बागलाणच्या कुशीत: साल्हेर

3 comments:
(click her for previous part)मुल्हेरची गाठभेट झाली आणि भरल्या अंतःकरणाने आम्ही हरगडाचा निरोप घेत मुल्हेरगावात शिरलो. चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. पण काय करणार ? नाहीतर पुढे जाऊन आम्हीच चुकलो असतो. पुढल्या वेळी म्हणत गावातल्याच दुकानातुन पुढल्या मुक्कामाचा शिधा वगैरे भरून घेतला. बाहेरचं काही खायचं नाही हा कटाक्षच होता. आजचा मुक्काम होता साल्हेरीस. हरगडाला भेट नं दिल्याची खंत मनात ठेवुनच आम्ही वाघांबेच्या जीपड्यात बसलो. जीपड्यात जागा दिसेल तिथे ड्रायवर माणसांना(?) कोंबता झाला होता. आम्ही दोघे मात्र मानाच्या सीटवरून(ड्रायवर शेजारील) आजुबाजुला असलेल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेऊ शकत होतो. जीपडं चालु झालं. समोर हरगडाची डोंगररांग कापुन काढलेली बारी दिसत होती. या भागात खिंडीला बारी असे म्हणतात. बहुदा हरणबारी ! हो हरणबारीच. 
थोडं पुढे सरकतोन सरकतो तोच ड्रायवरने बागलाणी राम राम स्वीकारून जीपड्याचा भार वाढवला. आता मात्रं मुंगीलाही उभं राहायला जागा नसती सापडली,म्हणजे म्हणण्याचा उद्देश !  मुंगीवरून आठवलं, पुण्यातली गोष्टं. टमटम कितीही भरुन करंजी झाली असली तरीही,एखाद्या हत्तीणीने हात दाखवला की ,जागा झालीच म्हणुन समजा. आणि अशा वेळी सामान्य माणसाच्या डोक्यात आलेला एकच प्रश्न, "आयला ,एवढी जागा होती कुठे रिक्षात ? " असो ! हरणबारी धरण मागे टाकत आमचा वाघांबेकडचा प्रवास सुरु होता. मागुन म्हातारे-कोतारे, बाया-बापड्यांच्या गप्पा रंगात आलेल्या. आम्ही मात्र आजूबाजूला असलेल्या डोंगरांचे आकार-उकार ओळखण्यात गुंग झालेलो.

हरगडाने शेवटचा निरोप दिला आणि त्याच रांगेत दूरवर आभाळात घुसलेली चार सुळके वजा शिखरांनी लक्षं वेधुन घेतलं. हे सुळके आसमंताला एवढे भिडले होते की,एखादा नवखा ट्रेकर या रस्त्यांनी आलाच तर त्याला नाशकातल्या या खड्या चढणीची धास्ती वाटली नाही तर शप्पथ! आम्ही पण तोंडात बोटे घातली आणि कुतूहलाने बाजूलाच बसलेल्या काकाला विचारायला सुरुवात केली,तेव्हा "ते पाच पांडव होत " असे कळले. पण सुळके तर चार आहेत ,मग ते सांगु लागले(अस्सल बागलाणी मध्ये),"ते जे डाव्या बाजूला पठार आहे नी ,तो भीम छे " ते तेवढं एक महाकाय पठार होतं,त्याच्याच पायथ्याशी भिमखेत होतं. तेव्हा मला गावाच्या नावाची उपरती झाली ! अस्सं होय ते ? तितक्यातच मागुन अजुन एका म्हाताऱ्या बाबाचा आवाज आला,"नकु....मकू....दाजी....धरम...." हे बाकीचे चार महारथी ! ऐकुन मोठी गम्मत वाटली. एव्हाना आम्ही भिमखेतला पोहोचलो होतो. भार कमी झाल्यामुळे का कोण जाणे,जीपड्यानी एक लांब सुस्कारा सोडला. येथुन वाघांबे अजुन चार किमी. गाडीतले जरा मोकळे झाल्यावर गाववाल्यांनी आमची विचारपुस करायला सुरुवात केली. त्यांना सविस्तर सांगितल्यावर "दोघंच???",सगळे आश्चर्याने आम्हा दोघांकडे पाहायला लागलेत. आम्ही साल्हेर विषयी विचारलं. एकाने सांगायला सुरुवात केली,"साल्हेर-सालुता एकदम जवळी हाय. सालुता नी साल्हेरची छोटी बहेन छे. एकाच बारीतून वाट जाते." खूपच मज्जा वाटत होती हो ! हे ऐकताना. आणि पाऊस ? "पाऊस!!!!,चार महिने टोक दिसत नाही " ,इति गावकरी. "आयला,कोण म्हटलं होतं ? बागलाणात पाऊस नसतो ते ." इथे तर वरूणराजा अक्षरशः झोडपुन काढत होता.

वाघांबे. बरेच दिवसापासुन पुस्तकातुन,इंटरनेटवरून गावाचा संदर्भ शोधत होतो. तेल्या घाटाचं माथ्यावरील गाव. येथुन घाट उतरलो की आपण चिंचली या गावी गुजरात मध्ये पोहोचतो. आज आपण महाराष्ट्रातला किंबहुना देशातला सर्वोच्च किल्ला गाठणार या कल्पनेनेच सुखावलो होतो. पण मनात थोडी धाकधुक होतीच. निसर्गाने अक्षरशः येथे तांडव मांडलेला होता. वरूण राजाने तर बाणांची सरबत्ती लावली होती. चांगले झोडपल्या गेलो. काय रे वाश्या, काय करायचं ? "काय करायचं म्हणजे हादडायाचं आणि निघायचं", इति वाश्या. मेथीचे चार-दोन पराठे फस्त केले. हुंदळणाऱ्या पोरासोरांना वाट विचारुन निघालो भातखाचराच्या दांडावरून.
या हिरव्या-पिवळ्या खाचरातून चालण्याची बाकी मज्जाच वेगळी! डोंगर दऱ्यातून वाहत येणारं पाणी,तेच निघतं पुढच्या प्रवासाला. ओळीने पायऱ्या पायऱ्या बनवलेल्या खाचरातून निथळून पुढे. असं करीत पांडबाच्या, मग म्हाद्याच्या वाफेतुन धरणीमायच्या कुशीत! "गडाची वाट हीच ना ?" दूरवर एका खाचरात बाबासोबत एक कुटुंब राबत होतं. तिकडून "हो" आली आणि निघालो. एकंदरीत वातावरणामुळे घड्याळाचे ठोके कळत नव्हते,पण सुमारे दोन-सव्वादोनला निघालेलो आम्ही अर्ध्या पाऊण तासात एका भल्या मोठ्या पठारावर येऊन पोहोचलो. वाघांबे शांत विसावलं होतं. अधुन-मधुन मघाचे नकु-मकु,इत्यादी आपली डोकी धुक्यातुन आत-बाहेर करत होते. पठार संपुन चढण आता धाप लागणारी होती. तेवढं चढुन अजुन एक विस्तीर्ण पठार. पठारावरच आजुबाजुला गुरं सोडुन बसलेली गावगप्पा मारत बसलेली गावातली पोरं. सुंसुं करत भिडणारा वारा चांगलाच लागत होता. जवळजवळ ऐंशीच्या कोनाचा चढ चढुन परत एका निमुळत्या पठारावर आलो तोच साल्हेर-सालोट्याच्या खिंडीने दर्शन दिले. फक्तं खिंडीने! बाकी दोन्ही टोकं धुक्यात घुसलेले. धुकयांचे लोट जणु महापूर आल्यासारखे दिसत होते. येथूनच उजवीकडची आडवी धोपट वाट धरून चालायला लागलो.
धुकं थोडं विरळ होताच साल्हेरच्या  अभेद्यपणाची जाणीव झाली. थोड्याच वेळात खिंडीत येऊन पोहोचलो. विसावलो. डाव्या बाजूला सालोट्याची अखंड आणि सरळसोट पाषाणमूर्ती आकाशाशी स्पर्धा करत धुक्यात हरवली होती आणि उजव्या बाजूला आमचं आजचं लक्ष्य आम्हाला साद घालत होतं. बसल्या बसल्या वाटेचा अंदाज लावत होतो. थोडासा पोटोबा उरकुन घेतला. डोंगरउतारावर एक गुराखी आपल्या गुरांना सांभाळत होता. आणि खिंडीजवळ थोडंसं अंतरावर त्याचा सोबती घोंगड्यात बसुन पावसाचा मारा पचवीत होता. दोन चार आवाज दिले,उपयोग झाला नाही. जवळ गेलो तर "आईशप्पथ,एक छान सुंदर मुलगी माझ्या पुढ्यात उभी आणि चेहऱ्यावरील गोड,हसऱ्या हावभावाने माझ्याशी बोलत होती. निखळ हास्य तिच्या चेहऱ्यावरून ओसंडुन  वाहत होतं. मी आपलं नेहमीप्रमाणं रस्ता विचारायला सुरुवात केली. गडावर जायला वाट ? ही अशी इकडुन वर,ती. पाण्याचे टाके,वगैरे ? आहे जवळच. मुखातुन मोजके शब्द बाहेर टाकत तिचा हसरा चेहरा बोलत होता. तेवढ्यात खालुन आवाज आला. तोच मघाचा गुराखी,बहुदा तिचे वडील असावेत. त्यांच्याकडून पुन्हा एकदा वाटनिश्चिती करून आम्ही गड चढायला सुरुवात केली. पोर फारच गोड हसत होतं की,रे ! ,इति वश्या.
गप्पा ऐन रंगात आल्या असताना पुढे एका धोकादायक ट्रावर्सने आमची वाट अडवली. वाढलेल्या झुडुपाला धरून पार केला आणिचांगल्या कमरे एवढ्या वाढलेल्या झाडीतुन वाट काढीत दगडी पायऱ्यांजवळ येऊन पोहोचलो. समोर धुक्याशिवाय डोळ्यांना काहीच दिसत नव्हतं. नाहीतर सालोत्याचं मनमोहक दर्शन येथुन झालं असतं. घुडगेरावांची वाट लावणाऱ्या पायऱ्या चढुन आम्ही कोरलेल्या कातळाजवळ पोहोचलो आणि समोर पहिल्या दरवाजाचं दर्शन झालं. मंडळी खुष ! पुढे अजुन दोन दरवाजे ओलांडुन गेल्यावर उजव्या बाजुला गुहेची भली मोठी रांग आमच्या दिमतीला हजर! आणि डाव्या बाजूला खोल दरी. सिंहगडावर कसं,"या,गरम गरम भाकरी तयार आहेती",म्हणून बायका-माणसं ओरडत असतात. तसंच इथल्या गुहा आम्हाला खुणावत होत्या. कुठे पाण्याचे नितळ टाके,तर कुठे मुक्कामाला सपाट जागा. इथला राखीव प्लान ठरवून आम्ही पुढे निघालो. कारण पुढे गंगा सागर तलावाजवळ चांगल्या प्रशस्त गुहा आहेत,असं वाचण्यात आलं होतं. चौथा दरवाजा पार करुन पठारावर पोहोचलो. धुक्यात दिसत तर काहीच नव्हतं पण जवळ असलेल्या नकाशाच्या साह्याने आम्ही कसे तरी गंगासागर तलावाजवळ पोहोचलो. मात्र गुहेपर्यंतचा रस्ता येथुन नक्की होत नव्हता.वाढलेल्या गवतामुळे वाटा बंद झालेल्या. थोड्याच वेळात आपले दिवाकरराव देखील ड्युटी संपवून निघणार होते, त्याच्या सोबतच निघालो आणि राखीव प्लान अमलात आणायचं ठरवुन परत गुहेत येऊन पाठ रिकाम्या केल्या. 

गुहा तपासुन झाल्या. बोरिया बिस्तर उघडल्या गेला. अंधार पडायच्या आत टेंट, सामान वेळेवर दिसेल त्या जागी,वगैरे वगैरे अगदी नवीन घरात राहायला आल्यासारखं मांडुन ठेवलं. आमचा हा उद्योग चालु असतानाच एका माणसाचे लक्षं आमच्याकडे गेलं,एव्हाना आमच्या इटुकल्या स्टोव्हवर मुंगडाळ खिचडी शिजायला सुरुवात झालेली. नमस्कार-चमत्कार झाला. ओ,दादाहो ! इथं का थांबलात ? वर मोठ्या गुहा आहेत.तिथं जाऊन ऱ्हा. नाही,इथेच बरं आहे,आम्ही. घोंगडं बाजूला ठेऊन गुहेत येऊन बसला आणि पुढचा तासभर गप्पांत एवढा रंगुन गेला की खुप दिवसांनी आपला एखादा जीवाभावाचा मैतर भेटावा ! पायथ्याच्या माळदर गावाजवळच्या शिंदेवाडीतला साधारण तिशीतला तरुण ! स्वभावाने बोलका आणि कामाने अतिउत्साही वाटत होता. बोलता बोलता मध्येच म्हणायचा ,"काय दादाहो ?, चला गुहा जवळी हाय ,जाऊन येऊ !" नको रे उद्या जायचंच आहे. त्रिमक(त्र्यंबक शिंदे) दादाची नागलीची(नाचणी) शेती आहे वाडीजवळ. त्याला औषधी झाडपाल्याची सुद्धा जाण आहे. तसं त्याने प्रात्यक्षिक पण करून दाखवलं वाश्याच्या दंडावर आलेल्या गाठीवर झाडपाला चोळून ! तासा-दिडतासात जाईल म्हटला गाठ. बोलता-बोलता आम्हाला त्याच्या घरचं उद्याचं नागपंचमीच्या जेवणाचं आमंत्रण सुद्धा आलं पण आमच्या तोंडातुन हावरट जिभेचा नाचणीच्या भाकरीचा लोभ आम्हाला लपवता आला नाही. आणि आम्ही नको नको म्हणत त्र्यंबकने "उद्या सकाळची न्याहारी-नाचणीची भाकरी" असं आश्वासन देऊन आमचा निरोप घेतला. काय साधी भोळी लोकं असतात नाही ? पैशाची हाव नसलेली ही माणसं आदरातिथ्यात कधीच कमी पडत नाही. पैशाची नव्हे तर सोन्याहुन पिवळी अशी मनाची श्रीमंती ! फक्त ते आदरातिथ्य कळायला पाहुण्याकडे  मनाचा मोठेपणा हवा,नाहीतर काँक्रीटच्या जंगलात दुसऱ्यांचे उणे काढण्यातच आपली धन्यता मानणारे भरपूर भेटतात. नाही का ? 

दिवाकररावांची जनरल शिफ्ट आता संपत आली होती. आम्ही आमचं रात्रीचं जेवण उरकून घेतलं आणि त्र्यंबकपंत सकाळी हजर होऊ देत अशी देवाजवळ मनोमन प्रार्थना करीतच झोपी गेलो. सकाळी सुर्यनारायण नेहमीप्रमाणे कामावर रजु झालेले, पण ९ वाजुन गेले तरी त्र्यंबकचा पत्ता नव्हता. पुढे वेळ वाचावा म्हणुन मग्गीने पोटोबा करून घेतला आणि तेवढ्यात त्र्यंबक नाचणीचा बेत घेऊन हजर झाला. परमानंद !! कारण भाकरीबरोबरच आता गडाचा फेरफटका पण सुकर होणार होता. ठरलेल्या प्लानप्रमाणे आज आम्हाला साल्हेरवाडीत उतरायचं होतं आणि कालच्या आलेल्या अनुभवावरुन धुक्यात वाट शोधणं जरा कठीणच दिसत होतं.


स्वारी निघाली परशुराम राम टोकाकडे. कळसुबाईनंतर महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर ! चढण खडी. पावलागणिक घुडघेरावांची पार छाताडापर्यंत मजल जात होती. धाप… धाप … धापा टाकीतच काहीवेळात परशुरामासमोर नतमस्तक झालो. चांगलं दमवलंस की रे चित्पावना ! असं म्हणतंच घोंगावणाऱ्या वाऱ्यापासून बचाव म्हणुन मंदिरात विसावलो. असं म्हणतात "परशुरामाने येथूनच आपल्या बाणाने अपरांताची निर्मिती केली होती." धुकं नसतं तर अख्खं बागलाण नजरेत भरलं असतं येथुन !! असो ! तूर्तास नाचणीची भाकरी आणि बटाट्याची भाजी . पाच हजार फुटावर त्र्यंबक ने आणलेल्या भाकरीचा गोडवा म्हणजे अगदी …. जाऊ दे शब्दच सुचत नाहीये. हाणा !! पाच मिनिटात चार मोठ्या भाकरींचा फडशा पाडून आम्ही उतरायला सुरवात केली. आम्ही राहणार होतो त्या गुहेजवळ येऊन पोहोचलो. तिथे पाच-सहा जणांचा ग्रुप वास्तव्याला होता. आम्ही दोघेच भटकतोय हे ऐकून त्यांनी पण आपली बोटे तोंडात घातली. "या गुहेतुन गुजरातला जायला एक भुयारी वाट होती ",असं सांगत त्र्यंबकने तो रस्ता आता दगडाने बुजवलेल्या जागेकडे हात दाखवला. पहिल्यांदा तर विश्वासच बसला नाही. मग वाटलं ,असेलही. मग रेणुकामातेच्या आणि गणेश मंदिराकडे मोर्चा वळवला. त्याच्या समोरच गंगासागर तलाव. काल आम्ही पार येथपर्यंत आलो होतो,मात्रं पुढची वाट नव्हती सापडली. परशुरामाची तपोभूमी आणि बाजूलाच असलेला यज्ञवेदी आणि यज्ञस्तंभ आपल्याला या किल्ल्याचे पौराणिक महत्व पटवुन देतो.
इथल्या मातीला जेवढा पुराणाचा गंध आहे तेवढाच भव्य इतिहास बागलाणातल्या या सर्वोच्च मानबिंदुला आहे. १६७१ च्या महाराजांच्या बागलाण मोहिमेनंतर इखीलास खान आणि बहलोल खान साल्हेर घेण्यास चालून आला होता. रात्रंदिवस चाललेल्या घनघोर युद्धात मोरोपंत पेशवे,सरनौबत प्रतापराव आणि इतर मराठ्यांनी मुघल सैन्यावर मात करीत साल्हेरच्या जोडीला मुल्हेरवरही भगवा उंचावत अख्ख्या बाग्लाणावर वचक बसविला होता. त्यासाठी सव्वालाख मराठ्यांपैकी दहा हजार कामी आले होते. इथले अजूनही शाबूत असलेले कोरीव-रेखीव दरवाजे आजही या अद्वितीय पराक्रमाची शौर्यगाथा सांगण्याचा प्रयत्न करीत असतात. ही शौर्यगाथा ऐकण्याचा प्रयत्न करीतच आम्ही गड उतरायला सुरुवात केली. एकामागून एक अशा तब्बल सहा दरवाज्याच्या भव्यतेने-भक्कमतेने थक्कं झालो. कातळात खोदलेल्या पायऱ्या तर अप्रतिम. मध्येच कुठेतरी भिंतीच्या दगडावर गणपतीची रेखीव मूर्ती बघुन आश्चर्यचकित झालो,चालता चालता सापाच्या छोट्या पिल्लाने सुद्धा दर्शन दिले. शेवटचा दरवाजा उतरून आम्ही बऱ्यापैकी खाली उतरलो होतो,आणि तेवढ्यात त्र्यंबक दादाने आपल्या गावाकडे बोट दाखवीत आम्हाला घरी येण्याचा आग्रह केला. तो आग्रह इतका प्रेमळ होता की आम्ही त्याला नकार देऊच शकत  नव्हतो.

खाली उतरल्यावर एका निसर्गरम्य देवीच्या मंदिराला भेट देऊन आम्ही शिंदेवाडीकडे चालते झालो. परत हिरव्या-पिवळ्या भातखाचराच्या बांधावरून चालत तिळाची,नाचणीची,भाताची शेती न्याहाळत मस्त रमत गमत चाललो होतो. मध्येच त्र्यंबक वाघुराची उमटलेली पावले दाखवायचा, ओळखीच्या लोकांना राम राम करायचा. आमच्या मोठमोठ्या पाठपिशव्या बघुन एका बाईला तर आम्ही चक्कं कपडे विकणारे गडी पण वाटुन गेलो. शिंदेवाडीत पोहोचलो आणि त्र्यंबकचे मोठे भाऊ,त्यांचा मुलगा,पुतण्याचं कुटुंब,अख्खं बारदाण आमच्याभोवती गोळा झालं. मग चहाचं आंधन वगैरे वगैरे. पण चूल काही पेटायला तयार नव्हती. मग आमच्या इटुकल्या स्टोव्हच्या करामतीने सगळे भारावले. चहा झाला, परत नाचणीच्या भाकरीवर भेंडीची भाजी गट्कावली. एवढंच नाहीतर त्र्यंबक ने त्याच्या शेतातला तांदुळ देऊन आमच्या पाठीवरलं ओझं वाढवलं. त्यांच्यासोबत मस्तपैकी एक फॅमिली फ़ोटो घेतला आणि त्र्यंबकच्या नकळत वहिनींच्या हातावर थोडे पैसे ठेऊन आम्ही निरोप घेतला, यांचा पण आणि माझ्या प्रिय सह्याद्रीचा पण .मला माहिती आहे, त्यांनी केलेल्या आदरातिथ्याचं मोल त्या एवढाश्या पैशात होणं कधीच शक्य नाही.पण असो तेवढंच आमच्या मनाचं समाधान ! सगळ्यांच्या चेहऱ्यावर मानसिक समाधानाची छटा स्पष्टं जाणवत होती आणि आमची दुर्गयात्रा सफल झाल्याने आम्हीही आनंदीत होतो मात्रं कळवणच्या "येस्टीत" बसताना "त्र्यंबकचा दुखी आणि एवढासा झालेला,पडलेला चेहरा" वाश्यानी अचुक टिपला होता.

धन्यवाद ! तुमचा खुप खुप आभारी आहे !!

बागलाणच्या कुशीत : मोरा-मुल्हेर

9 comments:
"बैसा" रिक्षावाल्यानी एका प्रवाशाला समोरच्या सीटवर जागा देत म्हटल्यावर ध्यानावर आलो तेव्हा खऱ्या अर्थाने बागलाणात पोहोचल्याची खात्री पटली. या भागातली भाषा मोठी मजेदार आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील सटाणा तालुका (मुळचा बागलाण) त्यामुळे भाषेवर परिणाम हा होणारच. इथली गुजराती संमिश्र मराठी ऐकायला भारी मज्जा येते. "बसा" आणि "बैसो" या दोहोंचा मिळुन बागलाणी " बैसा " झाला. काय ? आहे की नाही मज्जा ? मधल्या सीटवर एक आदिवासी कुटुंब बसलं होतं,त्यांची भाषा कोण जाणे ? कळत नव्हती . ताहीराबादवरून मुल्हेरकडे निघालो होतो. 

आदल्या दिवशी शिवाजीनगरला प्रवाशांची झुंबड (जोडुन ईदच्या सुट्टीचा परिणाम) बघुन थोडंसं टेन्शनच आलं होतं. पण आमच्या सर्वमाहितीसंपन्न (एक ना धड भराभर चिंध्या) वाश्यानी कुठल्याश्या ट्रवल्सचं आरक्षण करून ठेवलेलं,त्यामुळे तो प्रश्न मिटला होता. सकाळी नाशिकला पोहोचलो तेव्हा सटाणा बस आमचीच वाट पाहत असल्याच्या अविर्भावात उभी होती. बसायला जागा नाही मिळाली,पण एखाद्या लुटारूनी बिनविरोध खजाना लुटावा तसा साक्रीच्या एका सद्गृहस्थांनी आमच्यासमोर माहितीचा खजाना रिता करायला सुरुवात केली. मग काय चांगले पावणे दोन तास आम्ही दोघे पायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करीत ऐकत होतो. सरकारात नौकरी करून काका रिटायरमेंटला आले होते. स्वतः या भागातील गड-किल्ल्यांवर फिरलेले होते. त्यांच्या कडुन बरीच माहिती मिळाली. दुर्दैवाने घाईगडबडीत त्यांचं नाव विचारायचं वा फोन नंबर घ्यायचं आम्ही विसरलो. ताहीराबादला पोहोचलो. मी रिक्षावाल्याची चौकशी करायला गेलो तेव्हा हा वाश्या फळवाल्याशी घासाघीसी करीत बसला होता. म्हणे "सफरचंद, १०० रुपये किलो" आता काय बोलायचं ?

मुल्हेर गावाकडे निघालो तेव्हा फट्ट पडलं होतं,पावसाचे चिन्हं तर दिसत नव्हते आणि धरणी माय पण दोन दिवसांपासुन पाऊस नसल्यासारखी कोरडी पडली होती. पण गावात पोहोचलो तेव्हा जे व्हायचं तेच झालं,चांगला राप राप पाऊस पडत होता. मुल्हेरमाचीचा रस्ता विचारून घेतला आणि पायपीट सुरु केली. गावातले शेतकरी,मजूर,गुराखी आपापल्या कामाला निघालेले. आणि आमचं आजचं लक्ष्यं मोरा-मुल्हेर आणि हारगड हे अजूनही धुक्यात पहुडले होते. एका म्हसवाल्या बाबाला विचारून वाटनिश्चिती करून घेतली. त्यांच्यासोबतच थोडं चालत गेलो तेवढ्यात बाबांनी शोर्टकट टाकला आणि आम्हाला " इकडुन पाणी लयी हाय " असे सांगुन पुढुन जायला सांगितलं. बरं बाबा ! हारगडाचा माथा धुक्यातच होता. वाडीत पोहोचलो तेव्हा मोरा समोर असलेल्या तलावात स्वतःच्या पडलेल्या प्रतिबिंबाशी खेळत होता. आम्ही पण थोडी जलक्रीडा करून घेतली. मेथी पराठ्यांनी सकाळचा फास्ट ब्रेक केला आणि विनाब्रेक आम्ही मुल्हेर माचीवर येऊन पोहोचलो. माचीवरल्या गणेशमंदिरा समोरील मोती तलाव एवढा पाऊस पडुन रिकामा कसा ? याचंच आश्चर्य वाटलं . गणेश मंदिर तर " क्लासिक ". हारगड पाठीराख्यासारखा मागे उभा होता. थोडा वेळ मंदिरात शांत पहुडलो. मुक्कामाला अगदी साजेशी जागा होती. पण मुक्कामाची वेळ आता नव्हती. 
सोमेश्वर मंदिराकडे निघालो. मध्येच जोत्याची मजबूत बांधकाम असल्यासारखी जागा दिसली,चंदन बाव ही विहीर आसपासच असल्याचं वाचनात आलं होतं,पण ती नाही सापडली,तेवढा वेळही नव्हता.आटोपतं घेत सोमेश्वरास पोहोचलो. शिवमंदिरातली गूढ शांतता आमच्या बोलण्यानी भंग पावली. आम्ही समोरच असलेल्या यज्ञकुंडाकडे पाहत उभे होतो तेवढ्यात धुपाचा सुवास दरवळायला लागला,वळून पाहिलं तर एक जटाधारी बाबा हातात अगरबत्ती घेऊन देवाला ओवाळत होते. नुकताच स्नानसंध्या आटोपुन आले असावेत. कारण गडाचा रस्ता सांगायला जवळ आले तेव्हा, "अंगाला फासलेला परफ्युम हा कुठल्या कंपनीचा आणि कुठुन आणला असावा ? " असाच प्रश्न डोक्यात येऊन गेला. एवढंच ! असो. आम्ही चढाईला सुरुवात केली. चढण एकदम छातीवर येणारी. 
खूप दिवसांपासूनचा बागलाणात भटकायचा योग आता कुठे आला होता. इथल्या खड्या चढणीचे दुर्गसखे साद घालत होते. बाकी नाशिक जिल्ह्यातल्या या कोटांची बातच न्यारी ! चौथ्या पावलाला धाप लागली नाही तर नवलच ! नाशिक जिल्हा ! रायगड जर भटक्यांची पंढरी असेल तर हरिश्चंद्रगडाला भटक्यांचा स्वर्ग म्हणतात. यावरून बागलाणास भटक्यांची काशी म्हणावयास हरकत नाही. मांगी-तुंगी ,रवळया-जवळ्या,साल्हेर,मुल्हेर,अहिवंत,अचला,धोडप,कचना, औंढा,अलंग,मदन,कुलंग,यादीच संपत नाही. नाशकातले हे मानबिंदू,राकट, कणखर गडकिल्ले वर्षानुवर्षे ऊन,वारा,पावसाची तमा न बाळगता असेच उभे आहेत. पुण्यावरून वा मुंबईवरून इथे यायचं म्हटल्यावर चांगली तीन-चार दिवसांच्या सुट्ट्यांची सांगड घालुनच दाखल व्हावं आणि जगासोबतच स्वतःला देखील विसरून जावं. असंच आम्ही ईदच्या सुट्टीचा (शनिवार-रविवार ला जोडुन आलेल्या) सदुपयोग म्हणुन बागलाणातली डोलबारी रांग खिशात घालायचं ठरवलं होतं. भिडू दोनच एक वाश्या अन दुसरा मी. 

वाट विचारून सोमेश्वराचा निरोप घेतला. थोडंसं पुढे गेलो तोच वाट संपली होती. मुल्हेर-मोराची खिंड तर दिसत होती पण धोपट वाट बहुतेक पावसामुळे नाहीशी झाली असावी. आणि काटेरी झुडपातून,ढोरवाटेचा अंदाज घेत होतो. घसरडं झालेलं. झाडाच्या फांद्यांना पकडुन कसेबसे चढलो आणि खिंड स्पष्ट दिसली. दोन्ही किल्ल्यांना जोडणारी तटबंदीची भिंत अजूनही शाबूत आहे. माजलेल्या झुडुपातून वाट काढीत मोराच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो. दरवाजा मोठा सुंदर नक्षीकाम केलेला आहे. माचीवरून वर येताना दिसत होता तो हाच. थोडंसं वर गेलं की डाव्या बाजुला कातळात खोदलेलं टाकं आढळतं. माथ्यावर पोहोचलो तेव्हा सुं सुं करत घोंगावणाऱ्या वाऱ्याने आणि पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी चांगलेच झोडपुन स्वागत केले. समोरून वाहत येणारा वारा गडाची तटबंदी छेदत,पावसाचा थेंब जमिनीवर पडायच्या आधी जसाच्या तसा वर घेऊन येत होता. चहूबाजूंनी धुक्याचे साम्राज्य,हरगड थोडाफार काय तो अध्ये-मध्ये दिसायचा. पाऊस-वाऱ्याचा आस्वाद घेत तिथेच ठाण मांडुन बसलो थोडावेळ ! आणि मग मोर्चा वळवला मुल्हेर कडे. खिंडीतून उजव्या बाजूला असलेल्या कातळातल्या कोरीव पायऱ्या चढून गेलो की आपण मुल्हेरच्या माथ्यावर पोहोचतो. खिंडीतच एक पाण्याचं टाकं आहे. मुल्हेरचा माथा म्हणजे एक विस्तीर्ण पठारच! धुक्यांची चांगली दाटीवाटी झालेली,मध्येच पावसाच्या जोरदार सरी येऊन कोसळायच्या,मध्येच जीवघेणा वारा वाहायचा. त्यामुळं ऐतिहासिक खाणाखुणा शोधायचं अवघड होऊन बसलं होतं. पण सोबतीला किल्ल्याचा नकाशा असल्यामुळं ते काम सोप्पं झालं. मग हनुमानाचं मंदिर,भडंगनाथाचं मंदिर,राजवाड्याचे भग्नावशेष,त्यासमोरील दरवाजा. तोच थोडं पुढं गेल्यावर पाण्यानी तुडूंब भरलेली सहा-सात पावसाळी टाकी,बाजूलाच असलेल्या गुहा ! सगळं कसं गतवैभवाची आठवण करून देत होते. पौराणिक महत्व असलेला हा किल्ला,महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीनंतर स्वराज्यात दाखल झाला तो साल्हेरच्या सोबतीला. तसा या किल्ल्याला, एकंदरीत या बागलाण परिसराला फार मोठा प्राचीन इतिहास आहे. थोडीफार माहिती आपल्याला ट्रेकक्षितीज वर मिळते. पुढे निघालो तोच अपेक्षित असलेलं वाक्य वाश्यानी टाकलं "आपण इथेच राहु,बघ पाणी पण जवळच आहे " म्हटलं पाणी जरा जास्तच आहे आणि सोबतीला वारा पण ! खाली अजुन गुहा आहेत,तिथे जाऊन मुक्काम करूया. तसंच निघालो. ही गडावर येणारी दुसरी वाट. तीन मोठ-मोठे दरवाजे ओलांडुन आम्ही मुक्कामी गुहेजवळ येऊन पोहोचलो. ही वाट म्हणजे पूर्वीचा राजमार्गच असावा. चढताना पहिल्या दरवाज्याच्या डाव्या बाजूला अप्रतिम टाके खोदलेले आहे आणि उजव्या बाजूला ही गुहा. गुहेपासूनच सुटलेली डोंगराची सोंड हरगडाकडे आ वासुन उभी आहे. पावसाने चिंब भिजलो होतो. थंडीने कुडकुडत पाठीवरलं ओझं कमी केलं. टोर्चच्या प्रकाशात गुहेत कुठे सैनिक वा सरदार तर लपुन बसलेले नाहीत ना? याची खात्री करून घेतली. नाहीतर व्हायचा नको त्यावेळी गनिमी काव्याने हल्ला. चांगली १ bhk प्रशस्त गुहा होती. मध्यभागी राखेच्या ढिगाऱ्यात लाकडी ओंडका उभा करून ठेवला होता. कदाचित जमिनीच्या गारठ्याने ओला होऊ नये म्हणुन. कोरडे कपडे चढवले,आता कुठे बरं वाटत होतं. "वाश्या,हे बघ", मी ३ बाय ३ इंचाच्या चौकोनी प्लास्टिक केस मधुन एक चीजवस्तु बाहेर काढली आणि सेकंदात त्या वस्तुने भूर-भूर आग ओकायला सुरवात केली. "काय रे लेका,हे काय आणलं ?" वाश्यानी एकदम त्याच्या अस्सल कोल्हापुरी स्टाईल मध्ये आश्चर्य व्यक्त केलं. हे म्हणजे आमिरखानने इंटर्वल नंतर tzp मध्ये एन्ट्री मारावी तशी आमच्या उरलेल्या दोन दिवसाच्या कार्यक्रमात इटुकल्या स्टोव्ह ने एकदम वाईल्डकार्ड एन्ट्री मारल्यासारखी होती. मग काय पहिला बेत सुपाचा! मस्तपैकी गरमागरम सुपाची वाटी घेऊन बसलो बाहेरच्या ओसरीवर,एव्हाना पावसानी आपला जोर वाढवला होता. पावसाचे गुज आणि घोंगावणारा वारा यांची जुगलबंदी ऐकत सांजवेळ व्हायला लागली. अंधार पडायच्या आत टेंट वगैरे टाकुन घेतले. अंधार झाला तेव्हा स्टोव्हवर खिचडी शिजत होती. राखेच्या ढिगाऱ्यातला ओंडका कामी लावला. तेवढीच थोडीफार शेकोटी पण धुर काही स्वस्थ बसु देईना. गरम गरम खिचडी पोटात ढकलुन टेंट मध्ये शिरलो ते सकाळ होईपर्यंत!

सकाळी जाग आली ती घोंगावणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाने ! एका मागोमाग गडावरची निषिद्ध जागा पावन करून आलो. कालपासूनची पाऊस-वाऱ्याची जुगलबंदी अजून चालूच होती. आणि त्यात आता धुक्यानेही आपला सक्रिय सहभाग दर्शवला. क्षणात धुके विरळ होउन कधी हरगड डोके वर काढायचा,तर कधी माचीवरल्या सोमेश्वराचे दर्शन व्हायचे. कधी मोती तलावाचे पोपटी पाणी लक्ष वेधून घ्यायचे तर कधी हरणबारीला पूर आल्यासारखा भास व्हायचा. न्हावी-रतनगड,मांगी-तुंगीने मात्र शेवटपर्यंत दर्शन दिले नाही. एकूण धुक्याची किमया ! मुल्हेर गाव हळुहळू जागा होत होता. खऱ्या अर्थाने सकाळ एकदम  "गुड मॉर्निंग " होती.आणि वाश्यानी बनवलेल्या फक्कड BLACK टी ने ती अजुन "वेरी गुड मॉर्निंग " झाली. वाह सोसायटी ! अगदी दाणे एका बाजूला आणि काढा एका बाजूला. काय मज्जा आली म्हणुन सांगु ! कालची उरलेली खिचडी आणि सुपदार मैग्गीने पोटोबा झाला आणि पुढच्या प्रवासाला ट्रेकस्थ झालो. आता हरगडला भेट द्यायची की नाही ही द्विधा मनस्थिती सकाळपासूनच होती. मुल्हेर-हरगडाच्या खिंडीत येऊन पोहोचलो. गड चढून गेलो असतो पण भिमखेत कडची वाट पावसामुळे नाहीशी झाली असल्याची दाट शक्यता होती. सोबतीला वाटाड्या नसल्यामुळे सापडली नसती. त्यामुळे तो बेत रद्द केला आणि आजच साल्हेरचा माथा गाठायचा,ठरवुन मुल्हेरवाडीकडे चालते झालो. माचीवरुन खाली उतरतो तेवढ्यात सेलबारी रांगेतले न्हावी,तांबोळ्या आणि मांगी-तुंगी हे महारथी आभाळात घुसुन धुक्याशी दोन हात करत उभे होते. 

© Sandip Wadaskar | धन्यवाद
 

मावळातुन कोंकणात -एक भन्नाट सह्यभ्रमण(नाणदांड घाट - सुधागड)

8 comments:
मावळातुन कोंकणात -एक भन्नाट सह्यभ्रमण - भाग १
Continued from last part.....© Sandip Wadaskar
पहिल्या दिवसाचं तीन किल्ल्यांचं लक्ष्य साध्य झालं होतं. एकोल्याचा घनगड सर झाला तेव्हा सुर्य नारायण वेगाने मावळतीकडे झुकत होते. वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. गावातल्या विहिरीवरच्या पाण्यानी बाटल्या भरल्या आणि केवणी पठाराकडे चालायला लागलो. राहिलं होतं आजचं शेवटचं आव्हान, केवणीचा माथा गाठायचा ! 

© Sandip Wadaskar
वाट सरळ सरळ धोपटच आहे. जसजसं पुढे जातो तसा वातावरणाचा रंगच बदलत होता. शहराच्या गराड्यात नं दिसणारं नारायणाचं गोमटं रूप आणि हवाहवासा गारवा मन सुखावून गेला. पाठीराख्या घनगडावर सांजवेळची सोनेरी किरणे पडून नटल्यासारखा दिमाखात उभा होता. कदाचित निरोप घेत थांबलेला असावा. "मावळं,यावं परत भेटीला",असंच काहीतरी बोलत होता. उजव्या बाजूला तैलबैल पठारावर अजस्त्र कातळाच्या जुळ्या भिंती खुणावत होत्या. दिवाकर रावांची अपरान्तात वेगाने वाटचाल सुरु होती,पण त्याचे विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवुन घेण्यास आमचा वेग मंदावला होता. पुढ्यात भोरपगड जय्यत तयारीनिशी आमच्या स्वागतासाठी उत्सुक असल्यासारखा भासत होता आणि दूरवर अस्पष्ट सुधागड आणि तैलबैल पठाराच्या दरीपलीकडे सरसगड आपलं अस्तिव जाणवत होता. ह्या अशा कातरवेळी हे सह्यकडे बोलु लागतात,रानपाखरांचा चिवचिवाट कर्णेंद्रिय तृप्त करून जातात,कुठेतरी पराकोटीच्या शिस्तीने उडणारा पक्ष्यांचा थवा तुम्हाला टीमवर्क शिकवतो,याच टीमवर्कने प्रेरित होऊन आम्हा भटक्यांची पावले केवणी पठाराकडे पडत होती. गुढ शांततेत अखंड बुडालेला सोनेरी आसमंत न्याहाळत आम्ही एका खिंडीतून उतरायला सुरुवात केली,तेव्हा तैलबैलाच्या वेगळ्याच आणि अप्रतिम नजारयाने डोळ्याचे पारणे फिटले. जगाला दोन भिंती माहिती आहेत तैलबैलाच्या,या खिंडीतून त्या एकसंध वाटतात. पठारावर पोहोचलो तेव्हा,अंधार पडायला सुरुवात झाली होती. पठारावर मोजून तीन-चार खोपट्या. पैकी एका म्हाताऱ्या बाबांना विचारून पथाऱ्या पसरल्या आणि अंगणात मुक्काम करायचं ठरवलं. © Sandip Wadaskar
 सरपणाला वानवा नव्हती. तीन दगडी ठेऊन रानातला संसार थाटला. मग मोहरी-कांदा-तिखट-लसणाची पेस्ट अगदी कडीपत्ता सुद्धा, सर्र्र्र्र्र्र्र्र्र् फोडणीचा आवाज झाला ! दिवसभराच्या भटकंतीचा शीण, मस्तपैकी गरम गरम जेवायला मिळालं की कुठल्या कुठे पळतो आणि स्वतःच्या हातानी बनवलेलं असल्यामुळं जेवणसुख काय असतं हे इथे कळतं. तसंही आम्ही अशाच मुक्कामाच्या शोधात असतो. भात रटरटायला सुरुवात झाली आणि लागलीच खमंग दरवळला. भाताच्या सुगंधाने का कोण जाणे बाबांनी विचारले "काय,मसाले भात का?" चला,पावती पण मिळाली. येथेच्छ हादडून जमिनीला पाठ टेकवली तेव्हा रात्रीचे नऊ-सव्वा नऊ झाले असतील. चांगली ६ तासाची पुरेपूर झोप घेण्याची सोय होती. 

पहाटे जाग आली तेव्हा अंधारलेलच होतं. कोंबडा आरवण्याच्या जागी कुत्रे भुंकत होते. बाबांच्या झोपडीतला रेडिओ सुरु होता. पण दार बंद होतं . "बाबा,येताय ना वाट दाखवायला ?" बाबांना दोन-तीन आवाज दिले. आज आम्हाला कोंकणात उतरायचं होतं. नाणदांड घाटाची खिंडीपर्यंतची वाट अंधारात दिसली नसती. मावशीबायला थोडे पैसे देऊन आमची दुसऱ्या दिवसाची वाटचाल सुरु झाली. १०-१५ मिनिटे चालल्यानंतर आम्ही सह्यधारेवर येऊन थांबलो ,खिंडीकडे बोट दाखवुन बाबांनी उतरण्याची वाट दाखवली. ती बघुन थोडसं चर्रर्र झालं,तीव्र उतार असलेली वाट सरळ खाली उतरत होती. अंधारामुळं नेमकी स्पष्ट होत नव्हती. बाबांचा निरोप घेतला. झुंजूमुंजू व्हायला सुरवात झाली आणि आम्ही उतरायला सुरुवात केली. वाट दगडाच्या पालापाचोळ्याने झाकोळली गेली होती. तो बाजूला सारून उतरावं लागत होतं कारण तसं नाही केलं तर पार्श्वभाग जमिनीला टेकलाच समजा! बऱ्यापैकी उजाडल्यावर समोरचं दृश्य निखळ व्हायला लागलेलं. तैल्बैलाच्या भिंती सह्यरांगेच्या आड गेलेल्या,समोर सुधागडाचं विस्तीर्ण पठार आणि पठाराच्या दक्षिणेस सवाष्णीच्या खोरयात सरळ तुटलेला भव्य कडा! होय हेच ते सुधागडावरील टकमक टोक आणि त्यामागे भक्कम पातशहा बुरुज. 

© Sandip Wadaskar
सवाष्णीच्या पात्रात उतरलो तेव्हा सकाळची कोवळं उन्हं पडली होती. पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणारे नदीचे पात्र उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कोरडे पडले होते. मागे सह्याधारेच्या पोटातच आम्ही नुकताच उतरलेल्या घाटवाटेचा अंदाज लावत होतो. उजव्या बाजूला गोल बुरुजासारखे दोन कातळ लक्ष वेधुन घेत होते.वृक्षराजीने कात टाकल्यासारखं सगळीकडे फट्ट पडलं होता. पावसाच्या सरींना आसुसलेली ही वनश्री आकाशाकडे चित्त स्थिरावल्यासारखी दिसत होती. मघापासुन सह्यआड झालेल्या तैलाबैलाच्या सुळक्यांनी पुन्हा एकदा दर्शन दिले. समोरच्या सुधागडाच्या छातीवर वाळलेली गवताची कुरणे सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे चकाकून निघाली होती. वातावरणात एक विलक्षण शांतता होती. पण मन मात्र येथे घडलेल्या इतिहासाची पाने चाळण्यात रमलं होतं. पाच्छापुरच्या याच परिसरात स्वराज्याच्या खलबती झाल्या असतील नाही ? इथेच कुठेतरी शहजादा अकबराचा(दिल्लीश्वर औरंगजेबाचा मुलगा) तंबू पडला असेल,संभाजी महाराजांच्या भेटीला! स्वराज्याच्या सुवर्णकाळात शिलेदारांच्या घोड्याच्या टापांनी हा परिसर दणाणुन गेला असेल नाही ?,विचार करतच ओढ्यावर थोडं चाबुक डुबुक करून ठाकरवाडीकडे निघालो. 

© Sandip Wadaskar
ऐन उन्हाळ्याचे दिवस आणि वरून समुद्र जवळ असल्यामुळे दमट. घामाने निथळत ठाकरवाडीचा रस्ता कमी करत होतो. भूकेमूळ पोटात कावळे ओरडायला सुरुवात झालेली. वीस मिनिटात ठाकरवाडीचा माथा गाठला. दुर्दैवाने गावात खाण्यापिण्याची सोय नाहीये. त्यामुळे जवळ असलेल्या बिस्किटांवर भागवण्याशिवाय पर्याय नव्हता. गड चढायला सुरुवात केली तेव्हा परिसर धुक्याची चादर पांघरून होता. ठाकरवाडी या आदिवासी पाड्यात सकाळची लगबग चाललेली.चढाईच्या पहिल्या दमातच घामाच्या धारा वाहु लागल्या. सुधागड उर्फ भोरपगड! काय वर्णावे या कोंकणसख्या बद्दल? काय आणि किती लिहावे ? महाराजांना हा गड राजधानी करायचा विचार जसा आला असेल, तसाच या किल्ल्यानी पहिल्याच भेटीत मला भुरळ पाडली होती. ब्लॉग लिहेपर्यंत जरी तीन खेपा झाल्या असतील,तरी सुधागडाची ही माझी दुसरी खेप. सुधागडाच्याच अंग खांद्यावरील सौंदर्याने माझे भटकण्याचे रुपांतर हे नियमित भटकंतीत झाले. कॉलेज संपल्यानंतर तब्बल ३ वर्षांनी प्रसादशी आणि केसागरची भेट सुद्धा सुधागडच्याच  पहिल्या ट्रेक ला झाली. खोपोलीच्या बस स्टन्डवर दोन-अडीच तास आमची (वसु,रीश्या आणि मी) वाट पाहत थांबलेला केसागर आठवला की, अजूनही हसु आवरत नाही. आमच्याशी असं जिव्हाळ्याचं नातं जपणारा सुधागड आठवणीच्या कुठल्यातरी कोपऱ्यात घर करुन बसलाय. त्यामुळे इथे कधीही यावं. पावसाळ्यात यावं,उन्हाळ्यात यावं, सुखद आठवणींचा खजिना अगदी मोकळ्या हातानी बहाल करीत असतो.


  
पहिल्या दमात आम्ही शिडी जवळच्या पठारावर पोहोचलो. ही नवीन लोखंडी शिडी ट्रेकक्षितीज संस्थेनी बसवली आहे. त्यामुळे चढाई अजुन सोपी झालीये. पायथ्यापासून या शिडीचा आकार हा  जीराफच्या लांबलचक मानेसारखा दिसतो. झाडी ओसाड वाळलेली असली तरी उन्हाळी लाल फुलांनी नजाऱ्याला चांगलाच न्याय मिळवुन दिला होता. सुधागडाचे हे रुप पावसाळ्यात पार पालटून गेलेलं असतं. पावसाळ्यात हा भोरप डोंगर हिरवा रेनकोट घालुन मस्तवाल पैकी उभा असतो. आणि पावसानंतर तर पाहायलाच नको, हिरवी शाल पांघरलेला सुधागड सोनकी,तेरडा इत्यादी फुलांमुळे तर अधिकच सुंदर दिसतो. हे देखणं रूप सुधागडाचच नव्हे तर पूर्ण सह्याद्री रांगेचं असतं. शिडी वाट चढून आपण दरवाज्याजवळ पोहोचतो. उजव्या बाजूचा बुरुज नव्हे नैसर्गिक कातळाला तासुन सुंदर,सुबक,अभेद्य असा कातळकडाच! आणि ताशीव काम तर अफलातूनच! तसेच डाव्या बाजूचे कडे सुद्धा तासून बेलाग बनवलेले. गडावर जाण्यासाठी या भागातला रस्ता म्हणजेच हा पाच्छापूर दरवाजा. "शिवरायांचे दुर्गविज्ञान म्हणजे काय?" याची आपल्याला येथे आल्याशिवाय नाही कळणार. बुरुजावरच दगडी बांधकाम केलाय,ही त्याची तटबंदी आणि त्यातच पहारेकऱ्यांची टेहेळनिची जागा,कदाचित येथुन शत्रुसैन्यावर मारा करीत असावे. आत जाणाऱ्या पायऱ्यांवर नक्षीकाम केलेले आढळते. मध्येच छताला चिकटलेल्या पाली भीती दाखवतात. आणि त्या पाली आकारानी एवढ्या मोठ्या आहेत की असं वाटतं "शिवकाळापासून त्या इथेच वास्तव्याला आहेत आणि जागेची दुर्गमता टिकवुन आहेत." येथूनच पुढे गेल्यावर छोटाश्या पठारावरून पुन्हा एकदा टकमक टोक लक्ष वेधुन घेतो. वीस मिनिटात आपण माथ्यावर पोहोचतो आणि सरकारवाडा वा सदरेची जागा दृष्टीस पडते. आता फक्त दगडी अवशेष उरलेले आहेत. 
© Sandip Wadaskar
सुधागडाचं विस्तीर्ण पठार,मुख्य सह्यारांगेपासून वेगळा असलेला सुटा डोंगर,देश आणि कोंकण यांच्या अगदी सीमेवर असलेला,येथुन समुद्र पण जवळ! कदाचित याच भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे महाराजांना ही राजधानीची जागा करावीशी वाटली असावी. सदरेपासून निघालो की पडक्या वाड्यांचे अवशेष पाहत आपण पंत सचिवांच्या वाड्यात शिरतो. भोरचे संस्थानिक यांचा हा भव्य वाडा ब्रिटीशकालीन इतिहासाची आठवण करून देतो. वाड्यात ट्रेक्षितीज संस्थेने गडा संबंधी माहितीफलक लावलेले आहेत.वाड्यातले ऐसपैस ओटे शेणाने सारवलेले आढळतात. या परिसरातच कातळात खोदलेली पाण्याची तीन मोठी टाकी आहेत. आम्ही गेलो तेव्हा संस्थेचे कार्यकर्ते टाक्याची साफसफाई करत होते.वाड्याच्या मागल्या बाजूस महादेवाचे मंदिर आणि आत सुरेख शिवलिंग आढळते. त्याच्याच बाजूला चोर दरवाज्याचं बुजलेलं बांधकाम गत इतिहासाची आठवण करून देतो.भोराई देवीच्या मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला दाट झाडीतुन वाट काढीत खाली उतरलं की गार पाण्याचं छोटसं टाकं आणि उजव्या बाजूला तटबंदीची भिंत लक्ष वेधुन घेतात. तसंच आपण पायऱ्या उतरून गेलं की गुहेत शिरतो. गुहेतल्या पायऱ्या उतरलो की छोटाश्या चौकोनी दगडी बिळातून बाहेर पडतो न पडतो तोच थक्कं करणारं दुर्गविज्ञान आपल्याला आपसूकच शिवशाहीत घेऊन जातं. अरे केवढा तो बुरुजाचा घेर आणि केवढी ती भक्कमता! सुधागडावरील माझी ही सर्वात आवडीची जागा. इथे आलो की त्या बुरुजाकडे नुसतं बघत बसावसं वाटतं. चोर दरवाज्याची ही दुर्गम वाट घनदाट अरण्यातुन आणि खाचखळग्यातुन  धोंडसे या गावी उतरते.थोडावेळ घालवुन आमची स्वारी निघाली भोराईदेवीच्या मंदिराकडे.मंदिराच्या आवारात पाठपिशव्या टाकुन ओझं कमी केलं. जेवणाआधीचा टकमक्यावरून तेवढा आसमंत न्याहाळायचा राहिला होता,निघालो त्या बोलक्या कड्याकडे. पठारावर टोकाकडे जाताना दोन्ही बाजूनी हिरवंगार रान आहे आणि उजव्या बाजूला धान्यकोठारासारखं बांधकाम दिसतं. जाताना तीव्र उतार असल्यामुळे सावधानता बाळगावी लागते.निमुळत्या पठारावर पोहोचलो की विहंगम दृश्य आपली वाट असतं. सुमारे सहाशे-सातशे फुटाचा सवाष्णीच्या खोरयात तुटलेला कडा ,खाली पाहिलं की डोळे गरागरा फिरायला लागतात. आणि समोर पाहिलं की अभेद्य असा सह्याद्री !

परत मंदिराजवळ आलो तेव्हा भोराई देवीच्या पुढ्यात कुणाच्या तरी अंगात आलं होतं. अंगात येण्याचा कार्यक्रम एवढ्या ऱ्हिदम मध्ये चाललेला होता की एखाद्या बॉलीवुड गाण्याला चाल पण मिळाली असती. मंदिराच्या प्रवेशद्वारावर टांगलेली घंटा ही चिमाजी अप्पांनी वसईच्या किल्ल्यावरून आणलेली आहे, अशीच घंटा आपल्याला भीमाशंकरला पाहायला मिळते. मंदिराच्या बाजूंचे पठार हे विरगळ आणि समाध्यांनी भरलेलं आहे. येथुन तैलबैलाचे अजुन जवळुन दर्शन होते. पोटोबा उरकुन महादारवाज्याकडे चालायला लागलो. पाण्याची तहान लागली होती,पण पुजाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे महादरवाज्याच्या पुढे एक टाकं लागणार होतं. दहा पंधरा मिनिटे दगडांची आरास करुन तयार केलेल्या पायऱ्या उतरुन आपण दोन्ही बाजूंनी कातळभिंती असलेल्या दगडी जिन्याजवळ पोहोचतो. आणि जिना उतरुन बाहेर पडण्याआधीच महाद्वाराची भव्यता लक्षात येते. नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूनी पहारेकरयांच्या देवड्या. आणि बाहेर पडतो न पडतोच रायगडाची आठवण येते. रायगडावरील महाद्वाराची हुबेहूब प्रतिकृती! तीच गोमुखी रचना,तेच कमळपुष्पं आणि तेच व्याघ्रशिल्पं! वाह !


धोंडसे गावाकडची ही वाट अगदी अलीकडच्या काळापर्यंत बंद होती. यासाठी ट्रेक्षितीज संस्थेचे आभार मानायलाच पाहिजे,कारण त्यांनीच दगडमातीत बुजलेल्या महाद्वाराची वाट मोकळी केली. आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. थोड्या वेळानी टाकं लागलं, आणि पाणी ! तर केवळ अमृततुल्य! अर्धी वाट सरून आली तेव्हा तानाजी टाक्याजवळ येऊन पोहोचलो होतो. घनदाट जंगलातुन जाणारी ही पायवाट नव्हे पूर्वीचा राजमार्गच ! पण आता दगडांच्या राशीमध्ये स्वतःची पुरती ओळख विसरून बसलाय. इथवर येईपर्यंत घुडघेरावांची दमवणूक झाली खरी पण तानाजी टाक्यातील पाण्याने चालण्यास परत हुरूप आला. 

© Sandip Wadaskar
ट्रेक हा शेवटच्या टप्प्यात असताना कधी कधी म्हणजे नेहमीच (निदान मोठ्या ट्रेकमध्ये) "हा रस्ता संपत का नाहीये ?" असं त्रासल्यासारखं वाटत राहतं आणि कधी एकदा गावात येऊन पोहोचतो असं वाटतं. पण एकदा का गावातलं छानपैकी गार गार पाणी पोटात गेलं की क्षणार्धात थकवा नाहीसा होतो आणि पुढल्या ट्रेकचे प्लान डोक्यात हजेरी देऊन जातात. असंच दगडांना वैतागुन आम्ही वैतागवाडीत शिरलो. वैतागवाडी हे वाटेवरील वस्तीचं नाव आहे. अगदी नावाला साजेसं ! उतार संपुन सपाटीला लागलो तेव्हा दातपाडीच्या(हे नदीचं नाव आहे ! "काय एक-एक नावं आहेत? वाह !") दगडी राशीत शिरलो. चालताना ,आज एखाद्याची बत्तीशी कामी येणार असं वाटायला लागलं होतं ,पण सुदैवानं तसं झाली नाही. उन्हाचे चटके झेलत,अंगावर घामाचा पुर अशा अवस्थेत आम्ही धोंडसे गावात पोहोचलो तेव्हा "येस्टिची" वेळ झालीये असं कळलं. शरीरातलं पाणी चांगलच कमी झालं होतं. पाणी गार नसल्यामुळं पेप्सी कोल्यानी आत्मा शांत केला. एसटी आली,पालीकडचा प्रवास सुरु झाला. गाडी मुख्य रस्त्याला लागली तेव्हा तैलबैल रागावून,डोळे वटारून बसल्यासारखा दिसत होता,"नाहीच ना आला तुम्ही? ". निरोप घेतला पुन्हा एकदा भेटायला !  

धन्यवाद !

श्रीवर्धन-मनरंजन : कोंकण दरवाज्याने

3 comments:
© Sandip Wadaskar and All photos © Sagar Manore
महाराष्ट्र हा दुर्गांचा देश. भारतात सर्वात जास्त किल्ले असणारे राज्य. गड-किल्ल्यांच्या संख्येइतकाच येथे दुर्गाप्रकारही भरपूर. गिरिशिखरे असो,वनदुर्ग,जलदुर्ग,भुईकोट असो, ऐतिहासिक वा पौराणिक महत्व असलेले किल्ले असो. अखंड आयुष्य जाईल हे गड-किल्ले हिंडण्यात. महाराष्ट्रात जसे विविध प्रकारचे दुर्ग पाहायला मिळतात, तशीच किल्ल्यांची नामकरणाची परंपरा सुद्धा आहे इथे. जोडगोळी. म्हणजेच किल्ले आवळे-जावळे. अगदी जुळ्या भावंडासारखी. नावं पण गमतीदार,यमक साधणारी. सातारचा चंदन-वंदन असो,मनमाड जवळचा मांगी-तुंगी असो ! किंवा अंकाई-तंकाई असो. गड-किल्ल्यांचे नंदनवन असलेल्या नाशिक जिल्ह्यातला रवळ्या-जवळया असो. ही नावं ऐकायलाच किती गमतीदार वाटतं, नाही ? अशीच एक किल्ल्यांची जोडी देशाच्या पश्चिम-दक्षिण व्यापारावर लक्ष ठेऊन गेली कित्येक वर्षे आपलं कर्तव्य बजावत उभी आहे. खरं तर हे बालेकिल्ले आहेत,देशावर राजमाची येथे. अर्थात लोणावळ्या जवळील श्रीवर्धन-मनरंजन ही जोडी. 

© Sandip Wadaskar
असाच यावर्षीचा पावसात भिजण्याचा बेत किल्ले मल्हार गडावर पूर्ण होऊ न शकल्याने पुढच्याच आठवड्यात राजमाचीला जायचा बेत आखल्या गेला. जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे आम्हा भटक्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. जबरदस्त पाऊस पडतोय राव ! कॉम्पुटर समोर बसवत नाही आता. निघा की ? कधी निघायचं ? अशी कुरकुर जवळ जवळ प्रत्येकाची चाललेली. आता मात्र खरंच ऑफिस मध्ये बसवत नव्हतं. शेवटी शनिवार उजाडला. सगळी भटकी जमात अर्थात इंद्रा,अतुल ,शेखर,सागर, सचिन,प्रसन्ना आणि मी शिवाजीनगरला लोकलची वाट पाहत उभी राहिली. आमच्यातलं एक कच्चं लिंबू म्हणजे आमचा अजित,चिंचवड वरून बसणार होता.  गप्पा-टप्पाच्या ओघात कर्जत गाठलं. रात्रीचे साढे नऊ-दहा झाले असतील. एवढ्या उशिरा कोंदिवडे ला जायला वाहन मिळणे तर अशक्य होतं. पोरं सगळी उत्साहात,चल इथुनच ट्रेकला सुरुवात करूया. या कार्ट्याना म्हणायला काय जातंय ? इथूनच ट्रेक सुरु करायचा म्हटल्यावर, राजमाची च्या पायथ्याशीच संपला असता. कर्जत ते कोंदिवडे हे नंतर सुमारे १२ किमी आणि कापायला कमीत कमी साडेतीन तास लागणार होते. पण दुसरा पर्याय नव्हता.चालायला सुरुवात केली,रस्त्यांनी एखादी गाडी मिळाली तर चांगलेच आहे. वाट निश्चिती म्हणुन घराबाहेर बसलेल्या इसमाला रस्ता विचारला तर "हमको नाही $$$$ मालूम !" इति इसम. आयला ! कोंकणात भैय्या ! घराचे दार लावुन आत बसला तो बाहेर आलाच नाही ? च्यामारी ! हा काय प्रकार आहे ? तेवढ्यात बाजूलाच घराच्या अंगणात दोन भावंड खेळताना दिसली,त्यांच्या कुत्र्यासोबत ! त्यांनी आम्हाला वाट सांगितली. "कुत्र्याचं नाव काय ?" इति अतुल. पोराची हुक्की,दुसरं काय ? "स्यांडी",इति मुलगा. उत्तर ऐकुन पोरांचा हास्यस्फोट आणि माझा डोक्यावर हात ! आयला जगातली सगळी कुत्र्याची नावं काय संपली होती काय ? "स्यांडी" हे काय कुत्र्याचं नाव आहे का? आता हा प्रसंग पूर्ण ट्रेकभर मला चिडवण्यासाठी पोरांना पुरून उरणार होता. असो. आम्ही कोंदिवडे कडे चालायला सुरुवात केली. खरं सांगायचं तर बारा किमी चालण्याची अभिनव कल्पना मला पटलेलीच नव्हती. पण काय करणार ? पर्याय नव्हता. थोडं चालत गेल्यावर एका व्हन वाल्यानी गाडी थांबवली आणि थोडीफार घासाघीसी करीत ठरलेल्या पैशात कोंदिवडेला सोडण्यास तयार झाला. 

© Sandip Wadaskar
कोंदिवडेला पोहोचलो तेव्हा रात्रीचे साडे अकरा झाले असावेत. आमचा ट्रेक सुरु झाला. ठाकरवाडीकडे चालायला सुरुवात केली. जून महिन्यातला पाऊस आणि वेळेवर हजेरी दिल्यामुळे आकाशात ढगांची आणि वातावरणात धुक्याची दाटी झालेली. पावसाची चिन्हं दिसायला लागली तोच पिशव्यांना रेनकव्हर वगैरे घालुन पायपीट सुरू केली. कोंडाणा लेणीच्या वाटेवर एका लिम्बू सरबत वाल्याच्या झोपडीत बसुन थोडी थोडी भेळ पोटात ढकलली आणि चालु लागलो. बैलगाडी रस्त्याला लागताच असंख्य काजव्यांनी आमचे स्वागत केले. अक्षरशः दीपमाळ लावल्यासारखे झाडनझाड काजव्यांनी उजाळून टाकले होते. उजव्या बाजूला उल्हास नदी आमच्या विरुद्ध दिशेने वाहत होती. नुकताच पावसाने सुरुवात केल्यामुळे नदीला पाणी खुप कमी होते. ठाकरांच्या वाडीत प्रवेश केल्या केल्याच एक-दोन कुत्री भुंकायला लागली. आणि तेवढ्यावरच न थांबता बाकीच्या कुत्रे मंडळीला साद घालत अख्खं गाव जागं केलं. आता पंचाईतच होती,कुत्र्यांनी अक्षरशः गाव डोक्यावर घेतलं होतं. काय करावं या कुत्र्यांच्या भुंकण्याला ? सुदैवाने एका म्हाताऱ्याने झोपडीबाहेर येऊन आम्हाला योग्य वाटेस लावले आणि चढायला सुरुवात केली. आणि .. हो ! बरं का ? ही वाट नव्हे … ही घाटवाटच!

© Sandip Wadaskar
कोंकण दरवाजा ! देशावरून कोंकणातला दळणवळणाचा अजून एक पुरातन मार्ग. देशावरचं गाव उधेवाडी (राजमाची) आणि कोंकण पायथ्याचं कोंदिवडे(ठाकरवाडी). गावातले लोक सगळे कष्टकरी ठाकर. उंची कमी असताना सुद्धा समुद्रसपाटीपासून चढताना होणारी दमछाक इथे अनुभवायला मिळते. थोडे चढून वर गेलो की मोकळ्या जागेतुन दोन वाटा दिसतात. उजवीकडची वाट ही कोंडणे लेणीवरून आलेली असते आणि दुसरी आम्ही ज्या मार्गानी आलो तशीच राजमाचीकडे जाते. अडीच हजार वर्षापूर्वीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करणारी ही लेणी सुद्धा बेडसे,ठाणाळे या इतर लेण्यांसारखीच भव्यदिव्य! आणि नेहमीप्रमाणे एवढ्या दुर्गम भागात अशा दिव्य लेण्या घडवल्या कशा असतील ? याचा विचार करता करता आपोआपच तोंडात बोटे जातात.जसजसे वर चढत होतो,तसतसा बोर घाटातुन जाणारा रेल्वे रूळ खाली जात होता. मध्येच एखादी गाडी आली की डब्यांचा लपाछपीचा खेळ चालायचा. मग बोग्द्यांमधून लपत छपत गाडी आपली कोंकणात शिरायची. 

आगगाडी आणि बोगद्यांचा लपंडाव यांचा आनंद घेत दाट झाडीतुन वाट काढीत आम्ही मोकळ्या जागी पोहोचलो. दिवसा येथुन उल्हास दरीचे (Tiger vally ) विहंगम दृश्य दिसते. येथूनच उल्हास नदी उगम पावते. पण आता रात्र असल्यामुळे  आणि वाऱ्यामुळे सळसळत्या झाडांच्या पानांचा आवाज ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता.निसर्गाचा संगीत कार्यक्रम चालु असताना क्षणार्धात पावसाच्या जोरदार सरींनी त्या संगीतात सूर भरल्यासारखं वातावरण साग्रसंगीत करून सोडलं. आसमंत दणाणून सोडला आणि मघापासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आम्हा भटक्यांना नखशिखांत भिजवून टाकले. किल्ले मल्हारगडावरची पहिला पाऊस अनुभवण्याची इच्छा येथे पूर्ण झाल्यासारखी वाटत होती. पाऊस बराच वेळ असाच कोसळत होता. खेकडे पायाखाली येऊन चिरडल्या जात होते. बहुतेक खेकड्यांचा खुनाचा आळ तर शेखरयावरच आला असता,कारण शेखर पुढे गेला की मागच्यांना खेकड्याची डेड बॉडीच दिसायची. आणि अजित तर नेहमीप्रमाणे प्रिंट काढत होता,मध्येच कुठेतरी डिलीट व्हायचा ! अक्षरशः घसरायला लागला की स्वतःला तसाच पडू द्यायचा आणि त्याला पकडायला आम्ही ! थोडासा चढ आला की रिवर्स गियर टाकल्यासारखा मागे यायचा, च्या मारी ! आणि बरं का ? या ट्रेक मध्ये त्याच्या सुप्रसिद्ध पोज मुळे अजितला नवीन पदवी मिळाली. "Dk." आता याचा अर्थ तुम्हाला नाही सांगता येणार,माफ करा ते अजित आणि आमच्यामधलं गुपित आहे. पावसात भिजत भिजत आम्ही माथ्याचे अंतर कमी करत होतो. परत वाट झाडीत शिरली,येथुन एक दीड तासात खिंड गाठली आणि माथ्यावर पोहोचलो. पहाटेचे अडीच पावणेतीन झाले असावेत. बाजूलाच असलेल्या ताकवाल्याच्या झोपडीत पथाऱ्या पसरल्या. दाट धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते,टेंट टाकले आणि झोपी गेलो. 


 © Sandip Wadaskar
सकाळी जाग आली तेव्हा समोर फक्त धुक्याचं साम्राज्य पसरलं होता. धुक्याचे लोट येत होते,जात होते. दहा फुटावरच काही दिसेना. माथ्यावर झाडांची दाटीवाटी झाली होती. रात्रीच्या चिंब पावसानी आधीच गारठ्लेलो, त्यामुळे कालचे भिजलेले कपडे घालताना चांगलंच जीवावर आलं होतं. उधेवाडीकडे चालायला सुरुवात केली. पावसाने दमदार हजेरी लावत थोडेफार वाळलेले कपडे परत भिजवले. पोटात एव्हाना कावळे ओरडायला सुरुवात झालेली.  वाटेत लागणाऱ्या करवंदाच्या झाडांनी खुष केले. करवंदे खात खातच उधेवाडी गाठलं. बाहेर जोरदार पाऊस आणि आत दादाच्या ओसरीत गरमागरम पोह्यांवर ताव मारत आधी मनरंजन ला जायचं ठरवलं. वीस मिनिटात बालेकिल्ल्याचा माथा गाठला. वातावरण जर स्पष्ट असेल म्हणजे धुकं नसेल तर माचीवरूनच बालेकिल्ल्याची भव्य तटबंदी लक्ष वेधुन घेते. बुरुज खुणावत असतो. अगदी बुरुजाजवळ जाईपर्यंत प्रवेशद्वार कुठल्या बाजुला आहे, कळत नाही. आपल्याला वाटत राहते वाट डावीकडे आहे पण उजव्या बाजूच्या चिंचोळी वाटेने आपण बालेकिल्ल्यात प्रवेशतो. महाराजांच्या स्थापत्यशास्त्राचे वैशिष्ट्य असलेल्या गोमुखी रचनेची पूर्ण कल्पना, झालेल्या पडझडीमुळे येत नाही. पण दरवाज्याची भक्कमता जाणवल्याशिवाय राहत नाही. थोडं पुढे गेल्यावर कातळात खोदलेली पावसाळी जुळे टाके पाहायला मिळतात. दगडात कोरलेल्या पाच-सहा पायऱ्या चढुन आपण आतल्या आणि सर्वात वरच्या तटबंदीत शिरतो आणि समोर दिसतं ते छप्पर उडालेलं पण भिंती शाबूत असलेलं भव्य दगडी बांधकाम! प्रवेशद्वारावर गणेशाची सुबक मूर्ती कोरलेली आढळते. दोन्ही बाजुला कोपऱ्यात सुर्य आणि चंद्राचं नक्षीकाम केलेलं आहे आणि त्याच्याच खाली देवड्या आहेत. आत गेल्यावर विचार पडतो,"हे नक्की काय असेल ?" गडमाथ्याचा घेर पाहता "राहण्याची वा वस्तीची जागा नसुन प्रमुख टेहेळणीकराची सदरेची जागा असावी." कारण किल्ल्याची निर्मितीच मुख्यत्वे बोरघाटावर लक्ष ठेवण्यासाठी केली होती. हे सगळं पाहुन मन इतिहासात रमल्याशिवाय राहत नाही. असो ! तेवढ्यात अजित गाफील असलेला पाहुन सगळ्यांनी एकमेकांना इशारा केला आणि त्याला उचलुन टाकला पाण्याच्या डबक्यात . कितीतरी वेळ एकमेकांवर पाणी उडवत चाबूक-डुबुक करत होतो. लोकं स्वच्छ पाण्याने फ्रेश होतात आम्ही गढूळ पाण्याने ताजेतवाने झालो. अंगात उत्साह संचारल्यासारखा आम्ही पुढे निघालो तोच कातळात खोदलेल्या अप्रतिम टाक्याने लक्ष वेधुन घेतले. चौकोनी आकाराचं टाकं बघुन लोहगडावारच्या टाक्याची आठवण झाली. शेवटच्या बुरुजापर्यंत फेरफटका  मारून  परतीची वाट धरली,धुक्यानी थोडी ढिलाई सोडत वातावरण स्पष्ट केले. आजूबाजूचं विहंगम दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं. पाऊस पाण्यानी भरत आलेली कोंकणातली,उधेवाडीतली भातखाचरं,श्रीवर्धन बालेकील्ल्याची तटबंदी,लोणावळ्यापर्यंतची भलीमोठी डोंगररांग! समोर कोंकणात माथेरान चा डोंगर,मागच्या बाजूला ढाकचा बहिरी आणि त्याच्या बाजूला असलेल्या सुळक्याने लक्ष वेधुन घेतले. अधुन मधुन ऊन,पाऊस आणि धुक्याचा मजेशीर खेळ चालायचा. 


 © Sandip Wadaskar
किल्ले राजमाची. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची साधारण साडेतीन हजार फुट. सातवाहन,राष्ट्रकुट अशा बऱ्याच राजवटी अनुभवलेल्या या किल्ल्याला महाराजांनी कल्याण मोहिमेनंतर स्वराज्यात दाखल करून घेतले. नंतर छत्रपति शाहु काळात हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. पेशव्यांकडून शेवटी नेहमीप्रमाणे साहेबाकडे ! उधेवाडीच्या दक्षिणेकडे चालत गेलो की राजपुरीच्या देशमुखाने बांधलेला ब्रिटिशकालीन तलाव आढळतो. बाजूला तसा शिलालेखही आहे. तलावाला पाणी वर्षातुन बाराही महिने! समोरच प्राचीन शिवालय आहे. मंदिराच्या समोरच असलेल्या छोट्या टाक्यात, दगडी गोमुखातून बारमाही पाणी वाहत असते. वाह ! बांधकामाची कमालच म्हणायची नाही ? 
 © Sandip Wadaskar
तांदळाची गरमागरम भाकरी आणि बटाट्याची रस्सेदार भाजी ! बेत जमला फक्कड. मग काय ? पोरं नुसते ..ओरबाड ! जेवणे आटोपुन श्रीवर्धन कडे चालायला लागलो. मनरंजन आणि श्रीवर्धन खिंडीत येऊन पोहोचलो. खिंडीत भैरोबाचे देउळ आणि पुढ्यात दीपमाळ आहे. देउळ आणि मोकळी जागा मुक्कामास योग्य आहे. आजूबाजूला असलेल्या हिरव्यागार झाडीत दगडाचे काळे-कुळकुळीत मंदिर उठून दिसत होतं. बालेकिल्ला चढायला सुरुवात केली. कुठे दगडांमधून,कुठे घसरड्यावरून वाट काढीत,एका खिंडार पडलेल्या तटबंदीतुन माथा गाठला. किल्ल्यावरची भक्कम तटबंदी गत इतिहासाची साक्ष पटवुन देतो. समोरच एकदम पुढ्यात ढाकचा बहिरी आणि त्या बाजूचाच भयंकर सुळका ," इकडची वाट अवघड आहे " असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. थोडं चढुन गेलो की लोखंडी खांब आहे,त्यावर भगवा मोठ्या अभिमानाने फडकत होता. दक्षिणेकडील बुरुजावरून सभोवतालचे विहंगम दृश्य आणि कातळदऱ्याचे जुळे धबधबे लक्ष वेधुन घेतात. एकंदरीत धुक्यामुळे नेत्रसुखाला मर्यादा होतीच. पण असो ! पाऊस वाऱ्याचा मार खात आम्ही थोडावेळ तिथेच शांत बसुन होतो. परतीच्या वाटेला लागलो. आता आव्हान होतं उधेवाडी ते लोणावळा हा सतरा किमीचा लांब पल्ला गाठायचं . चालणे ,चालणे आणि फक्त चालणे !चालायला सुरुवात करतो न करतो तोच मुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावली. तेच आपलं नेहमीचं नं सुटलेलं कोडं ,"परतीच्या वाटेला पाऊस का कोसळतो ?" चालता चालताच मी आणि भाऊ (पप्पु दादा) आम्ही दोघांनीच केलेला दोन वर्षआधीचा ट्रेक आठवला. 
© Sandip Wadaskar
वर्षाचा शेवटचा दिवस. ३१ डिसेंबर ! HAPPY NEW YEAR साजरा करायला अतिऊत्साही लोकांची तर लोणावळ्यामध्ये जत्रा भरते,जत्रेतलं थोडसं ट्राफिक राजमाचीला पण डायवर्ट झालेलं. आणि मग योगायोगानेच आंबट शौकिनांच्या पार्ट्या आल्याच. भरपुर गर्दी,दारूंच्या बाटल्यांचा खच आणि सगळीकडे गोंधळ. अरे काय हे ? ज्या ठिकाणी आपल्या सुवर्ण इतिहासाचा अभिमान बाळगायला हवा, ज्या ठिकाणी इतिहासकालीन वास्तुचे जतन करायला हवे,ज्या ठिकाणी वातावरणाचे पावित्र्य राखायला हवे,त्या जागेवर या आंबटशौकीनांनी तर हैदोस घालायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी आम्हाला समाजकार्यास हातभार लावणे तर दूरच,पण जे करतात त्यांच्याकडे बोट दाखवुन,त्यांची चेष्टामस्करी करण्यातच समाधान वाटते. अरे निदान स्वतःचा कचरा तरी स्वतःच्या घरी नेता येईल की नाही ? मग "आपणच करून काय फायदा",अरे पण भल्या माणसा कुठूनतरी सुरुवात करावी लागेलच ना ? असो. तर १६-१७ किमी ची वाट भर उन्हात पायपीट करून आलो होतो आणि इथवर आल्यावर हे असं.…….
© Sandip Wadaskar
हे सगळं आठवत असतानाच गणेश मंदिराजवळ केव्हा पोहोचलो कळलेच नाही. भर पावसात चिखलाची वाट तुडवत आम्ही लोणावळ्याचे अंतर कमी करत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला करवंदानी लगडलेली भरपुर झाडं आणि वरुण राजाच्या कृपेनी धोधो पाऊस ! निसर्ग राजा अगदी उदार झाला होता. मग काय चांगले मोठे,टपोरे आणि अमृतगोड करवंद, झाड अक्षरशः निष्फळ होईपर्यंत सगळे येथेच्छ हादडत होती,माकडासारखी ! करवंदे खात,पावसाळी डबक्यात उड्या मारत मनमुराद आनंद लुटत होतो. चार -साडे चार तासाच्या पायपिटीनंतर लोणावळ्यात पोहोचलो. एव्हाना मुंबई-पुणे हमरस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांची झुंबड उडाली,ट्राफिक मधुन वाट काढीत एक टपरी गाठली. गरमागरम वडापाव आणि एक-एक कटिंग चहा मारून स्टेशन गाठलं !

धन्यवाद !