Exploring Bhimashankar(भीमाशंकर ) Via Shidichi Wat(शिडीची वाट) followed by descending from Siddhagad(सिद्धगड) towards Konkan.....2 OF 2

 आणि  एकदाची ती वेळ आली.पहाटेचे तांबडे फुटायला सुरवात झाली आणि आम्ही आमचे चंबू  गबाळ आवरायला सुरवात केली. गवांडे गावातली आमची एक रात्र आठवणीच्या कप्प्यात आणि डोळ्यात साठवुन आमचा पुढचा प्रवास चालू झाला.आज आम्हाला सिद्धगड सर करायचा होता. आहुपे च्या दिशेने आम्ही चालायला सुरवात केली. खेडुताच्या माहितीनुसार सरळ आहुपे ला न जाता,मध्ये एक नदी लागते, एक चुनाभट्टी ,मचाण आणि तलाव लागतो. आणि तेथून वळून सिद्धगड घाटाने उतरून आपल्याला सिद्धगड वाडी ला पोहोचता येतं. आम्ही चालत होतो. जंगल वजा गावातले  छोटे छोटे रस्ते, दोन्ही बाजूने घनदाट जंगल, सकाळचे आल्हाददायक वातावरण, सूर्याची कोवळे किरणे.एकंदरीत प्रसन्न वातावरणामुळे चालण्याची वेगळीच मजा  आम्ही अनुभवत होतो .
एक सव्वा तासात गावकऱ्यांनी सांगितल्यानुसार एका छोट्या नदीजवळ येऊन पोहोचलो.सकाळचे साधारण आठ वाजले असतील . पण ऊन जरी असले तरी गारठा कमी झालेला नव्हता.अजूनही थंडीने कुडकुडत होतो. थोडा वेळ थांबून प्रातःविधी उरकवीण्याचे ठरवले.निखिल आणि प्रसन्न दोघांनी शेकोटीसाठी लाकडे जमविण्यास सुरवात केली.थोडी पोटपूजा करत शेकोटीभोवती ऊब घेत बसलो. अर्ध्या पाउण तासात चालायला सुरवात केली.
 बराच वेळ झाला,चालत होतो.गावकऱ्यांनी सांगितल्यानुसार आम्हाला नदी तर लागली होती.पण तलाव आणि मचाण काही सापडत नव्हतं.पायवाट तर धोपट वाटत होती,पण जाते कुठे हे नक्की कळत नव्हतं.









आजूबाजूला घनदाटजंगल आणि जंगलात आम्हीच चार जण.रस्ता विचारावा तर कुणाला ? नाद सोडला आणि  चालत राहिलो. पण काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते.तेवढ्यात समोरून एक आजोबा येताना दिसले.बहुतेक गुरं चारायला घेऊन आले असावेत.सगळ्यांचे चेहरे फुलले.आजोबांना रस्ता विचारला परत चेहरे पडले.तो रस्ता होता अहुप्याचा. "अहुपे " सगळ्यांच्या कपाळात ! आम्ही वाट चुकलो होतो. आजोबा अहुप्याचेच राहणारे होते. आजोबांनी वाट सिद्धगड घाटाची वाट सांगितली. येथून गोरखगड जवळ आहे .मनात आलं चलो गोरखगड . आणि सिद्धगडच सर करायचा हा विचार करून सिंहगडा एवढा चढलेला डोंगर परत उतरू लागलो.




थोड्याच वेळात नदीवर येउन पोहोचलो.जवळपास दोन तासांची पायपीट व्यर्थ गेली .व्यर्थ गेली म्हणण्यापेक्षा एव्हाना आम्ही सिद्धगड घाटापर्यंत पोहोचायला पाहिजे होते. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही थोडे पुढे चालून नदीच्या उजव्या बाजूला वळलो . म्हणजे कोंढवळ गावातून निघाल्यावर नदी लागायच्या आधी डावीकडे वळलो की सिद्धगड घाट गाठता येतो. सरळ चालत निघालो.मचाण लागलं.छोटा तलाव पण सापडला.आजूबाजूला कुणाच्या तरी गायी चरत होत्या.गुराखी मात्र आजूबाजूला दिसत नव्हता.आता आम्हाला सिद्धगड घाटाची खिंड शोधायची होती.आणि अडचण अशी होती की नेमका धोपट मार्ग सापडत नव्हता.गुरांमुळे बऱ्याच पायवाटा तयार झाल्या होत्या.तरीही आम्ही एक धोका पत्करून २००-३०० फुटाचा डोंगर चढून वर गेलो.बघत होतो कुठली खिंड सापडते का? पण नाही .कुठेतरी कड्यावर बांधलेला एक पडका बुरुज दिसला. पण उतरण्याइतपत रस्ता दिसत नव्हता. परत उतरलो. इकडे तिकडे हाक मारून पहिल्या, पण कुणाचा प्रतिसाद नव्हता.अजून एक प्रयत्न म्हणून दुसऱ्या रस्त्याने जायचं ठरवलं.पण थोडं चालून रस्ता संपायचा आणि फाटे फुटायचे.सगळेजण कुठे अखंड रस्ता सापडतो का ते बघत होतो.शोधता शोधता मला एक माणूस येताना दिसला.सगळ्यांना आवाज दिला .आम्हाला देव दिसला होता. धन्य.त्याला वाट विचारली तर तो सिद्धगड वाडीतून कोंढवळ कडे निघाला होता.डोक्यावर कसलं तरी बोचकं.बहुदा काहीतरी विकायला घेऊन चालला असावा.म्हणजे अजूनही घाटमार्गाने व्यापाराची देवाणघेवाण होते तर!







रीतसर वाट विचारून आम्ही चालायला लागलो.थोड्याच वेळात खिंड सापडली आणि उजव्या बाजूला दमदम्या डोंगर .देशवरचं शेवटचं टोक. आता उतरायचं होतं कोंकणात.सिद्धगड घाटाने.खाली पाहिलं.अजून एक नळीची वाट.मला एकदम बोराट्यच्या नाळेचा अनुभव आठवला.त्यावेळेसारखी आज आपल्याकडून वाट संपलीच नाहीतर ???? खिंडीच्या सुरुवातीला एका मोठ्या दगडावर दिशादर्शक आखलेले आहे. त्यावरून भीमाशंकर,आहुपे आणि सिद्धगड नेमके कुठल्या दिशेला आहे हे कळत.


घाट उतरायला सुरवात केली. बोराट्यच्या नाळेचा अनुभव आठवून अंगावर एकदम रोमांच आले.कोंकणात एकदम खाली पाहिलं तर उचले नावाचं गाव दिसतं.सिद्धगडला जायचं असेल तर अलीकडेच एक पायवाट सुरु होते,ती सरळ सिद्धगड वाडीकडे जाते.मला वाटतं डोंगरमाचीवरचं हे छोटंसं गाव ठाणे जिल्ह्यात येत असावं.दहा -दहा फुटाची उतरण पार करून पायवाटे जवळ येउन पोहोचलो.थोडंसं पाणी पिऊन एक झक्कास फोटो काढला आणि जंगलातून चालायला सुरवात केली.चालत राहिलो.चढ-उतार करत,आजूबाजूचे झुडपे न्याहाळीत,पक्ष्यांच्या आवाजाचे कानोसे घेत आम्ही चालत होतो.अंदाजापेक्षा जरा जास्तच चालतोय असं वाटत होतं.

आणि आम्हाला दमदम्या आणि प्रथमच लिंगीचे दर्शन झाले.त्या दोहोंच्या मधून पार होणारे सूर्यकिरण अजूनच तेजस्वी वाटत होतं.दुपारचे साधारण एक वाजले असावेत.ऊन होतं पण जंगल असल्यामुळे एवढं भासत नव्हतं.अजून बरंच अंतर कापायचं होतं.त्यामुळे वेळ न घालवता चालत होतो.















दिसला .......सिद्धगडाचा दरवाजा दिसला.दरवाज्याची ढासळलेली स्थिती बघून वाईट वाटलं.थोडंसं फोटोसेशन करून पुढे निघालो.पावणे दोन -दोन पर्यंत आम्ही सिद्धगड वाडीत पोहोचलो. वाड़ीमधे प्रवेश करताच एक छोटंसं घर लागतं. कुठलंतरी सरकारी कार्यालय वाटत होतं. निखिल आणि प्रसाद गावात कुठेतरी जेवायला मिळेल का ? याची चौकशी करायला गेले.मी आणि प्रसन्ना सिद्धगड बालेकिल्ल्याकडे पाहत दोघांची वाट पाहत बसलो.

सिद्धागडचा बालेकिल्ला.एकदम सरळ चढाईचा.चढायचा कसा याचा अंदाज घेत होतो. उजव्या बाजूला गोरखगड आणि डाव्या बाजूला मच्छिंद्रगड दिसत होता . गोरखगडाची उंची सिद्धगडापेक्षा बरीच कमी वाटत होती. सिद्धगड. ९ व्या शतकात शिलाहाराने बांधलेला.किल्ल्याचे साधारण दोन भाग. बालेकिल्ला आणि सिद्धगड माची. माची वर साधारण २५०-३०० च्या आसपास लोकसंख्या. किल्ल्यावर नर्मदा देवी आणि महादेवाचं मंदिर आहे.सन १९४३ मध्ये इंग्रजांनी भाई कोतवाल आणि हिराजी पाटील या दोन स्वातंत्र्य सैनिकांचा वध याच किल्ल्याच्या आवारात केला. त्यांच्या स्मृती प्रितर्थ्य स्मारक पाहायला मिळतं.

निखिल आणि प्रसाद जेवण सांगून आले .जेवण होईपर्यंत sack मधून खाण्याचं काढलं,संपवलं.दुपारची थोडी वामकुक्षी म्हणून पडलो.जाग आली तेव्हा,अर्धा पाऊन तास झाला होता. वाम्कुक्षीचा रुपांतर कधी गाढ झोपेत झाला कळलंच नाही.उठलो आणि जेवणं उरकली. मावशीला विचारलं आम्हाला बालेकिल्ल्याला जायचं  आहे."जाऊन येउन दीड दोन तास लागेल" म्हणाल्या.तेथल्या एका मुलाला घेऊन किल्ला सर करायास निघालो.त्याने आम्हाला पायथ्याला सोडलं आणि रस्ता सांगितला.किल्ला चढायला सुरवात केली.चढण तर जशी दुरून वाटत होती,तशीच एकदम खडी .आमच्याकडे वेळ तसा खूप कमी होता पण आलोच तर सर करूनच जायचं असं वाटत होतं .झपझप चढत होतो.

चढताना वाटेत एक गुहा लागली ,वाटत होतं कुणीतरी राहत असेल पण कुणीच नव्हतं.खाली उतरल्यावर विचारलं  तर तर बरेच वर्षे एक साधू इथे राहत असल्याचं कळलं.नंतर तो कुठे गेला माहित नाही.जसजसं वर चढत होतो तशी चढण अजूनच धोकादायक वाटत होती.खाली पाहिलं तर सिद्धगड माची आणि आजूबाजूचं शेत शिवार सुंदर दिसत होतं.बाजूला दमदम्या आणि गोरखगड लक्षं वेधून घेत होते.बालेकिल्ला अजून बराच उंच होता आणि सुर्य पश्चिमेकडे झुकत होता.आणि त्यात वाट धोकादायक.विचार केला अंधार पडायच्या आधी आपल्याला परतीच्या वाटेला लागलेलं बरं पडेल.सर्वानुमते परतीच्या प्रवासाला लागायचं ठरलं.

बालेकिल्ला सर करायचा निखिल आणि माझा पहिला प्रयत्न,प्रसाद आणि प्रसन्नाचा दुसरा. फसला. पण "सर सलामत तो पगडी पचास " या धोरणानुसार पुन्हा भेट द्यायची हा निश्चय करून परतीच्या वाटेला लागलो.रस्त्याची ,बसची व्यवस्थित विचारपूस करून आम्ही चालायला सुरवात केली.आता उरलं होतं या ट्रेकच शेवटचं आव्हान.नारिवली हे गाव गाठायचं.आणि वाट होती सिद्धगड घाट.

सिद्धगड घाट. देशावरचं कोंढवळ आणि कोंकणातलं नारिवली.गावकऱ्यानुसार साधारण १-१/२ तासात आम्ही पायथ्याच्या गावात उतरायला हवं.आम्ही चालत होता.धोपट मार्ग होता पण उतार बराच असल्यामुळे प्रसादचा मघापासून दुखणारा पाय अजूनच दुखत होता.चालण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

एक दीड तासात कुठेतरी पोहचलो होतो.माणसे दिसायला लागली.विचारलं तर सिद्धगड नावाचा पाडा होता.मोजून सहा सात घरे.शेतीची कामे चाललेली.पाडा अगदी स्वच्छ.दिवाळी असल्यामुळे अंगणात आकाशदिवे लावलेले होते. लाल रंगांची घरं उठून दिसत होती.तेथल्या लोकांना रस्ता विचारून आम्ही पुढे निघालो.

बरंच अंधारलं होतं.१५-२० मिनिटे पुढे चालत तर,रस्त्याला दोन फाटे फुटले . एक नदीवरून नुकताच बांधलेल्या पुलावरून आणि दुसरा नदीमधून. आता विचार पडला कुठला रस्ता बरोबर असेल ? पंचाईत ???? पुलावरचा रस्ता पुढे जाऊन बघितला तर घनदाट जंगलातून जाऊन कुठेतरी संपणारा वाटत होता.एकच पर्याय होता नदीतून वाट काढली आणि चालत राहिलो .थोड्या वेळात माणसांचा आवाज ऐकू यायला लागला.नारिवली गावात पोहोचलो.दीर्घ उसासा टाकला आणि सर्वात आधी बस stand कुठे आहे विचारलं आणि निघालो. आणि गाव होतं ते !

आईशप्पथ .एवढं सुंदर ,स्वच्छ आणि नीटनेटकं गाव मी आतापर्यंत पाहिलं नव्हतं! नाद खुळा ! साढेसात -पावणे आठ ला काहीतरी बस होती. बस गाठायची म्हणून भरभर चालत होतो.पण माझ्या छोट्याश्या चुकीने साधेसात ची बस चुकली.आणि वातावरण तापलं.थंडी असल्यामुळे निवळल.मुख्यं थांब्यावर जाऊन शेवटच्या बस ची वाट बघत बसलो..............................................
























आमच्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार.....................
stay tuned with us for trekking experience and for previous part of the story please click the following link Exploring Bhimashankar(भीमाशंकर ) Via Shidichi Wat(शिडीची वाट) followed by descending from Siddhagad(सिद्धगड) towards Konkan.....1 OF 2




7 comments:

  1. मस्त विस्तृत माहिती लिहिली आहेस संदीप ....तुझ्या ब्लॉग रुपी पुस्तकाची वाट बघत आहे...

    ReplyDelete
  2. Nice blog Sandip...

    ReplyDelete
  3. Great experience. Great friends. Please sms me you num or email on hemant2432@yahoo.co.in
    Goodluck.
    Keep trekking
    Keep happy.

    ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences