जांबा अन् आंब्याच्या देशात - उत्तरार्ध

जांबा अन् आंब्याच्या देशात - पूर्वार्ध  येथुन पुढे
दिवसभराचा सर्वांना रापुन काढलेला प्रवास आणि बोंबलत फिरायची खाज आता कुठे थांबली.उन्हाने चांगलेच करपल्या गेलेलो.जयगड जेट्टीवर आमचा नंबर यायला अजुन बराच अवकाश होता.किल्ल्यावरुन निघताना रस्त्यावरचा "वेळणेश्वर 20 किमी" हा बोर्ड बघुन वाटलेलं,रस्ता असेल.पण नाही या मार्गात लागणाऱ्या जयगड ते तवसाळ या बोटफेरीचा हिशोब त्या 20 किमी मध्ये नसावा.असो,शेवटची बोटफेरी रात्री 10 ला असते ही नवीन माहिती मिळाली आणि आम्ही इथे पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे साधारण साढ़ेसहा झाले असावेत.या बोटफेरीने जवळजवळ 70 किमी चा गणपतीपुळे ते हेदवी असा भातगावमार्गे प्रवास कमी होतो.त्यामुळे गाडीत बुड टेकवुन बसायचा कंटाळा आला असेल तर ही जेट्टी म्हणजे तेराव्या महिन्यात लागलेली लॉटरीच.भुका लागल्या होत्या आणि नंबर यायला उशीर होता,थोडी पोटपूजा करून घ्यावी हा विचार करून शेजारीच असलेल्या हॉटेल मध्ये पाय टाकला. गरमागरम चपाती-आमलेट अन् फक्कड चहा! बेत आला जमून आणि प्रवासाचा सारा शीणच निघुन गेला.चहाची चव चाखून योगिता तर अमृत मिळाल्यासारखी आनंदली.चहा- आमलेटचा आस्वाद घेत बसलोय. 
© Sandip Wadaskar ।  © WTA | भटकंती…सह्याद्रीच्या कुशीत  । All Rights Reserved
खाडीतल्या छोट्या छोट्या लाटा वातावरणातला  जिवंतपणा वाढवत होत्या,बाकी सारे शांत-निवांत.हॉटेलवरही आम्हा चौघाशिवाय कोणी नाही.पलीकडे पॉवरप्लांटच्या प्रकाशाचं प्रतिबिंब पाण्यात पडून खाडीची शोभा वाढवत होतं.बोलता बोलता हॉटेलमालकाशी गप्पा रंगल्या,आंबे मिळतील का? याची चौकशी केली तर साळवीसाहेबांनी त्यांच्या बागेतलं फळ (अस्सल कोंकणी लोकं आंब्याला "फळ" म्हणतात) कसं बाधत नाही इथपासून ते झाडे लावताना मास्यांचा चुरा कसा टाकला इथपर्यंत.अंधारामुळे आता न दिसणाऱ्या झाडांचा जवळपास पाच वर्षांचा इतिहास डोळ्यांसमोर आला.त्यांच्या आजोबांपासुन चालत आलेली रोपं लावायची पूर्वापार पद्धत आणि नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबा,चांगली माहिती मिळाली. बराच वेळ चाललेलं साळवी साहेबांचं आंबा नैसर्गिकरीत्या कसा पिकवला जातो,या विषयावरील व्याख्यान माझ्या "आंबे कसे दिलेत,घ्यायचे होते?" या प्रश्नाने थांबलं.हुश्श! पण घरच्या वाडीतले आंबे संपले असल्यामुळे एक-दोघांना फोन करून जमवण्याचा त्यांचा निष्फळ प्रयत्न करून झाला,तोपर्यंत परतीची बोटफेरी जयगडाकडे येताना दिसली. साळवी साहेबांचा आणि आमलेट बनवून देणाऱ्या वाहिनींचा निरोप घेऊन बोटीत चढलो. आंबे मिळाले नाहीच.

दाभोळ खाडीच्या पार्श्वभूमीवर गोपाळगडाची तटबंदी


तटबंदीने सुरक्षित आतली आमराई
बोटीत खाली गाड्या अन् वरच्या डेकवर माणसं. गार वारा वाहत होता, दहा- पंधरा मिनीटाच्या प्रवासात लाटांवर हुन्द्लत बोट पैलतिरि तवसाळ ला पोहोचली तेव्हा चांगलंच अंधारून आलं होतं. हेदवी मार्गे मुक्कामी वेळणेश्वरास पोहोचलो, हॉटेलचं बुकींग आधीच झालं असल्यामुळे पटापट जेवणाची ऑर्डर देत,फ्रेश झालो. हलवा फ्राय (मास्यांचा प्रकार - उगाच वाचकाला गाजराची आठवण नको व्हायला :)) आणि कोलबीचा रस्सा,आता कसं कोंकणात आल्यासारखं वाटतं.ताव मारून पडी दिली. सकाळी सकाळी वेळणेश्वराचा समुद्रकिनारा सागराच्या लाटांशी सलगी करतच जागा झाला, त्याची गाज हॉटेलच्या गवाक्षातून ऐकू येत थेट अंतर्मनाला भिडत होती. सुरेख असते नाही ही गाज ! ऐकत रहावीसी वाटते. अप्रतिम,निखळ आनंद बास! हॉटेलच्यामागील बाजूस नारळाची आणि थोडी पोफळीची आकाशाला गवसणी घालणारी उंचच उंच झाडे आणि अशाच वाडीतून किनाऱ्याकडे जाणारी सुरेख वाट! व्वा! आणि याच धुंद वातावरणात हातात हात घालुन माझ्या सोबत चालणारी ती! असो,येईलच कधीतरी आयुष्यात. सगळं आवरुन बीच कडे निघालो.अर्थात तिथे जाऊन भिजणे हा कार्यक्रम मुद्दामच टाळला होता. कारण एकच,पहाटेच पोटात पडलेली आग आधी शमवायची.

गोपाळगडातील भव्य टाके आणि मागे पडकं बांधकाम
वेळणेश्वर बीच वर नाही म्हटलं तरी पर्यटकांची थोडीफार गर्दी होतीच. बाजूलाच असलेल्या टपरीवर रस्सा वडा - उपीट - वडापाव - आवळा सरबत - कोकम,इत्यादि इत्यादी अशी भरगच्च ऑर्डर देऊन झाली,पोटभरून चापली. कोंकणात आल्यावर मला एका गोष्टीचं फार वाईट वाटतं. म्हणजे बघा, कोंकणात पारंपरिक खाण्याचे भरपूर प्रकार आहेत. एवढं असूनही इथे आल्यावर तोच वडापाव खाण्यात मला काही मजा वाटत नाही असो.स्थानिक रेसीपी आपण आपल्या जपल्या पहिजे,एवढंच म्हणणं आहे,बस. पोटोबा संपवून वेळणेश्वराचे दर्शन घेतले आणि अंजनवेलच्या गोपाळगडाकडे मार्गस्थ झालो.

तटबंदीचा बाहेरील खंदक !
अंजनवेलच्या  रस्त्यावरून गुहागरच्या श्री व्याडेश्वराचे गाडीतुनच दर्शन घेऊन आत शिरलो तेव्हा डाव्या बाजूला असलेल्या गुहागर ग्रामीण रुग्णालयाचा फलक दिसला. पाच वर्षाआधीची कोंकण भटकंती डोळ्यांसमोर आली.आणि पुन्हा एकदा झुरळाच्या  गोष्टीने हुरळून गेलो. याच हॉस्पिटलमध्ये आमच्या जीजाजींच्या कानात गेलेलं झुरळ बाहेर काढण्याचे अथक प्रयत्न चालले होते. क्षणभर हसु किंवा रडु असे मिश्रित भाव मनात येऊन गेले. आणि कहर म्हणजे ते झुरळ इथे नमलंच नाही,त्याला काढावं लागलं दापोली इथे. ते झुरळ किमान दोन दिवस तरी कानात होतं. आणि ती गोष्ट बाकीच्यांना सांगतोय तर हे पण हसून हसून बेजार. एकंदरीत प्रवास मोठा सुखाचा आणि आनंदाचा जात होता. अधुन- मधुन डॉक्टरांनी बाहेर काढून दाखवलेली झुरळाची डेड बॉडी डोळ्यांसमोर यायची आणि वाईट वाटायचं. चालायचच,तूर्तास सड्यावरचा प्रवास आणि वरून दिवाकररावांची अवकृपा सोसत गोपाळगड जवळ करतोय. अंजनवेल मागे पडून मुख्य रस्त्यावरून सहा किमी आत वळलो की थोड्याच वेळात उजव्या बाजूला एनरॉन प्रकल्प आताचा  रत्नागिरी गॅस लीमिटेडचा प्लांट दॄष्टीस पडतो. गावातच खाडीच्या पाण्यावर बांधलेला छोटा पूल आडवा येतो,पलीकडे बहुदा किल्ल्यावरुनच खाली आणुन बसवलेल्या तोफा आपल्याकडे तोंड करून स्वागत करतात. गावाच्या पलीकडे थोडं वर चढुन किल्ला माळरानावर वसला आहे. जांबा दगडाचं मैदान आणि त्याच्याच बाजूला किल्ल्याची तटबंदी ! ड्राइवर दादा गाडी थेट किल्ल्यातच दामटणार होते,तेवढ्यात किल्ल्याचा आब राखत गाडी बाहेरच लावायची सूचना करून आम्ही किल्ल्यात प्रवेश केला.

दरवाज्यातच लावलेला "सिमरन मँग्रोव्हज" हा फलक बघुन कैक दिवसांपासुन वाचत आलेल्या गोपाळगडाची दुर्दशा लक्षात यायला वेळ नाही लागला. होय. हाच तो गोपाळगड,जो सरकारने अवघ्या काही रुपयांच्या मोबदल्यात विकून एका खाजगी माणसाकडे सुपूर्द केला. प्रवेशद्वार पूर्णतः उध्वस्त झालेलं आहे. असं ऐकण्यात आहे की,मालकाने गाडी आत जाईल या उद्देशाने तटबंदीला भगदाड पाडून प्रवेशद्वाराचं रुंदीकरण केलं. तसेही ते आताच्या नवीन बांधकामावरून दिसतच. जयगडासारखीच खंदकानी अभेद्य अशी  तटबंदी एकदम मज़बूत आणि खणखणीत आहे. याचाच वापर आता कुंपण म्हणून किल्ल्याच्या आवारात मस्तपैकी आंब्याची लागवड केली आहे. आमराई सुरक्षित आहे,किल्ल्याचे भविष्य मात्र दुर्लक्षीत. आत प्रवेश केला. हा किल्ला पाहून गेल्या वर्षीच्या मोहिमेतल्या भरतगडाची आठवण झाली. तोही तसाच कुण्या धन्याच्या घशात गेलेला.

आंजर्ल्याकडे जाताना सागराचा विहंगम नजारा
दाभोळच्या खाडीवर(वसिष्ठी नदीची खाडी ) लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी,कारण गतकाळात दाभोळ हे नावाजलेले बंदर होते. या किल्ल्यावरुनच वसिष्ठी नदीतून चालणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवता येत असावं. पूर्वी अंजनवेलचा किल्ला अशी ओळख असलेला हा कोट जिंकून तुळाजी आंग्रेनी गोपाळगड असे नाव ठेवले. त्याआधी शिवाजी महारांजाकडुन जंजिरेकर सिद्द्याकडे अन् कालांतराने आंग्रेकडुन इंग्रजांकडे असा प्रवास करीत तो आता एका आंबेवाल्याकडे आलाय. काय एकेका किल्ल्याचं नशीब आहे नाही! धन्य ! बाकी गडावर धुंडाळण्यासारखं कातळात खोदलेली विहीर,भला मोठा हौद आणि तटबंदीवरून समुद्राचं आणि दाभोळच्या खाडीचं विहंगम दर्शन! सर्व बाजूचे बुरुज चांगल्या स्थितीत आहेत. कालच्यासारखंच आजही आंबे चोरून पिशवीत भरल्या गेले, योगिता अन् रेश्माने तर किल्ल्यातच चापले, म्हणे आंबा लयी क्यूट होता, इति प्रसाद.

गडफेरी आटोपून धोपावे जेट्टीने पल्याड दाभोळात पोहोचलो तेव्हा पोटात भूकेचे आगडोंब उसळलेले. दापोलीत जेवणं उरकून सुवर्णदुर्ग जवळ करायचा असं ठरवून पुढच्या रस्त्याला लागलो. उन्ह चांगलंच झोंबत होतो. थोडं पुढे निघाल्यावर काजूवाडी जवळ दापोलीला जायला दोन रस्ते दिसले,त्यातला डावीकडचा जवळ केला अन् लक्षात आलं की रस्ता बहुतेक ठिगळछाप आहे,पण असू दे दोन्ही बाजूंनी कोंकणाचं अस्सल दर्शन होत होतं. वेळेचा जास्त फरक पडणार नाही पण हे सौंदर्य चुकवलं तर नक्कीच पडणार. कारण कोंकण म्हणजे फक्त समुद्रकिनारा नाही किंवा पुढ्यात असलेली फिशफ्राय फस्त करून दिलेली लांबलचक ढेकर पण नाही. इथे यायचं, नारळा- पोफळीच्या बागेत मस्त फेरफटका मारायचा, इथल्या आंब्याच्या झाडांची गार सावली मनसोक्त अनुभवायची. कोंकणी माणसं फार मायाळू,त्यांच्याशी गूजगोष्टी झाल्या तर फारच छान ! आणि भाषेबद्दल तर बोलायलाच नको. बोलण्याची लकब मस्तच, मजा येते ऐकताना,बोलताना. अस्सल कोंकणी लोकं एखाद्या मस्त झालेल्या रसाळ हापसासारखी बोलतात. हा सगळा निसर्ग अनुभवत दापोलीत पोहोचतो. आणि डावीकडे वळून थेट हरणे बंदराकडे, कारण जेवणाची व्यवस्था तिकडेच चांगली होणार होती. आन्जर्ले रस्त्याला असुदच्या केशवराजचा फलक दिसला पण घड्याळजी आणि पोटातले कावळे या दोघांनीही थांबायची परवानगी नाकारली.

काम बाजूला ठेऊन निवांत उन्ह खात पडलेलं मास्याचं जाळ ! हर्णे बंदर
फत्तेदुर्गाच्या दीपगृहाजवळ जाऊन सुवर्णदुर्गाला जाणाऱ्या बोटीची चौकशी करून झाली. आता सर्वात पहिलं एकच काम,चांगलं हॉटेल शोधायचं. दोन रॉउंड मारून झालेत, सापडलं नाही.तेवढ्यात "ते बघ,दिसलंय.गर्दी आहे आणि मला वाटतंय तेच चांगलं असणार,चला",इति प्रसाद.अन् पुढच्या मिनिटाला आम्ही जेवणाच्या टेबलावर! सगळ्या प्रकारच्या मास्यांची ऑर्डर गेली. सगळीकडे मास्यांचा घमघमाट सुटला होता पण "सोलकढी नाही" असे सांगून मालकाने आमचा भ्रमनीरस केला. असो,पण बेत लयी झक्कास जमला. प्रसादचा टोला एकदम वर्मावरच बसला होता.वेळ कमी असल्याने टेबलावरच सुवर्णदुर्गचा बेत रद्द करून आता केळशी गाठायचं,असं सर्वानुमते ठरलं. कमी वेळात अर्धवट किल्ला पाहणे नको!

केळशीचं पेशवेकालीन महालक्ष्मी मंदिर !
केळशीच्या अलीकडचं पेशवेकालीन महालक्ष्मी मंदिर आणि दायऱ्याच्या याकुबबाबाच्या दर्ग्याला भेट देऊन परतीच्या प्रवासाला लागलो तेव्हा नारायणराव पश्चिमेकडे कलायला सुरुवात झाली होती. वाटेत करवंदाचीही झाडे ओरबडून झाली,एवढी की वाटे करून दोघी विकायला बसल्या असत्या तर चार-पाचशे सहज जमवले असते. तिथून केळशीचं श्रीराम मंदिर. आणि महाड वरून वरंधा घाटामार्गे पुण्याकडे प्रस्थान! इति संपूर्ण कोंकण रपेट २०१५ !

ता.क. :: चोरलेल्या आंब्याचा रस छान झाला आहे. आताची माझी ही तीसरी वाटी ओरपतोय अन् विकत घेतलेला पेटीत पीकतोय. घरात वास सुटल्यावर कळवण्यात येईल. धन्यवाद ! :)

5 comments:

  1. Kupach chan blog lihla ahe sandy.....koknatle te 2 diwas jasechya tase dolyansamor ale...mastach...

    ReplyDelete
  2. खूप छान !!!तुमच्या या संपूर्ण ट्रेक् चा प्लान मला कळवा म्हणजे मला पण जाता येईल कोंकणात!!!! खुप दिवसांची इच्छा आहे ....
    माझा ईमेल nikhilmurhe@gmail.com ..... Pls..

    ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences