सह्याद्रीमस्तक साल्हेर - पूर्वार्ध

11 comments:
बागलाण मोहीम २०१५…. हरगडाच्या आत्मकथनापासुन पुढे
दोन वर्षाआधी भरपावसात केलेली साल्हेरची वारी जशीच्या तशी डोळ्यांसमोर आहे. कोसळणाऱ्या सरींची गाज आणि सुंसुं करत वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज अजूनही तेवढाच ताजा,अगदी कालच इथून गेल्यासारखा. पण त्याच पावसामुळे अर्धवट झालेली गडफेरी आणि तेव्हाचा राहून गेलेला सालोटा मनात घर करून होता. हरगडही चुकला होता. बागलाणात पुन्हा एकदा भटकायला ही दोन कारणं पुरेशी होती. सह्यमित्रांची जुळवाजुळव करून पावले नाशकाकडे वळवलीच. त्याच भटकंतीचा आजचा दुसरा दिवस उजाडला तो पहाटेच्या पडलेल्या दवाने. स्वच्छ आकाशाची अपेक्षा असताना पहाटेचं मळभ अस्वस्थ करीत होतं. आता पाऊस बरसतो की काय अशी भीती वाटून गेली. कालचं दिवसभराचं हरगडपुराण ऐकून मुल्हेरमाचीवर आमचा मुक्काम पडला होता.गर्द वनराईत तलावाकाठी वसलेल्या माचीवरल्या ऐतिहासिक गणेश मंदिरातला मुक्काम आणि हवाहवासा गारठा, दिवसभराचा सारा शीणच निघुन गेला. पहाटे पहाटे बिनदुधाच्या कोऱ्या-करकरीत चहात लिंबू पिळून घशाला शेक दिला आणि पायगाडी सुरु केली.
माची उतरतोय तसं आकाश निवळायला लागलं. पाऊण तासात मुल्हेरवाडी गाठून वाघांबेच्या रस्त्याला लागलो. बागलाणातलं एक उपेक्षित दुर्गरत्न सर झाल्याचं समाधान वाटत होतं, त्यात जिपड्यात लावलेल्या टिपिकल नाइनटीजच्या गाण्यांनी तर तोंडावर पाणी न मारता एकदम ताजेतवाने झाल्यासारखे वाटले. जीपची बाल्कनी आमच्या सॅकनी गच्च झालेली अन् त्यातच थोड्याफार जागेत आमची  चौकडी एकदम फिट बसली होती. हरणबारीच्या डाव्या बाजूने गेलेला निवांत रस्ता आणि बहुदा पहाटेची राहिलेली थकबाकी गोळा करत पुढ्यात बसलेला रोहन केव्हाच गारद झाला होता. पण त्याच्या दुर्दैवाने  वाघांबेचा रस्ता काही लांब नव्हता. जिपड्यातून उतरलो तर गावकऱ्याच्या प्रश्नांचा भडीमार सुरु झालेला. दोन वर्षापूर्वीच्या पावसाळी आठवांना उजाळा मिळाला. सर्वदूर पसरलेल्या हिरवाईत, वरून टपोऱ्या थेंबांचे तडाखे सोसत आम्ही खिंडीकडची जवळ केलेली वाट आणि धुक्यात हरवलेले साल्हेर-सालोट्याचे गडमाथे आठवून गेले.यावेळेला मात्र गावातूनच त्यांचं स्पष्ट दर्शन झालं. खल्लास ! आकाशास भिडलेले दोन्ही गडमाथे पुढच्याच क्षणी काळजास भिडले.


हरगड उवाच !

8 comments:

हरगड बोलतो तेव्हा … या नावाने,साप्ताहिक लोकप्रभा दि. २५ डिसेंबर २०१५ या अंकात पूर्वप्रकाशित लेख (वाचण्यासाठी इथे click करा , पान क्र७० च्या पुढे …)

बागलाण ! या चार अक्षरातच नाशिक जिल्ह्याच्या या भुभागाचा इतिहास डोळ्यांसमोरुन तरळून जातो. काही काही शब्दात एक विशिष्ट जादू असते. तो शब्द उच्चारला की इतिहास-भूगोलासोबत त्याचा वर्तमानही खुणावत जातो. इथले डोंगर जेवढे ऊंच,तेवढाच या मातीचा इतिहास  गगनाला भिडलेला. किंबहुना त्याहीपेक्षा उंच. जेवढा तुम्ही वाचलेला,तुमच्या माहितीतला,कुणी तुम्हाला सांगितलेला,तुम्ही ऐकलेला,त्याहीपेक्षा जास्त वास्तविक मी अनुभवलेला. खरं तर माझ्यापेक्षा तो कुणाला माहितही नसणार. नसणारच मुळी. इथे नांदलेल्या राजवटींपेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे झेललेला, आणि इथल्या मोठ्या मोठ्या राजकीय संक्रमणाचा साक्षीदार मी ! इथल्या रक्तपाताचा,इथल्या युद्धजन्य परिस्थितींचा,कधीकाळी शांततेत नांदत असलेल्या आणि ऐश्वर्यसंपन्न राजवटींचा मूक साक्षीदार मी. डोलबारी रांगेतला साल्हेर-सालोट्यानंतर सर्वात उंच डोंगर मी, प्रसिद्धी मात्र माझ्या वाट्याला त्याच्याइतकी नाही. हा एकटेपणा फार भयंकर असतो.या एकटेपणातच पिचलेल्या महाराष्ट्रदेशातील अश्या कित्येक गिरीदुर्गांपैकी एक मी. बाजूलाच उभारलेल्या दोन धाकट्या भावांची साथ असली तरी इकडे वळलेली मानवी पावलं  दुर्मिळच. असो, ही माझ्यासाठी रोजचीच व्यथा. पण आज मला बोलायचंय,हा अबोलपणा सोडायचाय.कोणी ऐकेल का ? पण त्यासाठी तुम्हाला तुमची वाट थोडी वाकडी करावी लागेल, माझ्या थोडं जवळ यावं लागेल. चला येताय ना मग !