बागलाणच्या कुशीत : मोरा-मुल्हेर

"बैसा" रिक्षावाल्यानी एका प्रवाशाला समोरच्या सीटवर जागा देत म्हटल्यावर ध्यानावर आलो तेव्हा खऱ्या अर्थाने बागलाणात पोहोचल्याची खात्री पटली. या भागातली भाषा मोठी मजेदार आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील सटाणा तालुका (मुळचा बागलाण) त्यामुळे भाषेवर परिणाम हा होणारच. इथली गुजराती संमिश्र मराठी ऐकायला भारी मज्जा येते. "बसा" आणि "बैसो" या दोहोंचा मिळुन बागलाणी " बैसा " झाला. काय ? आहे की नाही मज्जा ? मधल्या सीटवर एक आदिवासी कुटुंब बसलं होतं,त्यांची भाषा कोण जाणे ? कळत नव्हती . ताहीराबादवरून मुल्हेरकडे निघालो होतो. 

आदल्या दिवशी शिवाजीनगरला प्रवाशांची झुंबड (जोडुन ईदच्या सुट्टीचा परिणाम) बघुन थोडंसं टेन्शनच आलं होतं. पण आमच्या सर्वमाहितीसंपन्न (एक ना धड भराभर चिंध्या) वाश्यानी कुठल्याश्या ट्रवल्सचं आरक्षण करून ठेवलेलं,त्यामुळे तो प्रश्न मिटला होता. सकाळी नाशिकला पोहोचलो तेव्हा सटाणा बस आमचीच वाट पाहत असल्याच्या अविर्भावात उभी होती. बसायला जागा नाही मिळाली,पण एखाद्या लुटारूनी बिनविरोध खजाना लुटावा तसा साक्रीच्या एका सद्गृहस्थांनी आमच्यासमोर माहितीचा खजाना रिता करायला सुरुवात केली. मग काय चांगले पावणे दोन तास आम्ही दोघे पायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करीत ऐकत होतो. सरकारात नौकरी करून काका रिटायरमेंटला आले होते. स्वतः या भागातील गड-किल्ल्यांवर फिरलेले होते. त्यांच्या कडुन बरीच माहिती मिळाली. दुर्दैवाने घाईगडबडीत त्यांचं नाव विचारायचं वा फोन नंबर घ्यायचं आम्ही विसरलो. ताहीराबादला पोहोचलो. मी रिक्षावाल्याची चौकशी करायला गेलो तेव्हा हा वाश्या फळवाल्याशी घासाघीसी करीत बसला होता. म्हणे "सफरचंद, १०० रुपये किलो" आता काय बोलायचं ?

मुल्हेर गावाकडे निघालो तेव्हा फट्ट पडलं होतं,पावसाचे चिन्हं तर दिसत नव्हते आणि धरणी माय पण दोन दिवसांपासुन पाऊस नसल्यासारखी कोरडी पडली होती. पण गावात पोहोचलो तेव्हा जे व्हायचं तेच झालं,चांगला राप राप पाऊस पडत होता. मुल्हेरमाचीचा रस्ता विचारून घेतला आणि पायपीट सुरु केली. गावातले शेतकरी,मजूर,गुराखी आपापल्या कामाला निघालेले. आणि आमचं आजचं लक्ष्यं मोरा-मुल्हेर आणि हारगड हे अजूनही धुक्यात पहुडले होते. एका म्हसवाल्या बाबाला विचारून वाटनिश्चिती करून घेतली. त्यांच्यासोबतच थोडं चालत गेलो तेवढ्यात बाबांनी शोर्टकट टाकला आणि आम्हाला " इकडुन पाणी लयी हाय " असे सांगुन पुढुन जायला सांगितलं. बरं बाबा ! हारगडाचा माथा धुक्यातच होता. वाडीत पोहोचलो तेव्हा मोरा समोर असलेल्या तलावात स्वतःच्या पडलेल्या प्रतिबिंबाशी खेळत होता. आम्ही पण थोडी जलक्रीडा करून घेतली. मेथी पराठ्यांनी सकाळचा फास्ट ब्रेक केला आणि विनाब्रेक आम्ही मुल्हेर माचीवर येऊन पोहोचलो. माचीवरल्या गणेशमंदिरा समोरील मोती तलाव एवढा पाऊस पडुन रिकामा कसा ? याचंच आश्चर्य वाटलं . गणेश मंदिर तर " क्लासिक ". हारगड पाठीराख्यासारखा मागे उभा होता. थोडा वेळ मंदिरात शांत पहुडलो. मुक्कामाला अगदी साजेशी जागा होती. पण मुक्कामाची वेळ आता नव्हती. 




सोमेश्वर मंदिराकडे निघालो. मध्येच जोत्याची मजबूत बांधकाम असल्यासारखी जागा दिसली,चंदन बाव ही विहीर आसपासच असल्याचं वाचनात आलं होतं,पण ती नाही सापडली,तेवढा वेळही नव्हता.आटोपतं घेत सोमेश्वरास पोहोचलो. शिवमंदिरातली गूढ शांतता आमच्या बोलण्यानी भंग पावली. आम्ही समोरच असलेल्या यज्ञकुंडाकडे पाहत उभे होतो तेवढ्यात धुपाचा सुवास दरवळायला लागला,वळून पाहिलं तर एक जटाधारी बाबा हातात अगरबत्ती घेऊन देवाला ओवाळत होते. नुकताच स्नानसंध्या आटोपुन आले असावेत. कारण गडाचा रस्ता सांगायला जवळ आले तेव्हा, "अंगाला फासलेला परफ्युम हा कुठल्या कंपनीचा आणि कुठुन आणला असावा ? " असाच प्रश्न डोक्यात येऊन गेला. एवढंच ! असो. आम्ही चढाईला सुरुवात केली. चढण एकदम छातीवर येणारी. 




खूप दिवसांपासूनचा बागलाणात भटकायचा योग आता कुठे आला होता. इथल्या खड्या चढणीचे दुर्गसखे साद घालत होते. बाकी नाशिक जिल्ह्यातल्या या कोटांची बातच न्यारी ! चौथ्या पावलाला धाप लागली नाही तर नवलच ! नाशिक जिल्हा ! रायगड जर भटक्यांची पंढरी असेल तर हरिश्चंद्रगडाला भटक्यांचा स्वर्ग म्हणतात. यावरून बागलाणास भटक्यांची काशी म्हणावयास हरकत नाही. मांगी-तुंगी ,रवळया-जवळ्या,साल्हेर,मुल्हेर,अहिवंत,अचला,धोडप,कचना, औंढा,अलंग,मदन,कुलंग,यादीच संपत नाही. नाशकातले हे मानबिंदू,राकट, कणखर गडकिल्ले वर्षानुवर्षे ऊन,वारा,पावसाची तमा न बाळगता असेच उभे आहेत. पुण्यावरून वा मुंबईवरून इथे यायचं म्हटल्यावर चांगली तीन-चार दिवसांच्या सुट्ट्यांची सांगड घालुनच दाखल व्हावं आणि जगासोबतच स्वतःला देखील विसरून जावं. असंच आम्ही ईदच्या सुट्टीचा (शनिवार-रविवार ला जोडुन आलेल्या) सदुपयोग म्हणुन बागलाणातली डोलबारी रांग खिशात घालायचं ठरवलं होतं. भिडू दोनच एक वाश्या अन दुसरा मी. 

वाट विचारून सोमेश्वराचा निरोप घेतला. थोडंसं पुढे गेलो तोच वाट संपली होती. मुल्हेर-मोराची खिंड तर दिसत होती पण धोपट वाट बहुतेक पावसामुळे नाहीशी झाली असावी. आणि काटेरी झुडपातून,ढोरवाटेचा अंदाज घेत होतो. घसरडं झालेलं. झाडाच्या फांद्यांना पकडुन कसेबसे चढलो आणि खिंड स्पष्ट दिसली. दोन्ही किल्ल्यांना जोडणारी तटबंदीची भिंत अजूनही शाबूत आहे. माजलेल्या झुडुपातून वाट काढीत मोराच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो. दरवाजा मोठा सुंदर नक्षीकाम केलेला आहे. माचीवरून वर येताना दिसत होता तो हाच. थोडंसं वर गेलं की डाव्या बाजुला कातळात खोदलेलं टाकं आढळतं. माथ्यावर पोहोचलो तेव्हा सुं सुं करत घोंगावणाऱ्या वाऱ्याने आणि पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी चांगलेच झोडपुन स्वागत केले. समोरून वाहत येणारा वारा गडाची तटबंदी छेदत,पावसाचा थेंब जमिनीवर पडायच्या आधी जसाच्या तसा वर घेऊन येत होता. चहूबाजूंनी धुक्याचे साम्राज्य,हरगड थोडाफार काय तो अध्ये-मध्ये दिसायचा. पाऊस-वाऱ्याचा आस्वाद घेत तिथेच ठाण मांडुन बसलो थोडावेळ ! आणि मग मोर्चा वळवला मुल्हेर कडे. खिंडीतून उजव्या बाजूला असलेल्या कातळातल्या कोरीव पायऱ्या चढून गेलो की आपण मुल्हेरच्या माथ्यावर पोहोचतो. खिंडीतच एक पाण्याचं टाकं आहे. मुल्हेरचा माथा म्हणजे एक विस्तीर्ण पठारच! धुक्यांची चांगली दाटीवाटी झालेली,मध्येच पावसाच्या जोरदार सरी येऊन कोसळायच्या,मध्येच जीवघेणा वारा वाहायचा. त्यामुळं ऐतिहासिक खाणाखुणा शोधायचं अवघड होऊन बसलं होतं. पण सोबतीला किल्ल्याचा नकाशा असल्यामुळं ते काम सोप्पं झालं. मग हनुमानाचं मंदिर,भडंगनाथाचं मंदिर,राजवाड्याचे भग्नावशेष,त्यासमोरील दरवाजा. तोच थोडं पुढं गेल्यावर पाण्यानी तुडूंब भरलेली सहा-सात पावसाळी टाकी,बाजूलाच असलेल्या गुहा ! सगळं कसं गतवैभवाची आठवण करून देत होते. पौराणिक महत्व असलेला हा किल्ला,महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीनंतर स्वराज्यात दाखल झाला तो साल्हेरच्या सोबतीला. तसा या किल्ल्याला, एकंदरीत या बागलाण परिसराला फार मोठा प्राचीन इतिहास आहे. थोडीफार माहिती आपल्याला ट्रेकक्षितीज वर मिळते. 



पुढे निघालो तोच अपेक्षित असलेलं वाक्य वाश्यानी टाकलं "आपण इथेच राहु,बघ पाणी पण जवळच आहे " म्हटलं पाणी जरा जास्तच आहे आणि सोबतीला वारा पण ! खाली अजुन गुहा आहेत,तिथे जाऊन मुक्काम करूया. तसंच निघालो. ही गडावर येणारी दुसरी वाट. तीन मोठ-मोठे दरवाजे ओलांडुन आम्ही मुक्कामी गुहेजवळ येऊन पोहोचलो. ही वाट म्हणजे पूर्वीचा राजमार्गच असावा. चढताना पहिल्या दरवाज्याच्या डाव्या बाजूला अप्रतिम टाके खोदलेले आहे आणि उजव्या बाजूला ही गुहा. गुहेपासूनच सुटलेली डोंगराची सोंड हरगडाकडे आ वासुन उभी आहे. पावसाने चिंब भिजलो होतो. थंडीने कुडकुडत पाठीवरलं ओझं कमी केलं. टोर्चच्या प्रकाशात गुहेत कुठे सैनिक वा सरदार तर लपुन बसलेले नाहीत ना? याची खात्री करून घेतली. नाहीतर व्हायचा नको त्यावेळी गनिमी काव्याने हल्ला. चांगली १ bhk प्रशस्त गुहा होती. मध्यभागी राखेच्या ढिगाऱ्यात लाकडी ओंडका उभा करून ठेवला होता. कदाचित जमिनीच्या गारठ्याने ओला होऊ नये म्हणुन. कोरडे कपडे चढवले,आता कुठे बरं वाटत होतं. "वाश्या,हे बघ", मी ३ बाय ३ इंचाच्या चौकोनी प्लास्टिक केस मधुन एक चीजवस्तु बाहेर काढली आणि सेकंदात त्या वस्तुने भूर-भूर आग ओकायला सुरवात केली. "काय रे लेका,हे काय आणलं ?" वाश्यानी एकदम त्याच्या अस्सल कोल्हापुरी स्टाईल मध्ये आश्चर्य व्यक्त केलं. हे म्हणजे आमिरखानने इंटर्वल नंतर tzp मध्ये एन्ट्री मारावी तशी आमच्या उरलेल्या दोन दिवसाच्या कार्यक्रमात इटुकल्या स्टोव्ह ने एकदम वाईल्डकार्ड एन्ट्री मारल्यासारखी होती. मग काय पहिला बेत सुपाचा! मस्तपैकी गरमागरम सुपाची वाटी घेऊन बसलो बाहेरच्या ओसरीवर,एव्हाना पावसानी आपला जोर वाढवला होता. पावसाचे गुज आणि घोंगावणारा वारा यांची जुगलबंदी ऐकत सांजवेळ व्हायला लागली. अंधार पडायच्या आत टेंट वगैरे टाकुन घेतले. अंधार झाला तेव्हा स्टोव्हवर खिचडी शिजत होती. राखेच्या ढिगाऱ्यातला ओंडका कामी लावला. तेवढीच थोडीफार शेकोटी पण धुर काही स्वस्थ बसु देईना. गरम गरम खिचडी पोटात ढकलुन टेंट मध्ये शिरलो ते सकाळ होईपर्यंत!

सकाळी जाग आली ती घोंगावणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाने ! एका मागोमाग गडावरची निषिद्ध जागा पावन करून आलो. कालपासूनची पाऊस-वाऱ्याची जुगलबंदी अजून चालूच होती. आणि त्यात आता धुक्यानेही आपला सक्रिय सहभाग दर्शवला. क्षणात धुके विरळ होउन कधी हरगड डोके वर काढायचा,तर कधी माचीवरल्या सोमेश्वराचे दर्शन व्हायचे. कधी मोती तलावाचे पोपटी पाणी लक्ष वेधून घ्यायचे तर कधी हरणबारीला पूर आल्यासारखा भास व्हायचा. न्हावी-रतनगड,मांगी-तुंगीने मात्र शेवटपर्यंत दर्शन दिले नाही. एकूण धुक्याची किमया ! मुल्हेर गाव हळुहळू जागा होत होता. खऱ्या अर्थाने सकाळ एकदम  "गुड मॉर्निंग " होती.आणि वाश्यानी बनवलेल्या फक्कड BLACK टी ने ती अजुन "वेरी गुड मॉर्निंग " झाली. वाह सोसायटी ! अगदी दाणे एका बाजूला आणि काढा एका बाजूला. काय मज्जा आली म्हणुन सांगु ! कालची उरलेली खिचडी आणि सुपदार मैग्गीने पोटोबा झाला आणि पुढच्या प्रवासाला ट्रेकस्थ झालो. आता हरगडला भेट द्यायची की नाही ही द्विधा मनस्थिती सकाळपासूनच होती. मुल्हेर-हरगडाच्या खिंडीत येऊन पोहोचलो. गड चढून गेलो असतो पण भिमखेत कडची वाट पावसामुळे नाहीशी झाली असल्याची दाट शक्यता होती. सोबतीला वाटाड्या नसल्यामुळे सापडली नसती. त्यामुळे तो बेत रद्द केला आणि आजच साल्हेरचा माथा गाठायचा,ठरवुन मुल्हेरवाडीकडे चालते झालो. माचीवरुन खाली उतरतो तेवढ्यात सेलबारी रांगेतले न्हावी,तांबोळ्या आणि मांगी-तुंगी हे महारथी आभाळात घुसुन धुक्याशी दोन हात करत उभे होते. 

© Sandip Wadaskar | धन्यवाद
 

9 comments:

  1. punha ekda athvani jagya zalya

    ReplyDelete
  2. Have they constructed any tar road till Mulher machi?

    ReplyDelete
  3. Sandip!!!!!!
    to first photo madhe popati color marlyasarkha vataoy literallly..kay awesome vatavaran ahe...
    baghtach sagla thakva khallas!!!! me muddam link save karun thevli....offce madhe katkat vadhli ki ughdun bghun ghayyche ..he pics ani sudhagad wale... :)
    ani ho tu ekdun writer banlays....ek pustak lihi ata lavkarch....te "Baisa" wali suruvat ek number ahe..
    ani to tujja chulha(stove) dakhav mala ekda.... :) hahahahaha

    ReplyDelete
  4. aga ho ho......puskatla ek paragraph, tar tu ithech lihun kadhlay :)
    Ani khup khup abhari ahe tujha.....tumchya asha protsahanamulech tar me lihu shakto :)

    ReplyDelete
  5. Welcome :) :)
    Kharch chan ahe mhanun chan lihla ..nahitar tula tar mahitch ahe apan kase bolto te :) :)

    ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences