'अनमोल'रतनगड


बरेच दिवस झालेत,नवीन भटकंती नव्हती. दसऱ्याची मिळालेली चार दिवसांची जंबो सुट्टी पण वाया गेली होती. एकतर सुट्ट्यांची बोंब,त्यात अशा फुकट गेल्या तर हे भटकं मन फार हळहळतं हो. पाऊसही सरत आलाय,म्हणजे थोडेफार ढग मागे राहीलेत पण तेही हळुहळु आपले निरोप घेतील आणि जातील,गारठ्यानेही थोडा सूर आळवायला सुरवात केलीये. सह्याद्रीच्या कुशीत तो जास्तच असेल यात शंका नाही. तीन - चार महिन्याच्या धो - धो पावसानंतर विखुरलेली घरटी वीणायला पक्ष्यांनीही सुरुवात केली असेल.पाऊस पिऊन टरारुन वाढलेली जंगलं आणि वनराजीने नटलेल्या सह्यरांगा आळसावलेल्या अंगाने जाग्या होतायेत. तशीच लगबग सिमेंटच्या जंगलातही सुरू झालीये,थोड्याच दिवसात दिवाळसण येतोय ना दारी ! माळा वगैरे लावून घरासमोरील कंदीलही सज्ज झालेत.पहिला दिवा लागला दारी,वगैरे वगैरे मेसेज ची देवाण - घेवाण होऊन दिवाळी झाली पण घरच्या किंवा मित्रांच्या घरच्या फराळाची खरी मज्जा ही डोंगरात गेल्याशिवाय नाही कळायची. आता घरात थांबणे  नाही. शेवटी प्लान ठरला,रतनगड गाठायचा! रतनगड ! प्रवरामायचं उगमस्थान.खुप दिवसांपासुनची इच्छा होती,हे रत्न कधीतरी नजरेस घालायचं.पायगाडीने या दुर्गोत्तमाची दुर्गम अन् अवघड वाट एकदा तरी तुडवायची. येणाऱ्याची यादी कमी होत होत रेश्मा,योगिता अन् मी यावरच येऊन थांबली.पायगाडी वाटेवर लागायच्या आधीच मन पोहोचलं होतं रतनगडाच्या नेढ्यात !

आईशशप्पत!  रेश्मा,निघालीस का तु ? रविवारी सकाळी सातला रेश्माला फोन झाला तेव्हा ती घरातून नुकतीच निघाली होती. आणि योगिता पण मार्गस्थ झालेली. आता काही खरं नाही,या दोघीना वेळेवर यायला सांगून मीच उशीर केला म्हटल्यावर आता काय बोलायचं? आंघोळीची गोळी ! मग काय दुसरा पर्यायच नव्हता. आवरुन शिवाजीनगरला पोहोचेपर्यंत योगिताचा फोन आला, अकोले गेली. व्हायचं तेच झालं, एकमेव "डाइरेक्ट येस्टी" चुकली. तेवढ्यात इंद्राभाईचा व्हाट्सअप "निघाला का,मी चाललोय अकोलेला" हे इंदूरीकरांचे जावयी निघाले होते,सासऱ्याचे दिवाळे काढायला. काय करणार असो. पहिला वाहिला दिवाळसण ! म्हटलं,"सरबरायीतुन मिळाला वेळ तर घेऊन या कुटुंबाला गडावर " नाशिक गाडीने संगमनेर गाठायाचं ठरवलं. अन् एकदाचा प्रवास सुरू झाला. पुण्यातून गाडीला गर्दी नसली तरी मंचर- नारायणगावात लोकं उभे राहायला सुरुवात झाली. टू बाय टू ची थ्री बाय थ्री झाली, अन् एक आजीबाई शेजारी येऊन बसल्या. "एक समगनेर,हाफ. मला एकदम,"सावरगेट" आठवलं. असो, अजुन एक म्हणजे योगिता अन् रेश्माच्या बाजूला बसलेल्या मावशीला गावाकडची वैनी भेटली अन् त्यांच्या गप्पा(नळावरच्या ?) सुरू झाल्या. विंडो सीट धरून बसलेले आजोबा केव्हाच डिलीट झालेले, वैनीच्या छबीची गोष्ट ऐकत केव्हा मी डिलीट झालो ते कळलंच नाही.

आळेफाट्यावर चहापाणी आटोपून गाडी पुढच्या प्रवासाला लागली. "समगनेर"ला पोहोचलो तेव्हा दुपारचे साढ़ेबारा झाले. पुण्यावरूनच बसलेल्या एका माणसाने स्वतःहून सांगितल्याप्रमाणे अकोले बसही लगेच मिळाली. पाऊण- एक तासात अकोले. तेथून लगेच शेंडी- भंडारदरा बस लागलीये,हे बघून तर आनंद गगनात मावेना. राजुर गाठलं आणि आता आमची बस डोंगराळ रस्त्याला लागली, शहरातला कोलाहल मागे पडला,धुराचे लोट कमी झाले. आता होती फक्त "डोंगरयात्रा" मधली छोटी छोटी गावं अन् "येस्टी"चा घोंघों करणारा आवाज. बाकी गाडीतले प्रवासी दिवाळी खाण्यात गुंतलेले. आम्ही रस्त्याच्या कडेला असलेली शेती ओळखण्यात गुंतलो. ते दोघे पण आलेत रतनगडला,बीडचे आहेत, रेश्मा. बीडवरून ! चला बरंच आहे. बाकी,गिर्यारोहक फक्त पुण्य- मुंबई च्या आसपासच जन्माला येतात,हे वाक्य चुकीचे ठरवत पुण्यामुंबईच्या पलीकडेही महाराष्ट्र आहे,असे ठणकावल्यासारखे वाटले,उगीचच! असो एव्हाना बसने आम्हाला भंडारदऱ्याजवळ सोडले अन् ती शेंडीकडे मार्गस्थ झाली. ढगाळलेल्या आभाळात पल्याड अनामिक सुळका घुसलेला,प्रवरेच्या काठावर हौशी पर्यटकांनी गर्दी केलेली. भंडारदऱ्याच्या पलीकडील डोंगराच्या रांगेत खूँटा निवांत उभा अन् बाजूला समाधीस्थ रतनगड आम्हा भक्तांची आतुरतेने वाट पाहत असलेला.

बीडकरांशी हलकीशी ओळख झाली. दोन वडापाव अन् प्लेटभर भजी पोटात ढकलून पुढचा प्लान ठरवायला सुरुवात झाली. बोटवाला जरा जास्तच सांगतोय असं वाटल्यावर रस्त्याने रतनवाडी जवळ करायचं ठरवलं अन् फाट्यावर येऊन थांबलो.  गावकरी फाट्यावर बसची वाट पाहत बसलेले,त्यातले एक बाबा म्हणतात,आत्ता आत्ता पाच वाजता हाये बस.थोड्या वेळात ते बाबाच गायब ! कोणी म्हणे पावणे सहा,कोणी म्हणतंय साढ़े सातला नक्की येईल बघा ! जीपडे मुतखेलच्या पुढे जायलाच तयार नव्हते. आणि आतापर्यंत मस्तपैकी साथ देणारी येस्टी मात्र आता बेभरवशाची वाटायला लागली,कारण ज्याला विचारतो तो आपली वेगळीच वेळ सांगायचा.बरीच वाट बघून झाली. आणि आता तर मुतखेलला पण मिळेनासे झाले. निघालो चालत, बीडकरांना अजूनही गाडीची आशा असावी. ते तिथेच थांबले. अंधार व्हायला अजुन अवकाश होता, कमीत कमी तिथे पोहोचुन मुक्काम तरी होईल. थोड्याच वेळात बीडकर एका जीपड्याला लटकुन जाताना दिसले. पाऊण तासात वेशीवरचा हनुमान दिसला तेव्हा गावात पोहोचल्याची खात्री पटली. समोरून छोटा मुलगा साइकल घेऊन येतोय दिसल्यावर रेश्माचा छंद जागा झाला. सॅक टाकून,साइकल घेतल्या आणि निघालो भन्नाट राइडवर ! डोंगरांच्या कुशीत,हिरवाकंच निसर्ग अन् साइकलच्या दोन चाकांखालचा गुळगुळीत डांबरी पण पायवाटेएवढाच रस्ता. वाटत होतं,हीच साइकल घ्यावी अन् गाठाव थेट रतनवाडी. "संदिप, माझी ना एक बरीच दिवसांपासूनची इच्छा आहे. चांगली पंधरा दिवसांची ट्रीप काढायची साइकलवर,काय म्हणतोस?" रेश्मा. दुसरं कोण ? म्हटलं,चला आता. बरच दूर आलोय. परत आलो तेव्हा नेमका एक टेंपोवाला रस्त्यात उभाच होता. त्याला पटवला अन् आमचा अमृतेश्वर मंदिरातला मुक्काम फिक्स झाला.
टेंपोतला प्रवास ! हा काही माझ्यासाठी नवीन नव्हता. कदाचित योगिता अन् रेश्मा साठी तो असेलही. पण कधी कधी वाटतं यातच खरी मज्जा आहे. मजा आपल्यासाठी ? ज्या दुर्गम गावांमध्ये बस वेळेवर नसेल(त्यातला त्यात बस आहे हे महत्वाचं) तिथे या सगळ्या गोष्टींना पर्याय नाही. एखादा गंभीर रोगी तालूक्याच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवायचा असेल तर कुठे आहे पर्याय. नशीब रस्ते धड आहेत. मला नेहमी विचार पडतो, एसी मध्ये बसून बक्कळ पैसे कमवणारे आपण सुखी की अतिपावसामुळे घराची छप्पर गमावलेले हे डोंगरातली लोकं सुखी? शेवटी ज्याच्या- त्याच्या सुखाचा प्रश्न अन् ज्याची - त्याची व्याख्या ! असो. खोलात गेलो तर अजुन रुतायचो,दलदल फार आहे. विचारचक्र चालु असताना ड्राइवरने ब्रेक दाबला, बघतो तर एक मोठा साप रस्ता ओलांडून सरपटत होता. रतनवाडीत पोहोचलो तेव्हा चांगलच अंधारून आलं होतं. टेंपोवाल्याचे धन्यवाद मानून उतरलो तेव्हा थंडीने किंचितशी चुणूक दाखवली. भुका तर लागल्या होत्या पण त्याआधी एक फक्कड़ चहा झाला तर ! जेवणाची ऑर्डर अन् राशन भरून आम्ही अमृतेश्वराच्या आवारात प्रवेश केला तेव्हा मंदिराचा गाभारा साठच्या बल्बने उजळून निघाला होता. फ्रेम मिळाली होती,विचार केला जेवणानंतर निवांत टिपूया.अपेक्षेपेक्षा सुस्थितीत असलेला परिसर पाहून आनंद झाला. हनुमान मंदिरात पथार्या पसरल्या. चहा झाला,बीडकरांशी गप्पागोष्टीत ते दोघेही शिक्षक असल्याचे कळले. ओह "सर"लोकं आहात तुम्ही ! ते वर्षाला एक ट्रेक ठरवतात. मागच्या वर्षी हरिश्चंद्रगड,यावेळेस रतनगड. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये असताना आसपासचे बरेच ट्रेक केल्याचं कैलाससरांनी सांगितलं. पुढचे दोन दिवस चांगली सोबत मिळणार,मनोमन विचार करून आनंद झाला. जेवणावर ताव मारून मी आपल्या आजच्या दिवसाच्या शेवटच्या कामाला लागलो. आयुध घेऊन मंदिरासमोर उभा ठाकलो. चार - पाच  अप्रतिम शॉटस् मिळाले.बल्बच्या लालसर उजेडात उठुन दिसणारे मंदिराचे नक्षीकाम थक्क करणारे होते,सकाळी उठल्यावर उजेडात दिसणारं मंदिर  अप्रतिम असेल यात शंकाच नाही.

ऊठ,ऊठ पाऊस येतोय,पहाटे पहाटे रेश्माचा आवाज. पडवीत झोपलेल्या योगिताला ऊठवुन सगळे जण मंदिरात पांगले. थोडा वेळ पडून सकाळी जाग आली तेव्हा आभाळ नभांनी गच्च झालेलं. रतनगड धुक्यात दिसेनासा होत होता. फोटोग्राफीवर पाणी फिरणार असं वाटत होतं. आवरुन महादेवाचं दर्शन घेतलं. आणि खरच काळ्या पाषाणावरचं कोरीवकाम सुंदरच होतं ! घडवणारा किंबहुना घडवणारे कमालीचे कारागिर आणि तज्ञ असले पाहिजे,अन् त्यांच्या सबुरीची दाद द्यायला पाहिजे. आपल्याला थेट आठव्या शतकात घेऊन जाणारं हे हेमाडपंथी शिल्प म्हणजे इथल्या भव्य इतिहासाची एक जिवंत साक्षच मानायला हवी.कदाचित या किल्ल्याची निर्मिती सुद्धा तेव्हाच झाली असावी.किंबहुना त्याही आधी. म्हणजे रतनगड किती जुना असेल याची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. कोरलेली प्रत्येक मुर्ती रेखीव,प्रत्येक शिल्प आखीव,प्रत्येक चित्रं रेखाटलेलं, इतकं प्रमाणबद्ध की आजच्या वास्तूविशारदालाही लाजवेल! दगडातून आरपार गेलेल्या काही कलाकूसरीने तर भारावून गेलो. खिरेश्वरच्या नागेश्वराची आठवण झाली. बाजूलाच प्रवरेचा फुगवटा,त्यामुळे पाणी थेट शिवलिंगांभोवती मंदिरात ! हे म्हणजे भारीच. काही काही गोष्टी असतात खरच कल्पनेपलिकडच्या,त्यातच हे मंदिर आलं. झडे दादाच्या घरी पोह्यांचा पोटोबा झाला. गावातली रवी अन् शेखर ही जोडी दिमतीला घेऊन आमची पायगाडी निघाली रतनगडाच्या दिशेने.

दोन तासात पोहोचू का रे,शेखर ? अर्थातच हे विचारण निरर्थक आहे.पण असो,एक आपला वेळेचा अंदाज. नदीच्या काठून कधी नदीतून दगड- धोंडयातून वाट काढत निघालोय. थोडं पुढे जाताच,एक टुकार मुलांचा घोळका नदीच्या पात्रातच,त्यांची पार्टी चाललेली. मनोमन शिव्या हासडुन काढता पाय घेतला. गाढवापुढं गीता नाही ना वाचू शकत,अशा लोकांना खरंतर गांववाल्यांनीच सोलुन काढायला हवं. जाऊदे. प्रवराकाठ सोडून वाट दाट झाडीत शिरलो अन् पावसाने रंग दाखवायला सुरुवात केली. कदाचित झाडीमुळे आवाज अधिक होत असावा. पहिल्या पठाराला लागलो,कात्राबाईचे कडे अन् उजवीला खूँटा जवळ भासायला लागला. नेढ्याने स्पष्ट दर्शन दिले. परत दाट झाडी. थोड्याच वेळात एका चौकात येऊन थबकलो,चौक म्हणजे दहा - बारा जण सहज मुक्काम करतील अशी जागा होती. कात्राबाईच्या खिंडीतून हरिश्चंद्रगडाची वाट ही इथेच येऊन मिळते. पुढच्या ट्रेकचा प्लान डोक्यात हजेरी देऊन गेला. पंधरा मिनिटात पहिल्या शिडीजवळ पोहोचलो. लगेच दूसरी आणि गणेश दरवाजा. चढताना तेव्हाची लोकं कशी येत असतील वर ? विचार येऊन गेला. येथून उजव्या बाजूला रत्नादेवीची गुहा,मुक्कामाला साजेशी जागा. तिसरी शिडी चढून हनुमान दरवाजा आणि हाच गडमाथा. माथ्यावर पोहोचल्या पोहोचल्या आज्जा पर्वताचे कडे बघितल्यावर कोंकणकड्याची आठवण झाली. हे आपण इथेच अनुभवू शकतो. आजोबा शिखर अन् थोडं त्याच्या खाली सीतेचा पाळणा. पल्याड कात्राबाईचे कडे अन् खिंड,कोंकणात वाहणारी काळ नदी,चुकून पाय सटकला की डाइरेक्ट शिफ्ट - डिलीट ! फेरफटका मारत कोंकण दरवाज्याजवळ आलो. आणि तेथून अ-म-कुचं पहिलं दर्शन झालं. खाली सांधण दरीतील भीषणता भयावह होती,चिकटून बाण सुळका आपलं अस्तित्व जाणवत होता.अफाट! थोडं पुढे एका चोर दरवाज्याजवळ गार पाण्याचं टाकं. तिथेच दुपारचं जेवण शिजवुन पोटोबा झाला. आवरुन निघालोच,पावसाने हजेरी दिली. त्याच तडाख्यात आम्ही थेट नेढ्यात येऊन पोहोचलो. गार गार वारा वाहत होता,पावसाच्या सरीने अंधारून आलेला आसमंत आणि नेढ्यातून कोंकणातला आणि घाटावरचा नजारा भन्नाटच! तिकडे शैल कळसूबाईने पण दर्शन दिलं.हे नेढ म्हणजे निसर्गाचा आविष्कारच. दहा - बारा जण सहज बसतील अशी नैसर्गिक वातानुकूलित जागा म्हणजे भारीच,राजगडाच्या नेढ्याची आठवण झाल्याशिवाय राहवलं नाही. 
परतीचा प्रवास सुरू झाला. त्र्यंबक दरवाज्याची वाट जवळ केली. उतरताना खूँट्याचं अजुन एक एक भयानक रूप समोर आलं. आणि त्याच्या पल्ल्याड कुलन्ग पासुन सुरुवात करून मदन, अलन्ग,श्रीकिरडा,लहान कळसूबाई,कळसूबाई अगदी रांगेत उभे आणि पायथ्याला घाटघरचं पाणी. मस्तच यार ! त्र्यंबक दरवाज्यात पोहोचलो तेव्हा अशा अवघड जागेतून वाट असेल याची कल्पनाच करवत नाही. उतरताना काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. अक्खा दगड चिरून बनवलेल्या या पायऱ्या म्हणजे खरच डोकं सुन्न व्हायला होतं. अप्रतिम ! दगडांवरची कसरत झाली,ट्रॅवर्स पार करून खूँट्याच्या खिंडीत आलो तर बाण,नावाप्रमाणेच आकाशात निशाना लावून मस्तवाल उभा होता. इथून डाव्या बाजूला साम्रदची वाट अन् उजवी रतनवाडीकडे. ही वाट परत दाट झाडीत शिरते,त्या जंगलातुन जाताना रवीला झुडपातून काहीतरी सळसळल्याचा आवाज ऐकू आला अन् त्याचा भीती वजा टिंगल केल्याचा निरागस कटाक्ष आणि शेखरला उद्देशून टाकलेल्या, "शेक्याssss,डुक्कर! आहे वाटतं !!!" वाक्याची गम्मत वाटली. त्यानंतर शेखर चं "ह्ह्ह्ह्हूऊऊओह्म्म्म" हे डुक्करांना पळवण्यसाठीचा जप ! मोठी गम्मत वाटत होती. प्रवरेच्या काठी पोहोचलो,मस्त पाणवठा बघून गवती चहाचा बेत जमवला. बाकी रेश्माच्या गवती चहाने खरच रंगत आली ट्रेकमध्ये! पोरगी आहेच म्हणा हुशार :) भंडारदऱ्यावर मावशीकडे बरोबर गोड बोलून काढून घेतल्या होत्या तिने दहा - पंधरा काड्या. रतनवाडीत पोहोचलो तेव्हा सह्याद्रीतलं हे अनमोल रत्न प्रवरेच्या पात्रात आपलं रुपडं न्याहळीत बसला होता. 


रात्री अमृतेश्वराच्या आवारात योगिता अन् रेश्माने जमवलेला "स्पेशल" कांदा करपवुन - पेरू सलाड- मसाले भात एकदम दणकाच उडवून गेला ! अन् सोबतीला घरची आईच्या हातची "दिवाळी" व्वा ! बाकी बाईमाणसांना अन्नपूर्णाची उपमा देतात,ते काय खोटं नाही. भरपेट जेवणं झाली,सकाळी उठुन रतनवाडी- राजुर बस मध्ये पाय ठेवला तेव्हा अगरबत्तीच्या मंद सुगंधाने मन प्रसन्न झालं ! निरभ्र आकाशात पक्ष्यांच्या कीलकिलाटात खाली बसच्या गेअरने विचित्र आवाज करून मार्गस्थ झाली. दोन दिवसांच्या गोड आठवणी मनाच्या कप्प्यात ठेऊन आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.आणि ह्या पहाटेचं वर्णन करायला माझे शब्द अपुरे पडतील,इतकी सुंदर होती ! हवाहवासा गारठा सुखावत होता."येस्टी" चा घोंघों सोडला तर बाकी कमालीची शांतता.डोंगरातली झापं हळुहळु जागे होतायेत,तीन दिवसांपासुन सुट्टीवर गेलेले नारायणराव आज भेटले होते.डोंगराआड लपलेली किरणं आता जमिनीवर स्थिरायला सुरुवात झालीये. प्रत्येक वळणावर कमीत कमी एक झापं या हिशोबाने ड्राइव्हर ला सक्तीचा थांबा. त्यात तो एका माणसावर खेकसलाच, "तुम्हांला बस घराजवळ आल्यावरच निघायचं सुचतं का हो ?" त्याला जुमानतय कोण ? ह्यांची बाचाबाची चाललेली असताना कुठलंस जीवघेण अत्तर फासुन एका आजीबाईने गाडीत प्रवेश केला अन् अक्खी बस आता दरवळायला लागली. हा दरवळ घेऊनच बस शेंडीला पोहोचली तेव्हा मागुनच येणारी "डाइरेक्ट" पुणे येस्टी दिसल्यावर तर आनंद काय हे सांगायलाच नको! बीडकरांचा निरोप घेऊन पुण्याकडे मार्गस्थ झालो......2 comments:

 1. http://deepakparulekar.blogspot.in/search/label/%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1

  ReplyDelete
 2. छान वर्णन. आजुन फोटोज असते तर मज्ज आली असती.
  असो आमचा रतनगडचा अनुभव फार वेगळा होता.
  भर पावसात कधी रतनगडाला जाउ नये.
  पुन्हा जयचयं पण यावेळी थंडीतच जाईन..

  ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences