मंगळावरील चोर !


सोनकी अन् तेरड्याने सजलेला रस्त्याचा दुतर्फा आणि हिरवा शालू नेसलेला परिसर अनुभवत आमची तुकडी दुर्गाडीच्या वेशीवर पोहोचली, तेव्हा गावातलं एकेक बारदाण आमच्याभोवती गोळा व्हायला सुरवात झाली होती. कारण आमच्याकडून फार्सच तसा पडला होता. आमच्या तोंडून “चोरकणा” हे चार शब्द ऐकल्याबरोबर अख्खं  गाव आमच्याकडे चोर असल्यासारखं “अबाबा!” असं करीत विचारपूस करून जात होतं. गावात नेहमीची कामं, धूणीभांडी इत्यादींने गजबजला होता. अर्ध्या चड्डीवर किरटी पोरं हुंदळत होती. मध्यान्हीचं उन्हं  माथ्यावर आलं होतं. वाटाडया शोधायला म्हणून गेलेला प्रसाद अजुन परतलेला नव्हता. एकंदरीत आज चोरवाटेला लागण्याचे संकेत धूसर दिसत होते.
बऱ्याच वेळाने प्रसाद परतला तो वयाच्या साठीवर आलेल्या एका तरुणाला घेऊन. अपेक्षेप्रमाणे पिकलं पानंच कामाला आलं होतं. कारण चोरकणा हे ऐकूनच गावकरी आम्हाला परतण्याचे सल्ले देत होते. तिकडे न फिरकण्याची कारणंही भरपूर कानावर पडत होती. कमरेएवढं गवत अन् जनावरांची दहशत मनावर एवढी बिंबवली जात होती की चोरकण्याचा नाद सोडून वाघजाईने उतरावे लागेल की काय, अशी भीती वाटायला लागली. मात्र “चंदर पोळ” नावाच्या साठीवर आलेल्या तरुणाने आमच्या हातात काठ्या टेकवल्या अन् धारेपर्यंत सोडण्याचे कबूल करून चोरवाटेला लागलो तेव्हा दुपारचे दिड झाले होते.

दुर्गाडीच्या सोंडेवरून  नीरा - देवघर 


अखेर पायगाडी सुरू झाली. लोकसंख्या साढ़ेतीनशे-चारशे असलेलं दुर्गाडी हे डोंगरातलं छोटसं गाव सातारा,पुणे अन् इथल्या घाटवाटांनी रायगड या तिन्ही जिल्ह्यांसोबत सलोखा जपून आहेत. गावातला बांबू अन् इतर उत्पादने जवळपासच्या बाजारात विकुन आपलं गुजराण करणारी लोकं स्वतःपूर्ती भातशेती करून जगतात. रस्ते झाल्यामुळे गावकऱ्याच्या पार्श्वभागाखाली गाड्या आल्या आणि या घाटवाटांना मानवी पावलं दूरावत गेली. वरून पाऊसकाळ नुकताच सरत आल्यामुळे मळलेली वाट साफ नाहीशी झाली होती. त्यामुळे आमच्यासोबत कोण यायला धजावत नव्हतं. मात्र जुनाट वाटांना सरावलेले साठीचे आजोबा अन् त्यांच्या जनावरांची दहशत ऐकत जननीच्या देवराईपाशी पोहोचलो. राईत शिरताच हिरवळ अन् सोबतीला गारवा सूखवून गेला.
दुर्गाडीच्या पायथ्याशी “जन्नीची देवराई” असा वाचनात उल्लेख आला होता. इथे पोहोचल्यावर अपेक्षेप्रमाणे जपल्या गेल्याने आनंद झाला. जुन्या मंदिराजवळ सिमेंटच्या नवीन बांधकामामुळे मात्र मन थोडं नाराज झालं. पण देवाच्या नावाने राखली गेलेली ही राई मात्र आजूबाजुच्या ओसाड माळरानात हिरवाईचं समाधानच,नाही का ! असो,तूर्तास जननी देवीला नमस्कार करून पायगाडी पुढे सरकली आणि पुढच्या शेताडातून वाट काढीत वरच्या टेपावर पोहोचली. खालच्या राईतला गारवा सोडला तर इथे चांगलाच दमटपणा जाणवत होता. टेपाडावरून वरंध घाटाच्या तोंडाशी शिरगाव फाटा खुणवून गेला.

© Sandip Wadaskar ।  © WTA | भटकंती…सह्याद्रीच्या कुशीत  । All Rights Reserved

बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळपास दोन -एक महिन्यांनी अशा  निवांत ट्रेकला निघालेलो. आमच्या भ्रमणमंडळाचे आधारस्तंभ म्हणजेच दादाभाई नुकताच लंडनवारी करून “इंडिया”त दाखल झाले होते.आणि परतल्यावर चांगली पंधराएक दिवसाची सुट्टीही काढुन बसले होते. पठ्ठयाचा मोठ्या ट्रेकचा प्लॅन असावा म्हणजे होताच. पण दुर्दैवाने त्याची पायगाडी घरीच बसली होती धूळ खात. नाईलाजाने सुट्ट्यांमधला शेवटचा शनि -रवी सत्कारणी लावत चोरवाटेला लागला. बऱ्याच दिवसांचा ब्रेक पायांना चांगलाच जाणवत होता. तसा उन्ह-सावल्यांचा खेळ चाललेला असला तरी घामट्यानी पार आंघोळ घातली होती. दूरवर पसरलेल्या सह्याद्रीमंडळात एक विचित्र अनिश्चिती जाणवत होती.
टेपाडावर पाण्याचा पहिला ब्रेक आटोपून धोकादायक अशा आडवीला लागलो. चंदर आजोबांची घाई अन् दमटलेला आसमंत अश्यात त्या थरारक वाटेवरून चांगलीच तारांबळ उडत होती. एकतर कमरेएवढं वाढलेलं गवत, पुढे पाय टाकल्यावर पायाखाली वाट येईल की  गवताळ पोकळी येऊन पार्श्वभागाची वाट लागेल याची शाश्वती नाही. त्यात बाबाची घाई आणि वरून “सूलू...सूलू”चालण्याचा सल्ला ! पोरांनो पटापट चला, तुम्हाला मध्येच अंधार झाला तर वाट दिसायची न्हाय,लयी गवात वाढलंय बगा. जीवघेणी वाटणारी डोंगराची सोंड मात्र सोनकीच्या सड्याने मोहवून टाकत होती. हिरव्यागार रांगोळीत टवटवीत पिवळ्या सोनकीचा ठिपकेदार साज सर्वदूर पसरला होता. पुढचे दोन महीने सगळा सह्याद्री सोनपिवळा करण्यात या फुलांचा फार मोठा हात !  याला साथ करणारा तेरडा मात्र फूललेला दिसत नव्हता. रायरेश्र्वराचे पठारही काय फुलले असेल ना, समोरच दिसत होतं. ह्या असं आडवं-तिडवं पसरलेलं. या कोजागिरिला पौर्णिमेची रात्र जागवायचीच असा निर्धार करून पुढच्या वाटेला लागलो. नाखिंदच्या उजवेला अस्वलखिंडीचा उतार खुणावून गेला. दूरवर पूर्वेस आपल्या बुरुजांसह दिमाखात उभा असलेला रोहीडमल्लही भाव खाऊन गेला. डोंगराला वळसा घालून गप्पांच्या ओघात सह्यधारेवर येऊन पोहोचलो तेव्हा उजवीकडचा चिकना घाट धक्काच देऊन गेला.

सह्यकण्याची आडवी वाट 
चंदर आजोबांनी निरोपाचा बाँब टाकून परतीचा प्रवास सुरू केला आणि आम्ही पुढ्यात दिसणाऱ्या धारेवरचा चोरकणा उतरायला सुरुवात केली. खालचं गोठवली पिंपळवाडी स्पष्ट दिसत होतं. या सह्यकण्यावरुन खाली उतरायचं म्हणजे दिव्यच असणार यात शंकाच नव्हती. आजोबांनी निरोप दिल्यावर मोजून पाच मिनिटात पुढची वाट वाढलेल्या गवतात नाहीशी झाली. हे म्हणजे, साढ़ेतीनशे धावांचं लक्ष्य समोर असताना पहिल्याच षटकात विकेट पडल्यासारखी होती. आणि झालंही तसंच. पुढची धाव घेताना गवतावर घसरून माझा पार्श्वभाग जमिनीला टेकलाच. सगळ्यांनी फिदिफीदी हसून घेतलं. म्हटलं , "बघु ही लोकं कशी चालतात ते ?". गवत फार वाढलेलं, पण प्रसाद अन् योगीने आणलेल्या वाकींग स्टिक ला गवत झाडण्याचं फार मोठं काम मिळालं होतं. वाट तर नव्हतीच,त्यामुळे आता मांझी होण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रसादने माउंटन मॅनची जबाबदारी पेलत वाट झाडायला सुरुवात केली. त्याच्या मागे मी, माझ्यामागे पोरी आणि शेवटी प्रसन्न अशा थाटात आमची यात्रा गोठवलीकडे मार्गस्थ झाली. नसलेल्या वाटेत एकेक जण आपला पार्श्वभाग शेकून घेत होते. माझ्यावर हसणाऱ्याची तोंड आता पाहण्यासारखी झाली होती.. त्यात मागून रेश्माची किंचाळी ऐकू आली, पडली की काय म्हणून मागे बघतो तर, “साप....साप !” ओरडत होती. म्हणजे गावकरयांनी सांगितल्याप्रमाणे जनावरांची दहशत होती तर! पण एक बरं झालं, साप रेश्माच्या पुढ्यात होता. ती घसरली असती तर जनावर नाहक चेंबटलं गेलं असतं.
एक तीव्र उतार संपवुन खालच्या पठारावर पोहोचलो. आणि एका आसमानी संकटाची चाहूल लागुन गेली. आता पाऊस येणार की काय ? क्षणार्धात धुक्याची दाटीवाटी होऊन पुढ्यातली वाट साफ नाहीशी झाली. चारही बाजूने पांढरं-फट्ट धुकं अन् त्यात हरवलेले आम्ही सह्यसांगाती! वाऱ्याने थोडा जोर धरला. मात्र थोडाच वेळ, तोही निसटला. पुढे सरकेपर्यंत पावसाने ताल धरायला सुरूवात केली. सळसळणारा पानांचा आवाज पावसाच्या टपोऱ्या थेंबांसोबत घुमू लागला. हरवलेला सूर गवसल्यासारखा घन एका तालात एवढा बरसून गेला की, काही मिनिटातच आमचं पोतेरं झालं होतं. थोड्याफार सरीँची अपेक्षा होती, मात्र तो इतका कोसळेल याची कल्पनाच नव्हती. आणि नाही -नाही म्हणता पुढचे दिड-दोन तास तो असा काही बरसत होता, त्याला तोड नाही तुम्हाला सांगतो. गेल्यावर्षी हरिश्चंद्रावर अनुभवल्यासारखा तो अखंड कोसळत होता. कोरडे पडलेले अर्धवट धबधबे आता तुफान वाहू लागले. खालची ओढ्यासारखी भासणारी नदी आता खरी कोंकणातली वाटू लागली.

वाटेवरून नाखिंद , अस्वलखिंड
कोसळणाऱ्या सरीँचा आवाज,धबधब्यांची गाज,विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट हा सगळा सृष्टीचा तांडव अन् वरुण राजांचा पराक्रम पाहताना भानच हरपून गेलं. पण समोर आमचा मांझी-द माउंटन मॅन आपली जबाबदारी चोख पार पाडत होता. निसर्ग मात्र दिलखुलास हसत होता. न भुतो,एवढा पाऊस या मोसमात तर अनुभवलाच नव्हता. वा ! अविस्मरणीय ! वरून पाऊस, खालून वाटेत कधी काटे,कधी गवत,कुठे चिखल असे करत गोठवलीची वाट कमी होत होती. गावच्या अलीकडचं पठार आता जवळ भासू लागलं. पाऊसही ओसरायला लागला. समोर दिसणाऱ्या झोपडीतून धूर येताना दिसला तेव्हा गावच्या वेशीवर पोहोचल्याची खात्री पटली. कुठुन आलाव?? त्यांना “तिकडे” बोट दाखवताच.दुर्गाडीतून !!, एवढ्या रानात !! वाट दिसलीव तूमाला ? अशा काळजीवजा स्वरात आमचं कौतुक होऊ लागलं. हे गोड कौतुक ऐकतच आम्ही पिंपळवाडीकडे चालायला सुरूवात केली. पावसाची थोडीफार रीपरीप सुरूच होती. एवढं दिव्य करून आमचा दिवस संपला नव्हता. पायाखालचा डांबरी रस्ता आम्हाला घेऊन निघाला होता. गोगवले वाडी,खरबाचा खोंड,दुधाने वाडी,इत्यादी चालून पिंपळवाडीत पोहोचलो तेव्हा अंधार पडायला सुरूवात झाली होती.  सकाळी खाल्लेल्या कोंडेदेशमुखांच्या वडा सँपलची आठवण झाली तेव्हा,वाटेत राबणाऱ्या दोन पायांच्यावर पोट नावाचा गाव आहे आणि त्या गावात आता जोरदार दंगल उसळलीये याची तीव्र जाणीव होत होती. एकदाची पिंपळवाडी गाठली, आमचा ड्राइवर दादा आधीच पोहोचून ताटकळत होता.चोरकणा

चोरकणा वाटेवरून  कोकणात , पुढ्यात मंगळगड
मंगळगडाच्या पायथ्याशी महाराजांचा पुतळा कंगोरीनाथाकडे तोंड करून उभा आहे. उजव्या बाजुला कीर्र झाडीतून जाणारी गडाची वाट आता शांत नीजलीये. पावसाने टोटल उघडीप देऊन दिलासा दिलाय. बऱ्यापैकी अंधार असला तरी सह्यरांगेजवळ ढगांची पांढरीशुभ्र चादर उठून दिसत होती. वाडीतले दिवे विझायला किंबहुना सुरुवात झालेली, पण सुदैवाने वाडीतल्या एकमेव दुकानात जेवणाची ऑर्डर देऊन निश्चिंत झालो. जेवण तयार होईपर्यंत बराच वेळ गेला. मंदिरात टेंट वगैरे टाकून गोगावले काकांच्या पडवीत गप्पा छाटत बसलो.  "कुठुन आलाव ?" बाजूला बसलेले आजोबा विचारते झाले, अंगात खादीची बनयान अन् पंचा घातलेलं ते पिकलं पान एका खुर्चीत विसावलं होतं. पण जिभेवर स्पष्ट कोंकणी. "पुण्यावरून",आम्ही उत्तरलो. "काय कांगोरीगडावर ?"  आम्ही होकार कळवला. गाडीने आलाव ? नाही,दुर्गाडीवरून चालत, आमच्या तोंडून दुर्गाडी हे ऐकूनच आजोबांच्या भुवया उंचावल्या. तुम्ही चोरकणा उतरून आलाय ! अहो तुम्हाला वाट सापडली कशी? पावसा-पाण्यात या जंगलातून ! कमाल आहे बा तुमची. आता कोण जात नाय तिकडे अन् या वाटेला तर नाहीच नाही. दुर्गाडीला जत्रा असते तेव्हा जुनी लोकं सोडली तर कोण फिरकत नाय. गप्पा झाल्या,चार घास पोटात ढकलून मंदिरात पाठ टेकवली तेव्हा रात्रीचे साधारण दहा झाले होते.

पहाटे जाग आली तेव्हा दुधानेवाडीतल्या गुरवांची देवपुजा चालली होती. पुढ्यातला मंगळगड धुक्यातची दाट दुलई ओढुन अजूनही आळसावलेल्या अवस्थेत निवांत पहुडलेला होता. कदाचित नारायणाची सूर्यकिरणे जोपर्यंत डोळ्यावर येत नाही तोपर्यंत तो उठणार नव्हता हे निश्चित ! पण मग आमची निराशा होणार, गडफेरी धुक्यात आटोपणार कशी ? पण सह्यरांगेजवळच्या गोठवली आणि इतर गावांना कवेत घेणाऱ्या धुक्याने आमची दिवसाची सुरवात झाली ती मस्तच! गोगावले दादाच्या पडवीत उदरंभरणम् आटोपून कांगोरीगडाकडे आमची पायगाडी सरकली.


चोरकण्याच्या वाटेवरून , डाव्या बाजुला चोरकण्याची आणि पुढ्यात चिकना घाटाची डोंगरधार 


पिंपळवाडीतुन मंगळगड
ही वाट महाड कडून येणाऱ्या रस्त्याच्या अगदी उजवीकडून थेट मंदिरासमोरून गडाकडे जाते. वाट साधी. पण वाट ज्या परिसरात आहे तो परिसर मात्र जावळी,हे आपण विसरता कामा नये. तशी अनुभूती आपल्याला पुस्तकं वाचून येणार नाही. त्यासाठी इकडे वाट वाकडी करायलाच हवी. जावळीतला पावसाळी ट्रेलर आम्ही काल अनुभवलाच होता. मात्र उन्हाळ्यातही हिरव्यागार वनश्रीने आम्हाला गेल्या ढवळे घाटाच्या भटकंतीत चांगलंच मोहवून टाकलं होतं. तर याच जावळीत विसावलेले चंद्रगड आणि मंगळगड हे दोन माणिक म्हणजे या परिसराचे जिवंत द्वारपालच, ज्यांच्याशिवाय जावळीचा इतिहास पूर्ण होऊच नाही शकत. एक मंगळ,ज्याचा वरंध, कामथे, चोरकणा,वाघजाई,चिकना,इत्यादी घाटांवर कायम दरारा तर दुसऱ्या चंद्राचा ढवळेघाटावर जागता पहारा. वरून या दोन महारथीँची नजर आणि खालुन जंगलातल्या कीर्र वाटा, श्वापदांची भीती. अशा स्थितीत कुणाची टाप ती इकडे नजर वाकडी करायची. आणि ह्याच जावळीच्या जीवावर मोठे झालेले प्रतापी मोरे इथले अनभिषिक्त राजे. या दोन्ही किल्ल्यांची निर्मिती ही चंद्रराव मोरे यांची. खुद्द छत्रपतींना आव्हान देऊन मोरयांनी स्वतःचा पाडाव करून घेतला आणि आयतेच हे दोन्ही किल्ले स्वराज्यात दाखल झाले. पण जावळीतली ही इतिहासप्रसिद्ध चकमक एका वाक्यात सांगण्यासारखी नाही, हेही तितकंच खरं.

मंगळावरून  दिसलेला एकमेव नजारा !
असो. तर हा झाला इतिहास, साधी वाट संपून चढाईला लागलो आणि अर्ध्या-पाऊण तासात एका सपाटीला पोहोचलो. धूक्याने अजूनही नमतं घेतलं नव्हतं. वाटेत भेटलेल्या एका दादांकडून,आमची वाटचाल ऐकल्यावर परत एकदा कौतुक ऐकून झालं. वाट सगळी वाढलेल्या झुडपात हरवली होती. ती हुड्कत पहिल्या दरवाज्यात पोहोचलो. कमान ढासळलेल्या अवस्थेत आहे. पण पायऱ्या मात्र दगडात कोरलेल्या एकदम खणखणीत आहेत. झाडी बाजुला सारून उजव्या बाजुला बालेकिल्ला तर डावीकडे सरळ पुढ्यात सरकत गेलेल्या माचीवरील भैरवाचे मंदिर. आजुबाजुला फक्त हिरव्या रंगाच्या गालिच्यात छोटेखानी मंदिरावरील भगवा बघुन एकदम उत्साह संचारुन गेला आणि पावलं आपोआपच तिकडे वळाली. मंदिरात पोहोचेपर्यंत पावसाळी पाण्याने भरलेल्या टाक्याचे अवशेष खुणावुन जातात. पुढे सरकतो तेवढ्यात धूक्याने विरळ होऊन काल केलेल्या चोरकण्याचे दर्शन दिले. मंदिरात भैरवनाथाची मूर्ती,शिवपिंड,इतर भग्न मूर्त्या याशिवाय गावकऱ्यांनी स्वयंपाकासाठी भांडी ठेवलेली आढळतात. सर्वदूर धुक्याचे साम्राज्य असल्याने आजूबाजूचा परिसर दिसत नव्हता, तसं नसतं तर जावळीत उतरणारया घाटावाटांपासून राजगड,तोरणा,प्रतापगड,दुर्गाडी,रायरेश्र्वर,कोळेश्वर ते महाबळेश्वरच्या मढीमहलपर्यंत सर्व परिसर नजरेत सामावला असता. असो,त्यासाठीही पुण्यच हवे. नाही का ? झुडपातून बालेकिल्ल्यात चढायचे टाळून आम्ही परतीची वाट धरली ती वडघराच्या दिशेने. वडघरात पोहोचलो तेव्हा पोटात भूकेचे आगडोंब उसळेले होते. महाड रस्त्यावर एका कोल्हापुरी हॉटेल मध्ये रस्स्यावर आडवा हात मारत सुरमई हाणली,पोटोबा शांत झाला होता. पण मंगळावरील ही "चोर"टी भेट आटोपून निघाल्याची खंत मात्र मनात घर करून गेली. बालेकिल्ल्यावरून जावळी नजरेत भरवायला पुन्हा एकदा पायगाडी इकडे वळेल,यात दुमतच  नाही.

मंगळावरील चोर !
ता.क. रायरेश्र्वरावरची कौजागिरि याहीवर्षी साजरी करायची राहिलीच. असो !

12 comments:

 1. मस्त रे भाऊ 🙏🏼

  ReplyDelete
 2. मस्त रे.. फोटोज, वर्णन आणि आडवाटा!!!

  ReplyDelete
 3. संदीप भाऊ झकास आताच प्रशांत आणि मी मोहनगड कावळ्या मंगळगड केला.आधी जितुभाई बंकापुरे आणि अमृतकरांबरोबर कामथे ढवळे केला होता.चोरकणा राहीला बघू कधी योग येतोय!पण ब्लॉग वाचून परत जावेसे वाटते!!

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद तुषार ! आणि हो जाऊन या,छान ट्रेक आहे.

   Delete
 4. mastach..parat ekada jaun alyasarakh watal..

  ReplyDelete
 5. Sandip dada number deta ka tumacha...

  ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences