अंधारबन-गाढवलोट-खडसांबळे : लेण्यांच्या शोधात

पुर्वप्रकाशित लेख 'सह्याद्रील्या कुशीतली भटकंती' - लोकप्रभा अंक : ४ सप्टेंबर २०१५,पान क्र . ६९ च्या पुढे 
गेल्या आठवड्यातच अंधारबनला जाऊन आलो. पुण्याच्या अगदी जवळ पाठमोऱ्या ताम्हिणी घाटाजवळ वसलेल्या दाट जंगलात मनमुराद भटकंती अनुभवली. आतापर्यंत आडवाटेवरचा मानल्या गेलेला सह्याद्रीच्या धारेवरच्या पायगाडीचा हा प्रवास पुन्हा एकदा मनात घर करुन गेला. या प्रवासातले प्रवासी मात्र सगळ्या प्रकारात मोडणारे ! अगदी नेहमीच्या भटक्या मित्रांपासुन चिमुकल्या सह्यमित्रांपर्यंत पाच-एक डझनाचा गट घेऊन अंधारबन ते कोंकणातल्या भिरा धरणापर्यंतची वर्षासहल जोरात पार पडली. सुरवातीस पाऊस उदार होता पण नंतर मात्र त्याने जी काय पळी दिली ती ट्रेक संपला तरीही तो भेटलाच नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाटेत काडीचाही केर न करता,आरडाओरड न करता जवळपास १४ किमीचा ट्रेक यशस्वी झाला. अजुन एक, विशेष अभिनंदन प्रसादचं ! स्टोक कांगरी शिखर सर करुन आदल्या रात्रीच लेहवरून पुण्यात पोहोचलेला हा पठ्ठया अंधारबनचा ट्रेक लिड करायला सकाळीच हजर होता. क्या बात !! पहाटे पुण्यातून निघालेल्या गाड्या पिंप्रीच्या पाझर तलावाजवळ पोहोचल्या पोहोचल्याच योगीला विचारलेल्या प्रश्नाने आमचा अंधारबन ते खडसांबळ्याचा ट्रेक डोळ्यांसमोर तरळून गेला. काय योगी ? आठवतो का चना मसाला ? "हो ना, त्या खोपट्याजवळच पेटवली होती चुल", तीही वदली. बाकी तंगडतोड भारीच झाली होती म्हणा. आणि हो,अशा ट्रेकमध्येच भटकण्याची खरी मज्जा,घाटवाटा म्हटल्या की आमचा हा फार मोठा वीकपॉइंट बरं का !असो. तर वृतांत असा ! फाल्गुनातली रखरखणारी दुपार पण सह्याद्रीतल्या घाटवाटा खुणावत होत्या. आणि दुग्धशर्करा योग म्हणजे होळीची तीन दिवस जोडुन आलेली सुट्टी पायांना अस्वस्थ करत होती,पण काही घरघुती कामं आड आल्यामुळे तीन दिवसाऐवजी दोन दिवसांचा प्लॅन आखावा लागला. आमचा सह्याद्री पावसाळ्यात जेवढा उदार असतो,तेवढं त्याचं प्रेम उन्हाळ्यात कमी झालेलं असतं,असं काहींना वाटतं.पण आम्हाला त्याच्या कणखरतेतही गारवा अनुभवण्याची खाज असतेच,वाढणाऱ्या उन्हाचा विचार करता प्लॅन जरा बेताचाच ठरवलेला बरा. म्हणजे रानमेव्याची चंगळ असली तरी पाण्याची बोंब ! आणि वरुन उग्र नारायणराव अजूनच उग्र होऊन आग ओकत असतात. त्यामुळे ट्रेक जरा गारच हवा नाही का ! स्वारगेटवरुन निघणारी सव्वा- दहाची एकमेव वांद्रे- वडूस्ते बस पकडून अंधारबनाची वाट जवळ करायची ठरलं. आणि परतीला खडसांबळ्याच्या उपेक्षित लेण्यांना भेट द्यायची,पुढचा प्लॅन परिस्थितीनुरुप !

या वेळचे भिडू चौघंच ! योगिता,प्रसाद,रेशमा आणि वडस्करांचा कुलदिपक. ठरल्याप्रमाणे सगळे वेळेवर हजर आणि नेहमीप्रमाणे रेशमा वेळेच्या आधी. गाडीची चौकशी करायला काउंटरवर गेलो तर नेहमीचा हेकेखोरपणा सांभाळुन साहेब बोलते झाले,"आहे बस,येईल इतक्यात ". कॅन्सल नाही ना होणार ?, माझ्या या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करून खाकी आणि जाड कातडीचा तो प्राणी पुन्हा आपल्या कामात मग्न झाला. पुलंनी दुकानदार अन् ग्राहक यांच्यामधलं नातं एकाच वाक्यात सांगितलं आहे ते म्हणजे "दुकानात सर्वात जास्त दुर्लक्षित असलेली गोष्ट म्हणजे गिर्हाइक " त्याच धर्तीवर "येस्टी महामंडळाच्या चौकशी कक्षावर सगळ्यात जास्त दुर्लक्षिलेली गोष्ट म्हणजे प्रवासी " असंच म्हणावं लागेल. असु दे,प्रत्येकाला आपली ओळख जपावी लागते,ते सोडुन कसं चालणार. गाडी वेळेच्या वीस मिनीट उशीरा आली,म्हणजे वेळेवरच आली म्हणायची. मोजून आम्ही चार अन् ते दोघे असा ऐवज घेऊन तो लाल डब्बा एकदाचा मार्गस्थ झाला. शहरातील गर्दी अन् रहाटगाड्यातून मार्ग काढित  गाडी चांदणीचौकातून ताम्हिणी घाटाकडे रवाना झाली आणि कॉलेजच्या आठवणींना परत एकदा उजळणी मिळाली.
पुण्यापासून हाकेच्या अंतरावर अशी बरीच ठिकाणं आहेत,जी पावसात अगदी भरभरून हसत असतात,तिथल्या फुलांमध्ये,पानांमध्ये,दाटलेल्या धुक्यामध्ये अन् भरून आलेल्या नभांमध्ये,तिथल्या कोसळणाऱ्या महामूर पावसामध्ये. त्यातच मोडणारं ताम्हिणी घाट हे अक्षरशः वेड लावणारं ठिकाण. इथून निघालो की कॉलेज मध्ये असताना घाटात खालेल्ल्या वडापावची चव अजूनही आठवते. ही चव जिभेवर रेंगाळत असतानाच रेश्माची भूक जागी झाली, मला भूक लागली ! ह्या मुलीची भूक म्हणजे एक अवघड प्रकरण आहे. दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती म्हणा. पिंपरी गावात उतरलो तर अंधारबनाची वाट अलीकडूनच वर जाते ही नवीन माहिती मिळाली,मग गावातून पाण्याच्या बाटल्या भरून मागे चालायला सुरुवात केली. बस मध्ये एका शाळकरी मुलीने सांगितल्याप्रमाणे एका तळ्याजवळ पोहोचलो. आणि खरं सांगतो तळ काय सुंदर होतं, चौफेर डोंगररांगेने वेढलेला हा परिसर आणि त्यात हा पाझर तलाव. स्वारी एकदम खुष, उन्हाळ्या दिवसात दिवसात अशी ठिकाणं मनात घर करून जातात. अशा रम्यं तळ्याकाठी चुल मांडून दुपारच्या जेवणाचा बेत आखायचा हा विचारच खुप गोड होता हो ! चुल मांडल्या गेली,लगेच पंधरा मिनिटात रेडी-टू-सर्व्ह चना मसाला तयार झाला. अजुन एक म्हणजे योगीने घरून आणलेल्या वाटाणा घालुन तयार केलेल्या हिरव्या मिर्चीचा ठेचा दणकाच उडवून गेला. जेवणं तर अशी झाली होती की आडवे झालो असतो तर ट्रेक झाला असता आडवा, पण मनावर धोंडा ठेऊन सिनेर खिंडीकडे ट्रेकस्थ झालो तेव्हा दुपारचे साधारण अडीच झाले होते, अगदी वामकुक्षीची वेळ म्हणायला हरकत नाही म्हणजे ती होतीच. पण परवानगी नव्हती कारण आजच आम्हाला नागशेत पर्यंतचा लांबच लांब पल्ला गाठायचा होता.


वीर नावजी बलकवडेच्या स्मारकाजवळ पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. आता पुढचे दोन- अडीच तास इथल्या पाण्यावाचून पर्याय नाहीये. त्यामुळे पाण्याच्या रंगाकडे बघुन आढेवेढे न घेता आपापल्या पाणपिशव्या भरून घ्याव्यात. सिनेर खिंडीतलं हे स्मारक म्हणजे पायवाटेच्या उजव्या बाजुला थोडं वर एक मोठा दगड आणि त्यावर कोरलेली नावजी यांची प्रतीकात्मक मुर्ती अन् एक शिलालेख. बाजूलाच शेंदूर थापलेली वाघजाईदेवीची मुर्ती. बस एवढंच ! येथूनच झालेलं भिरा धरणाचे दर्शन आणि कुंडलिका नदीच्या उगमाजवळून सुरू झालेली दरी डोळे विस्फारुन गेले. आपण जिथे उभे असतो अगदी तेथूनच या प्रसिद्ध दरीची सुरवात होते. पावसात दोन्ही बाजूंच्या कड्यांवरून कोसळणारे पाणी एकवटुन कुंडलिका नदी येथून उगम पावते. येथूनच दरीतल्या कुंडलिका,नावजी अन् अंधारबन या सुळक्यांचे आणि कोंकणातल्या भिरा अर्थात उन्नई धरणाचे मनमोहक दर्शन झाले.

आता एकच करायचं,आपली पायगाडी टॉप गेअरमध्ये घालुन वारीला सुरुवात करायची आणि सपाटीवर चालण्याची मजा अनुभवत फक्त सुंदर निसर्ग जगायचा ! आम्हीही ट्रेकस्थ झालो तेव्हा नारायणराव अगदी पिकपॉईंटवर होते,मात्र थोड्याच वेळात अंधारबनाने आम्हाला त्याच्या कवेत सामावून घेतलं. आता आम्ही दरीच्या पलीकडील बाजूस घनदाट जंगलातुन चालत होतो. रान एवढं दाट की सूर्यकिरणांनाही जमिनीला स्पर्श करण्याची सहज मुभा नाही. जंगलाचा पहिला टप्पा ओलांडून बाहेर पडलो तर खालच्या कुंडातला नैसर्गिक स्विम्मिंग पुल साद घालुन गेला. भर उन्हाळ्यात अशी संधी सोडणार कोण.अगदी म्हशी डबक्यात डूंबाव्यात तसे आम्ही कीतीतरी वेळ त्यात पहुडत होतो. नागशेतपर्यंतचा पल्ला आठवताच भानावर आलो आणि परत पायगाडी सुरू झाली. मोकळ्या पठारावरून परत एकदा कुंडलिका दरीचं अफलातून दर्शन झालं. पुढ्यातल्या सरळसोट कातळकड्याच्या माथ्यावरुन अगदी रांगेत कोसळणारे धबधबे,याची आपण या भर उन्हाळ्यात फक्त कल्पनाच करू शकतो. बाहेर उन्हात काहिली होत असताना आत मात्र गारगार सावलीचं छप्पर सुखावुन जात होतं. निरनिराळ्या झाडांचा सुगंध पार छाती फुगुन आत शिरत होता, मध्येच एखाद्या माकडाचा आवाज, पक्ष्यांच्या सुमधुर गाण्याची मेजवानी मन प्रफुल्ल करीत होती. कित्येक ठिकाणी शिकारींसाठी लावलेले सापळे डुक्करांचे अस्तित्व जाणवून देत होते. खरंच नावाप्रमाणे ही वाट म्हणजे अंधारबनच ! पायाखाली येणाऱ्या पानगळीचा करकर आवाज तेवढा,बाकी सगळी शांतता. आणि पायवाट म्हणाल तर साधी सरळ. कुठेही चढाई नाही अथवा चुकण्याची भिती नाही. पुढे नावापुरता लागणारा एक चढ चढुन गेलो की आपण मोकळ्या पठारावर येतो. उजव्या बाजूला भलामोठा डोंगर खुणावत असतो. थोडं पुढे गेलो की पठारावरून उजव्या बाजूला सुधागड,सरसगड, आभाळात घुसलेल्या तैल्बैलाच्या जुळ्या कातळभिंती(इथुन त्या एकसंध वाटतात) आणि म्हातोबा डोंगराच्या पायथ्याशी निवांत पहुडलेला चौकोनी घनगड हे सर्व सह्यसखे दर्शन देतात. अन् डाव्या बाजूला अजूनच भेदक झालेलं कुंडलिका नदीचं खोरं भिती दाखवून जातं.तम्हिणी घाटातल्या गाड्या खेळण्यातल्या वाटाव्या,अशा धावत असतात. उघड्यावर एका झाडाखाली विसावलेली विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती हिर्डि गाव जवळ आल्याचं खुणावुन गेली. आणि अर्ध्या तासाची वाट तुडवून आम्ही गाव गाठलं. ऐन सह्यधारेवर वसलेलं हे गाव मावळतीला शांत भासत होतं,जणु गावात कोणी नाहीच ! कोणाला तरी रस्ता विचारून वाटनिश्चिती करायची होती.
बऱ्याच वेळाने एक बाबा आमच्याकडे येताना दिसले, नमस्कार-चमत्कार झाला आणि नागशेतची वाट विचारली. म्हटले,"चला,म्या दावतो वाट" असे म्हणून ते त्यांच्या घरात शिरले. तेवढ्यात एक मावशीबाय बाहेर येऊन, "आवो,सरळ वाट हाय. कशाला त्या बाप्याला घेऊन चालला, लयी बडबडा हाय बगा त्यो " आम्हाला हसुच येत होतं. असु दे. बाबानी आम्हाला नागशेत फाट्याला आणुन सोडलं आणि निरोप घेतला.इथुन डावीकडची वाट भिरा गावात उतरते तर उजवीकडे नागशेत. दिवाकरराव पश्चिमेकडे कलायला सुरुवात झाली आणि आम्हीही पश्चिमेचीच वाट धरून कोंकणात उतरायला सुरुवात केली. या घाटाचं नाव गाढवलोट,कारण काय तर म्हणे या वाटेने गाढवं कड्यावरून घसरुन मेली होती. काय विचित्र नावं असतात नाही. पण साध्या तुप-मीठाला हिर्डिकरांना नागशेत किंवा भिरा जवळ करावं लागतं. हिर्डिपासुन घुटक्याचा रस्ता झाला तर,गावातली ही समस्या सुटण्याची शक्यता आहे. उतार वाढत चालला तसा कोंकणातला दमटपणा वाढत होता.पण मावळतीचा गारवा अन् आजुबाजुला असलेल्या झाडोऱ्यातून वाट काढत खालच्या पदरात पोहोचलो तेव्हा दिवाकराचा लालभडक ठिपका झाला होता. शेताडातून वाट तुडवत नागशेतला पोहोचलो तेव्हा बराच अंधार झाला होता.

गाढवलोट उतरून आलो, या आमच्या वाक्यावर गावकरी विश्वासच ठेवायला तयार नव्हते. नुकताच शिमगा उधळून झाला होता, त्यामुळे गावात लगीनघाई सारखी लगबग दिसत होती. आमच्या भोवती गराडा पडला आणि मग कौतुक वाहू लागलं. खास करुन आमच्या सोबतच्या साळकाई - माळकाईचे. "पिंप्रीपासुन चालत आलाव !!",असं एका मावशीने विचारल्यावर उगीच त्यांच्या अंगावर मूठभर मास वाढलं. असो. कौतुकसमारंभ पार पाडून मुक्कामाला जागा म्हणून बाजूलाच मंदिर असल्याची माहिती मिळाली. पोलीसपाटलांना ओळखपत्र वगैरे दाखवून झालं. पण बाजुच्या मंदिरात गावकी चाललेली. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, गावकी म्हणजे बैठी ग्रामसभा, वर्षभराचा आढावा,हिशोब वगैरे,इत्यादीचं चर्चापीठ. शहरात कामासाठी गेलेली चाकरमानी सणासुदीला चार दिवस गावात येऊन आपल्या आप्तांसोबत सण साजरे करतात. बाकी कोंकणात गणेशोत्सव आणि होळी म्हटलं की नुसती धमाल,नाही महाराजा ! होय महाराजा !! जेवढा दिवाळीला फटाक्यांचा प्रकाश होत नाही त्यापेक्षा जास्त इथली चौकातली होळी आसमंत उजळून सोडते. मंदिरात गावकी चालली होती अन् पुढ्यात कालच्या पेटलेल्या होळीचा निखारा अजूनही जिवंत होता. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीचा चंद्रप्रकाश हळूहळू पसरू लागलेला. इथे सभा संपायला वेळ लागेल म्हणून गावातल्या दुसऱ्या मंदिराकडे आम्ही मोर्चा वळवला.

गावाच्या दुसऱ्या टोकावर वसलेलं हे ऐसपैस मंदिर मुक्कामाला अगदी साजेशी जागा होती. पथाऱ्या पसरून सरपण गोळा केलं. आकाशात चंद्रप्रकाश लक्ख झाला होता,खाली चुलीवर नेहमीप्रमाणे सुपचा बेत शिजत होता. गावापासून थोडं अंतरावर असल्यामुळे इकडे सगळी शांतताच होती. पूर्वेकडचा सह्यकणाही चंद्रप्रकाशात उजळून निघाला होता. अशा वेळी गरमागरम सुपचे घोट घेत आशाताईंचे नक्षत्रांचे देणे जर कानावर पडले तर ! अहाहा ! लागलीच सॅकमधुन मोबाइल बाहेर आला आणि "चांदण्यात फिरताना" अगदी वर्मावरच घाव बसला. आता कुठे रात्र सुरू झालीये, अजुन कीतीतरी वेळ या चांदोबाचं तेज मनभरून अनुभवू शकणार, व्वा ! "तरुण आहे...रात्र अजूनी" या कल्पनेनेच  मन आनंदुन गेलं. मग तीही आली "चांदणे शिंपित" ! काय जादू आहे ना गाण्यात ? निखळ आणि शुध्दतेचा एक अप्रतिम आविष्कार. सह्यादीच्या कुठल्यातरी कड्यांवर रात्रीचा मुक्काम ठोकुन असाल तर आशाताईंना किमान एकदा ऐका,त्याक्षणी तुम्हाला "तुम्हीच" असल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. बाकी आहेच आपलं रोजचं, तेव्हा ते "तुम्ही" नसताच मुळी. ही वाट दुर जाते स्वप्नामधील गावा, या ओळी ऐकत कडेकपारीतून वाट काढत एखाद्या गावात पोहोचण्यात जी मजा आहे ना ! खरं सांगतो,शब्दच नाही. नभ उतरू आलं,या गाण्याने पुढच्या चार महिन्यात धडकु पाहणाऱ्या वरूणराजाची चाहूल लागुन गेली. साग्रसंगीत सुपोत्सव झाल्यावर मंदिराच्या पायऱ्यांवर येऊन गप्पा मारत बसलो त्यात, नभांगणातील चंद्ररावही येऊन सामील झाले. पण गारव्याने जोर धरला तसा गप्पांचा फड आवरता घेत टेंटमध्ये शिरलो ते पहाट होईपर्यंत !

सकाळचा चहा घेऊन खडसांबळ्याच्या लेण्याकडे चालायला लागलो तेव्हा ऊन बरंच वर आलं होतं. वाट दाखवायला कोणीच नव्हतं,त्यामुळे आता खरी कसोटी लागणार असं दिसत होतं. कारण ह्या लेण्या शोधायच्या म्हणजे एक दिव्य काम. एकवेळ किल्ला आपल्या डोळ्यासमोर असतो,चुकलेली वाटही लवकर गवसते. गेल्यावेळेसची ठाणाळे लेणी शोधयात्रा चांगलीच अंगावर आलेली. पुढ्यात लेणी दिसत असताना तिथपर्यंत जाणारी वाट शेवटपर्यंत नाही सापडली.पण यावेळी जमेची बाजु एकच, आता पावसाळा नव्हता. काल गावकऱ्यानी सांगितल्याप्रमाणे समोरच्या डोंगराच्या पोटात खडसांबळे लेणी आहेत. ओढा ओलांडून आदिवासी पाडया पर्यंतची आमची स्वारी निघाली. उघड्या रानमाळावरून चालताना चांगलच रापुन निघालो,अक्षरशः घामटं काढलं उन्हाने. घामाने निथळत एका मोठ्या आंब्याखाली बुड टेकवलं. दात आंबून येइस्तोवर कैऱ्या अन् बोरं पाडून पोटभर चापली. मस्त आराम झाला आणि भानावर येऊन परत लेण्यांकडे मोर्चा वळवला. बोडकं रान सोडून वाट जंगलात शिरली. लेण्यांचा डोंगर डाव्या बाजूला राहिला. वाटेनेच जंगलात शिरत गेलो,लेण्यांचा मात्र दुरदुरपर्यंत पत्ता नव्हता. आता अजुन थोडं पुढे गेलो असतो तर केवणीच्या पठारावर पोहोचलो असतो. एकदोनदा मागेपुढे करुन झालं,निष्फळ ! आता ऊर्जाही संपत आली,भुका लागल्या होत्या. शोधमोहिम अंगलट येणार असं दिसत होतं. आजुबाजुला मानवी अस्तित्वाचा मागमुसही नव्हता. जेवणं आटोपून परत एकदा प्रयत्न करायचे ठरले आणि नेमकी एक म्हातारी आजीबाई पानगळ तुडवत आमच्यासमोर उभी ठाकली. काय आनंद झाला म्हणून सांगु. आजीबाई निघाल्या होत्या माथ्यावर घुटक्याला डोक्यावरचं बोचकं सांभाळत.

आजीच्या कृपेने लेणी गावली अन् जीव भांड्यात पडला. वाट अक्षरशः हरवलेली, झाडोरा तोडतच साफ केली. थोडं पुढं गेल्यावर वरच्या अंगाला एकदाची वाकण दिसली. पायऱ्या चढत असतानाच आत एखाद जनावर तर नाही ना ? याची खातरजमा करुन लेण्यांमध्ये पाय ठेवला. वासुदेव बळवंत फडक्यांनी  ह्या लेण्यांचा उपयोग इथे लपण्यासाठी कसा केला असेल याची प्रचिती आली. या अडगळीत लपल्यावर कुणाला गावायचा माणुस ! जुन्या व्यापारी मार्गावर कोरलेल्या लेण्यांपैकीच हे डोंगरातलं अप्रतिम लेण ! इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकात या लेण्यांची निर्मिती केली असावी. पायऱ्या चढुन गेलो की आपण ऐसपैस अशा विहारात प्रवेश करतो आणि समोरच स्तूप लक्ष वेधून घेतं. आजुबाजुला बौद्ध भिक्कूंसाठी बांधलेली गृह काळाच्या ओघात ढासळलेली आढळतात. याच्या बाजूला पण एक विहार आहे,कदाचित त्याही पलीकडे अजून असतील पण आता दगडमातीने सगळे बुजलेले आहेत. इकडेतिकडे डोकं घालुन आम्ही एका ओबडखाबड जमिनीवर दिली पाऊण- एक तास ताणुन. जाग आली तेव्हा एकदम उत्साह संचारला. डोळ्यांसमोर असा लक्ख प्रकाश पडल्यासारखा,हरवलेल्या वाटा गवसल्यासारखं ! पुढच्या प्रवासाला लागलो तेव्हा दुपारचे पावणेतीन झाले असतील.

खालच्या आदिवासी पाड्यातल्या ओढ्यावरून बाटल्या भरून घेतल्या आणि खडसांबळयाकडे चालायला सुरवात केली. उन्हाचा दाह चांगलाच जाणवत होता. बाटल्यामधले पाणीही गरम झाले होते,पाण्याची तहान काही जात नव्हती. पण गाव येण्यावाचून पर्याय नव्हता. सुधागड अन् तैलबैलच्या जुळ्या भिंती उजवीला ठेवत ठाकरवाडी गाठली तेव्हा देहाचं अक्षरशः पोतेरं होऊन घाम निथळत होता. वाडीतल्या एकमेव दुकानाजवळ बसकन मांडली अन् दुकानात जे मिळेल त्यावर ताव मारायला सुरवात केली. आमचा आत्मा शांत झालेला पाहून पुढ्यातला आमचा कोंकणसखा भोरपगड आमच्याकडे मंद स्मितहास्य करीत होता आणि आम्ही मात्र ठाकरवाडी-पाली या बसची शेवटच्या वेळेची वाट बघत बसलो.....


1 comment:

  1. Private गाडी असेल तर मुंबई वरून कुठे यावे लागेल ?

    ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences