ऐतिहासिक उंबरखिंड …. कुरवंडे घाटाने


श्रावण महिना. पाऊस कमी झालेला असतो. सगळीकडे उत्सवाचे आणि उत्साहाचे वारे वाहत असतात.घरामध्ये सणासुदीची चाहुल लागलेली असते.पण आम्हा भटक्यांचं मन मात्र गडावर गेल्याशिवाय रमतच नाही. अगदी आरामासाठी मोठ्या ट्रेकला टांग दिली असली तरीही! असाच पावसाने पळी दिलेल्या गेल्या श्रावणात आमच्या भटकंती परिवाराचा हरिश्चंद्रगड-नळीच्या वाटेचा ट्रेक ठरलेला, इच्छा असूनही जाता आलं नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळीच जाग आली तेव्हा,झोप गेली होती ट्रेकला. अशा वेळी वाटतं ,दिवसभर बोर होण्यापेक्षा छोटासा ट्रेक करून संध्याकाळ पर्यंत घरी परतावं. लगेच वाश्या आणि रीश्याला फोन जातो आणि दोन्ही भिडू टाकोटाक शिवाजीनगरला हजर होतात. बेत ठरतो उंबरखिंड गाठायची ती कुरवंडे घाट उतरून.

सकाळी सकाळीच म्हणजे उन्हं टोचायच्या आधीच आम्ही लोणावळा स्टेशन सोडुन डाव्या बाजूच्या रस्त्याला लागलो. गाडी नं मिळाल्यामुळं पायगाडीने रस्ता तुडवत निघालो,कुरवंडे गावाकडे . टाटा प्लांट जवळ असलेल्या शेवटच्या दुकानातुन तहानलाडू-भूकलाडू पिशव्यात कोंबून आमची पायगाडी सुरु झाली. स्वछ निरभ्र आकाश,पायतळी डांबरी गुळगुळीत रस्ता. मध्येच एखादं हौशी वाहन भर्रकन वारा उडवत निघुन जाई. मध्येच आकाशाला गवसणी घालणाऱ्या एखाद्या रानपाखराचा चिवचिवाट. कुठे उन्हं,कुठे सावल्यांची वाटणी करीत निघालेले निळ्या निळ्या आकाशी गस्त घालणारे पांढरे शुभ्र ढग. मस्त वाटत होतं, गेले तीन महिने पावसात भिजुन थोडी उसंत आता कुठे मिळत होती. चालत असतानाच, एक टेम्पो भरकन निघुन पुढे जाऊन थांबला,"ओ दादाहो,कुटं जायाचं?" "कुरवंडे",मी."या बसा". बसलो जाऊन टेम्पोत. "कुठं ? नागफणी ??",एक म्हातारा. हम्म्म. नंतर उंबरखिंड गाठायची आहे. "बरं बरं ,ते तुमच्या पुन्या-मुंबईकडचे लोक दर शनवार-रईवार पावसात लयी गर्दी करत्यात". आम्ही हो ला हो लावत बसलो आपली पालकट मांडुन. पण नाही, म्हातारे आजोबा ऐकायलाच तयार नव्हते. सह्याद्रीच्या कण्यावर वसलेल्या कुरवंडे गावातुन त्यांनी पाहिलेले सह्याद्रीचे  रौद्र रूप, त्यांच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर असे काही उमटुन गेले की आम्ही पाहतच राहिलो.


गावात पोहोचलो. उजव्या बाजुला नागफणीचं टेकाड फणा काढुन उभं होतं.  "बस्स!,एवढंच चढायचं",रीश्या. अहो महाराज,हा बोनस ट्रेक आहे. आपलं मुख्य लक्ष्य उंबरखिंड. काय ? चढायला सुरुवात केली. चढताना तुंग-तिकोना-लोहगड-विसापूर इत्यादी मावळसखे एक एक करून दर्शन देत होते .वीस मिनिटात माथ्यावर पोहोचलो. गर्द हिरवाईने नटलेला चौफेर मुलुख "श्रावण मासी …हर्ष मानसी… हिरवळ दाटे….चोहीकडे " या चार शब्दांचा अर्थ सांगुन गेला. मागे घाटमाथ्यावर आपले मावळसखे, समोर कोंकणात माथेरानची डोंगररांग. ते तिथे खाली ऐन सह्यधारेवर वसलेलं खंडाळा  आणि पायथ्याशी लगट करणारं खोपोली. आणि हो तो दूरवर, दिसतोय का ? हो तेच, दोन अंगरक्षक. बोर घाटाचे पहारेकरी,किल्ले राजमाचीवरचे श्रीवर्धन-मनरंजन बालेकिल्ले. त्याच्या मागे बहिरीचं ठाणं!  डाव्या बाजुला खाली कोंकणात अंबा नदीचं पात्रं. माथ्यावर महादेवाचं छोटेखानी मंदिर आणि पुढ्यात शिवभक्त नंदी.बस्स बाकी पाहण्यासारखं म्हणजे चौफेर हिरवागार निसर्ग !! हे नागफणी टोक म्हणे ड्यूक वेलिंग्टन नावाच्या इंग्रजाच्या नाकासारखं दिसतं,म्हणुन त्याला ड्युक्स नोज असेही म्हणतात.


 आम्ही आमची पायगाडी वळवली. वीस मिनिटात उतरून सह्यधारेवर येऊन पोहोचलो. आमचा बोनस ट्रेक संपला होता . इथुन कोंकणातलं चावणी गाव स्पष्ट दिसत होतं. पुढे धार उतरायला सुरवात केली तोच एक मोळीवाले बाबा आमच्या समोरून येत होते. त्यांनी अगदी डोक्यावरून मोळी बाजूला ठेऊन आम्हाला वाट सांगितली. आम्ही घाट उतरायला सुरुवात केली. एका ओढ्यापाशी पोहोचलो. येथे आम्बेनाळी घाटाची वाट येऊन मिळाली. ही वाट आता शिवाजी INS च्या कुंपणामुळे बंद झालीये. याच वाटेने मोगलांचे सैन्य घाटाखाली उतरलं होतं . मध्येच आम्हाला नागफणीने दर्शन दिले आणि खरच ते कुणाच्यातरी नाकासारखेच दिसत होते हो! कुठे पक्ष्यांचा किलबिलाट,कुठे दाट झाडी,कुठे सोनकी-तेरड्यांनी फुललेली सपाटी,कुठे गावातल्या म्हशी एखाद्या डबक्यात स्वीम्मिंगचा एथेछ आनंद लुटताना,निसर्ग अगदी आपल्याच नादात असल्यासारखा वागत होता. आम्हीही त्याचा मनसोक्त आनंद लुटत होतो. अर्ध्या पाऊण तासात आम्ही अंबा नदीचं पात्र गाठलं. गावकरी नदीत वाळू उपसत होते. गावाचं नाव चावणी. छावणी चा अपभ्रंश! कुरवंडे गावातुन आंबेनाळ घाट उतरून मुघलांची छावणी या गावातच पडली होती, म्हणुन ते नाव. गावकऱ्यांना वाट विचारून प्रवाहाच्या दिशेनं चालते झालो. अर्ध्या पाऊण तासात आम्ही ऐतिहासिक समरभूमीवर दाखल झालो. चारही बाजूनी निबिड अरण्यं,पूर्वेला खडा सह्याद्री,मधुन वाहतो तो पावसाळी अंबा नदीचा पाट,परिसर एकदम निर्मनुष्य. आणि अशा परिस्थितीत एखाद्यावर हल्ला झाला तर माणसाने कुणाकडे पाहावं ,नाही देवाला हाका मारण्याशिवाय पर्यायच उरत नाही. तर गोष्ट आहे १६६१ ची. शिवाजी महाराजांनी महाराजसाहेबांकडून मिळवलेल्या "गनिमी कावा" नामक ब्रम्हस्त्राची ! ती अशी ! 
 कारतलब खान आणि रायबाघन यांच्या नेतृत्वाखाली असलेली मुघलांची ३० हजाराची फौज कुरवंडे घाटातुन खाली कोंकणात उतरत होती. जवळच असलेल्या लोहगड,विसापुर,इत्यादी किल्ल्यांवरून कोणताही प्रतिकार न झालेले मुघल सैन्य मावळ्यांना गाफील ठेवण्याच्या अविर्भावात पुढे सरकत होते. तशी आज्ञा महाराजांचीच. पण  या नादानांना काय माहित, सह्याद्रीचा वाघ आणि त्याचे मावळे याच सह्याद्रीच्या पोटात दबा धरून बसलेलेत. घाटमाथ्यावर स्वतः महाराज आणि कोंकणातून नेताजी पालकर. मुघलांना कळायच्या आधी त्यांच्यावर हल्ला झाला. कापाकापी सुरु झाली आणि अवघ्या २-३ हजार मावळ्यांच्या मदतीने ३० हजारी फौजेचा धुव्वा उडवून पडता भुई थोडी केली. सारे शस्त्र,दारुगोळे,संपत्ती,घोडे,उंट जे काही होते ते तिथेच सोडुन बाकीच्यांना जीवदान देण्यात आले. महाराजांच्या गनिमी काव्याचे उत्कृष्ट उदाहरण ! ही ऐतिहासिक समरभूमी म्हणजेच अंबा नदीचे हे पात्रं.


स्वछ पाण्यात डुंबून येथेछ जलक्रीडा झाली,पोटपूजा करून पायगाडी निघाली ती ठाकरवाडी-शेमडी मार्गे खोपोलीच्या दिशेने ! कुरवंडे घाट उतरून तर आलो होतो पण आता शेवटचं आव्हान होतं ते खोपोली गाठुन बोर घाटातुन माथ्यावर जाणारी " येस्टी " पकडायचं आणि तेही बसायला जागा असणारी !!!

9 comments:

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences