साद सह्यसागराची....भरतगड,विजयदुर्ग

साद सह्यसागराची....निवती,सिंधुदुर्ग !  येथुन पुढे ……
तारकर्लीची पांढरी वाळू चांगलीच मानवलेली दिसत होती, कारण रात्रीची गार- गार वाळूला टेकवलेली पाठ घेऊन रिसोर्ट मध्ये येऊन झोपलो ते सकाळीच जाग आली तेव्हा प्रसाद अन् के माझ्या वाढलेल्या दाढीवर फोटोशूट करत होते. कुणाचं काय तर किसका कुछ ! आवरुन निघालो थेट रॉक गार्डन. मसुरे रस्त्याला शिवकालीन रामेश्वराचे दर्शन घेऊन सकाळचा नाश्ता आटोपून घेतला,वहिनी साहेबांचा कोंकणी धीरड्यांचा बेत राहूनच गेला होता. वडाप्पावर ताव मारून पुढच्या प्रवासाला लागलो. दुतर्फा हापसांनी लगडलेली आमराई पाहून मोह आवरला नाही,बाकी मसुऱ्याच्या अमराई ह्या प्रसिध्दच आहेत. गाडीतुन उतरून आम्ही आंब्याची झाडं न्याहळीत उभे होतो,एकेका झाडाला हजारोंनी आंबा ! कुणीतरी त्यात विचारलं,आपण तोडू शकतो का ? त्यावर कुणाची तरी कॉमेंट,हम्म !! आपल्या बापसाचंच आहे ना !  फणस पण लगडलेत,कसले भारी ! हे आमचं चर्चासत्र चालु असताना,एका मावशीने आम्हाला हटकलं,"तुका हापूस हवाय ?" अंगावर टिपिकल कोंकणी पेहेराव अन् मुखात रसाळ कोंकणी ! हो,आम्ही. "ये बाबु येका सावंतांकड घेऊन जा",असे म्हणत मागून येऊन बाजूलाच उभ्या असलेल्या ऑटोवाल्याला आमच्या दिमतिला दिलं. अहो मावशी फणस मिळेल का ?,आमच्या वहिनीसाहेब. फणसो !,यंदा फणसो आलाच नाsssय! मावशीसोबतचा हा गोड संवाद उरकून बाबुला फॉलो करत सावंतांच्या घरी पोहोचलो. सावंतांचं पारंपरिक कोंकणी घर आणि पडवीत आंब्याची रास,पैकी खास एका बंद खोलीत. देवगड हापूस हवाय,आमचा कार्यभाग ! अहो,इथली सगळी फळं म्हणजे देवगडच. किती पाहिजे ?,सावंतांची मुलं आम्हाला खोली जवळ घेउन गेली. काही तयार,काही कच्चे अशी करत प्रत्येकाने दोन - दोन,तीन - तीन या हिशोबाने पेट्या भरल्या अन् गाडीची बाल्कनी गच्च करून टाकली. खरेदी करून झाली,खाऊन झाली अन् सावंतांचा निरोप घेऊन आम्ही मसूऱ्याच्या उपेक्षित आणि दुर्लक्षित अशा दुर्गलेण्याकडे मोर्चा वळवला. अर्थातच सावंतफोंडाचा किल्ले भरतगड ! गाड्या थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जातात. पंधरा - वीस पायऱ्या चढलो की किल्ल्यात प्रवेश. आत पोहोचल्या पोहोचल्या अवाक झालो,कारण किल्ल्याच्या आवारात हापूस आंब्यानी लगडलेली झाडं किल्ल्याचा सगळा परिसर झाकोळून होती ! ह्या असा हात वर केला की हातात आंबा. चांगली तोंड रंगेपर्यंत,मनगटांवर ओहोळ उमटेस्तोवर पोटभरून चापली. किल्ल्याच्या आतली ही आमराई खासगी मालमत्ता असली तरी,तिथल्या माणसांनी आम्हाला हटकलं नाही,हे विशेष !


चाळीस एक एकरात पसरलेल्या या भुईकोटाची तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहे. जांबा दगडाच बांधकाम अजूनही आपलं अस्तित्व टिकवून आहे. तसं आत पाहण्यासारखं म्हणजे एक सिद्धनाथाचं मंदिर,पडकी विहीर तीही इंग्रजी हल्ल्यात तोफांच्या माऱ्यात कोरडी पडलेली. सावंतवाडीच्या सावंतांनी बांधून काढलेला हा किल्ला शिवकाळात नाकारला गेला होता तो इथल्या पाण्याच्या दुर्भिक्षामुळे. पण नंतरच्या काळात किल्ल्यासाठी कोल्हापूरकर भोसले अन् सावंतांमध्ये जुंपल्याचा उल्लेख आढळतो. रसाळ हापूसाची गोडी चाखत गडफेरी आटोपली आणि पुढच्या प्रवासाला लागलो. बाकी कोंकणातल्या सड्यावरचा प्रवास हा विलक्षणच! हापूस आंब्यानी लगडलेली झाडं,कुठे काजूच्या बागा,मध्येच फणसांची अन् पोफळीची झाडे डोकावतायेत. या बागांमधुन फिरताना कोंकणातल्या हा वळणावरचा प्रवास मोठं सुख देऊन जातं. हे सूख उपभोगतच,दुपारच्या उन्हात आम्ही आचऱ्याचा समुद्रकिनारा जवळ केला. नंतर मीठबाव करत कुणकेश्वरास पोहोचलो तेव्हा पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता.


कुणकेश्वराचं मंदिर मोठं निसर्गरम्य ! शिवकालीन महादेव हा समुद्रकिनाऱ्यावर वसलाय. अरबांनी पायाभरणी केलेल्या मंदिराचा भव्य सभामंडप, सुंदर नक्षीकाम केलेल्या भिंती आणि नुकताच जीर्णोद्धार  झालेलं मंदिर खरच देखणे आहे. मंदिराच्या ह्या जागेवरुन एका टीमटीमणाऱ्या दिव्यामुळे अरब, समुद्रातील वादळातून वाचले आणि ह्या तीरी पोहोचले,अशी कथा सांगितली जाते. महादेवाचं दर्शन झालं आणि आम्ही आमच्या सर्वात मोठ्या मोहिमेकडे मोर्चा वळवला. अहो विचारताय काय ? कालच्या अर्धवट राहिलेल्या मत्स्यपुराणाचा अध्याय नव्हता का बाकी ! एकतर कोंकणात आल्यावर अक्खा एक दिवस फुकट गेला होता,खाण्याच्या बाबतीत ! म्हणजे मच्छिचा साधा तुकडा नव्हता शिवला जिभेला. मंदिराच्या बाहेरच असलेल्या एका घरघुती हॉटेल मध्ये स्पेशल "बांगड्या"ची ऑर्डर गेली अन् मागचा पुढचा विचार न करता जे काही द्वंद्व सुरू झालं,त्याला तोड नव्हती. सुख रे, सूख ! आ हा हा हा ! बांगडा जिभेवर नाचवत- नाचवत जो काही भांगडा झाला,मजा आली. मास्यांवर आडवा हात घेत,प्रत्येकाने आपापले आत्मे तृप्त करून घेतले.


देवगडला भेट द्यायची होती पण पुढे उशीर झाला असता. म्हणुन थेट विजयदुर्गाकडे रवाना झालो. दक्षिणेला घुसलेल्या वाघोटन खाडीजवळचा हा बेलाग जलदुर्ग, रस्त्यावरूनच झालेल्या त्याच्या विहंगम दर्शनाने आम्ही अगदी भारावून गेलो. त्याची तिहेरी तटबंदी, खाडीवरील त्याची नजर, कुणाची काय बिशाद ? इथे घुसखोरी करेल. त्याचा आवाका पोचल्या पोचल्याच नजरेत भरला. तीन बाजूनी खाऱ्या पाण्याने वेढलेला अन् एका बाजूने आता मातीची भर घातलेला हा पूर्वेचा जिब्राल्टर खरच अवाढव्य आहे. जिंजी दरवाजा चढून मोकळ्या मैदानात असलेल्या हनुमानजीचं दर्शन घेउन आम्ही महादरवाज्यात प्रवेश केला,तोच पुढ्यात ओळीने ठेवलेल्या तोफ- गोळ्यांनी पोटात गोळा आणला. एवढे मोठाले तोफ- गोळे धडकुनही शिवदुर्गांचे काही बुरूज काळाचा मारा पचवित थाटात उभे आहे,या कल्पनेनेच क्षणभर शहारुन गेलो. येथून डावीकडे खलबतखाना अन् पुढे निशान्याचा बुरूज,पण पायगाडी उजवीकडे वळवून भुयारी मार्गातुन जेव्हा वर खूबलढावर पोहोचलो तेव्हा शिवरायांनी किल्ल्याच्या बांधकामात भर घातलेल्या तिहेरी तटबंदीचे कौतुक वाटून गेले. वाह! असा स्थापत्यविशारद पुन्हा होणे नाही. एखाद्याने प्रयत्न केलाच तर ढासळलेला बुरूज व्यवस्थित उभा करून पुढचे पाच वर्षे जरी टिकला तर बहुत कमावले,असंच म्हणावं लागेल. आमची गडफेरी सुरू होती, दारू कोठार,सदर त्यामागची घोड्याची पागा असं सगळं न्याहळीत साहेबांच्या ओटयावर येऊन थांबलो. येथूनच एका इंग्रज शास्त्रज्ञाने सूर्यावरील हेलियम चा शोध लावला. म्हणून त्याला ते नाव. इथून पश्चिमेकडे असीम सागर. दिवाकरही खाली उतरू पाहत होता,दूरवर छोटी छोटी जहाज आपल्या पुढच्या लक्ष्याकडे झेपावत होती. समुद्रात पडलेलं कोवळ उन्ह,लाटा शांत हुंदळत होत्या. पश्चिमेकडच्या बुरुजावरुन भला मोठा चुन्याचा घाणा अन् भक्कम तटबंदीने लक्ष वेधून घेतलं. परत आल्यावर निशान्याच्या बुरुजावरुन गिर्ये गावाचं अन् वाघोटन खाडीचं विहंगम दर्शन झालं. गाडीत जाऊन बसलो तेव्हा अंधारून आलं होतं.

केसागरला बंगलोर ला जाणारी VRL पकडायची होती,कोल्हापूरला त्याची साधारण साढ़े अकरा ची वेळ ठरलेली होती. त्यामुळे काकांनी जी गाडी दामटली ती थेट वेळेच्या आधी कोल्हापुरात ! रात्रीच्या जेवणाची वेळ तर झाली होती पण "के" साहेबांकडे तेवढा वेळ नव्हता,त्याला कोल्हापूरफाट्यावर बस मध्ये सोडून आम्ही परत आत येऊन एका तांबडा- पांढरा रस्स्याच्या खानावळीत पार्श्वभाग टेकवला. अस्सल कोल्हापुरी तडक्यासह,जवळपास एका कोंबडीचा जन्म सत्कारणी लावत जेवणं आटोपली आणि पुण्याकडे रवाना झालो. 

No comments:

Post a Comment

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences