्ही ऐकलेला,त्याहीपेक्षा जास्त वास्तविक मी अनुभवलेला. खरं तर माझ्यापेक्षा तो कुणाला माहितही नसणार. नसणारच मुळी. इथे नांदलेल्या राजवटींपेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे झेललेला, आणि इथल्या मोठ्या मोठ्या राजकीय संक्रमणाचा साक्षीदार मी ! इथल्या रक्तपाताचा,इथल्या युद्धजन्य परिस्थितींचा,कधीकाळी शांततेत नांदत असलेल्या आणि ऐश्वर्यसंपन्न राजवटींचा मूक साक्षीदार मी. डोलबारी रांगेतला साल्हेर-सालोट्यानंतर सर्वात उंच डोंगर मी, प्रसिद्धी मात्र माझ्या वाट्याला त्याच्याइतकी नाही. हा एकटेपणा फार भयंकर असतो.या एकटेपणातच पिचलेल्या महाराष्ट्रदेशातील अश्या कित्येक गिरीदुर्गांपैकी एक मी. बाजूलाच उभारलेल्या दोन धाकट्या भावांची साथ असली तरी इकडे वळलेली मानवी पावलं  दुर्मिळच. असो, ही माझ्यासाठी रोजचीच व्यथा. पण आज मला बोलायचंय,हा अबोलपणा सोडायचाय.कोणी ऐकेल का ? पण त्यासाठी तुम्हाला तुमची वाट थोडी वाकडी करावी लागेल, माझ्या थोडं जवळ यावं लागेल. चला येताय ना मग ! 


इकडे येण्याचा रस्ताही तसा आडवळणाचा.नाशिकच्या वायव्येस साक्री-नंदुरबारकडे जाणाऱ्या गाडीरस्त्यावर ताहराबाद शहर वसलेलं आहे.हे शहर पण आताचे नव्हे, सतराव्या शतकात मुघल सरदार मुहम्मद ताहिर याने वसवलेले. ताहिर हा, माझा धाकटा भाऊ मुघलांच्या ताब्यात असतानाचा पहिला किल्लेदार.मुहम्मद ताहिर आणि त्याच्या सोबतीला असणाऱ्या सरदाराने बागलाणवर हल्ला चढवला तेव्हा राजा बहीर्जी याचे राज्य होते.युद्धात आपला पराभव होणार हे दिसत असताना त्याने औरंजेबाशी तह करून मुघल मनसबदारी स्वीकारली आणि साढ़ेतीनशे वर्षं हिंदुराष्ट्र म्हणून उदयास आलेले ऐश्वर्यसंपन्न बागलाण अखेर मुघलांच्या ताब्यात गेले.इथे इतिहास भरपूर आहे,काळ-वेळ-जागा जमून आली की सांगेनच. तूर्तास ताहराबादवरून गाडी डावीकडे वळली की चार कोसांवर मुल्हेरवाडी हे एक ऐतिहासिक तसेच पौराणिक महत्व असलेलं शहर वसलेलं आहे. या रस्त्यावरूनच उजवीकडे सेलबारी रांगेतील मांगी-तुंगी अन् न्हावी-रतनगडाचे आणि डावीकडे डोलबारी रांगेतल्या माझ्या दोन भावंडांचे, मोरा-मुल्हेरचे पहिले दर्शन होते. मोरागडाचा कातळकडा लक्ष वेधून घेतो. पण तोपर्यंत मी दृष्टिक्षेपात येत नाही. त्यासाठी तुम्हाला मुल्हेरवाडीच गाठावी लागते. 
© Sandip Wadaskar ।  © WTA | भटकंती…सह्याद्रीच्या कुशीत  । All Rights Reserved
मुल्हेरवाडी ! वर्तमानात गावाच्या चौकातली गजबज तुमचं स्वागत करते. सकाळी सकाळी दुकाने उघडण्याची घाई करणाऱ्या वाण्यांपासून ते उकळलेल्या तेलाच्या कढईत वडे सोडणारया हातगाडीवाल्यांपर्यंत,सगळे जण लगीनघाईत असतात.पण आतापेक्षाही जास्त गजबजलेली मुल्हेरवाडी मी अनुभवलेली आहे.थोडे पुढे आलात की दोन्ही बाजूंचे थोडेच उरलेले जुनाट वाडे तुमचे लक्ष वेधून घेतील. हे वाडे फार सुंदर. नक्षीकाम केलेले दारे-खिडक्या बघून माझ्यासोबत तुम्हीही इतिहासात हरवून जाल. तेवढ्यात एखाद्या वाड्यासमोर तुम्हाला एखादी मुलगी अंगणात झाडू मारताना दिसते तेव्हा इथे घडलेल्या भूतकाळातील आठवणींनी मीही गदगदून जातो. मुल्हेरवाडीची ही बाजारपेठ एकेकाळी ऐश्वर्यसंपन्न म्हणून इतिहासप्रसिद्ध होती. सुरतेपासून दक्षिणेस जोडलेला व्यापारी मार्ग हा येथून जात असे. बाजारपेठेबरोबरच इथली टांकसाळही प्रसिद्ध होती. गुजरातच्या सुलतानाने मुल्हेर त्याच्या अधिपत्यात असताना महमुदी रुपये पाडले होते. तसेच मुल्हेरी तलवार मुठीसाठीही मुल्हेरवाडी प्रसिद्ध होती. हा झाला इतिहास,पण मुल्हेरवाडी ही काय कालपरवाची नव्हे. त्याहीआधी या वाडीचे अस्तित्व रत्नपूर म्हणून महाभारतात मिळते. महाभारतकालीन मयूरध्वज राजा इथे नांदत होता. त्याच्याच नावावरून रत्नपूरच्या या किल्ल्याला मयूरपूर असे नाव पडले आणि पुढे अपभ्रंश होत होत मुल्हेर हे नाव रूढ झाले. हाच माझा सर्वात धाकटा भाऊ. एकेकाळी बागलाणची शान असलेलं रत्नपूर/मुल्हेरवाडी,आता मात्र महाराष्ट्रातलं कुठल्यातरी कोपऱ्यात वसलेलं छोटंसं गाव म्हणुन लोकांना माहीत आहे, तसेही आता इकडे फिरकणार कोण? इथली मुल्हेरी मूठ राहिली नाही किंवा बाजारपेठही नाही. आता दृष्टीस पडतो तो इथला राबराब राबणारा शेतकरी.कामगार,आदिवासी वर्ग. जीभेवर बागलाणी   पण फार प्रेमळ लोकं.  असो, तूर्तास नव्याने बांधलेला डांबरी रस्ता आणि रस्त्याच्या दोन्हीबाजूने पडलेला घाणीचा सडा चुकवत तुम्ही चालते होता. पायथ्यापासून माझ्यापर्यंत पोहोचण्याची वाट तशी मळलेली नसल्याने वाडीतून वाट्याडया घेणे सोयीस्कर. 

गजबजलेली वाडी मागे टाकली की डाव्या बाजुला टेकडावर एक मंदिर लक्ष वेधुन घेते आणि उजव्या बाजुला एक जुनाट बांधकाम. ही कुणा एका मुघल अधिकार्याची कबर आहे. ही वास्तु बरीच मोठी आहे,कळसाला गोल घुमट आहे. अश्या बऱ्याच खुणा इथला भूतकाळ सांगण्याचा प्रयत्न करतात, फक्त ऐकण्याची आपली तयारी असावी लागते. थोडं पुढे सरकलो की माझ्यासोबतच माझ्या भावंडांचे तुम्हाला दर्शन होईल. आमचं त्रिकुट,अगदी एका सरळ रेषेत. मी हरगड! उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूस एकजीव झालेले मोरा-मुल्हेर! कशी वाटली ही पहिली भेट ! हो. मला माहीत आहे, अगदी आडवाटेलाच आहे. पण तुम्ही जसे-जसे जवळ याल तसे कळत जाईल, जेवढी वाटली तेवढी वाट वाकडी नक्कीच नाही. 


डांबरी रस्ता संपला. पुढ्यात पावसाळी पाणी अडवून बांधलेला बंधारा,मला दोन वर्षापूर्वीची बागलाण मोहीम आठवून गेला. त्यावेळेस करायचा राहिलेला हरगड आता स्वतःहून बोलू लागला होता. पहाटे नाशिकवरून निघालो तोच हरगडाने मनावरचा ताबा घेत कथन करायला सुरुवात केली होती. त्याची ही दुर्गव्यथा ऐकतच आमची पायगाडी, एका आंब्याच्या झाडाजवळ थबकली. ऐसपैस बांधुन काढलेला पार पाहून आपसूकच पार्श्वभाग टेकल्या गेला. हरगडाच्या कथेला एक स्वल्पविराम देऊन आम्ही एक व्यवसायिक विश्रांती घ्यायचं ठरवलं. पिशव्यामधुन दिवाळी बाहेर आली. तसेच ब्रेडवर चीज वगैरे लावून येथेच्छ पोटोबा उरकला. मुल्हेर-मोरागडाचा उभा ताशीव कडा आणि उजवीकडच्या हरगडाचा ओबडधोबड आकार एकदम आव्हान देऊन गेला. स्वच्छ निळ्या आकाशात त्रिकुट मात्र उठून दिसत होतं. नारायणरावही संथगतीने मैदानात उतरत होते. पाठीमागे सेलबारी रांगेतील मांगी-तुंगीही साद घालत होते. तूर्तास लक्ष्य डोलबारी. उदरंभरणम आटोपून चढाईला लागलो.हरगड परत बोलू लागला.


आंब्याच्या झाडापासून मजपर्यंत पोहोचायला तुम्ही एकतर मुल्हेरमाचीवर येऊ शकता किंवा मुल्हेर आणि माझ्यामधली जी खिंड दिसते, तिथपर्यंत सरळ उजवीकडील वाट धरू शकता. पण थोरला असलो तरीही माझे महत्व हे माझ्या धाकट्या भावामुळेच मुल्हेरमुळेच, त्यामुळे माचीवर आलास तर फार बरे. ही वाट तशी मळलेली त्यामुळे चुकण्याचा संभव नाहीच. तसेच तुम्ही पुढे चालत राहिला की एकामागून एक अश्या तीन दरवाज्यांचा संच तुमचं स्वागत करतो. पैकी पहिल्या दोन दरवाज्यांच्या कमानी पूर्णतः जमीनदोस्त झालेल्या आहेत, पडझड झालेले बुरुज आणि तट एवढेच काय ते शिल्लक. तिसरा दरवाजा मात्र चांगल्या स्थितीत आढळतो. थोड्याफार झाडोऱ्या वाटेतून साधारण पाऊण तासात तुम्ही मुल्हेरमाची गाठता. तिसऱ्या दरवाज्याला लागूनच निघालेल्या तटबंदीने मुल्हेरमाची संरक्षित आहे,पण त्यावर आता झाडी वाढलेली आहे. पुढ्यात तुमची नजर खिळवून ठेवतो तो गणेश तलाव आणि काठावर वसलेलं गणेश मंदिर अन् त्याच्याहीमागे  पहारेकऱ्यासारखा गगनाला भिडलेला मी. आता तलावातलं पाणी जरी खराब असलं तरी गतकाळातील इथला राबता तुम्हाला काय सांगु ! एकेकाळी इथल्या गणेश मंदिरात देवाधीपतीँचा दिवसरात्र चाललेला जप अजूनही माझ्या कानात  घूमतो आहे. तेव्हा आतासारखी झाडी वाढलेली नव्हती. दृष्ट लागण्यासारखी संपन्न नगरी इथे नांदत होती. बागलाणचा राजा बहीरमशहा आणि त्याची राजधानी मुल्हेरवाडी. या माचीवर या पराक्रमी राजाचा भव्यदिव्य असा राजवाडा होता. 


महासत्तेला साजेशी अशी ऐश्वर्यसंपन्न नगरी आणि त्यात उठून दिसणारा राजवाडा या माचीवर वसलेला होता. याच राजवाड्याचे अवशेष म्हणजे चौथरा आता शिल्लक आहे,बाकी इतिहासजमा. आता तुमच्या त्या वनविभागाने इथे वृक्षारोपण करून अध्ये-मध्ये विश्रांतीची सोय करून ठेवलीये. असो,काही क्षणातच तुम्ही सोमेश्वर मंदिरात पोहोचता. मंदिरात मयूरध्वजापासुनचा वंशावाळ फलक लावलेला आहे.आजुबाजुला भरपूर झाडी असल्याने जागा फार प्रसन्न वाटते. आंब्याची,पिंपळाची मोठ-मोठी झाडे तुम्हाला इथे खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. गतकाळात इथे शिवाची आराधना चालत असली तरी तूर्तास त्यात खंड पडलेला नाहीये. एका जटाधारी बाबाचं वास्तव्य असल्यामुळे पूजेचा दरवळ आणि स्वच्छतेचा वास इथे घुमत असतो. मंदिरामागे मुल्हेरचा बालेकिल्ला खुणावत असतो. उभ्या ताशिव कड्यात कोरलेलं हनुमान शिल्प लक्ष वेधुन घेतं. मोरागडाचा दगडात कोरलेला दरवाजाही साद घालत असतो. 

आम्ही पोहोचलो तेव्हा साधुबाबा मंदिरावरून माची न्याहळीत बसले होते, पाठीवरच्या सॅक जड झाल्या होत्या. हरगड आटोपून मुक्कामाला इथेच यायचं म्हटल्यावर सॅक कशाला पहिजे.
"अहो बाबा, बॅगा ठेऊ का इथे? "
"रख दो बेटा,रख दो.,बस अपना कीमती सामान अपने साथ लेकर जाना, और अच्छेसे बांध के जाना. नही तो ये बंदर छोडेंगे नही कुछ ",बाबा.
माकडं, अरेच्चा !
"बाबा, आपके खोली मे रख दे ?"
“नही,नही बाहर रखना है तो रखो,नही तो साथ मे लेके जाओ.वहा,मुझे रहने के लिये जगह नही”, इति बाबा.
जणु आम्ही बॅगा टाकून त्या खोलीवर कब्जाच करणार होतो. सुदैवाने मंदिरात एक प्लास्टिकचा रिकामा ड्रम मिळाला अन् त्यात आमच्या सॅक कोंबून पायगाडी एकदाची चालती झाली. मागच्या पानावरून पुढे हरगड पुन्हा बोलता झाला.हरगड अगदी आनंदात सगळं कथन करत होता. चला,इथून निघालो की झाडीतली छोटी पायवाट तुम्हाला माझ्याकडे घेऊन येते. वाटेत मुल्हेरमाचीवरील हत्ती आणि मोती तलावातल्या मधुर पाण्याने तुमच्या पाणपिशव्या भरून घ्या,कारण माथ्यावर पोहोचेपर्यंत मध्ये पाणी नाही. पायवाटेने चालत आला की उत्तरेस कमालीच्या ढासळलेल्या अवस्थेत एक दरवाजा आहे, तो ओलांडला तुमचा प्रवेश माझ्या हद्दीत झाला म्हणुन समजायचे आणि चालत सुटायचे, थोड्याच वेळात खिंड दिसेल जी,वाडीतून खुणावत असते. येथुन पलीकडे नरकोल आणि शेजारील बंधाऱ्याचे सुंदर दर्शन होते. नरकोल गावातून येणारी वाटही आपल्याला इथे भेटते. सपाटीला चालत गेलो की पुढ्यात एक भलामोठा वृक्ष आपली वाट पाहत असतो, त्याच्या सावलीत किंचित विसावुन उजवीकडे चढाईला लागायचे. समोर दिसणारी नाळेसारखी वाट आपल्याला चढायची असते. किल्ल्यावर पोहोचायला ही एकच वाट नसुन अजुन दोन आहेत, माथा गाठला की सांगेनच. तूर्तास छोट्या-मोठ्या दगडांच्या राशी पायाखाली तुडवने हा एकच पर्याय. जसे-जसे पुढे जाल तसातसा मोरा-मुल्हेर आपलं रुपडं नजर करीत असतो. या वाटेत,माथ्यावर पोहोचेपर्यंत तीन दरवाजे लागतात. दुर्दैवाने तिघांचीही अवस्था दयनीय आहे. बुरुज कसेबसे तग धरून आहेत.पहिला दरवाजा ओलांडला की कड्यात विसावलेल्या हनुमंताचे दर्शन घेऊन पुढे चढत रहायचे. तिसऱ्या दरवाजातून तुम्ही एकदम माझ्या खांद्यावरच येऊन पोहोचता. अगदी वर दिसणारे निळेभोर आकाशही ठेंगणे झालेले असणार. चला आता मी तुम्हाला माझी सैर घडवुन आणतो. पुढ्यातल्या महादेवाच्या मंदिरापासून सुरुवात करूया. ऊन-वारा झेलत उभं राहिलेलं गडावरचं हे एकमेव बांधकाम. त्यासमोरच उभ्या अवस्थेतला मारुतीराया आणि त्याच्याच पुढ्यात एक भलामोठा तोफगोळा आपली उत्सुकता वाढवतं. अर्थातच माझ्या एका खांद्यावर एक ऐतिहासिक खुण दडलेली आहे, ती आपण बघूच. तूर्तास मंदिरमागचं विस्तृत पठार तुमच्या पायांना मोकळं करून चालत रहा. महामूर पावसाने तृप्त झालेली झुडपे, उन्हामुळे करपून सोनेरी रंगात न्हाऊन निघाली आहे. ती तुडवत, चहुबाजूंचा बागलाण नजरेत भरवत इतिहासाचा मागोवा घेऊ. मुल्हेरसारखं बांधकाम माझ्या अंगावर नव्हतं, जो काय राबता तो मुल्हेरमाचीवर.पण इथल्या पडक्या अवशेषांवरून थोडीफार वर्दळ होती,हे सिद्ध होतं. मुल्हेर ही बागलाणची राजधानी आणि मी त्याचा रक्षकदुर्ग. मला घडवलाय तो बागुलवंशीय पिढ्यांनी. राजा बहीरमशहाच्या कारकिर्दीतली एक गोष्ट तुम्हाला सांगु इच्छितो. मुघलांच्या ताब्यात जाण्याअगोदर बहीरमशहाच्या आमात्यपदी असलेल्या काशीराजांवर औरंगजेबाशी फितुर झाल्याचा आळ आला, पण त्यात काही तथ्य नाही हे नंतरच्या काळात सिद्ध झाले. काशीराजांना पुन्हा अमात्यपद देण्यात आलं,पण त्यांनी ते नाकारून राजकारण सोडलं आणि इथे येऊन गणेशाची आराधना करू लागले. नंतरच्या काळात बागलाण मुघलांच्या ताब्यात गेला. मुल्हेरच्या सोबतीला माझ्यावरही परकीयांचा अंमल सुरु झाला, ते पुढची चाळीस वर्षे. त्यानंतर मात्र कमाल झाली. 1672 मध्ये शिवरायांच्या प्रतापराव आणि मोरोपंत पिंगळे,या दोन मराठा सरदारांनी मला स्वराज्यात दाखल करून घेतले. आणि पुन्हा एकदा माझ्या मस्तकावर भगवा डौलाने फडकु लागला. एकोणिसाव्या शतकात, बाकीच्या किल्ल्यांप्रमाणे माझ्यावरही इंग्रजाळलेला वरवंटा फिरायला विसरला नाही. तूर्तास पडक्या भिंती,वाडे आणि उध्वस्त दरवाजे एवढाच काय तो माझा वर्तमान. असो काळाच्या ओघात हे आलंच. 
उजवीकडे हरणबारी आणि चहुबाजूंनी डोंगरांची ओळखपाळख आटोपून शेवटच्या टोकापर्यंत गेलो की, दूरवर अस्पष्ट अशा साल्हेर अन् सालोट्याचं दर्शन होतं. ही दोघं डोलबारी रांगेचे मानकरी, आमचे थोरले बंधु. येथुन अगदी भीमाच्या बोटांपासुन संपुर्ण परिसर डोळ्यात भरतो. इथल्या कातळात कोरलेल्या टाक्यातले पाणी पोटात रिचवून परतीला लागायचे. वाटेत तलावाचे घडीव बांधकाम लक्ष वेधून घेते,पण कोरडा.

त्याच्यापलीकडे मात्र एक चोरदरवाजा आणि त्यातुन खाली उतरू शकलो तर अजुन एक दरवाजा. पण खालच्या दरवाज्यापर्यंतची वाट पूर्ण उध्वस्त झालेली आहे. तो बघुन आपण परत मंदिराकडे वळूयात. मघाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या खांद्यावर एक ऐतिहासिक खुण आहे,जी मला मुल्हेर गडाचा संरक्षक दुर्ग म्हणुन सिद्ध करते, ती म्हणजे 12 फूटी हजारबगादी तोफ! या तोफेच्या माऱ्यात मुल्हेरमाचीच नव्हे तर समोरच्या मुल्हेरवाडीपर्यंतचा भाग येतो. मिश्रधातूंची ही तोफ अगदी योग्य जागी ठेवली आहे, कारण माझी उंची जास्त असल्याने मुल्हेरचा बालेकिल्लाही या तोफेमुळे एकदम सुरक्षित आहे. तोफेसमोरच तिला फिरवण्यासाठीची सोय केलेली आढळते. तोफेचं कौतुक करून उजवीकडे थोडं खाली उतरलात की अजूनही बांधकाम मजबूत असलेला महादरवाजा तुम्हाला स्तिमित करून सोडेल,याची खात्री देतो. एवढं बोलुन हरगड अंतरध्यान पावला. 


उध्वस्त देवडयांचे चौथरे,खाली उतरत जाणाऱ्या खणखणीत पायऱ्या आणि टिकून राहिलेलं बऱ्यापैकी दरवाज्याचं बांधकाम हे बघुन दिल तो एकदम खुश हो गया. कमाल ! हरगडाची सफर सार्थकी लागल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. नक्षीदार कमान, रेखीव दगडी बांधकाम याचं कितीतरी वेळ आम्ही निरीक्षण करत होतो. वरच्या देवडयांमध्ये एक शिलालेख देखील आढळतो. ही वास्तु अजूनही टिकून असली तरीही बाजूच्या झाडांची मुळे दगडांमध्ये घुसली आहे, त्यामुळे दरवाज्याला फार मोठा धोका निर्माण झालाय. वेळेवर लक्ष नाही दिलं तर हरगडावरील सुस्थितीतलं हे एकमेव बांधकाम जमीनदोस्त व्हायला वेळ नाही लागणार. आणि ह्या दरवाज्यामुळेच गडावरील सावलीचं हे एकमेव ठिकाण. त्यामुळे पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना चांगलाच वाव मिळाला होता. घरून आणलेल्या थालीपीठावर ताव मारून आम्ही उतरायला सुरवात केली. हा महादरवाजा असल्यामुळे गतकाळात गडावर येण्याचा हा राजमार्ग होता, पण आता वाट बरीच निसरडी आणि पायऱ्या तुटलेल्या असल्याने वापरात नाही.पण सोबतीला असलेल्या मुल्हेरवाडीतल्या राजूदादाने वाट असल्याची हमी देऊन आम्हाला मागे-मागे येण्याचा सल्ला दिला. आम्ही सुरुवात तर केली, पण थोड्याच वेळात या राजमार्गाने रंग दाखवायला सुरुवात केली. मात्र हळूहळू, सावध पावले टाकत,कुठे झाडीचा आधार घेत एकदाचं आम्ही खालच्या सपाटीला लागलो तेव्हा हुश्श करीत दगडावर बसकणच मांडली. समोरच्या डोंगरधारेवरची ही वाट आम्ही उतरून आलो,याचंच कौतुक वाटून गेलं. नारायणराव पश्चिमेकडे कलत होते, आमचं या मोहिमेतलं आजचं लक्ष्य संपलं होतं. बऱ्याच दिवसांपासुन मनात घर करून राहिलेलं बागलाणचं हे उपेक्षित दुर्गलेण एकदाचं सर झालं. एकंदरीत दिवस सत्कारणी लागला. सोमेश्वर मंदिरात पोहोचेपर्यंत माचीवरील रामेश्वर मंदिर,अस्ताव्यस्त पडलेली एक तोफ,गुप्त दरवाजा,विहिरी,इत्यादी बघुन झालं.गणेश मंदिरात पोहोचलो तेव्हा अंधार पडायला सुरवात झाली होती. पण  थोड्या प्रकाशातही मंदिराचं आणि पाठीराख्या हरगडाचं देखणं प्रतिबिंब वेड लावुन गेलं आणि नकळत कॅमेरात बंदिस्तही झालं. चुल पेटली. चुलीत भाजलेल्या वांग्यांचा खमंग दरवाळायला लागला,तव्यावरील भाकरीही खरपुस भाजल्या जाऊ लागल्या. चुलीतून बाहेर काढलेल्या निखाऱ्यावर पापड पुटपुटत होते, कोशिंबीरीचा तडकाही लाजवाब. भरीस भर म्हणुन तव्यावरची मीठ घालून केलेली ढोबळ मिरची. क्या बात है सई,जियो ! रोहनने मंदिरातल्या पणत्यांमध्ये तेल ओतून गाभारा उजळवून टाकला. मी आणि अमीन आळीपाळीने चुलीतला जाळ सारखा करत होतो. पण प्रसंगी डोळ्यातून पाणी काढुन चुलीत मारलेली फुंकर वाया थोडेही ना जाणार. दिवस संपल्यावर आमच्या पुढ्यात होते साग्रसंगीत जेवणाचे रसरशीत ताट आणि सोबतीला होते आशाताईँचे नक्षत्रांचे देणे अन् गाभाऱ्यातला मिणमिणता प्रकाश ! अजुन काय हवंय आयुष्यात !!

धन्यवाद । संदिप वडस्कर

(Comment box or wadaskarsandip@gmail.com यावर तुमच्या प्रतिक्रिया कळवु शकता )

8 comments:

 1. मी सुद्धा नुकताच बागलाण करून आलो त्यात हरगड वेळेत शक्य असतानाही राहून गेला ह्याचे शल्य राहिले होते. तुझ्या लिखाणावरून एक नवसंजीवनी मिळालीय, त्यामुळे लवकरच मी ही हरगडशी बोलून येतो.

  बाकी लिखाण अप्रतिम नेहमी प्रमाणे... मुल्हेर माची वरील तो गुप्त दरवाजा कुठे आहे तेवढे जरा समजावून सांग.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद mega prodn ! नक्कीच, हरगड खरंच भेट देण्याजोगा आहे,विशेष म्हणजे 12 फूट लांबीची हजारबांगडी तोफ आवर्जून बघण्यासारखी.

   Delete
 2. Khupach sunder likhan ....sandip, sarswati mateche ashirwad labhaleli tumchi kalam ashich chalu dya

  ReplyDelete
 3. संदिप:: भन्नाट कॉन्सेप्ट!!! देखण्या गडाच्या अग्गदी मनातलं लिहिलंय... हरगड मुळात २-५% ट्रेकर्सच करतात, त्यातही लपलेल्या देखण्या द्वारापाशी पोहोचणारे कमीच.. तुम्ही ते साधलंत.. भारीच!!!

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद साई ! साधारण दोन वर्षापूर्वीच्या बागलाण भटकंतीत हे दुर्गरत्न पहायचं राहून गेलं होतं. यावेळेस फक्त हरगडासाठीच मुल्हेरमाचीवर दाखल झालो :)

   Delete
 4. Khupach chhan lihilayes Sandy! Keep it up! :)

  ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences