काय वाट'ट्रेल ते - वाघजाई

No comments:

सततधार पडणाऱ्या पावसाने थोडीफार उघडीप दिली होती. अधून मधुन बरसूनही जात होता. पण तेवढाच. नवख्या मोहिमांसाठी तसा हा काळ योग्य नव्हताच पण तरीही, नियमित वेळापत्रकाला फाटा देऊन प्रसाद अन् मी दोघेच निघालेलो वाट फूटेल तिकडे. म्हटलं,बघुया कूठे घेऊन जातो सह्याद्री माझा! लोणावळा स्टेशन वर उतरल्या उतरल्या पिकनिकछाप सिजनल सो कॉल्ड "ट्रॅकर" ची गर्दी अन् भुशी डॅमची जत्रा,यांच्यामधुन वाट काढत आम्ही एकदाचं अॅम्बिवॅलीच्या बसस्टॉपवर हुश्श झालो. सहारा सिटी चा येथून सुरू होणाऱ्या गुळगुळीत रस्त्यामुळे हाईफाई गाड्यांची अन् स्टॉपवर वाट पाहणाऱ्या वल्ली यांच्यामधली तफावत मनाला लागून गेली.  तितक्यात कुठूनतरी मुलांचा घोळका येऊन बसची वाट पाहत उभा राहिला अन् त्यातल्या एकाने तिथल्या ऑटोवाल्याला भुशीडॅमचं भाडं विचारलं अन् भाडं ऐकून तसाच तो मागे फिरला,त्यावर दुसऱ्याची प्रतिक्रिया, "भिजायले आला ना बे तु ? का गाडीत फिरायले ?" हे ऐकून वऱ्हाडाचा गडी दिसतोय, हे  समजायला काही भाषातज्ञांची गरज लागत नाही, मीही वऱ्हाडातला असल्याने,मला पण ऐकायला भारी मजाच वाटत होती. बाकी वेळ मस्त जात होता.बाजूलाच एक म्हातारे बाबा तंबाकू चोळत बसलेले. बाबा,काय हो गाडी आहे का जायला ?  हाय की येस्टी! वडुस्त्याची ! किती वाजता ? येईल बघा इतक्यात. कसली येतीये ? बाबांना काय कामं आहेत. बाकी गावातली म्हातारी माणसं,यांना कसली आली वेळ,बसतात येऊन आपली चोळत,तंबाकू!  बाकी लोकांना भुशी डॅमचा रस्ता सांगून सांगून आम्ही पण वैतागलो. आणि लोकं !तिथे पाटी असली तरीही विचारणारच !
All the content Copyright -Sandip Wadaskar

शेवटी एकदाचं आडवाटेवरच्या 'येस्टि'ने आडवेळेवरचं दर्शन दिलं अन् आमचा जीव भांड्यात पडला.होती नव्हती सगळी गर्दी कोंबून एसटी निघाली भांबर्डायच्या दिशेने! पण बस माझगांव पर्यंतच जात असल्याचा बॉम्ब टाकुन कंडक्टर निश्चिंत झाला. बोलण्या- बोलण्यात प्रसादची ओळख निघाली कंडक्टरशी. "बघु,माझगावच्या पुढेही बस नेता आली तर",असं आश्वासन देऊन कंडक्टर काका तिकिट फाडण्यत व्यस्त झाले. दोन तीन ट्रेकर चे ग्रूप,भुशि डॅमला भिजायला निघालेला हौशी मुलींचा ग्रुप आणि बाकी गाववाले. कोणी बोचकं सांभाळुन बसलय,कुणाच्या तोंडात गुटख्याचा तोबरा. त्यात माझ्या बाजूला उभ्या असलेल्या सुबकठेंगणीचे केस उगीचच माझा गाल कुरवाळत होते. म्हटलं "बाई,जरा दूर होशील का ?, नाही उगाचच गुद्गुल्या होतायेत." मनातल्या मनात ! आम्ही असल्या गोष्टी मनातच बोलतो. भुशी डॅमजवळ तूफान गर्दी झाली होती,त्या कोलाहलातून येस्टी आपली कशीतरी वाट काढत पुढे सरकत होती. या गर्दीत बसमधली गर्दी जेव्हा उतरून मिसळली,तेव्हा कूठे हायसं वाटलं.

"  गर्जतो मेघातुन,बरसतो नभातुनी बाणांपरी.  
 उरावा अलगद अळवावरती, दिसतोस कसा ? मोत्यापरी !!!! "मोरी वाहून गेली, कंडक्टर चढणाऱ्या प्रत्येकाला हेच कारण पुढे करून बस माझगावपर्यंतच जाणार आहे, असं सांगत सूटला होता. पण गाववाली, "जाते हो बस,या सरकारी लोकांनाच जायचं नसतं " अन् त्यात,पंगतीत दोन - तीनच दात राहिलेले म्हातारबा रात्रीची जास्त झाल्यासारखे (किंबहुना ती झालीच होती :) ) बसल्या बसल्या कंडक्टरला शिव्या हासडत होते. एव्हाना आम्ही माझगावापर्यंत पोहोचलो आणि खरच मोरीची दुर्दशा झाली होती,आता येथून पाच - सहा किमी च्या पायपीटीला पर्याय नव्हता. आमचा निरोप घेऊन "येस्टी" आल्यावाटेने परतली अन् आम्ही आमच्या पायगाडीला पुढची वाट मोकळी केली. बाकी वातावरणचा मूडच वेगळा होता. चारही बाजूने हिरवाई दाटलेली. आभाळातून धुकं थेट जमिनीला टेकलेलं, भातखाचरे तुडुंब भरून वाहणारे, अधून मधून पावसाची सरही कोसळुन जायची. गाडीतले गाववाले सहप्रवासी झपाझप पावले टाकत केव्हाच नाहीसे झालेले आम्ही मात्र आजूबाजूच्या हिरवळीचं नेत्रसूख घेत निवांत चाललोय. सालथर खिंडीच्या अलीकडे घनदाट झाडीने सह्याद्रीच्या वैभवाची पुन्हा एकदा जाणीव झाली. हलक्यास्या पावसाच्या सरीमुळे होणारा पानांचा सळसळ आवाज सुखावुन जात होता,मधेच सुरू होणाऱ्या पर्जन्यपक्ष्यांच्या गोड गाण्याने कर्णराज खुश व्हायचे. हे सर्व चालु असताना, मागून गाडीचा ऐकू आला तोच गाडीत उमेश सर ! मागच्या वेळी मदनगड हौद साफसफाई मोहिमेत भेटलेले आमचे अजुन एक डोंगरमित्र. कुटूंबाला घेऊन निघाले होते घनगडाच्या भेटीला ! त्यांच्याशी दोन शब्द बोलुन,परत वाटेला लागलो. बाकी या रस्त्याने चालायला पण मजा वाटत होती. लोकांना राजमाची पॉइंटवरुन दिसणाऱ्या धबधब्याचं कौतुक,आम्हाला मात्र आडवाटेवरच्या छोट्या - मोठ्या खाचरांचं आणि तुडुंब वाहणार्या ओढ्याचं अप्रूप !तशी लोणावळा- खंडाळा, ही पावसात अफलातून गर्दी खेचणारी घाटमाथ्यावरील प्रसिद्ध ठिकाणं. त्यात भुशीडॅमचं तर लोकांना फारच कौतुक! पण त्याच रस्त्यावर भांबरडे फाट्यावरुन दहा- बारा  किमी आत शिरलो की माणसांची वर्दळ कमालीची कमी होते आणि इथे असतात फक्त दोघे,एक निसर्ग अन् दूसरे तुम्ही. सालतर ची खिंड ओलांडून तैलबैल फाट्याला लागलो की अर्ध्या तासात आपण गावात प्रवेश करतो. तैलबैलला जायला लोणावळ्यावरुन बससेवा आहे,पण तेवढ्या वेळा सांभाळल्या तर सोयिस्कर. जेमतेम शंभर सव्वाशे लोकसंख्या असलेलं, ऐन घाटमाथ्यावरचं हे सुंदर गाव नजरेस भरतं ते इथल्या नैसर्गिक जुळ्या भिंतीमुळे. इथे येणारा प्रत्येकजण भारावूनच जातो.  हे प्रस्तर म्हणजे प्रत्येक गिर्यारोहकाचं जणु दिवास्वप्नच!  अनेक कातळारोहणपटुनी आरोहण केलेली ही भिंत म्हणजे सह्याद्रीच्या रांगेतलं निसर्गाविष्कार! दोन भिंतीच्या मध्ये गावाचा देव भैरोबा वसलाय,त्याच्याच बाजूला गार पाण्याचे टाके आणि मिळून छप्पर,मंदिर आता चांगलं बांधलंय. गावातली लोकं सांगतात, देव आधी डाव्या बाजुच्या भिंतीवर जाताना एक टाकं लागतं तिथे वस्तीला होता,सोयीप्रमाणे आणला खाली गावात. बाकी तैलबैल हे सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु असला तरी पाऊसकाळ सोडून इथे येणाऱ्यात कातळारोहणपटुचीच जास्त वर्दळ. असाच पायगाडीचा प्रवास उरकून आम्ही गावातल्या रोकडे काकाच्या घरी पाठपिशवी उतरवली तेव्हा तैलबैलाच्या जुळ्या भिंती धुक्यातुन आत - बाहेर करत होत्या. घराच्या ओसरीत एक ग्रुप आधीच हजर होता अन् बाजुच्या बंबात त्यांच्या आंघोळीचं पाणी तापत होतं. त्यांच्यातही एकजण ओळखीचं निघालं, गप्पाटप्पा झाल्या. अंधार व्हायला अजुन बराच अवकाश होता. कॅमेरा अन् छत्रा (माझी जंबो छत्री :) ) घेऊन आमची पठारावरील सैर सुरू झाली. धुकं दाटलं असलं तरी अधून मधून विरळ होत होतं.त्यातच भिंतीच्या खालच्या झाडीवर नेमका प्रकाश पडून त्याचा एक अप्रतिम नजारा डोळ्यांसमोर आला. थोड्याच वेळात धुक्याच्या सोबतीला पावसाने जी काही जोरदार सुरुवात केली,वीस मिनिटे जागचं हलताही आलं नाही.


इथल्या जुळ्या भिंती कमालच दिसत होत्या, गेल्या प्रजासत्ताकदिनी 7 तासात तीन बाजूंनी आम्ही त्या सर केल्या होत्या, त्यानंतर मार्चमध्ये दोन दिवसांत चारही बाजूंनी सर केल्या. तेव्हाच्या आठवणींना उजाळा मिळाला. अजुन एक विशेष म्हणजे तैलबैल पठाराचा भव्य विस्तार अन् तेथुन कोकणात उतरणाऱ्या घाटवाटा! त्यातल्या मुख्यतः उत्तरेला वाघजाई अन् दक्षिणेला सुधागड जवळ करायचा असल्यास घोडेजीन आणि या दोघींच्या मध्ये सवाष्णी या परिचित. बाकी केवणी पठारावरून नाणदांड घाट,नाळेची वाट  आहेतच. यांची नावं पण मजेशीर अन् लोभसवाणी ! पण ही फक्त नावं नाहीयेत, तर इथे घडलेल्या इतिहासाचे पुरावे आहेत. पेशवेकाळात पंत सखारामाच्या पत्नीचे निधन ज्या वाटेत झाले,तो म्हणजे सवाष्णी घाट. या घाटवाटा अर्थातच पुर्वीचे दळणवळणाचे मार्ग. या वाटेनी कोण कोण गेलं असेल? आता रस्ते आलेत,वाहनं आली त्यामुळे ह्या वाटेने गावातली जुनी- जाणती सोडली तर सहसा कुणी फिरकत नाही.  यातलीच वाघजाई उतरायची,आम्ही ठरवलं होतं.
दुसऱ्या दिवशी गावातील मेणेदादांना घेऊन आम्ही वाघजाई घाटाकडे रवाना झालो. गावापर्यंत आलेला डांबरी रस्ता सोडुन बैलगाडी रस्त्याला लागलो की भिंतीचा अजुन एक अफलातून नजरा आपल्याला साद घालतो. महामूर पावसामुळं भातखाचरं अन् ओढ़े भरभरून वाहत असतात.  हिरवाकंच नक्षीदार गालिचा पांघरलेलं हे पठार मन  सूखावुन जातं.  साधारण वीस मिनिटात आपण सह्यधारेवर येऊन पोहोचतो अन् अफाट कोंकण डोळ्यांसमोर उलगडत जातं. उत्तरेपासुन सुरुवात केली तर कोंडगांव अन् धरणाची भिंत,ठाणाळे आणि त्याच्या बाजुला पार पलीकडे नाडसूर! पार पल्याड सरसगड धुक्यात, पण सुधागडाच्या पश्चिम टोकाने स्पष्ट दर्शन दिलेलं असतं. थोडंसं खाली उतरलो की डाव्या हाताला वाघजाईचे ठाणे आणि मागेच कोसळणारा जलप्रपात शांततेचा भंग करतो. उजव्या हाताला चालू लागायचे. वाटेतच मेण्याचा देव भेटतो. या देवाची पण एक मजेदार गोष्ट आहे. खालच्या ठाकरवाडीतल्या लोकांचा,माडी वजवणे(तयार करणे)हा एकमेव व्यवसाय. एके दिवशी ठाकरांकडुन वरच्या दोन मेणे पाटलांना  मेजवानीचे आमंत्रण गेले, मग काय आहे फुकट म्हटल्यावर इतकी झाली की परत वर येताना लागलेल्या वणव्यात सापडले तरीही भान नाही. होरपळुन जीव गेला,नंतर गावात त्रास वाढायला लागल्यावर येथे ते देव वसवल्या गेले. काय अजब दंतकथा असतात नाही ? कुठे झाडोरा,कुठे पठार असं करीत उतरलो की एका वळणावर येऊन थबकतो. येथून डावीकडे ठाणाळे लेण,उजवीकडे कोंडगाव अन् सरळ आपलं ठाणाळे गाव.
ठाणाळे लेणी बघण्याची इच्छा होतीच,तसंच दादांना पटवून आम्ही तिकडे ट्रेकस्थ झालोही , पण वाट जेवढी साधी सुरवातीपासून वाटत होती,तोच ती थोडं आत गेल्यावर नाहीसी झाली. शोध शोध शोधली,उजव्या बाजूला वर कातळांत लेणी स्पष्ट दिसत होती,पण शेवटी वाट नाहीच सापडली. मेणेदादांना सुद्धा सुचत नव्हतं. सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास असलेली ही लेणी म्हणजे अप्रतिम,तेवढंच तिचे स्थान दुर्गम. घडवणाऱ्याचं खरंच कौतुक करावंसं वाटतं! आज योग नाही,अशी स्वतः ची समजूत काढून आम्ही परत घाटवाटेला लागलो. पावसात वाट जाम घसरडी झालेली,पाय चुकीचा पडला की पार्श्वभाग जमिनीला टेकलाच समजा! आस्ते कदम करत निघाव. पुढे वाटेत आपल्याला खडकात खोदलेली एकमेकांशी जोडलेली दोन टाकी आढळतात. बहुतेक वाटसरुंना पिण्याच्या पाण्याची सोय असावी. अर्ध्या तासाच्या वाटचालीनंतर एका ओहोळा जवळ थांबलो तेव्हा पाठमोऱ्या सह्यरांगेने दर्शन दिलं आणि सुखावून गेलो, मेणेदादाचा निरोप घेतला आणि गावात पोहोचलो तेव्हा पोटात कावळ्यांनी रणकंदन केलं होतं. पोटातली आग शमवून आम्ही नाडसुरची  वाट धरली.पुणेकरांसाठी वाघजाई सोयीस्कर, तो उतरून कोंडगाव,पेडली पाली-खोपोली रस्ता जवळ करता येतो. 
मदनावरील खारीचा वाटा !

3 comments:

महाराष्ट्रात फार पूर्वी पासुन किल्ले-भटकंती ची एक भन्नाट संस्कृति रुजु झालीये आणि ती आजतागायत तेवढ्याच उत्साहात टिकून आहे. विशेषतः पुणेकर,मुंबईकरांमध्ये.आठवड्याअंतीचं प्लॅनिंग इथे सोमवारपासुनच सुरू होतं.आणि जोडून सुट्टी आली की पाठीवर पिशव्या चढवून रानोमाळ हिंडणाऱ्याची संख्या इथे कमी नाही.मग त्या दोन दिवसात तुम्ही - आम्हीचं रूपांतर तु तु - मै मै मध्ये आणि अनोळखीचं मैत्रीमध्ये होतं,एकदम चिरकाल टिकणारया ! तिथे वय,सामाजिक प्रतिष्ठा,श्रीमंती,गरिबी काहीही आड येत नाही.एखाद्या मुक्त उधळण करणाऱ्या ताज्या दमाच्या बालट्रेकरची आणि डोक्यात रॉउंड कॅप,हातात कॅमेरा वगैरे मिरवणाऱ्या आजोबांची मैत्री इथे नवीन नाही. आणि अशी जगावेगळी डोंगरमैत्री इतरत्र कुठे पाहायला मिळणार नाही हे माझं प्रांजळ मत आहे. कदाचित याच हव्याहव्याश्या डोंगरमैत्री मुळे आम्हाला घरात बसवत नसेल. कदाचित,आमच्या लाडक्या सह्याद्रीला भेटल्या शिवाय करमत नसेल. रानोमाळ तंगडतोड करणाऱ्या मनस्वी भटक्यामध्ये या सह्याद्रीबद्दल अपार आदरभाव आहे.झपाट्याने चाललेली डोंगरांची लचकेतोड आणि जंगलांची कत्तल त्याला पाहवत नाही. चंगळवादी पर्यटकांमुळे दूषित झालेलं वातावरणही त्याला पाहवत नाही. साचलेल्या कचरयामुळे त्याचेही मन हळहळल्याशिवाय राहत नाही. साफसफाईची प्रेरणा घेऊन मग दहा - पाच जणांचा गट तयार होतो आणि जमेल तेवढे श्रमदान करून कचरा पायथ्याशी आणला जातो. पण आजच्या परिस्थितीत तेही एवढं साधं आणि सोपं राहिलेलं  नाही. माझ्या मते अशा ठिकाणी आपण आधीच जर जबाबदारीने वागायला शिकलो असतो तर ही वेळ ओढवलीच नसती. ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. गावकरी,ट्रेकर,पर्यटक या सगळ्यांची.तर अशाच डोंगरयात्रेतून,गिर्यारोहणातून जर संवर्धनही होत असेल तर त्या भटकंतीला एक वेगळीच दिशा मिळु शकते. त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. फक्त गरज आहे  ती आपल्या अफाट सह्याद्रीबद्दल  अपार प्रेमाची आणि ढासळत जाणाऱ्या पर्यावरणाच्या पुरेपुर जाणीवेची.याच जाणीवेतुन आम्ही मागच्या वर्षापासून गडावर स्वच्छता अभियान सुरू केले. किल्ले तोरण,लोहगड- विसापुर अशा गर्दी खेचनार्या ठिकाणावरून दहा - पंधरा कचरयाच्या पिशव्या खाली आणताना मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. आपण आपल्या घरात इकडे तिकडे पडलेला थोडासाही केर जर बघु शकत नाही तर या पवित्र ठिकाणी आपल्याला कचरा करण्याचा अधिकार दिलाय कोणी ? ही साधी सरळ गोष्ट आपल्याला का समजू नये ? आणि हे अति झालं की प्रशासनाला नावे ठेऊन आपण मोकळे होतो. फक्त नावं ठेऊन चालणार नाही तर, आपल्यालाही हातभार लावता येईल, याची जाणीव असु द्यावी. याच जाणीवेतुन मग अरुण सरांसारखे डोंगरमित्र पुढे येतात.
All the content Copyright - Sandip Wadaskar
किल्ले मदनगड़ावरील हौsद साफसफाईचा विडा त्यांनी उचलला. तसं पाहिलं तर अलन्ग मदन कुलन्ग या सह्याद्रीमधल्या सर्वात दुर्गम आणि अवघड किल्ल्यावर पर्यटकांची सोडाच पण गिर्यारोहकांची म्हणावी तेवढी वर्दळ कमीच. त्यामुळे चंगळवादी प्रव्रुत्तिपासुन हा त्यातल्या त्यात सुरक्षित,पण दुर्गमतेमुळं तेवढाच दुर्लक्षितही ! इथे मुक्कामाला प्रसन्न गुहा आहेत पण उदकाची मारामार. नाही म्हणायला  कातळात खोदलेल्या पाण्याच्या तीन टाकी,सगळ्या मोठमोठ्या दगड- मातीने गच्च झालेल्या. एका हौsदाच्य कोपऱ्यातून पिण्याच्या पाण्याची थोडीफार सोय होते. पैकी एका हौsदाची साफसफाई मोहीम सरांनी आखली होती आणि वाटा खारीचा का असेना आम्हीही मोहिमेत सहभागी व्हायचं ठरवलं. तिन्ही दिवस शक्य नसल्याने शुक्रवारचं ऑफीस आटोपून मी,प्रसाद,सागर अमराळे अन् त्याचा भाचा, किरण सर,महादेव गदादे आणि प्रह्लाद सर असे सात डोंगरमित्र आंबेवाडीकडे रवाना झालो. नुकताच लागलेल्या निवडणुकीच्या निकालावर चर्चासत्र झाली. सागरने सांगितलेल्या अरुण सरांच्या काही आठवणींनी त्यांना भेटायची इच्छा अजूनच दृढ होत गेली. गप्पांच्या नादात आम्ही आंबेवाडीत पोहोचलो तेव्हा रात्रीच्या थोडयाफार प्रकाशात त्रिकुट उजळून निघालं होतं. डाव्या बाजुला काळसुबाईंच ठाण खुणावीत होतं. जेवणं उरकून लखनच्या पडवीत पथाऱ्या पसरल्या आणि झोपी गेलो.


दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईची अन् नाशकातल्या जल्लोशची मंडळी येऊन मिळाली. संजय अम्रुतकर सरांची ओळख झाली. "वडस्करांचा संदिप पण आलाय वाटतं !" या त्यांच्या वाक्याने डॉ. जयराम ढीकले सरांची भेट झाली. उरलेल्या सामानाची विभागणी करून पाठीवर चढवलं आणि मदनकडे ट्रेकस्थ झालो. बऱ्यापैकी उजाडलं असल्यामुळे अ- म - कु चा पसारा त्याच्या दुर्गमतेची जाणीव करून गेला. अलंगचा ट्रॅव्हरस नं घेता,अलंग आणि मदनच्या खिंडीत जाणारी जरा जवळची नाळेतली वाट धरली. आणि दोन- अडीच तासात आम्ही खिंडीत पोहोचलो. उन्ह वाढतच होतं. त्यातच मदनाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. घामाच्या धारा वाहत होत्या. चाळीस फूटी तुटलेल्या कड्याजवळ पोहोचलो तेव्हा कुठे थोडीफार सावली मिळाली आणि विसावलो. कड्याला सुरक्षादोर नसल्यामुळे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. थोडया वेळाने संजय आणि पराग या दोघांनी दोर सोडल्यानंतर एकेकानी चढायला सुरुवात केली. गडमाथ्यावर पोहोचलो तेव्हा काम सुरू होतं. उमेश सरांनी ताक- पाणी वगैरे घेऊन नंतर कामाला लागण्याची सूचना करून गुहेकडे बोट दाखवलं.  अरुण सर आणि काही मंडळी दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागली होती. गुहेत पाठपिशव्या ठेऊन कामाला भिडलो.

आदल्या दिवशीच्या श्रमदानामुळे गाळानी बुजलेले झरे थोडेफार मोकळे झाले होते. हौsदात पाणी साचलं होतं. गाळाच्या सोबतीला मोठमोठ्या दगड- धोंडयांच्या राशि. हे प्रकरण म्हणजे जरा अजबच वाटत होतं. गाळ उपसायचं ठीक होतं,पण ही दगडं कमी करायची म्हणजे ताकदीबरोबर थोडं डोकंही चालवायची गरज होती. मग काय पायथ्याची भोरु अन् कंपनी आणि आमची ट्रेकर कंपनी. कुणी गाळ काढत होतं काहीजण दोर खेचत होतं. माती बाजूला करून मोठमोठी दगडं मोकळी होत होती. दोराची गाठ घट्ट आवळली अन् दहा - पंधरा जणांनी जोर लावला की दगड टाकयाबाहेर पडलाच समजा! जल्लोश व्हायचा,हर हर महादेवाच्या आरोळ्या उठायच्या. सारा आसमंत दुंदुमून जायचा नुसता!आणि अजून एक म्हणजे दगडांखाली गाळात दडलेले खेकडे,दगडाखाली हात गेला की एखाद चिंबोरा हातात आलाच पाहिजे. पुढे तर असं झालं की चिंबोरे शोधायलाच दगड वर यायचे. हे सगळं चालु असताना गुहेतुन जेवणाचं आवतन आलं. हात वगैरे धुवून गुहेकडे धावलो तर अरूण सरांनी जेवणाचा साग्रसंगीत थाट मांडला होता. पुरणाची पोळी काय,मसाले भात काय, छोले काय ? आ हा हा !!! इथे हौsद सफाईला आलोय की उत्सवाला हेच कळेना?


एवढ्या दुर्गम किल्ल्यावर,टळटळीत उन्हात हातातल्या ताटात पुरणाची पोळी अन् मसाले भाताचा आस्वाद घेत बसलेले दुर्गवीर! हे चित्रं म्हणजे कमाल. पण इथे एक साधी अट होती. पुरणाची पोळी प्रत्येकाला एकच, अर्थात जेवण प्रत्येकाला आणि समान मिळायला पाहिजे हाच उद्दात हेतु. पण मजा आली भरपेट जेवणं झाली,वामकुक्षी झाली आणि मावळे हौsदाकडे वळले. कामं सुरू झाली.पण पाहतो काय, तेवढ्यात वातावरणाचा नुर पालटला,अलंग्याच्या मागून येणारे काळे ढग आमच्या दिशेने झेपावु लागले होते. आभाळ गच्च झालेलं. ढगांची दाटीवाटी आणि विजांचा कडकडाट. कुणीही म्हणणार नाही की वीस मिनिटाआधी इथे टळटळीत दुपार होती. विजेच्या कडकडाटासह घन बरसू लागला,इतका की समोरच्या अलंगवर धबधब्यांना सुरुवातही झाली. कुणीतरी गुहेच्या वरच्या बाजूला गेलं असता वीज अनुभवल्याचंही सांगत होतं, नंतर कळलं ते आमचे किरण सर होते. बाहेर पाऊसवेडे पाऊस जगत होते. गुहेत हिंदी- मराठी गाण्यांना उजळणी मिळत होती. पण अरूण सर मात्र गुहेतल्या अंधाराची सोय म्हणून मशाली(आधुनिक torch) ठेवण्यासाठी जागा शोधत होते. बराच वेळ पाऊस असाच कोसळत होता. हौsदाचं काम बंद पडलेलं पण असो, पहिला पाऊस आहे घ्यावा गोड मानून! सगळे आनंदात! दिड एक तास बरसल्यावर पावसाची सर हळूहळू ओसरायला लागली.

तासा- दोन तासाआधी उन्हाचे चटके देणारा निसर्ग आता हवाहवासा वाटू लागला होता. हवेत कमालीचा गारवा आणि वातावरण कसं स्वच्छ,नितळ! एक एक करून सगळे कामगार गडी हौsदाकडे परतु लागले. पहारी,घन,घमेले,फावडे,वगैरे वगैरे सामान घेऊन सगळे परत एकदा सज्ज झाले. आता अजुन एक अडचण म्हणजे पावसाच्या पाण्यामुळं हौsदात चिखल झाला होता. पण आता कुणाला त्याची तमा नव्हती,घमेल्याने गाळाचा उपसा सुरू झाला. पावसाने एकदम ताजे- तवाने झालेले गडी जे भिडले ते सांगायलाच नको. दगड बांधायचा अवकाश, ओढला की टाकयाबाहेरच फेकला जायचा. हे सर्व चालु असताना अलंगावर सांजवेळ उन्ह खेळत होती,पावसानंतर ऊन- पावसाच्या खेळानं रंगून गेलेल्या अलंग्याचं मनमोहक रुपडं बघून भारावून गेलो. नारायण पलिकडे चांगलाच कलला होता.मदनाच्या सर्वोच्च माथ्यावरून नारायणराव थोड्याच वेळात कुलंगआड होणार होते. महारथी कुलंगच्या मागे सांजवेळ सोनेरी किरणे आपले रंग उधळीत होती. तो अनुपम सोहळा पाहत,तिथून हलावसं वाटलं नाही की कॅमेराचं शटर बटन दाबावसं वाटलं नाही. आणि काय सांगु काय दिसत होता सह्याद्री! माझा सह्याद्री! अफाट,अभेद्य,अजिंक्य सह्याद्री! महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील सर्वात उंच डोंगरशिखरांची मांदियाळी ही इथेच! सगळ्यांची उंची ही सरासरी पाच हजार फूटांपेक्षा जास्तच. सर्वात ऊंचावर असलेल्या कळसुबाईंच्या ठाण्यापासुन उजवीकडे,छोटा कळसुबाई,श्रीक़िरडा,अलंग,घन्चक्कर,कात्राबाई,आजोबा,कुलंग हे महारथींची भलीमोठी रांग जणु अस्ताला जाणाऱ्या दिवाकरास सलामी देतायेत असं वाटत होतं. कुठे रतनगड डोके वर काढतोय,कधी त्याचा खूँटा स्वतःचं अस्तित्व जाणवतोय. कुठे डांग्या सुळक्या खुणावतोय. खाली घाटघर अन् सांधण दरी मागल्या भेटीची आठवण करून देतायेत,पश्चिमेकडचा जलाशय सांजवेळची सूर्यकिरणे झेलत पहुडलाय,कधी तिकडे तो पट्टा विश्रामासाठी निमंत्रण पाठवतोय असं वाटत होतं. मस्त मस्त !!

अंधार गडद व्हायच्या आधी हौदाकडे वळलो. आता तर गारव्यामुळे चांगलाच उत्साह संचारला होता. दगड बाहेर फेंकताना कुणाना- कुणाच्या तरी श्रीमुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दागणिक हास्यकल्लोळ उठायचे.हसून- हसून पोट दुखायची वेळ आली होती अन् हौदही रिकामा झालेला दिसत होता. अगदी रात्रीचा दिवस करून काम चालु होतं. बऱ्यापैकी अंधारून आलेलं. थोडावेळ उपसा करून आजचा दिवस संपला,असं जाहीर झालं अन् गुहेकडे वळलो. रात्रीच्या जेवणात खीर आणि दुपारच्या छोल्याचा फडशा पाडुन जमिनीवर पाठ टेकवली तेव्हा निरभ्र आकाशात चांदण्यांचा सडा पडला होता. तारे मोजत कधी झोप लागली कळलंच नाही.

सकाळी जाग आली तेव्हा, प्रसाद ओरडत होता. सॅन्डया. उठ,उठ अरे तुझा सूर्योदय, तुला फोटो काढायचे होते ना ? उठलो तेव्हा "गोल्डन अवर" निघून गेला होता. सकाळची आण्हीक उरकून हौदाजवळ येऊन बसलो. तिकडे गुहेत चहा- नाश्त्याची तयारी चालु होती. मला कालपासुन एक प्रश्न पडला होता. या हौदात ही एवढी मोठ-मोठी दगड गेली कशी असेल. नाही,मुद्दाम टाकली असेल. कदाचित इथला पाण्याचा स्त्रोत कायम बंद करण्याच्या उद्देशाने. हो असच झालं असेल. त्याच मानसिकतेतुन इथल्या पायऱ्या पण उध्वस्त करण्यात आल्या आहेत. पण मग एवढी दगड. सांगता येणार नाही. तसा या किल्ल्यांचा इतिहासही फारसा ज्ञात नाही. आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या बुरुज वजा किल्ल्याचा उपयोग होत असावा. कारण सर्वात उंच टोकावर उध्वस्त झालेली चौकी पहायला मिळतात. असो. तूर्तास हौदाची साफसफाई महत्वाची होती. प्रह्लाद सर, किरण सर, महादेव अन् प्रसाद मिळून चहा होईपर्यंत तेवढा गाळ उपसुन घेतला आणि चहा- नाश्ता आटोपून सर्वजण परत एकदा लढाईस सज्ज झाले. शेवटचा दम म्हणत म्हणत बरेच दगड बाहेर आली होते. आता दगडांच्या राशी हौदाच्या बाहेर दिसायला लागल्या होत्या. पाहून फार फार बरं वाटत होतं. बराच गाळ बाहेर आला होता. कुठेतरी आमच्या सह्यादीच्या कामी आल्याचं समाधान होतं. साफसफाईची सांगता झाली. तेवढ्यात महादेवने त्याच्या नुकताच जगात प्रवेश केलेल्या बाळाचे पेढे भरवुन तर शेवट अगदी गोड करून टाकला. एका डोंगरमित्राचा पेढे वाटतानाचा चेहऱ्यावरील आनंद काही औरच होता !


"जल्लोष"ने निरोप घेतला.आम्ही गावलेले थोडेफार चिंबोरे भाजुन खाल्ले पण गुहेत जेवणाचा बेत वेगळाच शिजलेला! मस्तपैकी झिंग्याची चटणी आमची वाट पाहत होती. सागर अमराळेने बऱ्यापैकी जतन करून आणलेलं आम्रखंड, व्वा वाह ! भर उन्हात चुलिवर पोळ्या भाजतानाचे किस्से, गप्पा मारत जेवणं उरकली. एकमेकांचे अनुभव वाटल्या गेले. अरूण सरांसोबतही गप्पा झाल्या. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. त्यांना भेटून येणारे म्हणत असतात,अरूण सर तुमच्या बाजूला येऊन थांबले तरी तुम्ही नाही ओळखू शकणार. तेही खरच आहे, बाहेरून असे साधारण दिसणारे अरूण सर ही काय चीज आहे, हे फक्त त्यांच्यासोबत असणारे भटकेच सांगू शकतील. त्यांनी आखलेली ही मोहीम म्हणजे फक्त हौद साफ करणे नव्हे तर चार लोकं एकत्र येऊन आपण आपल्या सह्याद्रीसाठी काहीतरी करु शकतो  अशी प्रेरणा देणारी एक मोहीम आहे,असं माझं मत आहे.  वेगवेगळ्या ग्रुपसोबत फिरणारे, वेगवेगळ्या ग्रुपचे चालक- मालक, पुणे - मुंबई- नाशिक अन् इतर आजूबाजूची भटकी कंपनी,संजय सरांसारखे लेखक,ढीकले सरांसारखे सायक्लिष्ट, श्वेता,पिनाक,देव,प्रिसिलिया,मिहिर,दिवेश,समीर,विष्णु, हर्षल,संजय,पराग,उमेश सर, महिमचे जयंतकाका आणि इतर सर्व यांच्यासारखे डोंगरमित्र या सगळ्यांसोबत दोन दिवस मस्त मजेत गेले. हौदाच्या पुढच्या वर्षीच्या कामाचं आवतण, गेल्या दोन दिवसाच्या श्रमाची पोचपावती म्हणजे गोड आठवणी अन् अनुभवलेला अविस्मरणीय सह्याद्री मनाच्या कोपऱ्यात ठेऊन आवरायला सुरुवात झाली.

हार्नेस बांधून परतीची वाट धरली. उतरताना डोळ्यासमोर आलेली दरीची भीषणता काळजाचा ठोका चुकवल्याशिवाय राहत नाही. तूटलेला कडा उतरून खिंडीत पोहोचलो. आता नाळेची वाट न घेता अलन्गचा ट्रॅवर्स जवळ केला. रमत गमत सपाटीला लागलो तेव्हा आभाळ गच्च झालं होतं. विजेच्या लखलखाटात पसारा अजूनच भेदक भासत होता.समाधानी मनाने परतीच्या वाटेला लागलो तेव्हा संध्याकाळचे सात वाजुन गेले होते....

अरुण सरांनी याही वर्षी ही मोहीम आखलेली आहे , तरी जास्तीत जास्त डोंगरमित्रांना या मोहिमेत सहभागी होण्याचे टीम मदनगड हौद साफसफाई च्या वतीने मी आवाहन करतो .लवकरच सर्वांची भेट होईलच :) !!!!!!

'अनमोल'रतनगड

2 comments:

बरेच दिवस झालेत,नवीन भटकंती नव्हती. दसऱ्याची मिळालेली चार दिवसांची जंबो सुट्टी पण वाया गेली होती. एकतर सुट्ट्यांची बोंब,त्यात अशा फुकट गेल्या तर हे भटकं मन फार हळहळतं हो. पाऊसही सरत आलाय,म्हणजे थोडेफार ढग मागे राहीलेत पण तेही हळुहळु आपले निरोप घेतील आणि जातील,गारठ्यानेही थोडा सूर आळवायला सुरवात केलीये. सह्याद्रीच्या कुशीत तो जास्तच असेल यात शंका नाही. तीन - चार महिन्याच्या धो - धो पावसानंतर विखुरलेली घरटी वीणायला पक्ष्यांनीही सुरुवात केली असेल.पाऊस पिऊन टरारुन वाढलेली जंगलं आणि वनराजीने नटलेल्या सह्यरांगा आळसावलेल्या अंगाने जाग्या होतायेत. तशीच लगबग सिमेंटच्या जंगलातही सुरू झालीये,थोड्याच दिवसात दिवाळसण येतोय ना दारी ! माळा वगैरे लावून घरासमोरील कंदीलही सज्ज झालेत.पहिला दिवा लागला दारी,वगैरे वगैरे मेसेज ची देवाण - घेवाण होऊन दिवाळी झाली पण घरच्या किंवा मित्रांच्या घरच्या फराळाची खरी मज्जा ही डोंगरात गेल्याशिवाय नाही कळायची. आता घरात थांबणे  नाही. शेवटी प्लान ठरला,रतनगड गाठायचा! रतनगड ! प्रवरामायचं उगमस्थान.खुप दिवसांपासुनची इच्छा होती,हे रत्न कधीतरी नजरेस घालायचं.पायगाडीने या दुर्गोत्तमाची दुर्गम अन् अवघड वाट एकदा तरी तुडवायची. येणाऱ्याची यादी कमी होत होत रेश्मा,योगिता अन् मी यावरच येऊन थांबली.पायगाडी वाटेवर लागायच्या आधीच मन पोहोचलं होतं रतनगडाच्या नेढ्यात !

आईशशप्पत!  रेश्मा,निघालीस का तु ? रविवारी सकाळी सातला रेश्माला फोन झाला तेव्हा ती घरातून नुकतीच निघाली होती. आणि योगिता पण मार्गस्थ झालेली. आता काही खरं नाही,या दोघीना वेळेवर यायला सांगून मीच उशीर केला म्हटल्यावर आता काय बोलायचं? आंघोळीची गोळी ! मग काय दुसरा पर्यायच नव्हता. आवरुन शिवाजीनगरला पोहोचेपर्यंत योगिताचा फोन आला, अकोले गेली. व्हायचं तेच झालं, एकमेव "डाइरेक्ट येस्टी" चुकली. तेवढ्यात इंद्राभाईचा व्हाट्सअप "निघाला का,मी चाललोय अकोलेला" हे इंदूरीकरांचे जावयी निघाले होते,सासऱ्याचे दिवाळे काढायला. काय करणार असो. पहिला वाहिला दिवाळसण ! म्हटलं,"सरबरायीतुन मिळाला वेळ तर घेऊन या कुटुंबाला गडावर " नाशिक गाडीने संगमनेर गाठायाचं ठरवलं. अन् एकदाचा प्रवास सुरू झाला. पुण्यातून गाडीला गर्दी नसली तरी मंचर- नारायणगावात लोकं उभे राहायला सुरुवात झाली. टू बाय टू ची थ्री बाय थ्री झाली, अन् एक आजीबाई शेजारी येऊन बसल्या. "एक समगनेर,हाफ. मला एकदम,"सावरगेट" आठवलं. असो, अजुन एक म्हणजे योगिता अन् रेश्माच्या बाजूला बसलेल्या मावशीला गावाकडची वैनी भेटली अन् त्यांच्या गप्पा(नळावरच्या ?) सुरू झाल्या. विंडो सीट धरून बसलेले आजोबा केव्हाच डिलीट झालेले, वैनीच्या छबीची गोष्ट ऐकत केव्हा मी डिलीट झालो ते कळलंच नाही.

आळेफाट्यावर चहापाणी आटोपून गाडी पुढच्या प्रवासाला लागली. "समगनेर"ला पोहोचलो तेव्हा दुपारचे साढ़ेबारा झाले. पुण्यावरूनच बसलेल्या एका माणसाने स्वतःहून सांगितल्याप्रमाणे अकोले बसही लगेच मिळाली. पाऊण- एक तासात अकोले. तेथून लगेच शेंडी- भंडारदरा बस लागलीये,हे बघून तर आनंद गगनात मावेना. राजुर गाठलं आणि आता आमची बस डोंगराळ रस्त्याला लागली, शहरातला कोलाहल मागे पडला,धुराचे लोट कमी झाले. आता होती फक्त "डोंगरयात्रा" मधली छोटी छोटी गावं अन् "येस्टी"चा घोंघों करणारा आवाज. बाकी गाडीतले प्रवासी दिवाळी खाण्यात गुंतलेले. आम्ही रस्त्याच्या कडेला असलेली शेती ओळखण्यात गुंतलो. ते दोघे पण आलेत रतनगडला,बीडचे आहेत, रेश्मा. बीडवरून ! चला बरंच आहे. बाकी,गिर्यारोहक फक्त पुण्य- मुंबई च्या आसपासच जन्माला येतात,हे वाक्य चुकीचे ठरवत पुण्यामुंबईच्या पलीकडेही महाराष्ट्र आहे,असे ठणकावल्यासारखे वाटले,उगीचच! असो एव्हाना बसने आम्हाला भंडारदऱ्याजवळ सोडले अन् ती शेंडीकडे मार्गस्थ झाली. ढगाळलेल्या आभाळात पल्याड अनामिक सुळका घुसलेला,प्रवरेच्या काठावर हौशी पर्यटकांनी गर्दी केलेली. भंडारदऱ्याच्या पलीकडील डोंगराच्या रांगेत खूँटा निवांत उभा अन् बाजूला समाधीस्थ रतनगड आम्हा भक्तांची आतुरतेने वाट पाहत असलेला.

बीडकरांशी हलकीशी ओळख झाली. दोन वडापाव अन् प्लेटभर भजी पोटात ढकलून पुढचा प्लान ठरवायला सुरुवात झाली. बोटवाला जरा जास्तच सांगतोय असं वाटल्यावर रस्त्याने रतनवाडी जवळ करायचं ठरवलं अन् फाट्यावर येऊन थांबलो.  गावकरी फाट्यावर बसची वाट पाहत बसलेले,त्यातले एक बाबा म्हणतात,आत्ता आत्ता पाच वाजता हाये बस.थोड्या वेळात ते बाबाच गायब ! कोणी म्हणे पावणे सहा,कोणी म्हणतंय साढ़े सातला नक्की येईल बघा ! जीपडे मुतखेलच्या पुढे जायलाच तयार नव्हते. आणि आतापर्यंत मस्तपैकी साथ देणारी येस्टी मात्र आता बेभरवशाची वाटायला लागली,कारण ज्याला विचारतो तो आपली वेगळीच वेळ सांगायचा.बरीच वाट बघून झाली. आणि आता तर मुतखेलला पण मिळेनासे झाले. निघालो चालत, बीडकरांना अजूनही गाडीची आशा असावी. ते तिथेच थांबले. अंधार व्हायला अजुन अवकाश होता, कमीत कमी तिथे पोहोचुन मुक्काम तरी होईल. थोड्याच वेळात बीडकर एका जीपड्याला लटकुन जाताना दिसले. पाऊण तासात वेशीवरचा हनुमान दिसला तेव्हा गावात पोहोचल्याची खात्री पटली. समोरून छोटा मुलगा साइकल घेऊन येतोय दिसल्यावर रेश्माचा छंद जागा झाला. सॅक टाकून,साइकल घेतल्या आणि निघालो भन्नाट राइडवर ! डोंगरांच्या कुशीत,हिरवाकंच निसर्ग अन् साइकलच्या दोन चाकांखालचा गुळगुळीत डांबरी पण पायवाटेएवढाच रस्ता. वाटत होतं,हीच साइकल घ्यावी अन् गाठाव थेट रतनवाडी. "संदिप, माझी ना एक बरीच दिवसांपासूनची इच्छा आहे. चांगली पंधरा दिवसांची ट्रीप काढायची साइकलवर,काय म्हणतोस?" रेश्मा. दुसरं कोण ? म्हटलं,चला आता. बरच दूर आलोय. परत आलो तेव्हा नेमका एक टेंपोवाला रस्त्यात उभाच होता. त्याला पटवला अन् आमचा अमृतेश्वर मंदिरातला मुक्काम फिक्स झाला.
टेंपोतला प्रवास ! हा काही माझ्यासाठी नवीन नव्हता. कदाचित योगिता अन् रेश्मा साठी तो असेलही. पण कधी कधी वाटतं यातच खरी मज्जा आहे. मजा आपल्यासाठी ? ज्या दुर्गम गावांमध्ये बस वेळेवर नसेल(त्यातला त्यात बस आहे हे महत्वाचं) तिथे या सगळ्या गोष्टींना पर्याय नाही. एखादा गंभीर रोगी तालूक्याच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवायचा असेल तर कुठे आहे पर्याय. नशीब रस्ते धड आहेत. मला नेहमी विचार पडतो, एसी मध्ये बसून बक्कळ पैसे कमवणारे आपण सुखी की अतिपावसामुळे घराची छप्पर गमावलेले हे डोंगरातली लोकं सुखी? शेवटी ज्याच्या- त्याच्या सुखाचा प्रश्न अन् ज्याची - त्याची व्याख्या ! असो. खोलात गेलो तर अजुन रुतायचो,दलदल फार आहे. विचारचक्र चालु असताना ड्राइवरने ब्रेक दाबला, बघतो तर एक मोठा साप रस्ता ओलांडून सरपटत होता. रतनवाडीत पोहोचलो तेव्हा चांगलच अंधारून आलं होतं. टेंपोवाल्याचे धन्यवाद मानून उतरलो तेव्हा थंडीने किंचितशी चुणूक दाखवली. भुका तर लागल्या होत्या पण त्याआधी एक फक्कड़ चहा झाला तर ! जेवणाची ऑर्डर अन् राशन भरून आम्ही अमृतेश्वराच्या आवारात प्रवेश केला तेव्हा मंदिराचा गाभारा साठच्या बल्बने उजळून निघाला होता. फ्रेम मिळाली होती,विचार केला जेवणानंतर निवांत टिपूया.अपेक्षेपेक्षा सुस्थितीत असलेला परिसर पाहून आनंद झाला. हनुमान मंदिरात पथार्या पसरल्या. चहा झाला,बीडकरांशी गप्पागोष्टीत ते दोघेही शिक्षक असल्याचे कळले. ओह "सर"लोकं आहात तुम्ही ! ते वर्षाला एक ट्रेक ठरवतात. मागच्या वर्षी हरिश्चंद्रगड,यावेळेस रतनगड. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये असताना आसपासचे बरेच ट्रेक केल्याचं कैलाससरांनी सांगितलं. पुढचे दोन दिवस चांगली सोबत मिळणार,मनोमन विचार करून आनंद झाला. जेवणावर ताव मारून मी आपल्या आजच्या दिवसाच्या शेवटच्या कामाला लागलो. आयुध घेऊन मंदिरासमोर उभा ठाकलो. चार - पाच  अप्रतिम शॉटस् मिळाले.बल्बच्या लालसर उजेडात उठुन दिसणारे मंदिराचे नक्षीकाम थक्क करणारे होते,सकाळी उठल्यावर उजेडात दिसणारं मंदिर  अप्रतिम असेल यात शंकाच नाही.

ऊठ,ऊठ पाऊस येतोय,पहाटे पहाटे रेश्माचा आवाज. पडवीत झोपलेल्या योगिताला ऊठवुन सगळे जण मंदिरात पांगले. थोडा वेळ पडून सकाळी जाग आली तेव्हा आभाळ नभांनी गच्च झालेलं. रतनगड धुक्यात दिसेनासा होत होता. फोटोग्राफीवर पाणी फिरणार असं वाटत होतं. आवरुन महादेवाचं दर्शन घेतलं. आणि खरच काळ्या पाषाणावरचं कोरीवकाम सुंदरच होतं ! घडवणारा किंबहुना घडवणारे कमालीचे कारागिर आणि तज्ञ असले पाहिजे,अन् त्यांच्या सबुरीची दाद द्यायला पाहिजे. आपल्याला थेट आठव्या शतकात घेऊन जाणारं हे हेमाडपंथी शिल्प म्हणजे इथल्या भव्य इतिहासाची एक जिवंत साक्षच मानायला हवी.कदाचित या किल्ल्याची निर्मिती सुद्धा तेव्हाच झाली असावी.किंबहुना त्याही आधी. म्हणजे रतनगड किती जुना असेल याची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. कोरलेली प्रत्येक मुर्ती रेखीव,प्रत्येक शिल्प आखीव,प्रत्येक चित्रं रेखाटलेलं, इतकं प्रमाणबद्ध की आजच्या वास्तूविशारदालाही लाजवेल! दगडातून आरपार गेलेल्या काही कलाकूसरीने तर भारावून गेलो. खिरेश्वरच्या नागेश्वराची आठवण झाली. बाजूलाच प्रवरेचा फुगवटा,त्यामुळे पाणी थेट शिवलिंगांभोवती मंदिरात ! हे म्हणजे भारीच. काही काही गोष्टी असतात खरच कल्पनेपलिकडच्या,त्यातच हे मंदिर आलं. झडे दादाच्या घरी पोह्यांचा पोटोबा झाला. गावातली रवी अन् शेखर ही जोडी दिमतीला घेऊन आमची पायगाडी निघाली रतनगडाच्या दिशेने.

दोन तासात पोहोचू का रे,शेखर ? अर्थातच हे विचारण निरर्थक आहे.पण असो,एक आपला वेळेचा अंदाज. नदीच्या काठून कधी नदीतून दगड- धोंडयातून वाट काढत निघालोय. थोडं पुढे जाताच,एक टुकार मुलांचा घोळका नदीच्या पात्रातच,त्यांची पार्टी चाललेली. मनोमन शिव्या हासडुन काढता पाय घेतला. गाढवापुढं गीता नाही ना वाचू शकत,अशा लोकांना खरंतर गांववाल्यांनीच सोलुन काढायला हवं. जाऊदे. प्रवराकाठ सोडून वाट दाट झाडीत शिरलो अन् पावसाने रंग दाखवायला सुरुवात केली. कदाचित झाडीमुळे आवाज अधिक होत असावा. पहिल्या पठाराला लागलो,कात्राबाईचे कडे अन् उजवीला खूँटा जवळ भासायला लागला. नेढ्याने स्पष्ट दर्शन दिले. परत दाट झाडी. थोड्याच वेळात एका चौकात येऊन थबकलो,चौक म्हणजे दहा - बारा जण सहज मुक्काम करतील अशी जागा होती. कात्राबाईच्या खिंडीतून हरिश्चंद्रगडाची वाट ही इथेच येऊन मिळते. पुढच्या ट्रेकचा प्लान डोक्यात हजेरी देऊन गेला. पंधरा मिनिटात पहिल्या शिडीजवळ पोहोचलो. लगेच दूसरी आणि गणेश दरवाजा. चढताना तेव्हाची लोकं कशी येत असतील वर ? विचार येऊन गेला. येथून उजव्या बाजूला रत्नादेवीची गुहा,मुक्कामाला साजेशी जागा. तिसरी शिडी चढून हनुमान दरवाजा आणि हाच गडमाथा. माथ्यावर पोहोचल्या पोहोचल्या आज्जा पर्वताचे कडे बघितल्यावर कोंकणकड्याची आठवण झाली. हे आपण इथेच अनुभवू शकतो. आजोबा शिखर अन् थोडं त्याच्या खाली सीतेचा पाळणा. पल्याड कात्राबाईचे कडे अन् खिंड,कोंकणात वाहणारी काळ नदी,चुकून पाय सटकला की डाइरेक्ट शिफ्ट - डिलीट ! फेरफटका मारत कोंकण दरवाज्याजवळ आलो. आणि तेथून अ-म-कुचं पहिलं दर्शन झालं. खाली सांधण दरीतील भीषणता भयावह होती,चिकटून बाण सुळका आपलं अस्तित्व जाणवत होता.अफाट! थोडं पुढे एका चोर दरवाज्याजवळ गार पाण्याचं टाकं. तिथेच दुपारचं जेवण शिजवुन पोटोबा झाला. आवरुन निघालोच,पावसाने हजेरी दिली. त्याच तडाख्यात आम्ही थेट नेढ्यात येऊन पोहोचलो. गार गार वारा वाहत होता,पावसाच्या सरीने अंधारून आलेला आसमंत आणि नेढ्यातून कोंकणातला आणि घाटावरचा नजारा भन्नाटच! तिकडे शैल कळसूबाईने पण दर्शन दिलं.हे नेढ म्हणजे निसर्गाचा आविष्कारच. दहा - बारा जण सहज बसतील अशी नैसर्गिक वातानुकूलित जागा म्हणजे भारीच,राजगडाच्या नेढ्याची आठवण झाल्याशिवाय राहवलं नाही. 
परतीचा प्रवास सुरू झाला. त्र्यंबक दरवाज्याची वाट जवळ केली. उतरताना खूँट्याचं अजुन एक एक भयानक रूप समोर आलं. आणि त्याच्या पल्ल्याड कुलन्ग पासुन सुरुवात करून मदन, अलन्ग,श्रीकिरडा,लहान कळसूबाई,कळसूबाई अगदी रांगेत उभे आणि पायथ्याला घाटघरचं पाणी. मस्तच यार ! त्र्यंबक दरवाज्यात पोहोचलो तेव्हा अशा अवघड जागेतून वाट असेल याची कल्पनाच करवत नाही. उतरताना काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. अक्खा दगड चिरून बनवलेल्या या पायऱ्या म्हणजे खरच डोकं सुन्न व्हायला होतं. अप्रतिम ! दगडांवरची कसरत झाली,ट्रॅवर्स पार करून खूँट्याच्या खिंडीत आलो तर बाण,नावाप्रमाणेच आकाशात निशाना लावून मस्तवाल उभा होता. इथून डाव्या बाजूला साम्रदची वाट अन् उजवी रतनवाडीकडे. ही वाट परत दाट झाडीत शिरते,त्या जंगलातुन जाताना रवीला झुडपातून काहीतरी सळसळल्याचा आवाज ऐकू आला अन् त्याचा भीती वजा टिंगल केल्याचा निरागस कटाक्ष आणि शेखरला उद्देशून टाकलेल्या, "शेक्याssss,डुक्कर! आहे वाटतं !!!" वाक्याची गम्मत वाटली. त्यानंतर शेखर चं "ह्ह्ह्ह्हूऊऊओह्म्म्म" हे डुक्करांना पळवण्यसाठीचा जप ! मोठी गम्मत वाटत होती. प्रवरेच्या काठी पोहोचलो,मस्त पाणवठा बघून गवती चहाचा बेत जमवला. बाकी रेश्माच्या गवती चहाने खरच रंगत आली ट्रेकमध्ये! पोरगी आहेच म्हणा हुशार :) भंडारदऱ्यावर मावशीकडे बरोबर गोड बोलून काढून घेतल्या होत्या तिने दहा - पंधरा काड्या. रतनवाडीत पोहोचलो तेव्हा सह्याद्रीतलं हे अनमोल रत्न प्रवरेच्या पात्रात आपलं रुपडं न्याहळीत बसला होता. 


रात्री अमृतेश्वराच्या आवारात योगिता अन् रेश्माने जमवलेला "स्पेशल" कांदा करपवुन - पेरू सलाड- मसाले भात एकदम दणकाच उडवून गेला ! अन् सोबतीला घरची आईच्या हातची "दिवाळी" व्वा ! बाकी बाईमाणसांना अन्नपूर्णाची उपमा देतात,ते काय खोटं नाही. भरपेट जेवणं झाली,सकाळी उठुन रतनवाडी- राजुर बस मध्ये पाय ठेवला तेव्हा अगरबत्तीच्या मंद सुगंधाने मन प्रसन्न झालं ! निरभ्र आकाशात पक्ष्यांच्या कीलकिलाटात खाली बसच्या गेअरने विचित्र आवाज करून मार्गस्थ झाली. दोन दिवसांच्या गोड आठवणी मनाच्या कप्प्यात ठेऊन आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.आणि ह्या पहाटेचं वर्णन करायला माझे शब्द अपुरे पडतील,इतकी सुंदर होती ! हवाहवासा गारठा सुखावत होता."येस्टी" चा घोंघों सोडला तर बाकी कमालीची शांतता.डोंगरातली झापं हळुहळु जागे होतायेत,तीन दिवसांपासुन सुट्टीवर गेलेले नारायणराव आज भेटले होते.डोंगराआड लपलेली किरणं आता जमिनीवर स्थिरायला सुरुवात झालीये. प्रत्येक वळणावर कमीत कमी एक झापं या हिशोबाने ड्राइव्हर ला सक्तीचा थांबा. त्यात तो एका माणसावर खेकसलाच, "तुम्हांला बस घराजवळ आल्यावरच निघायचं सुचतं का हो ?" त्याला जुमानतय कोण ? ह्यांची बाचाबाची चाललेली असताना कुठलंस जीवघेण अत्तर फासुन एका आजीबाईने गाडीत प्रवेश केला अन् अक्खी बस आता दरवळायला लागली. हा दरवळ घेऊनच बस शेंडीला पोहोचली तेव्हा मागुनच येणारी "डाइरेक्ट" पुणे येस्टी दिसल्यावर तर आनंद काय हे सांगायलाच नको! बीडकरांचा निरोप घेऊन पुण्याकडे मार्गस्थ झालो......साद सह्यसागराची....निवती,सिंधुदुर्ग !

1 comment:

पुण्याहून गृह-भोजन मुहूर्त (जेवणं वगैरे घरातूनच आटोपून,नंतर रस्त्यात वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात.ही वेळ साधारण रात्रीचे 10-10:30 ची असते) साधून निघालेलो आम्ही! जेवणं झाली असली तरी चहाची तेवढी तल्लफ उगाचच जाणवत होती. साताऱ्यापासुन चहा - चहा करीत कोल्हापुर गाठुन बावडा घाट उतरायला सुरूवात झाली तरी चहाच्या टपरीचा कुठे मागमुसही नव्हता. शेखऱ्याचं आपलं चाललेलं "काय सँडया ,चहा नाय का नाश्ता नाय,काय हाय का नाय ? तर हा शेखऱ्या,त्याचं कुटुंब मोनाली वहिनी आणि प्रसन्ना,त्याचं कुटुंब पुजा वहिनी हे दोन जोडपी आणि प्रसाद,केसागर,मी असे तीन अतरंगी अशी सप्तरंगी टोळी आणि आमचे ड्रायव्हर काका असं आठाचं धावतं विश्व रात्रीच्या मिट्ट काळोखात गगनबावडा घाटातली वेडी- वाकडी वळण पार करत निघालोय.मोनालीची त्यांच्या नुकताच मिळालेल्या आणि प्रतिष्ठित क्लाइंट,अशा टिकेकरांवरील स्तुतिसुमने उधळून झाली होती. ह्या केसागऱ्याला झोप आवरत नव्हती,कशाला उगीच एका बाणात दोन पक्षी मारायचे प्रयत्न? जीवघेणी वळणं,सीडी प्लेयरमध्ये मध्येच लागणारं एखादं भन्नाट गाणं, गप्पा- टप्पाच्या नादात स्वारी निघाली होती कोंकणात. किर्र अंधारात वाऱ्याशी सलगी करणारा गाडीचा वेग आणि गप्पांचा ओघ मंदावला की समजायचं,काकांनी साइड दिली. मग उगाचच घाटात गाडी चालवणे म्हणजे ड्रायव्हर कमालीचाच पाहिजे वगैरे वगैरे प्रतिक्रिया ! कीलकिल्या डोळ्यांनी घाटाचं निरीक्षण करता करताच गगनगड खुणावत गेला.एका मोठ्या वळणावर तर एकदम वरंधा घाट डोळ्यांसमोर आला.
खुप दिवसांनी निघालो होतो कोकणात हिंडायला.जवळ जवळ दोन एक वर्षांनी! अधुनमधून हरेश्वरला जाऊन आलो  होतो पण अशी सुसाट भटकंती फार दिवसांनी. मला अजूनही आठवतं नऊ - दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा कोकणात गेलो होतो,आमच्या कोंकणवेड्या कल्याणीताई सोबत. तेव्हा खोतकाकुंनी बनवलेली सोलकडी,ही अशी पेल्यानी ओरपली होती आणि नाकपुड्यातून डोक्यात शिरलेले मासे (तेव्हा मी खात नव्हतो,पण इथे आल्यावर बटाट्याची भाजी.....छे छे,हे पटलंच नाही) आणि त्यांचा सुवास असा भिनलाय की कोकणाच्या प्रेमातच पडलो आणि तेव्हापासून या सागरी मेव्याला मी कधीच अंतर दिलं नाही. खोत काकांचं बांबु आणि पोफळी वापरुन बनवलेलं पारंपारिक कोंकणी घर, घरामागुन नारळाच्या दोन बागा ओलांडल्या की थेट पांढरी वाळू. पहिल्यांदा अनुभवलेला सागरी किनारा,सकाळी सकाळी ताज्या ताज्या निरेची आलेली झिंग, आणि मग समुद्रात केलेली मस्ती,उगाचच प्रत्येकाच्या अंगावर पाणी उडवत मज्जा करायची. मग वाळूचे कण आणि खारवटलेले अंग घेऊन परतायचं तर पोफळीच्या बागेतली विहीर आपल्यासाठी सज्ज असायची. गार पाण्याने मस्त आंघोळ झाली की फ्रेश. पेशवेकालीन हरेश्वराचे दर्शन घेऊन यायचं आणि जिभेला वाट मोकळी करून दयायची. मग काय, होऊ दे खर्च,येऊ दे पॉपलेट- सुरमई,झिंगे अन् बांगडा! ही अशी सगळी चंगळ.

बागेतल्या मुंजोबाच्या गोष्टींवर रात्री झोपताना टरकल्याचंही आठवतं. ह्यो माका कोंकण,तुका कसा वाटला ? हे कोणी विचारत नाही,कारण विचारण्याला काही अर्थच नसतो. कोंकण म्हणजे महाराष्ट्राचं सौंदर्य! इथली संध्याकाळची गार वाळू,नारळा- पोफळीतला गारवा,वेड्या- वाकडया पायवाटा,सड्यावरच्या आंबा अन् काजूच्या बागा,इथला हवाहवासा निसर्ग म्हणजे अप्रतिम! आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथली माणसं अन् त्यांची रसाळ कोंकणी भाषा. इथं आल्यावर मला उगाचंच पुलंच्या अंतूशेटना भेटायची फार इच्छा होते,कोण जाणे "ओ गोविंदभट,टाकतोस का दोन डाव?" अशी हाक एखाद्या गल्ली- बोळातून ऐकू यावी.

हे सगळं आठवत असताना,मी ड्रायव्हर शेजारील सीटवर बसलोय याचा विसर पडला आणि डुलकी लागली. तेवढ्यात ती ड्रायव्हर काकांनी परतवली. "ही डुलकी जर ड्रायव्हर काकांनाच लागली असती तर!" या कल्पनेने माझी झोपच उडाली. पहाटेच्या ब्राह्मणमुहुर्तावर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. एक - एक कटिंग चा ब्रेक झाला आणि परत गाडीत बसायला लागलो तर शेखऱ्या बाहेर येऊन मॉर्निंग वॉक करायला लागला,म्हणे,"तुम्ही चहा घेणार ना ?" अहो वहिनी सांगा त्याला,चहा घेऊन निघण्याची वेळ झालीये. काय हो वहिनी,हा झोपेत चालतो की काय ? नाही आपलं विचारून घेतलेलं बरं,एखाद्या वेळेस जायचा आपला निषिद्ध जागा समजून कड्यावर! शेखरच्या आइसब्रेकरने सगळ्यांच्याच झोपा उडाल्या आणि कोकणातल्या आल्हाददायक वाऱ्याची झिंग प्रत्येकाच्या डोक्यात शिरायला सुरुवात झाली. प्रसाद, कुठुन करायची सुरवात? जाऊ दे वेंगुर्ल्याला.वेंगुर्लाsss!

सात- सव्वासातच्या सुमारास वेंगुर्ल्याच्या बंदरावर पोहोचलो. कोळी बांधवाची सकाळची धामधूम चाललेली. मासेमारीला निघणाऱ्या होड्या युद्धावर निघालेल्या खिंकाळणाऱ्या घोड्यांसारख्या समुद्राच्या लाटांवर हुंदळत होत्या. सकाळच्या कोवळ्या किरणास समुद्रापर्यंत पोहोचायला वळवाचा मज्जाव चाललेला,अशा प्रसन्न वातावरणात कॅमेरा सुरु करावा तर महाशयांची तब्ब्येत ठिक नसल्याचं जाणवलं. पुरता हीरमोड झाला. आता कॅमेराशिवाय पुढचे दोन दिवस जगायचे कसे,हा प्रश्नच पडला. तरीही आपला एक टिपून घेतला. भोगवे बीच कडे मार्गस्थ झालो, तेव्हा पोटात आग पडली होती. आणि नेहमीप्रमाणे         आमचा दादया, प्रसन्न "वडापाव बघ रे,कुठे मिळतो का ? या माणसाला हॉटेल ताज मध्ये जरी नेऊन सोडला ना तरी हा आपला वडापाव काही  सोडणार नाही. कारण काय, तर म्हणे " तो कुठेही सहज मिळतो. "

शेवटी रस्त्यालगतच्या टपरीवर थांबलो. तर हा कोंकणी वडापाव. पावाची साइज़ बघून तर हसुच आवरत नव्हतं. आणि जेव्हा वड्याने पावात प्रवेश केला तेव्हा तर त्या वड्याचा पोस्टमाटमच करून टाकला पोरांनी! अहो,दिवसेंदिवस दिवस आकाराने कमी होत चाललेल्या पुण्यातील जोशी वडेवाल्यांच्या वड्यानी जर हे प्रकरण वाचलं असतं तर त्यांचीही मान शर्मेने खाली गेली असती हो! मग कोकणात पाव केवढयाला? वडा एवढा छोटा का ? आणि मग भजी केवढी असतात? वगैरे वगैरे. तेवढ्यात केसागर ने सॅंपल चा सांभार करून दोन वडे गटकावले. म्हटला," मज्जा आली ". दोन - दोन वडापाव पोटात ढकलून पुढचा प्रवास सुरू झाला.

पाऊण तासात भोगवेचा समुद्र किनारा गाठला. ड्रायव्हर काकांना आता कुठे विश्रांती मिळाली. त्यांनी आपली सोयिस्कर जागा बघुन दिली ताणून.आम्ही आमच्या पायांना वाळू मोकळी केली. दगडांवर आपटणाऱ्या लाटांचा आवाज,फेसाळणारं पाणी आणि सागराकडे झुकलेल्या नारळाच्या झाडांनी फ्रेम मध्ये जीव आला आणि खछ्याक आवाज करून कॅमेरा मध्ये बंदिस्त झाला. कॅमेरा थोडाफार साथ देत होता. निवतिच्या समुद्रकिनाऱ्याला लागूनच असलेला छोटासा पण रम्य किनारा,जिथे कर्ली नदी सागरास येऊन मिळते. कर्ली नदीच्या खाड़ीपलीकडे तो देवबाग बीच.अलीकडे नारळाच्या झाडांनी गच्च झालेलं रान म्हणजे त्सुनामि बेट. आणि पार पल्याड तो,दिसतोय का ? भक्कम तटबंदीचा कोट,होय तोच. तो आपला स्वराज्याचा जंजीरा! किल्ले सिंधुदुर्ग!! विशेष असा की या रमणीय सागरी किनाऱ्यावर फक्त आम्हा साताची तुकडी. मस्त फोटोसेशन झाल,पांढऱ्या वाळूत सगळी दंगामस्ती झाली. वाळू झटकून गाडीत बसलो आणि आमच्या या सागरी मोहिमेतल्या पहिल्या किल्ल्याकडे रवाना झालो.


परत सड्यावर आलो तेव्हा उन्ह वाढत चाललेलं.पण दुतर्फा असलेल्या आंब्याच्या अन् काजूच्या बागानी खुष केलं. एखाद्या जंगलात भरदिवसा असल्यासारखी रातकिडयांची किर्र मन सुखावुन गेली.असं वाटत होतं उतरावं गाडीतुन आणि द्यावी थेट ताणून, एखाद्या आंब्याखाली. थोड्याच वेळात किल्ले निवतिच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. चढायला सुरूवात केली तेव्हा टोचणरं उन्ह मी म्हणत होतं.करवंदी आणि काटेरी झाडोरा बाजुला सारुन गडमाथ्यावर प्रवेश केला. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी काही जण सरसावले अन् बाकीची करवंदीवर तुटून पडली. पण सांडया,राजमाचीची सर नाय,शेखर. अजुन कोण? पार तुंगर्लि येईपर्यंत त्यानेच जास्त चापले होते, पण शेखर्या तिथल्या खेकडयांनी तुला अजूनही माफ केलेलं नाही,बरं ! असो,निवतिच्या माथ्यावरून पश्चिमेला असीम सागराने सुरेख दर्शन दिले. डोईवर तळपणार्या सूर्याची किरणे झेलत पहुडलेला समुद्र शांत भासत होता. किल्ल्याच्या पायथ्याशी झाडी पलीकडे,समुद्रातून अवतरलेल्या कातळकड्याने लक्ष वेधून घेतले. निळ्याशार पाण्यावर त्याचा लालसर रंग उठुन दिसत होता. इतिहासाचा वेध घेत आम्ही किल्ल्यावरचा फेरफटका सुरू ठेवला.जांबा दगडापासुन बांधलेल्या पडक्या वाड्याचे  आणि तटबंदीचे अवशेष पाहून शिवरायांच्या दुर्गबांधणीची आठवण झाली. पण हे बांधकाम शिवकालीन नसावं. या किल्ल्याचा तसा इतिहास ज्ञात नाही. हाकेच्या अंतरावरील मालवणच्या किल्ल्यामुळे निवतिला देखील महत्व असावे,पण किल्ला स्वराज्यात असेल तर! कदाचित टेहळणीची जागा म्हणून. करवंदांचा आस्वाद घेत उत्तर बुरुजावर पोहोचतो तर भोगावेच्या सुंदर किनार्याने डोळ्यांचे पारणे फिटले. माथ्यावर गर्द हिरवाईने नटलेलं रान आणि पायथ्याला पांढऱ्या शुभ्र वाळूचा रुपेरी पट्टा! निवतिची सफर सार्थकी झाल्यासारखी वाटली. फोटोचा नुसता क्लिकक्लिकाट झाला. माघारी फिरुन उतरलो तेव्हा गाडीची पार भट्टी झाली होती. पुढच्या प्रवासाला लागलो,आता मालवण गाठायचं.

गाडी सुरू झाली,गार वारं लागायला सुरुवात झाली. तेव्हा कुठे गाडीतलं तापमान जरा कमी झालं. पण मोनालीचा " उपवास " हा विषय ऐरणी वर  आला आणि परत तापलं. ते निवळण्याची औपचारिक जबाबदारी अर्थातच मी स्वीकारली. कसं आहे ना,वहिनीसाहेब ? आपण एकदा का शिवापूर फाट्यावर सातारयाचा टोल फाडला (शिव्या देत का होईना !) की उपास- बिपास काही नसतं. उपवास पुण्यात,कोकणात कुठून काढला उपवास ? तो पेंगतोय बघ,केसागर. अरे किती झोपतो,फिरायला आलास की झोपायला ? हां.तर मी काय म्हणत होतो," इथे घासफूसवाल्यांचे हाल होतात तर उपासकांची काय बिशाद?" वहिनीसाहेबांचे समाधान झाल्यासारखे वाटले. त्यानंतर मासे आणि त्यांचे प्रकार यावर एक छान चर्चासत्र सुरू झालं. गप्पांच्या नादात परुळ्यात शिरलो आणि रस्त्यालगतच एक छान टुमदार टिपीकल कोंकणी मंदिराच्या दर्शनाने आमची गाडी कडेला घेतल्या गेली. बहुतेक अदिनारायणाचे मंदिर,प्रसाद पुटपुटला. हो तेच. मोठा सभामंडप,आत रुंद गाभारा,त्यात विसावलेली अदिनारायणाची गोमटी मूर्ती. आंघोळ न करताच एकदम प्रसन्न वाटलं. बाकी कोंकणवासियांचं आराध्य दैवत म्हणजे बाप्पा! तेवढ्याच भक्तिभावाने,उत्साहाने राखलेलं आणि रंगरंगोटी केलेलं मंदिर म्हणजे अप्रतिम! चला,गाडीत जाऊन बसलो, उर्वरीत मत्स्यपुराण सुरू झालं.मालवणात येऊन धडकलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते.


 रस्त्यावर पर्यटकांची आणि प्रवासी गाड्याची झुंबड उडाली होती. गर्दीतून वाट काढत एकदाचं आधी ठरल्याप्रमाणे हॉटेल सी- व्यू रिज़ॉर्ट मध्ये चेक इन झालो आणि पाहिलं काम म्हणजे मेनू कार्ड चेक! पण जेवढ्या उत्साहाने ते हातात घेतलं होतं,तेवढ्याच वेगाने ते भिरकावलं,काय रे हे रेट !! मासे रद्द आणि सर्वानुमते कोंबडी सत्कारणी लावायची ठरवलं. खानपान झालं. खुर्च्या टाकून वाळूत ( तारकर्ली बीच वरची वाळू थेट रिज़ॉर्ट मध्ये अंथरली होती ) गप्पा मारत बसलो. नंतर वामकूक्षी घेण्याच्या बेतातच होतो की दादामहाराजांनी आज्ञा सोडली. " चला सिंधुदुर्गला जायचंय ना ?" नारायणराव तरी अजून दोन- अडीच तास ड्यूटीवर होतेच. मालवणच्या किनार्यावर पोहोचलो तेव्हा पर्यटकानी धुमाळ गजबजला होता. हौशी पर्यटकांच्या कॅमेरांचा क्लिकक्लिकाट आणि दुकानांची वर्दळ. त्यातच मालवणच्या धक्क्यावर उभ्या असलेल्या बोटी लोकांना खचाखच भरवुन किल्ल्याकडे रवाना होत होत्या. अशाच बोटीमधून आम्ही कुरटे बेटावर पाय ठेवला तेव्हा सूर्य पश्चिमेला कलायला सुरुवात झालेली. समुद्राच्या लाटा तटबंदीवर आदळआपटत होत्या. त्यांचा आवाज. पुढ्यात धक्क्याचं काम चाललेलं,समुद्रात भर टाकणारी माणस,त्यांचा कल्लोळ. रहाटगाडा जोमाने चालला होता. त्यातच समोरच्या पद्मगडागडाची दुर्दशा हेलावणारी होती.


 मुख्यद्वारातून आत प्रवेश केला आणि उजव्या बाजूला भिंतीमध्ये एका बंदिस्त असलेल्या चौथरावर थबकलो. असं म्हणतात गडाचं बांधकाम झाल्यानंतर महाराजांच्या एका हाताचा आणि एक पायाचा ठसा इथे उमटऊन घेतला होता. त्याचं निरीक्षण झालं,तटबंदिवरुन चालायला सुरुवात केली. पाउले पुढे पडत होती,मन मात्र इतिहासाचा मागोवा घेण्यास रमलं. " आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच, ज्यास अश्वबल त्यास पृथ्वी प्रजा आहे. तदवतच ज्याजवळ आरमार,त्याचा समुद्र! " या आरमार प्रकरणातील वाक्यावरुन द्रष्टया शिवाजी महाराजांनी समुद्राचे महत्व वेळीच ओळखले होते. या आरमाराची मुहूर्तमेढ अर्थातच 40 एकरात पसरलेल्या या कुरटे बेटावर रोवल्या गेली. बांधकामास तब्बल तीन वर्ष लागलेला हा जलदुर्ग म्हणजे जंजीरेकरांच्या थोबाडात मारलेली सणसणीत आरमारी चपराकच म्हणायला हवी. महाराजांच्या या आवडत्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे अभेद्य अशी 12 फुट रुंद आणि 50 एक फुट उंच भिंत (तटबंदी).  57 बुरुजानी सुरक्षित केलेलं हे आरमारी प्रतिक पाहण्याजोगं आहे. किल्ल्यात कायमची वस्ती असणारी घरे अगदी शिवकाळापासुन राखलेली आहेत. किल्ला म्हणण्यापेक्षा आत अख्खं गावच वसलेलं आहे . नगारखाना दरवाजा, आणि त्यावरील नगारा वाजवण्याचा अधिकार आजही परंपरेप्रमाणे चालत आलेल्या एका कुटुंबाकडे आहे. इतर किल्ल्याप्रमाणे आत हनुमानाचे,कुलस्वामिनी आई भवानीचे मंदिर आहे.आणि जगात कुठेही न आढळून येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर अद्वितीय! छत्रपती राजारामांनी स्थापना केलेली मूर्ती कोळी वेशात पाहायला मिळते. बाकी गोड पाण्याचे टाके दूधबाव,साखरबाव आणि दहीबाव पाहण्यासारखे. तटबंदीवरून दिसणारी राणीची वेळा, ताराराणीसाहेबांची खासगीची जागा. तिथे जायला तटबंदी मधुनच एक छोटा दरवाजा काढलाय. सिंधुदुर्गाबद्दल लहानपणी पुस्तकात वाचलं होतं,तेव्हापासुन या किल्ल्याचं खुप आकर्षण होतं. आज प्रत्यक्ष अनुभवताना मन भारावून गेलं. फेरफटका झाला आणि बोटीमध्ये जाऊन बसलो. हॉटेलवर पोहोचलो तेव्हा अंधारलं होतं.रात्रीचे जेवणं शाकाहारी. बाकी कोकणात व्हेज म्हटलं की ती यादी बटाटा,कोबु हराभरा अन् मटकीची उसळ या पलीकडे सरकत नाही. पण जेवणात सोलकडी अन् उकडीचे मोदक,बेत जमला फक्कड़! पण मासे आज राहूनच गेले,साधा सुरमईचा एक तुकडा जिभेला शिवला नव्हता! असो,बघुया उदया काय होतं ते ?

भटकंती- पुण्याच्या आसपास

2 comments:

माझ्या मित्रवर्तुळात भटक्या म्हणुन मी सगळ्यांना माहिती आहे. आणि नेहमीचे भटके मित्र वगळता नवख्यांचा मला नेहमी एकच प्रश्न असतो, "आम्हाला यावंसं वाटतं रे पण, आम्हाला जमेल का, तुमचे ट्रेक खुप मोठे आणि कठीण असतात " वगैरे वगैरे. तर खास त्यांच्यासाठी म्हणुन ही थोडीफार विषयाला हात घालणारी माहिती. पुण्याच्या अगदी ५०-६० किमी अंतरावरील सर्वात सोप्पे आणि जिथुन अगदी हिमालयीन मोहिमांसाठी सुद्धा सराव केला जातो असे छोटे-छोटे ट्रेक आपण एका दिवसात करू शकतो . चला तर मग करायची सुरवात ?

photo credit: Sagar Manore
 १) मल्हारगड : नेहमीच्या फिरस्त्यांमध्ये सुद्धा अपरिचित असणारा सोनोरीचा मल्हारगड हा एकदा तरी जवळ करावा असाच आहे. पेशवेकाळात सरदार पानसेनी उभा केलेला,मराठेशाहीत शेवटचा बांधलेला किल्ला म्हणजेच मल्हारगड. किल्ल्याची लांबच लांब तटबंदी आणि मल्हारी-मार्तंडाचं मंदिर या खेरीज गडाचं मुख्य प्रवेशद्वार पाहण्यासारखं आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी दिवे घाट पार करुन डाव्या हाताला वळलो की सोनोरी गावात पोहोचता येते, गावातच पानसेचा खासा वाडाही पाहण्याजोगा आहे.
 

२)रोहीडा: रोहिड खोऱ्यात म्हणजेच नीरा नदीच्या खोऱ्यात वसलेला हा सुंदर किल्ला पुण्यावरून साधारण ६५ किमी अंतरावर आहे. पुण्यावरून भोर गाठावे आणि तेथुन एसटी किंवा जीप मधुन बाजारवाडी गाठावे. मळलेली वाट आपल्याला तासाभरात गडमाथ्यावर घेऊन जाते. पायथ्यापासुन गडावर असणाऱ्या दोन टोकावरील असलेल्या बुरुजांमुळे एक विशिष्ट आकार जाणवतो. गडावरील एकूण सहा बुरुज आणि तटबंदीमुळे गड अजूनही भक्कम वाटतो. इथल्या पाण्याच्या टाक्यांची भलीमोठी रांग आणि एकमेकांना जोडले असल्यामुळे शिवरायांच्या दुर्गविज्ञानाचे कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. रोहीडमल्लंच्या मंदिरात ७-८ जणांच्या राहण्याची सोय होऊ शकते.


३)राजगड:जिजाऊ साहेब आणि छत्रपति शिवरायांच्या २६ वर्षाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या इथल्या मातीला जगात तोड नाही. ज्या स्थापत्यशास्त्राची अवघ्या जगाने दखल घेतली आणि किल्ले बांधणीचा उत्कृष्ट नमुना म्हणुन घोषित केले आहे तो म्हणजेच आपल्या राजांचा गड. सुवेळी अर्थात पहाटेच्या वेळी सूर्योदयाचा निस्सीम आनंद घ्यायचा असेल तर राजगडा व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही तुम्हाला सांगतो. पाली गावातुन पालखी दरवाजा, भुतोंडे गावातुन अळू दरवाजा किंवा गुंजवण्यातून चोरदिंडीमार्गे गडदाखल झालात की या पवित्र भूमीत रमण्यासारखं दुसरं सुख नाही. बालेकिल्ल्याच्या अवघड पायऱ्या चढुन गेलो की सकाळ्ची कोवळी किरणे ल्यालेला महादरवाजा चकाकून निघतो. प्रवेश करता करताच लगेच कुजबुज सुरु होते ,"कुठं बरं पुरलं असेल अफजलखानचं मुंडकं ? " संजीवनी माचीकडे जाताना होणारं बेलाग बालेकिल्ल्याचं अद्भुत दर्शन आणि पुढ्यात दुहेरी तटबंदी असलेली नागिणीसारखी सळसळणारी संजीवनी माची म्हणजे अप्रतिम. तर मग कधी येताय राजगडावर ? पद्मावती मंदिरात ५०-६० जण रात्रीच्या मुक्कामाला राहु शकतात, गडावर जेवणाची सोय होऊ शकते. 


४)सिंहगड: हिमालयीन मोहिमेचा सराव करण्यासाठीची पुणेकरांची पहिली पसंती! कोणीही नवखा पुण्यात अवतरला की त्याच्याकडुन "तो सिंहगड किल्ला कुठे आहे रे ?",असा प्रश्न हमखास विचारला जातो. पण मला तिथे कसं जायचं याची माहिती देण्याची गरज वाटत नाही. पावसाळ्यात अगदी शिवापुर फाट्यापर्यंत गाड्यांची भली मोठी रांग,एवढी गर्दी खेचणारा हा सिंहगड म्हणजेच वीर तानाजीच्या शौर्याचं जिवंत प्रतीक. इथे येऊन फक्त पिठलं-भाकरीवर ताव न मारता संपुर्ण गड पहावा. कलावंतीण बुरुज पहावा,तानाजी कडा पहावा. थोडा वेळ शांत बसुन कल्याण दरवाज्याचं सौंदर्यही न्याहाळावं. गडावरुन दिसणारी राजगड-तोरणा ही दुर्गाजोडी तर अप्रतिमच.


५)घनगड: कोरसबारस मावळातला अगदी छोटेखानी, सवाष्णी आणि वाघजाई घाटाचा पहारेकरी. लोणावळा-ऍमबी व्हॅली रस्त्यावरून उजवीकडे भांबर्डे फाट्याकडे वळायचे. भांबरड्याच्या अलीकडेच येकोले म्हणुन एक गाव आहे तिथुन चालत वीस मिनिटात आपण किल्ल्याचा पायथा गाठतो. तेथून पाऊण तास गडमाथा. माथ्यावर एक विहीर आणि बुरुजाशिवाय पाहण्यासारखं काही नाही, पण कोंकणातल्या सुधागड,सरसगड, सवाष्णीचे खोरे आणि आपलं सह्यभुषण तैलाबैलाच्या कातळभिंती हा नजरा म्हणजे अफलातुनच. तैलबैलाच्या अवाढव्य पठाराची आपल्याला कल्पना येते. शिवाजी ट्रेल या संस्थेच्या अखत्यारीत या किल्ल्याचे संवर्धन सुरु आहे.


६)तुंग: पवना काठचा मावळखोर्याचा पहारेकरी. तिकोन्यावरून बेलाग सुळक्यासारखा भासणारा पण पायथ्याशी पोहोचताच गोमुखी प्रवेशद्वार आपल्याला मार्ग दाखवतो. तिकोना पायथ्याच्या जवण गावापासुन साधारण १० किमी वर असलेल्या मोरवे गावी पोहोचलो की अर्ध्या तासात चालत जाऊन आपण तुंगवाडीत पोहोचतो. पाऊण तासात माथा गाठता येतो. पडझड झालेली दरवाजे,हनुमानाचे कोरलेले दगडी शिल्प,गणेश आणि तुंगाई देवीच्या मंदिराखेरीज पाहण्यासारखे तसे काही नाही. पण पवनेचं विस्तीर्ण जलाशय आणि अक्ख्या मावळाचं विहंगम दृश्य नजर खिळवून ठेवतं. 


७)तिकोना: पावसाळ्यात हौशी ट्रेकर मध्ये प्रसिद्ध असलेला तुंग-तिकोना-लोहगड-विसापूर-कोरीगड या दुर्गापंक्तीतला एक छोटेखानी किल्ला. याच्या आकारावरूनच याला हे नाव पडले असावे आणि माथ्यावर असलेल्या वितंडेश्वराच्या मंदिरावरून याला वितंडगड असेही म्हणतात. बालेकिल्ल्याचं प्रवेशद्वार भव्य आहे. उजवीकडे लगेच बारमाही पाण्याचं टाकं आहे. थोडीफार तटबंदीही शाबूत आहे. वितंडेश्वराच्या मंदिरामागे खंदक खोदलेले आढळतात. अलीकडच्या गुहेत पावसाळा सोडुन १५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.


८)तोरणा: "गरुडाचे घरटे" आणि "पुणे परिसरातील सर्वात उंच किल्ला" अशी बिरुदावली मिरवणारा रांगडा दुर्ग नवख्या तसेच कसलेल्या गिर्यारोहकांचीही नेहमी परीक्षा पाहत असतो. भट्टीमार्गे वाळणजाई,राजगड-तोरण्यामार्गे बुधलामाची अशा बऱ्याच वाटा असल्या तरी साधारण ट्रेकर हे वेल्हयातून बिनी दरवाज्यानेच किल्ला जवळ करताना दिसतात. वेळ असेल तर बुधला माचीकडे जाताना उजव्या बाजूला वाळणजाई दरवाजा नक्की पाहावा. पाऊसकाळ सोडुन गडावर सकाळीच चढायला सुरुवात करावी. गडावर पोहोचायला साधारण २-२:३० तास लागतात. सदरेजवळच असलेल्या टाक्यात पाण्याची आणि मेंगाई देवीच्या मंदिरात राहण्याची सोय आहे.झुंजार माचीकडील हनुमान बुरुजावरून राजगडाचे विहंगम दर्शन होते. दूरवर लिंगाणा,रायगड,सिंहगड,रायरेश्वर,पुरंदर,इत्यादी दुर्गसख्यांचे दर्शन होते.

चला तर मग करायची सुरुवात ? पावसाळा पण जेमतेम आठवड्यावर येउन ठेपलाय. पण एक साधी अट आहे,घरातून निघालेला प्लास्टिक(पाण्याच्या बाटल्या, वेष्टण,इतर अविघटनशील) चा कचरा ट्रेक संपल्यावर घरच्या डस्ट बीन मध्येच दिसायला हवा. बाकी अफाट सह्याद्री तुम्हाला मोकळा आहेच…….